
काही गोष्टी योगायोगाने घडतात आणि परमेश्वरी योजनेवरचा आपला विश्वास दृढ करतात हेच खरे. गेल्या रविवारी असाच एक योग जुळून आला आणि फारसं काही ध्यानीमनी नसताना मला आईबरोबर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्याचे भाग्य लाभले. सुरू झालेली विचारचक्रं अशी गतिमान होऊन फिरली म्हणून सांगू की निमिषार्धात सगळं आयोजन तर झालंच, पण त्याच वेगात आम्ही दोघं पोहोचलोही नर्मदामाईच्या कुशीत!
आई आणि मी मुंबईत भेटलो तेही मैय्याच्या एका लेकीच्याच घरी. सुजातानी केलेलं अगत्य आणि तिच्या घरी जाणवलेली आपुलकी शब्दातीतच! गाडीने टिलकवाडा गाठेपर्यंत सगळं नेहमीप्रमाणेच होतं बघा, मात्र मैय्याच्या प्रथमदर्शनानी मन सुखावले. वातावरणातील उष्मा मनातील नामस्मरणाच्या गारव्यात सुखावह तर झालाच, पण ओघळलेल्या अश्रूंनी आनंदाची ग्वाही दिली. वासणच्या श्री वासुदेव आश्रमात अस्खलित मराठी बोलणार्या गुरुजींकडून ह्या, वाहनाने केलेल्या, परिक्रमेचा संकल्प सोडला आम्ही. त्याचीच पहिली पायरी म्हणून एका वाटीत भिजवलेले अष्टगंध समोर करून त्याचा टिळा स्वतःलाच लावायला सांगितला त्यांनी. आजवर का कधी लावला नव्हता का हो अष्टगंधाचा टिळा! पण तिथली अनुभूतीच निराळी! त्या सुखद गार स्पर्शात आणि अवर्णनीय सुगंधात मैय्याचा आशिर्वाद होता जणू!
केशर, चंदन, भीमसेनी कापूर आदी आठ घटकांपासून निर्मिलेले हे अष्टगंध तसे सुपरिचितच. केशरी रंगाची अतिशय गुळगुळीत आणि विशेष सुगंधी अशी ही पूड आपल्या घरातील पूजासाहित्यात असतेच नं! कधी बारीक दाण्यांच्या तर कधी कांडीच्या रूपातही मिळते म्हणा हे अष्टगंध. वातावरणाबरोबरच मनातही सात्विकता भरणारा तो गंध नकळत आपली नाळ त्या परमेशाशी जोडतो, नाही का? गंधाचे अनेक प्रकार उपलब्ध असतांना ह्या अष्टगंधाचे नेमके महत्व काय हो!
अष्ट म्हणजे आठ, हा आकडाच मुळी पुराणात संपत्ती व समृद्धीचे प्रतीक मानला गेलाय. अष्टलक्ष्मी, अष्टविनायक, अष्टनिधी, अष्टसिद्धी अशी अनेक दैवी रूपं ह्या आठाच्याच पटीत सामोरी येतात, ती उगीच नाही. अष्टदिशांचे महत्व तर आपण सगळेच जाणतो व इष्ट दैवताला नी श्रीगुरूंना आपण वंदनही साष्टांगच करतो की. ह्या सगळ्याच गोष्टी साधकाला समृद्ध करणार्या! त्याच रांगेत हे अष्टगंधही बसवायला हरकत नसावी कुणाची! रंगसुगंधाची ती कुपी उघडली की मनांत भक्तिगंध तर दरवळतोच.
हाच भक्तिगंध अनुभवला आम्ही ह्या एकदिवसीय परिक्रमेतही. केवळ चैत्रात माई उत्तरवाहिनी होते म्हणून ह्या परिक्रमेचे महत्व ह्याच दिवसांत. दुथडी भरून वाहणारी नर्मदामैय्या आणि तिच्या दोन्ही तटांवरची समृद्धी ही केवळ अनुभवण्याचीच गोष्ट. ज्वारी, बाजरी, कपाशीच्या जोडीलाच शेवग्याच्या शेंगा, पेरू, एवढेच काय पण सुखेनैव डोलणारे कडूलिंबाचे वृक्ष सुद्धा त्या समृद्धीची साक्ष देतात. कोणतीही नदी ही दुहिताच असते, मैय्याचे महत्व तर जगावेगळे. भक्ती, ज्ञान, वैराग्य देणारी ही पुण्यसलीला! असं म्हणतात की गंगास्नानानी पापमुक्ती होते, पण नर्मदामैय्याच्या केवळ दर्शनानेच ती पापमुक्ती साधते. किती आणि काय देते हो ही मैय्या तुम्हाआम्हाला?
बाकी तर सगळे घेतच असतो की आपण; पण घेता घेता तिचे ते देणारे हात घेता आले तर आयुष्याचे सोने होईल, ह्यात दुमत नाहीच! तिच्याशी स्वतःची तुलना करण्याचे शिवधनुष्य पेलवणारे नाहीये, तरी त्याच शक्तीचा एक अंश म्हणून यथाशक्ती यथामती ते दातृत्व अंगिकारता आले तर आपलेच जीवन जास्त समृद्ध होईल हे नक्की. ‘दारी आलेला याचक, लावी न सुज्ञ परत देख’ दासगणु महाराज श्री गजानन महाराजांच्या पोथीच्या पहिल्या अध्यायातच हे मोठं मर्म सांगून जातात. देणार्याने देण्याची संधी दिली म्हणून त्या याचकाप्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे हा संदेश स्वामी विवेकानंदही वारंवार देतातच की.
काय देणार हो मग आपण नेमके? विचारांना योग्य दिशा, भरकटलेल्या जीवाला आधार, थकलेल्या पावलांना विश्रांतीचे क्षण आणि निरपेक्ष प्रेमानंदापलीकडे खरंच काही नको असतं बघा कुणालाच. ही सगळी सकारात्मकता पेरण्याची विविध माध्यमं. आपल्या मनात तेवत असलेली ही सकारात्मकतेची ज्योत अशी प्रभावी ठरावी की नकळत समोरच्याकडेही ती प्रज्वलित व्हावी. पैसाअडका, धनधान्य ह्या गोष्टी महत्वाच्या असतातच, पण पोटापुरते कमावण्याची सोय आणि क्षमता परमेश्वर नक्की देतो. त्यापलीकडे माणसाला माणूस म्हणून स्वीकारून एकदा का नर्मदामैय्याच्या आशीर्वादाने ही अलौकिक देवाणघेवाण सुरू असली की दोहोंचे आयुष्य उजळून निघेल, दोन्ही बाजू सुगंधित होतील… अष्टगंधाचा टिळा मिरवणार्या कपाळाबरोबर तो लावणार्या बोटासारख्याच!

