• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

रक्षक

ऋषिराज शेलार अर्ध्या मुर्ध्या गोष्टी

marmik by marmik
June 5, 2026
in गावगप्पा, भाष्य, विनोदी लेख, विशेष लेख
0
रक्षक

काय आहे हे? डिझेल उपलब्ध नाही. खडूनं ठळक अक्षरात लिहिलंय. पेट्रोलपंपाच्या बाहेर. अधूनमधून होतंच हे! अर्ध्या पंपावर लायनीत लागला. गाड्या फार नाही. पण बहुतेकांच्या मनात धडकी भाव वाढल्याची. अर्ध्याला पण जाणून घ्यायचंय, नेमका आज भाव काय आहे?
‘किती आहे रे?’ एकानं पुढल्याला विचारलं. लागलीच अर्ध्यानं पण कान टवकारला.

‘तुला करायचं काय? टाकायचं शंभरचं अन् निघून जायचं. तू जास्ती कधी टाकलंय?’ पुढला मागल्याला बोलला आणि गाडी पुढं घेऊन परत नंबर यायची वाट पाहायला लागला. अर्ध्याचा पण हिरमोड झाला.
एक एक करता करता अखेर अर्ध्याचा नंबर लागला. नंबर आल्याबरोबर तो भाव बघायला लागला. हे रोजचंच. त्यात नवीन काय? गपचूप एक निळी नोट आणि वर दुसरी रंगीत नोट देऊन तो पळणारे आकडे थांबायची वाट बघायला लागला. ते थांबले. गुणाकार भागाकार करून कितीला किती किंवा कितीचे किती, याची आकडेमोड त्यानं करून बघितली.

फोन आला वाटतं. त्यानं थरथरणारा मोबाईल खिश्यातून बाहेर काढला. नम्याचं नाव आलंय. तसा अर्ध्यानं घाईनं फोन उचलला.
‘हॅलो! बोल ना नमित भाऊ!’ अर्ध्यानं मान दिला.
‘हां, पेट्रोल टाकलं का? टाकून झालं असंल तर थांब तिथंच आलो मी!’ बोलता बोलता नम्यानं फोन कट केला.
आता? थांबावं लागेल. शेवट गाडी नम्याचीच म्हंटल्यावर थांबावं लागेलच ना? अर्ध्यानं गाडी पुढं घेतली. आणि मोटारसायकलवर बसून राहिला, मोबाईलवर रील बघत.

तोच पेट्रोल पंपावर एक कार जोरात आली. ड्रायव्हरनं कार बाजूला लावून घेतली. त्यातून केवळ दोघं उतरले, एक पंपाबाहेर गेला आणि रस्त्यावर नजर ठेवून पानाच्या दुकानावर उभा राहिला. दुसरा आळोखे-पिळोखे देत अर्ध्याच्या समोर आला. धीरज उर्फ बंटी वाटमारे. अर्थात कौगार्डचे जिल्हा सहकार्यवाह की काय ते? असंच काहीतरी असलेले हे मेन कार्यकर्ते. शेजारच्या गावात राहतात. त्यांचा अख्ख्या पंचक्रोशीत दरारा. गाडीत एकवेळ बाई पळवणं सोपं पण गाई नाही. अशी यांची ख्याती. धरला का भररस्त्यात घेऊन चाबकानं फोडायचा यांचा ़फंडा. आज कपाळभर टिळा रेखून हे इथं आले, म्हणजे सावज टप्प्यात असलंच पाहिजे. हे अर्ध्याला कळालं.
‘बंटी भाई! वलेकुम स..!’ अर्ध्यानं घाईनं जीभ चावली, ‘आले कुठून भाई?’ असंच म्हणायचं होतं? त्यानं स्वतःला विचारत सावरून थोडं स्मितहास्य करून वाटमारेच्या गुढघ्याला हात लावला.

‘अरे राहू दे! राहू दे! हे इथं एक काम आहे आपलं. जरा सायलेंट र्‍हा. आताच बोंब मारशील तर फिस्कटंल सगळं,’ भाईनं जरा दरडावत सल्ला दिला.

‘नाही भाई! मी तुमचा जबरा फॅन आहे. तुम्ही मागल्या हप्त्यात ती पळती ट्रक पलटी केली ना? तो रील अख्ख्या गावात शेअर केला होता. लै लाईक आले माहित्येय?’ अर्ध्या कवतिकानं सांगायला लागला.
‘तो तू का? साल्या तुझ्यामुळं बांबू लागले मला. पोलीस केस झाली, माझ्यावर! कितीला शेकलं माहितीये का? मिटवता मिटवता किडण्या विकायची पाळी आली होती माझ्यावर!’ भाई तं उलट तापला ना!

‘भाई पण मी नाही काही केलं. हे आपलं कौ-गार्डनिंगचं काम आहे ना? ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी फक्त ते रील शेअर केलं. कॅप्शन बघा ना? गायींना हाथ तर भाईंची लाथ! असं टाकलं भाई!’ अर्ध्यानं निरागसपणे रील दाखवलं.
‘पण पोलिसांनी घातली ना नको तिथं… लाथ! शेवट वरून फोन आणला तेव्हा सुटलो. परत नको करू असं! काय?’ भाईनं शक्य तितक्या प्रेमानं सांगितलं. तसं अर्ध्यानं मान हलवली.
‘पण भाऊ तुमच्याकडं ते टायर फोडायचे खिळे भारी आहेत हो. मला दाखवा ना. काय एक एक टायर फोडतात तुम्ही?’ अर्ध्यानं स्तुतीसुमनं उधळायला घेतली.

‘तुला बघायची आहे का? मागून बघ! फक्त रील-बिल काढून टाकू नको कुठं! नाहीतर खिळे माझ्या मारून जाशील!’ त्यांच्या परवानगीनं अर्ध्या त्या कारकडं गेला. खिडकीतून आत डोकावला. मागं ठेवलेली अवजार पाहून अवाक झाला. तोवर भाईचे दोनचार फोन झाले.
‘भाई, खिळे, कुर्‍हाडी, चर्‍हाटं, चाबूक आणि बरंच काही आहे हो.’ अर्ध्या नवलानं विचारायला लागला.
‘फोटो नाही ना काढला तू? लागतं रे हे! आपल्या गोमातेला घेऊन जात्या ही बेणी! त्यांना रस्त्यात फोडायला लागत्याच अशी हत्यारं. हे तर काहीच नाही, राजेंकडं दोन कट्टे आहेत. सांगू नको कोणाला!’ एवढ्यात भाईनं तंबाखू मळली. तोंडात चुटकीभर ऐवज सारला.
‘भाई पण आजचं काय नियोजन आहे? इथं आबगी कशे आले तुम्ही?’ अर्ध्याला राहवलं नाही.

‘सांगू नको! एक टीप मिळालीय. त्या क्ष्वाड्या खाटकाची गाडी येऊ राहिली. आज त्याला भररस्त्यात बघ कसा टिपसवतो!’ भाईनं हळू आवाजात प्लॅनच सांगितला. तोच टपरीजवळच्यानं खूण केली. तसा भाई सावध झाला. कारमधले आणखी दोनजण खाली उतरले. एकाच्या हातात खिळ्यांची फळी. दुसर्‍याच्या हातात हॉकी स्टिक. ड्रायव्हरनं पटकन कार वळवली. आणि रस्त्यात मधोमध करकचून ब्रेक दाबत उभी केली. भाई आणि कारमधून बाहेर आलेले दोघे पळत रस्त्याच्या दिशेला गेले. टपरीजवळचा एक जण सावध झाला. मागून पिकअप येताना बघून एकजणानं खिळ्यांची फळी रस्त्यावर ठेवली, दुसरा
हॉकी स्टिक घेऊन तयार उभा झाला. तशी काचेवर चंद्रकोर काढलेली पिकअप करकचून ब्रेक दाबत फळीच्या मागं थांबली. तसे भाई सवâट सगळेजण गाडीवर तुटून पडले. मधल्या दोघांना बाहेर घेऊन स्टिकनं, लाथा-बुक्क्यांनी हाणू लागले. ते बघून अर्ध्या जागेवरच थिजला.

‘अरे पोरा, ऐक तरी!’ एक सुरकुतलेला म्हातारा विव्हळत बोलू लागला.
‘क्ष्डग्या, जनावरं मारतो. तुला कापू का?’ एकजण म्हातार्‍याच्या सणसणीत कानामागं लगावतो.
‘अरे, तुम्ही माझ्या पोराच्या वयाची…’ तो म्हातारा पुढं बोलणार तर दुसर्‍यानं लाथ म्हातार्‍याच्या कंबरात घातली.
‘गोमाता म्हणतो आम्ही! आणि तू ऐन धोंड्यात घेऊन चालला. तुह्यासारख्याला तर चौकात गोळी घालायला पाहिजे,’ तिसरा चाबूक काढून दोघांना हाणू लागला. वाटमारे भाई बाजूला झाला, आणि समाधानाने फोन लावू लागला.
‘अरे पण मागं बैलं आहेत!’ हळूहळू भोवती जमलेल्या गर्दीतून कुणीतरी सांगितलं.

‘बैल काय गोवंशात येत नाहीत का? ह्या अवलादी गाय घ्यायला गेल्या होत्या, त्या भावात दोन बैलं मिळाली असतील. मग आले घेऊन. हाणा, तिच्याङयला!’ म्हणत परत सगळे तुटून पडले.
तेवढ्यात कॅमेरा घेऊन एकजण आला, ते बघून बाजूला गेलेला धीरज उर्फ बंटी भाई वाटमारे घाईने पुढे झाला.
‘तर् आपल्या ह्या ऐन पवित्र महिन्यात हे जे प्रकार होताय ते आम्ही आमची संघटना कौ-गार्ड खपवून घेणार नाही. पोलिसांनी यात लक्ष देऊन ही अशी अवैध वाहतूक थांबवली नाही. तर आम्ही अशी टाळकी फोडतच राहू!’ वाटमारेनं म्हातार्‍याच्या मानगुटीवर पाय ठेवत डरकाळी फोडली कुठं नाही ते त्याच्या कंबरेत एक लाथ बसली. त्याचा तोल जावून तो रस्त्यावर पालथा पडला.
‘माझ्या बापाला मारतो..ङङवड्या! दे रे स्टिक!’ कौगार्ड संघटनेचा जिल्हाध्यक्ष कोमलराजे संतापला. ज्याच्या हातात स्टिक होती त्यानं गपगुमान दिली.
तो स्टिक उचलणार तोच थरथरत म्हातारा उठला नि त्यानं कोमलराजेच्या कानामागं जाळ काढला.
‘ही पोरं तुझ्या संघटनेची हाईत का? हे काम करतो का तू?’ म्हातारं भडकलं. ‘अरे डिझेल महाग झालं म्हणून बैल घेतले तर मलाच झोडलं. कुणी?’ म्हातार्‍यानं लेकाची
कॉलर धरत विचारलं.

तसा मागून डोळ्यात काजळ घातलेला, गळ्यात ताईत असलेला एक दुसरा म्हातारा मागून आला आणि त्यानं खाडकन मार खाल्लेल्या म्हातार्‍याच्या कानसुळात हाणली. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडं वळल्या.
‘तुझं पोर काय करतं हे तुला माहीत नाही व्हय? अरे मी दावणीला गाभण गाय घेऊन चाललो म्हणून माझ्या पाळतीवर तुही पोरं होती. त्यांनी माझ्याआधी तुला हाणलं, तेव्हा तुला जाग आली का? तुह्या ह्या पिलावळीमुळं साधी जनावरं ने-आण करणं महाग झालं रे शेतकर्‍यांना! पुन्हा ही पिलावळ रस्त्यावर वळवळताना दिसली तर सगळे शेतकरी रस्त्यावर आणून यांना बांबू लावील. ध्यान ठेव. अय, घ्या रे यांना बाजूला! माझी गोमाता आठव्या महिन्याची अडेले! निघा आता!’ काजळ घातलेला म्हातारा रुमाल खांद्यावर टाकून मागल्या पिकअपकडं वळला. तशी लोकं पांगली.
अर्ध्याच्या डोक्यावर टपली मारून नम्यानं चल म्हणून खूण केली आणि दोघं झालेला तमाशा बघत निघून गेले.

Previous Post

माझे साडी पुराण!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.