• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चिरा आणि निष्ठा!

योगेंद्र ठाकूर बेधडक

marmik by marmik
June 30, 2026
in बेधडक
0
चिरा आणि निष्ठा!

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली, त्याला ६० वर्षे पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या वाटचालीत सुरुवातीस साप्ताहिक ’मार्मिक’ने मोलाची भूमिका बजावली. ’मार्मिक’मुळे शिवसेनेचा जन्म झाला. त्यानंतर शिवसेना वाढवण्यात दै. ’सामना’चेही मोलाचे योगदान राहिले आहे. शिवसेनेची भूमिका महाराष्ट्रात व देशात पोहोचवण्याचे महत्त्वाचं काम ’सामना’ने केलं, आजही ते सुरू आहे. सामनातून छापून आलेल्या बाळासाहेबांच्या मुलाखती म्हणजे शिवसेनेची वर्तमानातील भूमिका आणि भविष्यातील वर्तमान होते. या बाळासाहेबांच्या मुलाखतीमधून शिवसैनिकांना आणि नेत्यांनाही सतत मार्गदर्शन होत राहिले. आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सामनातून मुलाखतीद्वारे पक्षाची भूमिका व रूपरेषा मांडताना दिसतात. त्यातून सामान्य शिवसैनिकांना कार्याची दिशा मिळते. तर उद्धवजींनी घेतलेल्या निर्णयामुळे मराठी माणसाला आधार मिळतो. मराठी वृत्तपत्रांनी शिवसेनेच्या कार्याला जेवढी प्रसिद्धी द्यायला हवी होती तेवढी दिली नाही, आजही देत नाहीत.

गेल्या ६० वर्षांत शिवसेनेला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. त्याला हा मीडिया आणि मराठी माणूस काही प्रमाणात कारणीभूत आहे. इतर राज्यांत, प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांत, प्रादेशिक पक्ष त्या राज्याची सत्ता काबीज करतात. दोन वर्षांपूर्वी उदयास आलेला तामिळी अभिनेता जोसेफ विजय यांचा टीव्हीके हा प्रादेशिक पक्ष तामिळनाडूत सत्तेवर आला आहे. याआधी गेली ४० वर्षे तामिळनाडूमध्ये कधी द्रमुक तर कधी अण्णा द्रमुक सत्तेवर होती. आंध्र प्रदेशात तेलगू देशम हा प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहे. गेल्या ३०-३५ वर्षांत तो चार वेळा सत्तेवर आला आहे. तेलगू अभिनेता एन.टी. रामाराव यांनी (तेलगू बिट्टा) तेलगू अस्मितेचा अंगार फुलवला आणि तेलगू देसम पक्षाला १९८२ साली प्रथम आंध्र प्रदेशच्या सत्तासिंहासनावर बसवले. २०१४मध्ये तेलंगण राज्याची निर्मिती झाली, तिथे के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा प्रजा समिती हा प्रादेशिक पक्ष सत्तेत आला. ९ वर्षे तेलंगणाची सत्ता त्यांनी राबविली. दक्षिणेतील स्वाभिमानी भाषाभिमानी जनता आणि तेथील माध्यमे त्या प्रादेशिक पक्षांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली, राहत आहेत. त्या प्रमाणात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माध्यम शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली नाहीत. आजही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणे शिवसेनेला महाराष्ट्राची सत्ता लवकर काबीज करता आली नाही. स्वबळावर शक्य झाले नाही.
१९९५ साली शिवसेना-भाजपा युतीचे ‘शिवशाही’ सरकार महाराष्ट्रात प्रथम सत्तेवर आले आणि शिवसेना नेते मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. हे सरकार सत्तेत येण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जादुई करिश्माई चमत्कार होता तो. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात शिवसेना सत्तेत होती. २०१९ साली शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विराजमान झाले. भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा शब्द न पाळल्यामुळे शिवसेनेला हा वेगळा निर्णय घ्यावा लागला.

शिवसेना सत्तेवर बसली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांना रुचले नाही. भाजपाचे ११५ आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्यास काही अडचण नव्हती. राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना जवळ करून सत्ता स्थापण्याचा प्रयत्नही केला, पण तो ४८ तासही टिकला नाही. देवेंद्र फडणवीस व अजित दादा औट घटकेचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ठरले. मग एकनाथ शिंदे यांना पुढे करून जून २०२२मध्ये भाजपाने शिवसेनेत मोठी फूट पाडली. पण देवेंद्र फडणवीस यांच्या पदरी निराशाच पडली. भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने फडणवीस यांना मुख्यमंत्री न बनवता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. शिवसेनेत फूट पडली पण शिवसेना कमजोर झाली नाही. कारण शिवसेनेची पाळेमुळे मराठी मनात घट्ट रुजली आहेत.

आज देशातील विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्ष संपवण्याचा सपाटा भाजपाने लावला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर-पदाधिकार्‍यावर खोट्या केसेस टाकल्या आहेत. ईडी इन्कमटॅक्स, सीबीआयचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला आहे. निवडणुकीत निवडणूक आयोगाला हाताशी धरून हेराफेरी केली जात आहे. न्यायपालिकेला हाताशी धरून शिवसनेचे चिन्ह आणि पक्ष गद्दारांना बहाल केले. भाजपने राष्ट्रवादी पक्ष फोडून त्याचीच पुनरावृत्ती केली. पश्चिम बंगालमध्येही निवडणूक यंत्रणा हाताशी धरून तृणमूल काँग्रेसचा पराभव करून भाजपाने गैरमार्गाने सत्ता मिळवली आहे. तृणमूल काँग्रेसच्या ८०पैकी ५८ आमदारांनी तृणमूलमध्ये वेगळी चूल मांडली. त्यामागे भाजपचाच हात आहे. कारण या फुटीर गटाच्या बॅनर्जी यांना भाजपच्या सभापतीने लगेच विरोधी पक्षनेत्याची मान्यता दिली आहे. तृणमूलचे २८पैकी २० लोकसभा खासदारही भाजपने फोडले आहेत.

भाजपा देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते आहे. काही ठिकाणी प्रादेशिक पक्ष कमजोर केले आहे. महाराष्ट्रात मूळ शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला पण शिवसेनाप्रमुखांची शिवसेना अशी संपणार नाही उल्ाट ती उसळून वर येणार. शिवसेना आता संपली असे वाटत असताना २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले. मुंबईतून तीन खासदार निवडून आले तर एक उमेदवार अवघ्या ४८ मतांनी पराभूत झाला. ही जागा चोरली असेच सर्वांचे मत आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातून २० आमदार निवडून आले. त्यापैकी १० आमदार एकट्या मुंबईतून निवडून आले. यावर्षी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईतून शिवसेना हद्दपार होणार, शिवसेना संपणार असे भाकीत भाजपा आणि त्यांच्या सत्तास्वार्थी मित्रपक्षांनी केले होते. परंतु मूळ शिवसेनेचे ६५ नगरसेवक निवडून आले. मुंबई मनपाची सत्ता पुन्हा मिळाली नाही. पण लक्षणीय यश मूळ शिवसेनेस मिळाले. मुंबईतील मराठी माणसाने शिवसेनेवर विश्वास दाखवला. भाजपा व मित्रपक्षाने पैशाचा खेळ केला. निवडणूक यंत्रणेचा व सत्तेचा गैरवापर केला तरी मूळ शिवसेनेला हे लक्षणीय यश मिळाले हे नाकारून चालणार नाही.

महाराष्ट्रात शिवसेनेला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही म्हणून काही जण टीका करतात. पण सत्ता असताना आणि नसतानाही शिवसेना वाढतच राहिली आहे. गेल्या ६० वर्षांत शिवसेनेत १९९०, २००५-२००६ आणि २०२२मध्ये फूट पडली. पण शिवसेना संपली नाही. शिवसेनेने अनेक जय-पराजय पाहिले. अनेक वादळी संकटांना तोंड दिले पण शिवसेना नावाचा वटवृक्ष कोलमडला नाही. त्याची पाने गळून पडली, फांद्या झडल्या पण वटवृक्ष कोसळला नाही. शिवसेना हा न वठणारा वटवृक्ष आहे.

जून २०२२मध्ये मोठी फूट होऊनही उद्धव ठाकरे हे डगमगले नाही. धैर्याने या संकटाला सामोरे गेले. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला. शिवसेनेशी गद्दारी केली. निकटवर्तीय नेते सोडून गेले, सत्ता गेली, शिवसेना पक्ष व चिन्हही चोरले. पण उद्धवजींनी शिवसेनेवर आलेल्या या सर्व संकंटांना समर्थपणे तोंड दिले. आजही शिवसेनेने आपला दरारा कायम ठेवला आहे. कारण मूळ शिवसेनेकडे कडव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज आहे. तेच शिवसेनेचे बलस्थान आहे. शिवसैनिकातील हा कडवटपणा, चिवटपणा शिवसेनेची पुढील वाटचाल यशस्वी करण्यासाठी व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्पष्टवक्ते होते. उद्धवजी संयमी व विवेकी आहेत. बाळासाहेबांनी शून्यातून शिवसेना उभी केली तर उद्धवजी संकटातून शिवसेनेला आधार देऊन शिवसेना पुन्हा मजबूत करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेना पुन्हा उभारी घेईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र व मराठी माणसाचे हित हाच शिवसेनेचा अजेंडा आहे. शिवसेनेप्रमाणेच प्रादेशिक अस्मितेतून अनेक प्रादेशिक पक्ष निर्माण झाले ते तिथे सत्तेतही आले. परंतु त्या प्रादेशिक पक्षांत आणि शिवसेनेत फरक आहे. ‘प्रथम देश मग राज्य’ अशी शिवसेनेची भूमिका आहे. काही प्रादेशिक पक्ष फुटीरतेची भूमिका घेतात. शिवसेनेवर संकुचित विचारसरणीचा पक्ष, प्रादेशिक पक्षाची टीका झाली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ‘प्रथम देश मग राज्य’ ही भूमिका मांडली. ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ ही शिवसेनेची भूमिका कायम आहे.

शिवसेनेला कमजोर केले तरी आज निष्ठावंत शिवसैनिकांच्या जिवावर संकटातही शिवसेना संघटना खंबीरपणे उभी आहे आणि मार्गक्रमण करीत आहे. साडे तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तो किल्ला लाटांचे तडाखे खातोय. त्या लाटांच्या तडाख्याने किल्ल्याचे दगड झिजले, पण दोन दगडांना साधणारा चिरा अजून तसाच आहे. दगड झिजतील, पण चिरा तो मात्र चिरंतर राहील. हा चिरा म्हणजे ‘निष्ठा’. माणसे येतील-जातील पण निष्ठा मात्र अखंड आणि अथांग राहील. हा निष्ठावंताचा चिरा एक-एक दगड घट्ट धरून ठेवेल आणि शिवसेनेचा किल्ला पुन्हा मजबूत करून शिवसेनेचे आणि महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल घडवेल!
शिवसेना हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. कारण शिवसेनेशी मराठी माणसाची नाळ १९६६ सालापासून जुळली आहे. मुंबईत-महाराष्ट्रात मराठी माणसाला मान-सन्मान मिळवून देण्याचे महत्कार्य केले आहे. त्यासाठी गेल्या ६० वर्षांत अनेक आंदोलने, संघर्ष केले आणि त्यासाठी काही शिवसैनिकांनी आपले बलिदानही दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम झोपलेल्या मराठी समजाला जागे केले, जे जागे होतेच त्यांना स्वाभिमानाने उभे केले. जे उभे होते त्यांना चालते केले आणि जे चालत होते, त्यांच्या खांद्यावर ‘महाराष्ट्र धर्मा’चा भगवा झेंडा दिला. हाच महाराष्ट्र धर्माचा, मराठी अस्मिता आणि स्वाभिमानाचा झेंडा घेऊन गेली ६० वर्षे शिवसेना वाटचाल करीत आहे, करीत राहील.

Previous Post

गंध अष्टगंधाचा… नर्मदामाईच्या दातृत्वाचा…

Next Post

आंब्राई

Next Post
आंब्राई

आंब्राई

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.