
रूपकुमार काय नाव आहे नाही?
अर्ध्या त्याच्या जामीनासाठी आयुष्यात पहिल्यांदा कोर्टात आला.
त्याची आणि रूपकुमारची ओळख व्हायचं कारण म्हणजे अर्ध्या आणि मित्रमंडळीने बेत ठरवलेला, महाबळेश्वर जाण्याचा. पण जायचं तर गाडी लागंल. बाकीच्या गाड्या बघितल्या, पण भाड्यावारी जेवढे पैसे मागितले त्यापेक्षा हा फक्त पेट्रोलपाण्याच्या खर्चात पटला. गाडी मात्र अर्ध्या आणि मित्रमंडळीनं न्यायची. डायवर, टोल सगळं यांनीच बघायचं. पण झालं असं का त्याच्या दुसर्या दिवशी रूपकुमार आणि एकाचे गुटखा खाण्यावरून भांडणं झाले. फार नाही, पण एकमेकांच्या गचंडी धरेपर्यंत. त्या दिवशी पोलीस कदाचित जास्त कर्तव्यदक्ष असतील, त्यांनी दोघांना पोलीस स्टेशनात नेलं, क्रॉस केस करून घरी पाठवलं. त्यानंतर कोर्टात जामीनासाठी दोघांना आज बोलावलं. मग जामीनदार कोण? रूपकुमारनं अर्ध्याला गाठलं. पोलीस स्टेशनला रेकॉर्ड क्लिअर आहे तर दे ब्वॉ जामीन. आता नाही द्यावं तर गाडी मिळायला अडचण यायची. मग नाईलाजानं का होईना, अर्ध्या तालुक्याला आला.
इथं अर्ध्या आला तर सगळे काळ्या डगल्यात दिसणारे इसम बघून त्याला नवल वाटलं, पण तीच लोकं वकील आहेत, आणि हा त्यांचा ड्रेसकोड असल्याचं रूपकुमारकडून त्याला कळलं. इथं प्रत्येक खोलीत काही व्यक्ती कम्प्युटरसमोर बसून बटणं दाबताय. त्यांच्या मागं कपाटभरून फाईली आणि समोर बी कागदांचे गठ्ठे दिसत्याय. दोनेक रूम सोडून ठराविक अंतरानं कोर्टरूम दिसतोय, त्याच्यात पहिल्या दोन तीन सोडल्यास बाकी अख्ख्या खुर्च्या रिकाम्या. एखादा वकील खाली मान घालून अदबीनं कोर्टरूममधी शिरतो न् त्या रिकाम्या खुर्च्यांपैकी एखादीवर जाऊन बसतो. थोडा वेळ बसून परत पाठ न दाखवता बाहेर पडतो. लोकं मात्र भेदरत चपला-बूट बाहेर काढून हात जोडून आत जात्या नि झालेलं, न झालेलं काम आवरून परत येत्या. दारातला शिपाई कोंबड्यागत अधून मधून बांग द्यावी तसा कुणाच्या न् कुणाच्या नावाचा पुकारा करत राहतो. ज्याचं नाव आलं त्यानं बोचकं-बाचकं सोडून आत जावा. हा क्रम चालुय.
तेवढ्यात रूपकुमार वकीलामागून आला.
‘यांचे कागद आणले का? पैसे? जामीनाचे वेगळे आणि वकीलपत्र घ्यायचे वेगळे घेतो मी! सांगितलं ना तुम्हाला त्यानी?’ वकील नुसता मशीनगनवानी धाडधाड फायरिंगच करायला लागला.
‘एवढे घ्या! बाकीचे संध्याकाळपर्यंत देतो, घरी आणून!’ रूपकुमारनं कपाळावर आठ्या घालून काही नोटा सरकवल्या, उरलेल्यासाठी गयावया केलं.
‘हे बघ मी थांबत नाही, पण उगाच आता तू त्याच्या सांगण्यावरून माझ्याकडं आला, म्हणून मग केवळ मला जास्त बोलता येईना. नाहीतर मी इतका बिझी आहे, ह्या अश्या किरकोळ वादावादीच्या केस घेतच नाही. डायरेक मर्डर, जबरी दरोडे अश्याच केस घेतो. अन् पर केस आपले रेट ऐकशील ना, इथं बेशुद्ध पडशील.’ वकीलानं रूपकुमारला आणखी दमात घेतलं, हातातले कागदं उलटेपालटे करून पाहिले. एकदोन ठिकाणी अर्ध्याच्या सह्या घेतल्या आणि चारदोन तिकिटं रूपकुमारला आणायला लावले.
‘तवर मी काय करू?’ अर्ध्याला प्रश्न पडला. साहजिक आहे, आता रूपकुमार जाणार हे तिकिटं-बिकिटं शोधायला तर त्याच्यामागं चारदोन टपर्या फिरावा का कुठं बसून घ्यावा. म्हणजे वेळशीर वकील सांगंल तवा न्यायाधीशापुढं फायनल सह्या करून निघायला. ते ऐकून रूपकुमार पण डोकं खाजवायला लागला. वकीलानं भोवताली नजर टाकली. तर आज व्हरांड्यात यात्रा भरेल. काही लोकं खुर्च्यांवर काही जमिनीवर बशेल. मग?
‘चल माझ्या मागून. फक्त मी बोलेपर्यंत उठायचं नाही,’ म्हणत वकिलानं ठाकून-ठोकून घेतलं आणि डायरेक रूममधी रामराम-श्यामश्याम करून घुसला, त्याच्यामागं अर्ध्या गेला. वकीलानं न्यायाधीशापुढल्या रिकाम्या खुर्च्यांवर बसायला सांगितलं. कोपर्यातल्या क्लार्क का कोण असतो त्याच्याशी बारीक आवाजात खुसरपुसर केलं अन् माघारी निघून गेला. आता रे? अर्ध्याला घाम फुटला. कोर्टात बसायचं म्हणजे मोबाईल वाजू पण देता यायचा नाही, बघता यायचा नाही. आता हा वकील इथले चारपाच कोर्टरूम फिरेल, त्याच्यामागं जाता यायचं नाही. रूपकुमार गेला… मरो!
‘साक्षीदार कुठंय तुमचा?’ न्यायाधीश महोदयांनी समोरल्या वकिलाला विचारलं.
‘आलेत ते! आपण परवानगी दिली तर…’ वकील हळू पुटपुटला. अर्ध्याचं लक्ष साहजिक तिथं गेलं. तिथं साक्षीदार अन् बाकी प्रजा उभी राहते त्या पिंजर्याबाहेर एक बाकडं टाकलेलं. तिथं गावचा बातमीदार कम पत्रकार बसलेला. शेजारी काही जागा सोडून दुसरा गावचाच एक खउट मास्तर बसलेला. यायला, यांची तारीख इथं आहे तर. हा मास्तर त्या पत्रकाराला मागं काही बोललेला, त्यावरून गावात कहर झालेला. आज दोघं टक लावून न्यायाधीशाकडे बघत बसलेत.
‘तुमचं नाव काय?’ न्यायाधीशाने विचारलं. एक सफेद पायजमा, शर्टवाला इसम त्या पिंजर्यात उभा राहिला. घुसला नाही तर लगेच प्रश्न आला बी!
‘मॉह नॉव कॉ?’ त्याच्या तोंडात नेमकाच गुटखा भरेल.
‘यांनी गुटखा खाल्लेला दिसतोय. तुम्ही यांना सांगितलं नाही का? त्यांना न्यायालयात दंड होऊ शकेल असं? तुम्हाला न्यायालयाचे नियम सांगावे लागतील का?’ न्यायाधीश तापला न् घेण्यान् देण्याचं!
‘माफी असावी मिलॉर्ड! त्यांची ही पहिलीच वेळ आहे, कोर्टमध्ये येण्याची!’ वकिलान्ो घाईघाईने त्या साक्षीदाराला बाहेर नेऊन गुटखा थुकायला लावला. तर बाहेर व्हरांड्यातून मोठमोठ्यानं आवाज यायला लागला.
‘आं! त्यांला माहा गुटखा चालत नसंल तर मी काय चालायचोय? इथं पन्नासला इमल भेटती! तुम्हाला काय लागतं? माणसाला काही आंबलपानी लागतं का नाही?’ तो इसम भलता कावला. बाहेरून त्यांच्या बोलण्याचा आवाज मधी येतोय.
‘अहो मी देतो, पन्नास रुपये! पण साक्ष देईपर्यंत कृपा करून गुटखा, तंबाखू खाऊ नका. नाहीतर ते दंड ठोकतील,’ वकील अजून त्या इसमाच्या नाकदुर्या काढतोय.
‘तो दंड ठोकणार असंल तर त्याला म्हणा नाही देत साक्ष जाय! मला काही प्रेस्टीज आहे का नाही? साधं पोलीस स्टेशनला गेलं तरी हवालदार असू नाहीतं सायेब, किमान गुटख्याची पुडी काढतोच मला पाहिल्यावर… अन् इथं दंड होणार असंल तर माझं काय खेटरं अडलं का त्याच्यापुढं जायला?’ तो इसम जे बोलतोय, ते मधी ऐकायला येतंय. ते बघून दुसरा बी वकील घाईनं बाहेर निघाला.
‘ओ, हळू! इथं तुम्ही पत्रकाराच्या बाजूनं आला का नाही? तुम्ही साक्ष दिली नाही तर न्यायाधीशांना काय फरक पडेल? आपण केस हरू ना? बघा, तुम्हाला काय करायचं ते!’ वकील शेवट त्याला जाणीव करून देतोय. त्यानं गडी नरमला. अन् कुणी काही बोलायच्या आत शिरला.
‘द्या त्यांना शपथ द्या! खरं सांगेल अशी!’ न्यायाधीश शिपायाकडे बघून आदेश देतो, तसा तो एक लाल बाड घेऊन आला, त्यानं ते पुढं केलं, इसमाने शपथ घेतली. अर्ध्या सगळी प्रोसिजर बघतोय, ही आपल्याला अशी शपथ घ्यावं लागंल का? त्याला प्रश्न पडला.
‘तुमचं नाव सांगा! मागून कुठं राहता ते पूर्ण सांगा. आधार कार्ड दाखवा.’ न्यायाधीशानं एकामागोमाग एक प्रश्न डागले.
पण इसम गप्पच उभा!
‘अहो, बोला पटकन! का पुन्हा गुटखा खाल्लात?’ न्यायाधीश फिरकी घ्यायच्या मूडमधी!
‘चुकीचं बोल्लो तं दंड करित्या म्हणी तुम्ही! मी काय पहिल्यांदा कोर्टात आलोय. ह्या पत्रकार भाऊसाठी. पण तुम्ही दंड करणार असंल तर मग का बोलायचं? निदान एक चूक माफ करायला पाहिजे ना?’ इसम चाचरत बोलला. वकीलानं चमकून वर त्याच्याकडं पाहिलं.
‘बोला हो! प्रश्नाला अनुसरून बोला. फक्त हे ध्यानात ठेवा. तुम्ही साक्ष द्यायला आलात. ह्या बातमीदारांना हे शिक्षक चारचौघात अपमान करण्याच्या उद्देशाने विकाऊ दलाल म्हणाले. त्यावर हा अब्रुनुकसानीचा दावा आहे. आणि तुम्ही त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहात. आता सांगा तुमचं नाव!’ न्यायाधीश थोडं वातावरण हलकं करत बोलले.
‘मग माझं नाव दौलत खंडू आगलावे! मी बघा, इथं गावात राहतो. पण त्या वारी गुटखा संपला म्हणून पक्याच्या टपरीवर गुटखा घ्यायला गेलो. तिथं शेजारी गटारीचे काम चालू आहे ना? तिथं आमचे पत्रकार ज. रा. काणे आणि मास्तर शहाणे यांच्यात भांडण चालू होतं. मास्तर म्हणी सरपंचानं अर्धी गटार खाल्ली, पण तू साधी ओळ खरडली नाही. मंत्र्यांनं एक सगट पूल खाल्ला, तू लिहिलं नाही. तू भडवा विकाऊ दलाल आहे. असं बोलून ते निघून गेले. पण आमच्या भाऊला राग आवरला नाही. त्यानं माह्यादेखत सरपंच आणि मंत्र्याला फोन केला. म्हणी याला आताच आवरलं नाही, तर मी एक गोणी शिमिट घराला नेलं आणि मोटरसायकल घेतली हे पण अख्ख्या गावभर करील. सांगा काय करू? ते म्हणी टाक केस! मग आम्ही ह्या मोतीरामच्या पोराला नुसतं फोनवर समदं सांगितलं. यानी दोन तासात खरडून ही केस तुमच्या पुढं टाकली. बघा, असं झालं सगळं!’ त्यानं एकदमात अख्खी साक्ष संपवली.
अर्ध्यादेखत न्यायाधीशानं टपरीवाला पक्या, पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर, सरपंच नि मंत्री यांच्या सरस निरस चौकशीचे आदेश दिले. मास्तरला मोकळं सोडलं. आता नंबर अर्ध्याच्या जामीनाचा!

