
पस्तीशीचं वय म्हणजे सर्वसामन्यांसाठी आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा. पण काही क्रिकेटपटूंसाठी या वयात निवृत्तीचा टप्पा सुरू झालाय. सूर्यकुमार यादवला भारतीय संघातून वगळण्यात आलंय, नाइट क्लबमधील वादामुळे बेन स्टोक्सची इंग्लिश संघातून हकालपट्टी करण्यात आलीय, तर लॉर्ड्सच्या पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या केन विल्यमसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे.
तिन्ही घटना तशा वेगवेगळ्या, त्यांची कारणं वेगळी. पण गेल्या काही दिवसांतच घडलेल्या आणि क्रिकेटजगतात धुरळा उडवून देणार्या. मार्चमध्ये भारताने ट्वेंटी-२० विश्वविजेतेपद पुन्हा राखण्याची किमया साधली ती सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली. पण तीन महिन्यांत घोषित झालेल्या त्यानंतरच्या भारतीय संघात कर्णधार म्हणून नाहीच, तर खेळाडू म्हणूनही ‘स्काय’ स्थान मिळवू शकलेला नाही. म्हणजेच त्याला डच्चू देण्यात आलाय, हे केवढं मोठं आश्चर्य! उर्वरित दोन्ही घटना ह्या इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीमधील निकालानंतरच्या. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि त्याचा साथीदार गस अॅटकिन्सन विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्या रात्री एका नाइट क्लबमध्ये गेले आणि तिथे त्यांनी मद्यधुंद अवस्थेत हाणामारी केली. इंग्लंड क्रिकेटच्या कठोर नियमांचा भंग केल्यामुळे ह्या कर्णधारावर दुसर्या सामन्यातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि दोघांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आलेत. त्याच वेळी न्यूझीलंडच्या माथी पहिल्यावाहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा टिळा लावणारा दिग्गज कर्णधार केन विल्यमसन याने या सामन्यात अपयशी (दोन्ही डावांत अनुक्रमे ० आणि १८) ठरल्यामुळे थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून टाकला. विल्यमसन हा सध्या कर्णधार नाही; पण त्याच्या नेतृत्वानं आणि कर्तृत्वानं किवी क्रिकेटला मोठं वैभव मिळवून दिलंय.
‘सूर्या’स्ताकडे…
सूर्यकुमारकडून भारताचं ट्वेंटी-२० क्रिकेटमधील कर्णधारपद काढून घेतलं जाणं हा निर्णय रणनीतीचा; अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीनं दोन वर्षांनी म्हणजे २०२८च्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेचं लक्ष्य समोर ठेवून घेतलेला. या दृष्टीनं सूर्यानंतर आता श्रेयस अय्यर ह्या भूमिकेसाठी त्यांना योग्य वाटतोय. बरं नेतृत्व गमावण्यापर्यंत ठीक आहे. पण संघातलं स्थानही तो टिकवू शकलेला नाही. यासाठी कारणीभूत ठरला तो त्याचा धावांसाठीचा संघर्ष. ट्वेंटी-२० विश्वचषकात ९ सामन्यांत २४२ धावा ही त्याची कामगिरी. अमेरिकेविरुद्ध वानखेडेवरील पहिल्या सामन्यात भारताचा डाव गडगडला असताना साकारलेल्या नाबाद ८४ धावांची खेळी वगळल्यास नंतर एकही अर्धशतक त्याला नोंदवता आलं नाही. या विश्वचषकाआधीही त्याचं धावांसाठी झगडणं सुरूच होतं. ह्या विश्वचषकादरम्यान सूर्यानं ज्या संजू सॅमसनची थट्टा उडवली, त्यानेच मग आपल्या आश्चर्यकारक खेळींनी भारताला जिंकून देण्याचा सपाटा लावला. त्यामुळे सूर्याची समाजमाध्यमांवर क्रिकेटचाहत्यांनी हुर्यो उडवली.

मग आलं ‘आयपीएल’. एकीकडे मुंबई इंडियन्स संघाची विजयाच्या दुष्काळामुळे होरपळ होत असताना सूर्याचा रुबाब कुठेच दिसला नाही. १३ सामन्यांत २७० धावा आणि २०.७६ची सरासरी त्याला अजिबात शोभणारी नाही. गेल्या काही महिन्यांत सूर्या ‘मिस्टर ३६०’ या बिरुदाला साजेशी फलंदाजी करीत नाही. त्याचा सुपला बर्याचदा अपयशी ठरतो. त्याचे कच्चे दुवे ‘आयपीएल’मध्येच नव्हे, तर टी-२० मुंबई लीगमध्येही प्रतिस्पर्धी संघांनी सहज हेरल्याचे प्रत्ययास येते. या लीगमधील सूर्याच्या ट्रम्फ नाइट मुंबई नॉर्थ ईस्ट संघानं साखळीत ५ पैकी फक्त १ सामना जिंकला, तर ४ पराभव पत्करले. इथे ५ सामन्यांत १६३ धावा त्याच्या खात्यावर होत्या. त्यामुळे त्याचं अस्तित्व जाणवलंच नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर कपिल देव, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्यासारखा विश्वविजेतेपद जिंकणारा कर्णधार होणं, हे विधिलिखित होतं; पण तसं मोठेपण त्याच्यात कुठेच दिसत नाही. त्यामुळे सूर्याची कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करतेय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
वादग्रस्त स्टोक्स
इंग्लंडच्या महान अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये बेन स्टोक्सची गणना केली जाते. क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडची विश्वविजेतेपदाची प्रतीक्षा गेल्या आठ वर्षांत संपुष्टात आली. २०१९मधील एकदिवसीय आणि २०२२मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक इंग्लंडनं जिंकला, त्या दोन्ही यशांमध्ये स्टोक्सचा सिंहाचा वाटा होता. २०२२मध्ये ब्रेंडन मॅककलम इंग्लंडच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला. त्यानं इंग्लिश क्रिकेटला आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेटचा मार्ग दाखवला, जे तत्वज्ञान क्रिकेटविश्वात ‘बॅझबॉल’ म्हणून ओळखलं जातं. हे विकसित करताना स्टोक्सकडे कसोटी कर्णधारपद देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इंग्लंड क्रिकेटला मोठं यश मिळालं. पण मैदानावर अष्टपैलुत्व दाखवणारा स्टोक्स मैदानाबाहेरच्या वर्तणुकीमुळे अनेकदा वादाच्या भोवर्यात सापडला. सप्टेंबर २०१७मध्ये बिस्टल येथे वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामना संपल्यानंतर स्टोक्स आणि त्याचा साथीदार अॅलेक्स हेल्स यांनी एका नाइट क्लबबाहेर रस्त्यावर धुडगूस घालून मारहाण केली. या प्रकरणी या दोघांना पोलिसांनी अटक केली. यात स्टोक्सही जखमी झाला होता. हे प्रकरण पुढे न्यायालयातही चाललं. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानं त्याच्यावर कारवाई करीत ३० हजार पौंड आर्थिक दंड आणि आठ सामन्यांची बंदी अशी शिक्षा दिली. स्टोक्सनं अनेकदा आपलं मानसिक आरोग्य ठीक नसल्याचं मोकळेपणानं जाहीर केलं होतं. मनस्वास्थ्याकडे लक्ष केंद्रित करता यावं, म्हणून त्यानं जून २०२१मध्ये अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला. बिस्टल नाइट क्लब प्रकरण, करोनाची साथ आणि वडील गेड स्टोक्स यांचा मेंदूच्या कर्करोगामुळे मृत्यू या घटनांचा आपल्या आयुष्यावर परिणाम झाला असून आपण भयगंड आणि भीतीचे तीव्र झटके यांना सामोरं जातोय, हे त्यानं कबूल केलं.

ऑगस्ट २०२२पर्यंत तो मानसिक उपचार घेत होता. याशिवाय दुखापती आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्षही होतेच. म्हणूनच त्याच्या ताज्या वादानंतरही काही क्रिकेटपटू त्याच्या समर्थनार्थही मतप्रदर्शन करतायत. सध्या स्टोक्स निवृत्ती पत्करेल अशी चर्चा ऐरणीवर आहे. पण एक उत्तम कारकीर्द आदर्शवत ठरण्याऐवजी कशी डागाळली जाते, याचं उदाहरण म्हणजे स्टोक्स.
आदर्शवत् विल्यमसन
केन विल्यमसनची न्यूझीलंडचा यशस्वी कर्णधार म्हणून ख्याती. शैलीदार फलंदाजी आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी ही त्याची वैशिष्ट्यं. कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा काढणारा हा अवलिया. न्यूझीलंडला कसोटी क्रिकेटमधील विश्वविजेतेपद त्यानं जिंकून दिलं. याशिवाय २०१९मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०२१मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचं उपविजेतेपद किवी संघाला मिळालं, त्यावेळी विल्यमसनच कर्णधार होता. एक आदर्श क्रिकेटपटू म्हणून त्याची ओळख क्रिकेटमध्ये ठळकपणे जाणवते. कठीण परिस्थितीतही तो संयम राखतो, प्रतिस्पर्धी संघाच्या चांगल्या खेळीचं तो नेहमी कौतुक करतो, वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाच्या हिताला अधिक महत्त्व देतो, ही त्याची खासियत. इतका मोठा खेळाडू असूनही त्याच्यात अजिबात अहंकार दिसत नाही. २०१९च्या विश्वचषकात न्यूझीलंडला अत्यंत दुर्दैवी आणि वादग्रस्तरीत्या पराभव पत्करावा लागला. स्टोक्सच्या बॅटला लागून चेंडू सीमारेषेबाहेर जाणं आणि अतिरिक्त ४ धावा मिळणं. यासंदर्भात अनेकांनी आपली नाराजी प्रकट केली. पण विल्यमसन अपवाद ठरला. काही घटना नियंत्रणाबाहेरील असतात. त्या घडल्या की स्वीकारणं कठीण जातं, असं पत्रकार परिषदेत तो सहजपणे म्हणाला. पण तरीही आकाडतांडव न करता शांतपणे त्यानं पराभव स्वीकारला.

गेल्या काही वर्षांत विल्यमसन खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या संघाला खंबीरपणे उभं करतोय. पण आकडेवारी स्पष्टपणे बोलते. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध ऐन मालिका चालू असताना मध्यावरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं तात्काळ निवृत्ती जाहीर केली. ‘मी याबद्दल बर्याच काळापासून विचार करत होतो, पण गेल्या काही दिवसांत मला स्पष्टपणे जाणवलं की आता योग्य वेळ आली आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली. स्टोक्सची ही निवृत्तीदेखील त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी ठरली. म्हणूनच त्याचं गुणगान गाणं अपरिहार्य ठरतं.
