२८ जून १९६४ या तारखेच्या मार्मिकचे हे जळजळीत मुखपृष्ठ चित्र. पूर्ण मुखपृष्ठामध्ये या चित्राच्या वर, इथे न दिसणारं, बाळासाहेबांच्या अग्रलेखाचं शीर्षकही आहे, त्यात त्यांनी देशातल्या अन्नटंचाईचं खापर सरकारची नालायकी, बेपर्वाई आणि भ्रष्टाई यांच्यावर थेट फोडलं होतं. हा देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाला एक महिनाच झाल्यानंतरचा काळ होता. बाळासाहेबांसारखे पत्रकार संपादक सरकारवर खरपूस टीका करत होते आणि देशातल्या जनतेची काय अवस्था झाली आहे, हे भेदक चित्रातून दाखवूही शकत होते. हे चित्र निव्वळ विषयासाठी महत्त्वाचं नाही. काळा, करडा आणि पांढरा या रंगांच्या वापरातून आणि चित्रामधल्या अफाट संतुलनातून बाळासाहेबांनी परिस्थितीचं गांभीर्य किती प्रभावीपणे रेखाटलं आहे. वाईट काळासाठी योजलेला काळा रंग चित्रात जवळपास अर्धी जागा व्यापून आहे. त्यातच स्वराज्याचा सूर्य आणि त्याला झाकणारा अन्न परिस्थिती, भ्रष्टाचार आणि महागाईचा चंद्र यांची नाट्यमय रचना आहे. खाली करडे ढग आणि सर्वात खाली, संकटांपुढे छोटे दिसणारे फाटक्या कुटुंबाचे सदस्य… त्यांच्या देहाकृती, हावभाव आणि चेहर्यांमधून त्यांची भुकेकंगाल अवस्था जिवंत झाली आहे… आजही देशात हीच स्थिती आहे, पण, सत्ताधार्यांना बकरी ईदच्या बकर्यांचं राजकारण करायचं आहे, सारसबाग बंद ठेवण्याचा कोतेपणा करायचा आहे, पंतप्रधानांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत भरपूर पाणी पीत चला असा सल्ला द्यायचा आहे आणि चाटुकार मीडियाला जनतेचे हाल दाखवायचे नाहीत, हीच लक्ष उडवणारी चापलुसी चालवायची आहे. सरकारपेक्षा प्रसारमाध्यमांची ही नालायकी अधिक दु:खदायक आहे. त्यांच्यावरचा विश्वास उडवणारी आहे.

