
फुल्ल साईझ श्रीमुख वेंगाडून आमचे “सांता, द परमपिता”, सरकारात राहून जनतेला बचतीचा महान संदेश देऊन, स्वतः जनतेच्या पैशावर कोट्यावधींची उधळण करत फुकाच्या डेटवर जाऊन यथेच्छ खिदळत हुंदडून आले… असं जाण्यासाठी, फक्त अंगठाछाप अर्हता, खोटी डिग्री आणि पराकोटीचा कोडगेपणा, इतक्याच गोष्टी लागतात, ज्या इथे ओसंडून वाहत असतात… अगदी जन्मानंतर ते मगर पकडण्यापासून, चहा विकण्यापासून ते अगदी झोला उठा के फकिरी करत, विश्वात जेवढे असतील नसतील तेवढ्या देशांत देशाटने करेपर्यंत ही विशेष ‘अर्हता’ आमच्यात कूट कूट के भरली आहे!
उगीच नाही मग आम्ही “विश्वगृ”!
आता एवढे “ओव्हर एलिजिबल” (अति अर्हताप्राप्त) महामानव, एवढं भयंकर युद्ध चालू असताना देखील जिवावरचा इतका प्रचंड धोका पत्करून, तेल नसताना विमानात उसने तेल टाकून आटापिटा करत, परदेशवारीला फक्त “मेलोडी टॉफी” द्यायला गेले होते, असा तुमचा महान गैरसमज झाला असेल… वाटलंच… बुद्धीच तेवढी तुमची क्षुद्र! भक्तांच्या रिकाम्या कवटीत निदान गोबर तरी भरभरून भरता येते… तुमच्या या क्षुद्रबुद्धीत काय घुसवणार!? त्यामुळे प्रत्येक गोष्टी उकलून सांगाव्या लागतात तुम्हा परजीवी आळशी लोकांना! (सॉरी माय लॉर्ड!) काय आहे की, तिकडे जाऊन वेगवेगळ्या दुश्मन देशांच्या खुफिया हेरांना, जे पत्रकार म्हणून येऊन आपल्या देशाच्या खुफिया जानकाऱ्या विचारून देशावर संकट बिंकट आणण्याची मनीषा ठेवणाऱ्या दहशतवाद्यांची ‘खबर’ घेऊन आलेत हे! टेलिप्रॉम्पटरवरच तात्काळ त्यांचं अकाऊंट बिकाऊंट बंद पाडण्याचे आदेश देऊन त्यांना तिथेच नेस्तनाबूत करून धमक दाखवून आलेत हे!
आता “एवढंच होतं काय?” असं समजू नका लगेच झुरळांनो! तुम्हा “अडाणी” लोकांना काय जाण? तिथे जाऊन तुम्हा अडाणी लोकांची सुद्धा सोय करून आलेत ते! एवढंच नाही, तर इकडे तुम्हा परजीवी झुरळांना “अदानी, द भारत भाग्यविधाता” यांच्या महत्कृपेने त्यांच्या खाणीत मजूर म्हणून काम देण्यासाठी, जंगलंच्या जंगलं तोडावी लागत असल्याने, तिकडे इटलीत आपले महामानव, “एक पेड माँ के नाम” लावून संपूर्ण जगभरात पर्यावरणाचा डंका देखील पिटून आलेत! इटलीमधल्या या झाडामुळे तुम्हा झुरळांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन मिळेल, ही केवढी दूरदृष्टी या नॉनबायोलॉजिकल अवतारात आहे, याची तुम्हा आइतखाऊ परजीवींना काय खबर? आपल्यासारख्या अतिसामान्य बायोलॉजिकल माणसांना त्यातले “मास्ट्ररस्ट्रोक” कसे कळणार म्हणा!
बरं येताना काय रिकाम्या हातांनी परत येतील का ते! सोबत ज्वेलरीच्या पेटीत ठेवलेले दोन पुरस्कार, शेखच्या तीन मिठ्या आणि येतानाच्या विमानात चार लिटर एक्स्ट्रा तेल पण आणलंय! आता इथं आम्हाला तेल, पेट्रोल डिझेल नाही म्हणून लगेच गळे काढू नका… “अदानी, द भारत भाग्यविधाता” यांच्यावरच्या सगळ्या फ्रॉड, भ्रष्टाचारवाल्या केसेस अमेरिकेने धुवून पुसून घडी करून बंद केल्यात… जिवाच्या आकांताने नव्वद अंशांनी वाकून, वेळ पडल्यास जमिनीवर रेंगाळून, अमेरिकेविरुद्ध एकही ब्र न काढता, आपल्या परमपित्याने कष्टाने हे धुणे धुवून ही मिळकत मिळवली आहे… त्यामुळे यांना अमेरिकेत लाखो डॉलर्सचे उद्योग टाकण्याचा ‘सुवर्ण’मार्ग मोकळा झाला आहे…
“आता हे एवढे पैसे कुठून येणार?”, असं वाटलंच ना तुम्हाला! तर आपल्या सर्व ऐतखाऊ झुरळांचा पैसा बँकेत पडून पडून सडायला लागला आहे… तुम्हा आळशी लोकांजवळ तर त्या पैशाला काही काम नाही… त्यामुळे, आपल्या उदारमतवादी, फुकटछाप तत्पर बँका ठेवल्यातच तेवढ्यासाठी… या उद्योगी पतींनी, लाखो डॉलर्स आपल्या बँकांकडून कर्ज म्हणून घेतले आणि आपल्या या दादांचा “धंदो” तिथे एकदाचा सुरू झाला अन् आपले पैसे एकदाचे बुडाले, म्हणजे त्या पैशांना योग्य त्या महामानवाच्या हाताने ‘मोक्षप्राप्ती’ होईल… आणि आपल्या सर्व झुरळांच्या या झुरळजन्माचे परम कल्याण होईल!
तुम्ही नशिबानं या देशात जन्माला आला आहात, जिथे, उसन्या आणलेल्या “स्वर्गवासी चिते की चाल अन् कावळे की काणी नजर” असलेले चाणकी लोकप्रतिनिधी तुम्हाला लाभले आहेत… त्याच चाणकी काण्या कावळ्यांच्या हातात सध्या दरबार आहे… ते कशाने का दरबार भरवेनात, तुम्ही गप गुमान अशोकमग्न आदर्शवाद जपत “जी जी रं जी जी रं जी जी जी..” करावं…
तेल तेल, पेट्रोल डिझेल काय करता सारखं? क्षुद्र भौतिक गोष्टींतच गुंतून पडण्याइतकीच तुम्हां झुरळांची मजल! पण परमपित्यांनी छप्पन इंची निधड्या छातीने रशिया आणि इराणचे कमी किमतीचे, आपल्या रुपया चलनात दिले जाणारे तेल, खते सगळं सपशेलपणे धुडकावून लावलं आहे… करेन तर तात्यांच्या अमेरिकी डॉलरमध्येच व्यापार करेन, नाहीतर नाही! अशी हिंमत करण्यासाठी तेवढा जिगरा लागतो! चाचा नेहरूंना देखील अजून हे जमलं नाही.
इथे लगेचच “रुपया-डॉलर” तुलना करणाऱ्या अल्पशिक्षित लोकांना, ते “एन्टायर पॉलिटिकल सायन्स” शिकलेले नसल्याने यातील अर्थशास्त्र कुठून कळणार! त्यामुळे शेवटी, गोभी है तो पमकीन है या राष्ट्रीय गीतावर अंतरंगातून श्रद्धा ठेवून, या सर्व भौतिक गोष्टींच्या मोहमायेचा सर्वतोपरी त्याग वगैरे करून, एतद्देशीय सर्व झुरळांनी या महामानवाच्या आवाहनांच्या स्प्रेला नाकतोंड भरेपर्यंत आत्मसात करून घेऊन, व्यवस्थेला कसलेही प्रश्न न विचारता, पेट्रोल पंपावर उगीचच गर्दी न करता, घरातच पडून राहत, आपली झुरळी देशभक्ती सिद्ध करून दाखवावी! सोने सोने अशी हाव न करता, अदानीभायच्या कोळशाच्या खाणीत नक्की हिरे सापडतील… त्याचा चुरा तुम्हा मजूर झुरळांना वाटण्यात येईल. वाट बघा…
आणि हो, नुकत्याच अंड्यातून बाहेर पडलेल्या झुरळाच्या पिल्लांनी नीट मान खाली घालून, जशी घेतली तशी नीट परीक्षा देत, थोड्याच दिवसांत शांतपणे बेरोजगार मोठे झुरळ बनत, राष्ट्रहितासाठी परजीवी लोकसंख्येत भर घालून देशभक्तीत आपले योगदान द्यावे.
बोला श्री श्री श्री विश्वगृ महामानव परमपिता सांता पॉझ की…
मेलोडी माता की…जय..!
