
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारणार्या बेरोजगार तरुणांना ‘कॉक्रोच’ अर्थात झुरळ म्हणून संबोधलं आणि एकच खळबळ उडाली. अर्थात सोशल मीडियाच्या आजच्या काळात राजकीय पक्षांनी खानपानाची सोय आणि रोजंदारी दिल्याशिवाय मोर्चाची गर्दी जमत नाही. पण, विदेशात बसलेल्या एका मराठी तरुणाने केवळ उपहास म्हणून ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा आरंभ केला. तोही आभासी. पाहता पाहता या तथाकथित पार्टीचे अडीच कोटींच्या घरात इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स झाले. ‘जगातला सर्वात मोठा पक्ष’ असल्याचा टेंभा मिरवणारा भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियावरच्या फॉलोअर्सच्या तिप्पट आणि काँग्रेसच्या पाठिराख्यांच्या दुप्पट एवढा हा आकडा आहे. लगेचच या पेजचा संस्थापक अभिजीत दिपके याला जिवे मारण्याच्या धमक्या देणे आणि त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर बंदी आणणे, ती बंद करणे हे भाजपच्या दडपशाहीचे खेळही झाले.
आता या सीजेपीच्या पातळीवर थोडी शांतता आहे, पण तिच्या अचानक उदयाने आणि तिला मिळालेल्या प्रतिसादाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. याआधी न्याय्य प्रश्नांसाठी तरुणाई मैदानात उतरायची. आता ही गर्दी निव्वळ समाजमाध्यमांवर होत असेल तर या देशातील तरुण त्यांच्या प्रश्नांसाठी गंभीर नाहीत असा त्याचा सोपा अर्थ काढायचा का? देशाची अर्थव्यव्यस्था अत्यंत धोक्यात आहे. येणार्या काळात वाहनांसाठी तेल, स्वयंपाकासाठी गॅस मिळणार नाही, महागाई टोकाला गेली आहे, प्रत्येक सामान्य नागरिकांचे खिसे कापून अदानी, अंबानींच्या हाती संपूर्ण देश सोपवला जात आहेत. ‘नीट’चे पेपर फोडले जात आहेत. शेतकर्यांचे हाल होत आहेत. येणारा काळ भारतीयांसाठी अत्यंत कठोर असणार आहे. अशावेळी ही तरुणाई रस्त्यावर उतरायला हवी की ‘कॉक्रोच कॉक्रोच’ खेळत बसायचे?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दररोज देशापुढील संभाव्य धोक्यांवर पोटतिडकीने भाष्य करीत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासारखे अभ्यासू तरुण नेते मुंबईच्या आणि राज्याच्या गंभीर समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करत असतात. परंतु सरकारने पोसून ठेवलेले माध्यमे त्यांचे विषय जनतेपर्यंत पोहोचूच देत नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात मोदींसह त्यांच्या भक्तीत डुंबलेले न्यायपालिकेतील, निवडणूक आयोगातील लोक असोत, अंगावर भगवे चढवून नागवी वक्तव्ये करणारे भोंदू असोत की पत्रकारितेच्या नावावर देशाची दिशाभूल करणारी दलालांची टोळी असो- हे सगळेच ‘ओरल डायरिया’ झाल्यागत ढराढरा बरळताना आणि कृती करताना दिसतात. त्यांच्या दूषणांमुळे वैतागलेल्या तरुण पिढीला बोस्टनमध्ये शिकत असलेल्या अभिजीत दीपकेच्या उपरोधात्मक कृतीतून आपला रोष व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. एका सर्व्हेनुसार भारतातील हाताला काम नसलेले जवळपास पाच कोटी ‘जेन-झी’ युवक मोबाईलवरून मते व्यक्त करीत असतात. सरन्यायाधीशांचं वक्तव्य हे एक निमित्त ठरलं, त्यांचा रोष देशातील बेरोजगारीवर आहे, सदोष परीक्षा यंत्रणेवर आहे, महागाईवर, मतचोरीवर आहे, सरकारच्या अतिरेकी धर्मांधतेवर आणि उच्च-नीचतेच्या नीच कल्पनांवर आहे, सरकारची बटीक झालेल्या न्यायपालिकेवरही रोष आहे. पण तो फक्त सोशल मीडियावरून व्यक्त करून चालेल का?
गेंड्यालाही लाजवेल असे मोदी सरकार झाले आहे. कारण देशातील ज्वलंत विषय, प्रश्न आणि आव्हानाचे डोंगर माहिती असूनही अलीकडे जनता सुस्तावलेली दिसते. लाडकी बहिण दीड हजारात खुश आहे. देशातील ८० कोटी जनता फुकटचे अन्न मिळते म्हणून शांत बसलेली आहे. सरकारच्या ‘पापाचा घडा भरला’ आहे, हे माहिती असूनसुद्धा देशातील तमाम सामान्य नागरिक डोक्यावर बर्फ ठेवून बसले आहेत. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणेच आपणही शूरवीर असल्याचे भासवत आजची तरुणाई हातात मोबाईल घेऊन जणू काही युद्धावर निघाल्याचे दाखवत आहे. स्वस्त डेटाच्या बळावर कोट्यवधी लोक दिवसरात्र मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसले आहेत. आनंद किंवा रोष व्यक्त करायचा असला तरी हे खाटेवर बसून/ झोपून स्क्रीनवर बोटे चालवतात. प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे बळ कोणात शिल्लक आहे का?

खरोखरचे जनआंदोलन उभे होते तेव्हा तिथे सद्सद्विवेकबुद्धी जागरूक असलेले लोक लाखोंच्या संख्येने येतात. तुम्हाला आठवते का निर्भया प्रकरण? १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री दिल्लीतील मुनिरका भागात एका खासगी बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला. अत्यंत क्रूर पद्धतीने तिला मारहाण केली गेली होती. १३ दिवसांच्या झुंजीनंतर तिचा मृत्यू झाला. ही घटना भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील सर्वात काळ्या आणि क्रूर घटनांपैकी एक मानली जाते. यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. निर्भया हत्येच्या निमित्ताने तरुण विद्यार्थ्यांचे दिल्लीत अभूतपूर्व आंदोलन उसळले. लाखो तरुण हातात मेणबत्त्या घेऊन इंडिया गेट आणि जंतरमंतरवर एकवटले होते. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी आक्रोश करण्यात आला. पोलिसांच्या निष्क्रीयतेवर तीव्र नाराजी व्यक्त होत होती. हे आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित न राहता मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हैदराबादसह अनेक शहरांत झाले. विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये चर्चासत्रे घेण्यात आली. यातूनच सरकारने निर्भया निधीची घोषणा केली, जलदगती न्यायालय सुरू झाले. बाल न्याय कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा यांसारख्या कायद्यात बदल झाले. चार आरोपींना फासावर लटकवण्यात आले.
आजही व्यवस्थेत बदल घडायचा असेल तर तरुणांनी मैदानात उतरणे क्रमप्राप्त ठरते. सरन्यायाधीशाने ‘कॉक्रोच’ म्हटल्यावर जेन-झी, झिलेनियल्स, मिलेनियल्स या पिढीतील सगळेच मैदानावर यायचे आणि रस्त्यांवर उतरायचे सोडून मोबाइलच्या स्क्रीनवरूनच निषेध व्यक्त करतायत, हे काही चांगलं चिन्ह नाही. याआधी तरुणांच्या नेतृत्वात जशी आंदोलने झाली तशी पुन्हा केली गेली तर जेन-एक्स आणि बेबी बूमर्सही तरुणाईच्या सोबत असतील.
भारताच्या इतिहासात अनेक आंदोलनांमध्ये तरुण सहभागी झाले आहेत. महात्मा गांधींनी तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतलं होतं. ते मुख्यतः अहिंसा, स्वावलंबन, राष्ट्रसेवा आणि त्याग या मूल्यांवर भर देत होते. १९२०-२२मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन केले, त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना ब्रिटिश शाळा-कॉलेजांमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. ब्रिटिश शिक्षणपद्धती भारतीयांना गुलाम बनवते. त्याऐवजी राष्ट्रीय शिक्षण घ्या, सरकारी नोकर्या सोडा, ब्रिटिश पदव्या आणि मान-सन्मान नाकारा, सूत कताई, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि परदेशी वस्तूंचा बहिष्कार हा तरुणांसाठी रोजच्या जीवनातील संघर्षाचा भाग त्यांनी बनवला. १९३०मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन आणि मीठ सत्याग्रह झाला. दांडी यात्रेतही गांधीजींनी तरुणांना सत्याग्रह करण्याचे आवाहन केले. युवकांनी शिस्तबद्धपणे, अहिंसक मार्गाने अन्यायाविरुद्ध लढा द्यावा असे आवाहन केले होते. हजारो तरुणांनी मीठ बनवणे, मोर्चे काढणे आणि जेल भरो आंदोलनात भाग घेतला होता. भारत छोडो आंदोलनातही तरुणांची संख्या लक्षणीय होती. गांधीजींच्या आवाहनाने लाखो तरुणांना प्रेरणा मिळाली. विद्यार्थी, युवक संघटना, सेवादल यांसारख्या संस्थांमधून तरुण सक्रिय झाले. त्यांचे आवाहन केवळ राजकीय नव्हते, तर आध्यात्मिक आणि नैतिक क्रांतीचे होते. ‘जगात तुम्हाला जो बदल पाहायचा आहे, तो बदल तुम्ही स्वतः बना’ हा गांधीजींचा विचार तरुणांना सातत्याने बळ देणारा होता. त्यातूनच जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, राजेंद्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, के. कामराज, सरोजिनी नायडू असे अनेक नेते घडले. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे हे तर गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार ठरले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित-शोषित-पीडित समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानतेच्या लढ्यातील तरुणांची संख्याही लक्षणीय होती. त्यांचा लढा अस्पृश्यता निर्मूलन, जातिव्यवस्था विरोध, शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समानता, श्रमिक-कष्टकर्यांचे हक्क आणि संवैधानिक लोकशाहीसाठी होता. त्यांचा ‘शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मंत्र तरुणांना नवदिशा देणारा ठरला. त्यांचे मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, पार्वती मंदिर सत्याग्रह, सार्वजनिक तलावात पाणी पिण्यासाठी महाड सत्याग्रहात हजारो तरुण-तरुणी सहभागी झाले होते. बाबासाहेबांच्या जवळचे काही तरुण, अनुयायी पुढे देशाचे महत्त्वाचे नेते, खासदार, आमदार आणि मंत्री झाले. डॉ. बाबासाहेबांना आदर्श नेता मानणारे अनेक दलित नेते भारतीय राजकारणात सक्रिय झाले. कांशीराम, जगजीवन राम, आर.एस. गवई, बी.डी. खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड, मायावती, जोगेंद्र नाथ मंडल (हे पाकिस्तानात मंत्री होते), रामविलास पासवान, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जितन राम मांझी, उदित राज, चिराग पासवान, मीरा कुमार, खा. चंद्रशेखर रावण हे वेगवेगळ्या पक्षांत असले तरी लोकनेते ठरले. स्वातंत्र्यानंतर विद्यार्थी चळवळींनी भ्रष्टाचार, आरक्षण, घुसखोरी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सांस्कृतिक ओळख अशा विविध मुद्द्यांवर काम केले. काही आंदोलने सरकार बदलण्याइतके प्रभावी ठरले, तर काहींनी समाजात खोल चर्चा निर्माण केली. ही आंदोलने बहुतेक वेळा शांततापूर्ण सत्याग्रह, मोर्चे यावर आधारित होती.
१९७४मध्ये गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले. त्याचे नेतृत्व मुख्यतः विद्यार्थ्यांनी केले. गुजरातच्या महाविद्यालयांमध्ये वसतीगृह शुल्कवाढ, महागाई, भ्रष्टाचार आणि सरकारी निष्क्रियता यावर हे आंदोलन होते. यात मुख्यमंत्र्यांचा राजीनामा झाला, विधानसभा बरखास्त झाली. हे आंदोलन जयप्रकाश आंदोलनासाठी प्रेरणा ठरले. आणीबाणीला विरोध करीत १९७४-७५ जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती आंदोलनात विद्यार्थी आणि तरुण मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. या आंदोलनाचा १९७७च्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या पराभवात मोठा वाटा होता. १९७९-१९८५ मध्ये बांगलादेशातून अवैध घुसखोरी, सांस्कृतिक ओळखीचा प्रश्न निर्माण करणारे आसाम आंदोलन पेटले. सत्याग्रह, आर्थिक नाकाबंदी, मोर्चे या पद्धतीचा अवलंब झाला. पुढे प्रफुल महंत यांच्यासारखे विद्यार्थी नेते मुख्यमंत्री झाले. हे भारतातील सर्वात यशस्वी विद्यार्थी-नेतृत्व आंदोलनांपैकी एक होते. १९९०मध्ये मंडल आयोग आंदोलन झाले. याचे नेतृत्व सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांनी केले. ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी हा विषय होता. या आंदोलनाने आरक्षण धोरणावर राष्ट्रीय चर्चा घडवून आणल्या. डॉ. मनमोहन सिंग सरकारला भ्रष्टचाराच्या आरोपात घेरण्यासाठी २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या बॅनरखाली आधी जंतरमंतरवर नंतर रामलीला मैदानावर आंदोलन केले. लोकपाल विधेयकाची मागणी करण्यात आली. हजारो तरुण या आंदोलनांशी जुळले.
काँगेसचे सरकार पडल्यानंतर हजारे झोपी गेलेत, बारा वर्षांत ते या विषयांवर कधी जागे झालेच नाहीत. पुढे मोदी सरकारने लोकपालला आणि त्यांच्या जनमाहिती अधिकार कायद्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. परंतु या आंदोलनातून अरविंद केजरीवालांच्या ‘आम आदमी पार्टीचा’ उगम झाला. त्यांनी तब्बल एक दशक दिल्लीत सत्ता गाजवली. हे सगळे लाखो तरुण मैदानात उतरल्यानेच शक्य होऊ शकले.
२०११ ते २०१४ चा काळ बघा. हजारे, केजरीवाल यांच्याप्रमाणेच विरोधी पक्षात असलेली भाजपा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मैदानात होती. अरुण जेटली, सुषमा स्वराज, राजनाथ सिंग, स्मृती इराणी हे तर जंतरमंतरवर तळ ठोकून असायचे. इथे केवळ भाजपचे तरुण कार्यकर्तेच नव्हते, तर आपले प्रश्न मांडतात म्हणून देशातील तरुण सुद्धा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत होते. भाजपने संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार नखशिखांत भ्रष्टाचारी असल्याचा कांगावा केला. भ्रष्टाचाराला ‘ए ते झेड’पर्यंत नावे दिलीत. पुढे मोदी सरकार यातला कोणताही आरोप सिद्ध करू शकले नाही. त्यांच्या सरकारच्या काळात तर भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. महागाईच्या नावाने इराणीबाई ३०० रुपयांचा गॅस सिलेंडर घेऊन फिरायच्या. आता हजार रुपये मोजावे लागतात. बारा वर्षात पेट्रोल-डिझेलचे भाव सव्वाशे टक्क्यांनी वाढले आहेत. धान्य, कडधान्य, खाद्य तेलाने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. विरोधकांचे महागाई विरोधातील आंदोलन केवळ पत्रकार परिषदेतून सुरू आहे. त्यांना जंतर मंतरमधील आंदोलनस्थळ कुठे आहे याबाबत माहिती आहे की नाही ही शंका येते.
तरुणांना नोकर्या नाहीत. आयटी क्षेत्रातल्या तरुणांना पुढच्या दोन वर्षांत तुमच्या नोकर्या संपुष्टात येतील असे सांगितले जात आहे. त्यांनी पुढे काय करायचे? कसे जगायचे? तुम्ही दिलेली मते चोरली जातात. ईव्हीएमवर कोणाचाही विश्वास नाही. बोगस मतदारयाद्या तयार होतात किंवा नावे गहाळ केली जातात. निवडणूक आयोग, न्यायपालिका, ईडी, सीबीआय, आयटी, पोलीस या सगळ्या यंत्रणा केवळ भाजपसाठी काम करतात असा तरुणांसह सगळ्यांचा समज झाला आहे. तरीही सगळेच गप्प कसे?

राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी १४५ दिवसांची भारत जोडो यात्रा काढली. राहुल गांधी ४ हजार कि.मी. पायी चालले. या यात्रेने देशात फूट पाडणार्या राजकारणाविरुद्ध एकता, प्रेम आणि सौहार्दाचा संदेश दिला. महागाई, बेरोजगारी, सामाजिक विभाजन, द्वेषपूर्ण राजकारण, संविधान आणि लोकशाहीचे रक्षण असे यात्रेचे मुद्दे होते. यात ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूं’ हा राहुल गांधींचा संदेश देशातील तरुणांना आकर्षित करणारा ठरला. यात्रा काँग्रेसची असली तरी हजारोंच्या संख्येत तरुण सहभागी झाले होते. अन्य पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, लेखक, चित्रपट सृष्टीतील दिग्गज, नागरी समाज, तरुण, शेतकरी, मजूर यांचीही गर्दी होती. या यात्रेने काँग्रेस पक्षाला नवीन ऊर्जा मिळाली. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत यात्रा जिथून जिथून गेली त्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे सहा टक्के मताधिक्य वाढले. कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी पक्षाला फायदा झाला. लोकसभेत काँग्रेसचे १०० खासदार निवडून आलेत (खरं तर ही निवडणूक भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून बळकावली असे आरोप होतात, तो भाग वेगळा). आता राजकीय पक्षही हा थेट जनतेत उतरण्याचा मार्ग विसरले आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो.
आज सोशल मीडियावर तरुणांची झुरळसेना उभारणारा अभिजित दीपके हा तरुण २०२०-२२मध्ये ‘आप’च्या सोशल मीडिया/डिजिटल टीमचा भाग होता. त्याने २०२०मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत मीम्स-आधारित डिजिटल कॅम्पेनिंग केले. ज्यामुळे युवकांना पार्टीशी जोडण्यास मदत झाली. त्यानंतर दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागात कम्युनिकेशन अॅडवायझर म्हणूनही काम केले. त्यामुळेच ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हे ‘आप’चेच पिल्लू असल्याची शंका व्यक्त होते. तसं असेल, तर हा आभासी पक्ष भाजपला पुन्हा बळकटी देणारा ठरेल, ही भीती काही व्यर्थ नाही.
कॉक्रोच पार्टीवर काही विनोदी अंगाने तर काही भविष्यात जणू काही हीच पार्टी देशाची तारणहार आहे अशा गंभीर स्वरूपात चर्चांचे फड रंगवत आहेत. हे सगळे होताना आपण गाफील तर नाही ना, याची खात्री कोणी करायची? सोशल मीडियावरची अडीच कोटींची फॉलोवर्सची संख्या पाच कोटींवर गेली तरी जमिनीवर काय फरक पडणार आहे? देशात युवा राग, संताप आहे हे या निमित्ताने दिसून येईल. पण, तेवढेच.
भारतातील युवा शक्ती पोकळ संतापात न वाया घालवता, रचनात्मक मार्गाने वापरली तर देश बदलू शकतो. झुरळापेक्षा सिंह बनणे हा तरुणांचा खरा उद्देश असावा. त्यासाठी आता दिसत असलेला आभासी सैलाब रस्त्यांवर दिसावा लागेल. अभिजीतची चळवळ जेन -झीचे लक्ष वेधण्यासाठी अस्ाली तरी अप्रत्यक्षपणे त्यांना आळशी, अकार्यक्षम म्हणून संबोधले जात आहे. कोणीतरी कॉक्रोच, आळशी म्हणतात आणि आपण जर हो ‘मीही झुरळ आणि आळशी’ अशी ‘मीही अण्णा’ प्रमाणे डोक्यावर टोपी चढवत असेल तर आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत. खरं तर जेन-झी ची ही चळवळ सत्तेत आणि प्रशासनात बसलेल्या झुरळांना चिरडणारी असावी. त्यासाठी प्रत्येकाला ढाण्या वाघासारखी डरकाळी फोडावी लागेल.
