• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

माझे साडी पुराण!

लीना पांढरे (विशेष लेख )

marmik by marmik
June 5, 2026
in विशेष लेख
0
माझे साडी पुराण!

वयाची पहिली वीस वर्षे विद्यार्थीदशेत काय पेहरावे यावर फारशी बंधनं नव्हती. दहावीपर्यंत गणवेश होता पण अनेकदा तो न घालता भलतेच कपडे घालून गेल्याने वर्गाबाहेर तासभर उभं राहायची शिक्षा सहन करावी लागे. पण मला त्याची सवय झाली होती.
१९८७मध्ये वयाच्या २३व्या वर्षी ठिकठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करत होते. तेव्हा पुण्याजवळ भोर येथील महाविद्यालयात नोकरी मिळाली तर प्राध्यापक असणारी आई म्हणाली, ‘अगं खेड्यातील विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. तू फार छोटी दिसतेस. विद्यार्थ्यांमध्येच मिसळून जातेस. त्यामुळे साडी नेसत जा. प्रभाव पडेल.’ म्हणून नाईलाजाने साडी नेसायला सुरुवात केली. भोर, वङ्कोश्वरी, चाळीसगाव, मालेगाव अशा नोकर्‍या धरत सोडत नाशिकच्या कॉलेजला आले तेव्हा चक्क २८ वर्षांची झाले होते. ‘दे राजीनामा शोध नवीन गाव, नवीन कॉलेज’ असं करून करून बारा गावचे पाणी प्यायले होते.

चक्क दोन वर्ष एका कॉलेजला सलग नोकरी करून परमनंट झाले होते आणि त्यामुळे मूल जन्माला घालता आलं होतं. बाळंतपणाची रजा मिळणार नसेल, पगार थांबणार असेल तर मूल जन्माला घालण्यासारख्या चैनी परवडणार्‍या नव्हत्या. मूल जन्माला घालू का, हे नवर्‍याला विचारण्याच्या अगोदर २४ तासांची बाई शोधून तिची परवानगी विचारली. ती म्हणाली, ‘हो घाला! मी सांभाळेन.’ मग मूल जन्माला घालण्याचा हॉस्पिटलचा खर्च, बाकीचे खर्च असे पैसे साठवले आणि मग घातलं पिल्लू जन्माला.

आईला अजिबात मुलाबाळांची आवड नव्हती. मीच अपघाताने झालेले. ‘असलं काही केलंस तर तुझं तू निस्तार’ असं तिनं आधीच सांगितलेलं. नवरा पुण्यात नोकरी कामधंद्यासाठी संघर्ष करत होता, त्यामुळे त्याची फार इच्छा नव्हती. पण कामाच्या मावशी आणि बँकेत साठवलेले पैसे, नोकरीत भर पगारी मिळणारी तीन महिन्यांची रजा या गोष्टींच्या जिवावर घातलं पिल्लू जन्माला.
नवीन शहर, सहा महिन्यांच्या बाळाला बेबी कॅरिअरमध्ये घालून पोटाशी बांधून भल्या पहाटे पाळणाघरात पोहोचवणे आणि नंतर तसेच एमएटीवर सकाळी साडेसातचे कॉलेजमधील लेक्चर गाठणे, त्यातून पहाटे उठून पाळणाघराची बॅग तयार करणे अगदी लंगोटापासून वावडिंग टाकून उकळलेल्या गाईच्या दुधापर्यंत. या सव्यापसव्यामध्ये साडी नेसून जाणं हे कठीण होऊ लागलं होतं. तेव्हाचे प्राचार्य लवकरच निवृत्त होणार होते. त्यांची पत्नी मला म्हणाली, ‘आता तू कशाला साडी नेसते? पंजाबी ड्रेसमध्ये ये.’ मी म्हटलं, ‘प्राचार्यांना चालेल का?’ ती म्हणाली, ‘तू वेळेवर येणं, उत्तम शिकवणं याच्याशी त्यांना मतलब आहे. पुन्हा नवीन प्राचार्य आल्यावर ते कसे असतील कोणास ठाऊक! तू आत्तापासूनच पंजाबी ड्रेस वापरायला सुरुवात कर.’ मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच पंजाबी ड्रेस वापरायला सुरुवात केली.

पाच वर्षं दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या वर्गांना शिकवून मला समजलं होतं की तुम्ही काय कपडे वापरता याला शून्य महत्त्व आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवता? तुम्हाला त्यांच्याबद्दल किती जिव्हाळा आहे? दोनशेजणांच्या वर्गात शेवटच्या बेंचवर बसलेला पोरगा त्याच्या वहीच्या शेवटच्या पानावर काय खरडतो आहे तिकडे तुमचं लक्ष आहे का? या गोष्टी मॅटर करतात. पण नवीन आलेले प्राचार्य बुवा फारच परंपरावादी निघाले. त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून ‘उद्यापासून साड्या नेसून येत जा,’ असं फर्मान सोडलं. मी सौम्यपणे नकार नोंदवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी तुमची बदली करू अशी धमकीही दिली पण मी काही बधले नाही. त्यावेळेला प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक दीक्षित यांनी मुद्दाम प्राचार्यांच्या समोर मला ‘का हो साडी नेसून येत नाही?’ असं विचारलं. मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की ‘मला माझ्या एमएटीवर कधी गॅसचा सिलेंडर बांधून न्यायचा असतो. कधी गावातून धान्याचे पोते बांधून न्यायचं असतं. पोटाला मूल बांधलेलं असतं, त्याची बॅग असते, कसं शक्य आहे साडी नेसून सर्व करणं?’ हे स्पष्टीकरण दिलं आणि लगेच तेव्हा सर्व वर्तमानपत्रांत छापून आलेली एक बातमी पण दीक्षित सरांना दाखवली. कोणी स्वाती पुंगलिया नावाची प्राध्यापिका पुण्यामध्ये महाविद्यालयाच्या प्रशासनाने साडी अनिवार्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात गेली होती. तेव्हा तिला नोकरीवरून काढून टाकले गेले. तिने कोर्टामध्ये जाऊन लढा दिला आणि ती जिंकली. जितका काळ ती घरी राहिली तितक्या काळाचा पगार प्रशासनाला भरून द्यावा लागला आणि सन्मानाने तिला पुन्हा कॉलेजमध्ये रुजू करून घ्यावं लागलं.

प्राचार्यांनी मला साडीवरून अपमानित करण्याचा बराच प्रयत्न करून पाहिला. स्टाफ मीटिंगमध्ये हिणवून पाहिलं. पण मी दाद दिली नाही. इतकंच नाही तर हे प्राचार्य रविवारी आसपासच्या धरणांवर प्राध्यापक प्राध्यापिकांच्या सहली काढत असत. मी त्या सहलीला जायला स्पष्ट नकार दिला. बाकीच्या प्राध्यापिका बदली होऊ नये म्हणून घाबरून आपली छोटी छोटी मुलं घेऊन सहलीला जायच्या. यावर मी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘स्त्रियांचे कार्यालयीन अनुभव’ म्हणून लिहिले. त्यामुळे मी ‘पेपरवाली बाई’ झाले आणि या मंडळींनी माझ्या वाटेला जाणं बंद केलं आणि पुढील तीस वर्ष साडीपासून माझी मुक्तता झाली. ही कहाणी १९९३/९४च्या सुमारास घडलेली आहे .आज त्याच व्ाâॉलेजात निदान शंभर तरी प्राध्यापिका असतील. त्या सगळ्या जणी पंजाबी ड्रेस आनंदाने घालतात. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही आहे असं कोणालाही वाटत नाही.

प्राध्यापक मंडळींचे दोष दाखवणारा एक भन्नाट लेख मी तेव्हा मटामध्ये लिहिला. त्यामुळे माझी बदली केली गेली. वयाच्या ५५व्या वर्षी मी नवीन नोकरी शोधायचं ठरवलं. परत प्राध्यापकाची नोकरी मिळणं कठीण होते. प्राचार्यांचे पद एकमेव पद मानले जात असल्यामुळे ते ओपन कॅटेगरीला जायचे. मी तीन ठिकाणी प्राचार्यपदासाठी प्रयत्न केला. सुदैवाने नाशिकमध्ये एका महिला महाविद्यालयाची प्राचार्य म्हणून माझी निवड झाली. खरं म्हणजे मी मुलामुलींनी एकत्र शिक्षण घ्यावं अशा मताची आहे. वेगळं महिला महाविद्यालय हे प्रकरण मला पटणार नव्हतं. त्यातून त्या संस्थाचालकांची कदाचित मी साडी नेसावी अशीच अपेक्षा असणार अशा अंदाजाने मी चुपचाप सुरुवातीच्या काळात म्हणजे नोकरीत कन्फर्मेशन मिळेपर्यंत साड्या गुंडाळल्या आणि कन्फर्मेशन मिळाल्यानंतर शिंगे बाहेर काढून साड्या नेसणे बंद केले. खरं म्हणजे त्या काळात सुद्धा मला माझ्या महाविद्यालयाच्या प्रशासनाने साड्या नेसा, असं सांगितलं नव्हतं. पण विद्यार्थिनी मिळवण्यासाठी मी माझ्या प्राध्यापकांबरोबर आसपासच्या खेड्यांमध्ये जायचे, तिथल्या सरपंचांना भेटायचे तेव्हा काही वेगळं लक्षात यायचं. या सगळ्या ग्रामीण भागातून माझ्याकडे येणार्‍या विद्यार्थिनी होत्या, त्यांच्यातल्या काहींच्या पालकांची मानसिकता जुनाट परंपरावादी होती. को-एज्युकेशन असणार्‍या कॉलेजात आम्ही आमच्या लेकींना पाठवणार नाही, असे वाटणार्‍यांना साडीवाली प्राचार्य जास्त विश्वसनीय वाटली असणार. मला महाविद्यालयामध्ये प्रवेश वाढवायचे होते, कारण माझ्या कॉलेजच्या आसपास अजून एक महिला महाविद्यालय सुरू झालेले होते आणि दोन तीन छोटी छोटी नवीन कॉलेज सुरू झालेली होती. त्यामुळे दोन वर्ष साडी-कुंकू-मंगळसूत्र असा नाटकात काम केल्यासारखा सारा जामानिमा करून मी जात होते. माझ्या दोन्ही मुलांचे, माझ्या मित्र-मैत्रिणींचे भरपूर शिव्याशाप त्या काळात मी खाल्ले आहेत.

मी प्राध्यापकाची नोकरी सोडून प्रशासकाची म्हणजे प्राचार्याची नोकरी स्वीकारल्यामुळेही माझ्या मुलांचाही रोष ओढवून घेतला होता. कारण प्राचार्य झाल्यानंतर तुम्हाला बर्‍यापैकी धूर्त, लबाड व्हावे लागते. अकॅडमिक सोडून बर्‍याच लष्कराच्या भाकर्‍या भाजाव्या लागतात. पण हे उद्योग करत असताना प्राचार्य असूनही मी आठवड्याला बारा लेक्चर्स घेत होते. कारण शिकवणं ही गोष्ट मला सर्वात प्रिय होती. पण तरीही अशा गोष्टी मी कराव्यात, आयुष्याच्या संध्याकाळी मनाविरुद्ध लुगडी गुंडाळावीत, याचा फार त्रास झाला होता. पण माझा नाईलाज होता. कारण आधीच्या संस्थेने एकदा बदली करून जरी मला परत नाशिकला आणलं असलं तरी परत नाशिकहून दुसरीकडे
बदली होणार नाही याची काय गॅरंटी होती? मी वैतागलेले होते. मी वयाच्या ५३-५४व्या वर्षी फक्त ९ सर्जरी झालेल्या असताना स्वतः रोज पहाटे साडेचारला उठून जाऊन येऊन २१० किलोमीटर माझ्या कारने स्वतः ड्राईव्ह करत मालेगावला जात येत होते. मला पेट्रोलचा व टोलनाक्याचा खर्च दरमहा वीस हजार येत होता आणि माझा पगार दहा हजाराने कमी झाला होता. त्यामुळे दर महिन्याला तीस हजार रुपयांचा फटका मला बसत होता. मी दुसर्‍या प्राध्यापकांच्या कारने जाऊन येऊन पाहिलं. पण मला ते प्रकरण जमलं नाही. कारण त्या प्राध्यापकांच्या कारमधील गप्पांचा स्तर आणि सतत कारमध्ये वाजणारी ‘मला बोलवतोय रिक्षावाला’ टाईप गाणी मला सोसणे शक्य नव्हते. धाकट्या मुलाला शिक्षणासाठी कॅनडाला पाठवल्यामुळे माझा दरमहा कर्जाचा हप्ता एक लाख पस्तीस हजार होता, त्यामुळे मी मेटाकुटीला आलेले होते. माझं उत्पन्न दरमहा तीस हजाराने कमी होणं मला परवडणारे नव्हते. त्यामुळे मी ‘जाऊ दे, जेथे साक्षात अर्जुनाला अज्ञातवासात किन्नर होऊन लुगडे गुंडाळावे लागले तर माझे काय?’ असं म्हणून मी साडी गुंडाळणारी प्राचार्य होण्याचा कॉम्प्रमाईज केला होता.

कॉम्प्रमाईज असला तरी प्राचार्य म्हणून माझं काम चोख केलं. राष्ट्रीय चर्चासत्र घेणे, आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशित करणे, नॅकची ग्रेड बी वरून बी प्लसला नेणे, विद्यार्थीसंख्या वाढवणे, विज्ञान शाखा सुरू करणे, संशोधन केंद्र सुरू करणे, ग्रंथालय समृद्ध बनवणे, मुख्य म्हणजे मुलींना स्वातंत्र्य देणे, व्यक्त व्हायला शिकवणे… निवृत्तीच्या अखेरच्या महिन्यात १०० मुलींना रोजगार मिळवून दिला याचाही आनंद आहे. पण सारे प्राचार्य हेच करतात. मी माझा अजेंडा राबवला. सावित्रीचं प्रतिमापूजन सुरू केलं, भन्तेंना बोलावून कॉलेजात बुद्ध पौर्णिमा साजरी केली… आंतरमहाविद्यालयीन कविता स्पर्धा घेतल्याने मालेगाव कॉलेजातून आलेल्या मुस्लीम मुलामुलींच्या उर्दू शायरीचे सूर कॉलजमध्ये घुमू लागले. डॉ बाबासाहेब आंबेडकरावरचं आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रकाशित केले. ‘मावा’सह आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव साजरा केला… सोनाली दळवी वगैरे ट्रान्सजेंडरची व्याख्यानं आयोजित केली. मुलींना एक्सपोजर देणे, आत्मविश्वास देणे, रोजगार देणे यावर भर दिला.

वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्यपद हे वयाच्या ६२पर्यंत असते. मी साठीच्या पण थोडी आधी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर सर्वात आधी घरात नोकरीच्या काळात जमवलेल्या ज्या काही दोनशे तीनशे साड्या होत्या त्या माझ्या कामाच्या मावश्यांना वाटून टाकल्या. जे थोडेफार खोटे दागिने होते त्यांचे वाटप केले. खरे दागिने नव्हतेच. ब्युटी पार्लरवाल्या पोरीला राम राम ठोकला. मस्त गुडघ्याखाली जाणारे चार-पाच प्रâॉक म्हणजे झगे घेऊन आले. आता कुठेही जाताना तो एक झगा चढवला की काम भागते. मस्तपैकी पोहायला जाणे, दूर दूर चालायला जाणे, आपली कार घेऊन भारतभर ड्राईव्ह करत भटकणे, झाडाखाली झक्कपैकी स्वयंपाक करणे, राहून गेलेली पुस्तके वाचणे आणि मनमुक्त जगणे… निवांत नक्षत्रासारखे…

धाकटा मध्ये कॅनडाहून घरी आला होता. केस कापून माझा बॉयकटवाला भुंडा कोल्हा झाल्याचे पाहून त्याने आरडाओरडा केला. थोरला मुंबईत आयआयटीत नोकरी करतो. तो कधीमधी घरी येतो. लेकाचा नाक फेंदारून म्हणतो कसा, ‘असले कपडे घालणं तुला शोभत नाही. तू माझ्याबरोबर येणार असशील तर काहीतरी बरं घालू शकत नाहीस का?’ मी त्याला शांतपणे म्हणते, ‘क्षमस्व! तुला माझी लाज वाटत असेल तर तू माझ्याबरोबर बाहेर येऊ नकोस. बाय-बाय!’
आता आयुष्याच्या संध्याकाळी मी माझं स्वातंत्र्य कोणाकडेही गहाण टाकणार नाही!
साडी कहाणी समाप्त!

Previous Post

वैद्यकीय इच्छापत्र, एक मृगजळ

Next Post

रक्षक

Next Post
रक्षक

रक्षक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.