• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

क्रिकेट जगणारा माणूस

संजय परब (विशेष लेख )

marmik by marmik
May 29, 2026
in खेळियाड, विशेष लेख
0
क्रिकेट जगणारा माणूस

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शरद कद्रेकर यांना नुकताच माटुंगा येथील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबतर्पेâ वि. वि. करमरकर करमरकर स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. क्रीडा पत्रकारितेतील एका अग्रणी गुरूंच्या नावाच्या पुरस्काराने त्यांच्या शिष्याचा हा अनोखा गौरव झाला. कद्रेकर यांचे अनेक वर्षांचे सहकारी आणि मित्र, ज्येष्ठ पत्रकार संजय परब यांनी साकारलेले कद्रेकर यांचे हे हृद्य व्यक्तिचित्र.

जगात अनेक प्रकारची माणसं असतात. विविधरंगी, विविधअंगी, विविधढंगी… भारतात तर कला, क्रीडा, साहित्य, नाटक, सिनेमा आणि क्रिकेट यासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलेली माणसं बघायला मिळतात. शरद कद्रेकर हा त्यापैकी एक. क्रिकेट जगलेला नव्हे, अजूनही फक्त क्रिकेटच जगणारा माणूस! क्रिकेट त्याच्या नसानसात भिनलेलं आणि माणूसपण अंगांगात… शरद क्रिकेटवर बोलायला लागतो तेव्हा तो काही तास न थकता बोलू शकतो. मुख्य म्हणजे अचूक संदर्भांसह. हातात मोबाईल नव्हता तेव्हा सुद्धा त्याला सर्व क्रिकेटपटू, त्यांचे विक्रम, खेळण्याची लकब, राजकारण तोंडपाठ होते. क्रिकेट सांख्यिकीतज्ज्ञसुद्धा त्याला फसवू शकत नव्हते. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त क्रिकेटचा विचार करणारा हा अवलिया आहे. त्याला झोपेतून उठवा आणि एखादा क्रिकेटचा संदर्भ विचारा, तो खाड्कन् गुगल आणि आता एआयसारखी माहिती तुम्हाला क्षणात देईल…

क्रिकेटसाठी जन्माला आल्यामुळे असेल कदाचित, पण त्याने आपल्या जीवनात जोडीदार निवडला नाही. क्रिकेटप्रेमासाठी तो जगभर फिरत राहिला. मी गंमतीने त्याला म्हणतो : ‘आज लग्न केले असते तर आजोबा झाला असतास!’ त्यावर त्याचे उत्तर असते, ‘मग, मला पावसात कांगा लीगचा मनमुराद आनंद कधी घेता आला असता? लावली पाठीला बॅग आणि निघालो चेन्नईला, असं होऊ शकलं असतं का? वाटलं ऑस्ट्रेलियाला जायचंच, निघालो असतो का? आता कसं, परवानगी नको, काय नको. बरं आहे ना! आपल्या मनासारखं जगता आलं. क्रिकेटवर प्रेम करता आलं. माणसांवर प्रेम करता आलं… ऑलिम्पिक, देशी खेळ यांचे संघटक, कार्यकर्ते, खेळाडू यांना मदत करता आली. ते कुटुंबासारखेच तर आहेत. फक्त रूढार्थाने संसार झाला नाही इतकचं.’
चिवटपणे त्याला कोंडीत पकडण्यासाठी आणखी एक मुद्दा मी लावून धरतो. ‘तू रुईया कॉलेजचा ना? एकही मुलगी तुला जोडीदार म्हणून मिळू नये. काय फेकतो तू.’ यावर क्रिकेट गुरू आणखी एक कारण आपल्या तोंडावर फेकणार… ‘रुईयाच्या कट्टयावर सर्व मुलेमुली कॉलेजकडे तोंड करून बसायचे. मी मात्र कॉलेजकडे पाठ करून असायचो. कारण समोर माटुंग्याच्या रमेश दडकर मैदानात सुनील गावस्कर, अजित वाडेकर, रमाकांत देसाई खेळत असायचे. क्रिकेट मैदानावरचे हे हिरो सोडून कुठे कॉलेज चिमण्यांचा चिवचिवाट ऐकत बसायचा…’


याच रुईया कॉलेजसमोरील मैदानात कोळी बंधूंनी शरदचा वि.वि.करमरकर स्मृती पुरस्कार देऊन गौरव केला, तेव्हा या मैदानाने सुद्धा त्याला लाल सलाम केला असेल. ‘लाल सलाम’ हा त्याचा आवडता शब्द आणि विचार सुद्धा. शरदचे वडील कम्युनिस्ट. लाल झेंड्यावाले. लालबागच्या गिरणगावात साठ, सत्तरच्या दशकात डाव्यांच्या विचारांचा असलेला पगडा त्याच्यावरही होता. त्याच्या झेंड्याचा आणि मैदानावरील मातीचा रंग सुद्धा लाल. शाळा, कॉलेजच्या दिवसांत त्याला लाल झेंडा रूढार्थाने जवळ करता आला नसेल, पण लाल मातीच्या मैदानात तो रमला! याचमुळे त्याचा सत्कार होत असताना न्यू हिंद, दादर युनियन, दापाझो, माटुंगा जिमखाना हे सारे क्लब भरून पावले असतील. हे मैदान अनधिकृत झोपडपट्ट्यांपासून वाचण्यासाठी, त्याचे कोणी लचके तोडू नये यासाठी भास्कर सावंत, मंगेश भालेकर यांच्यासारख्या मैदान बचाओ कार्यकर्त्यांसोबत शरद आणि महाराष्ट्र टाइम्सचा क्रीडा विभाग भक्कमपणे उभा राहिला. कार्यकर्त्यांना बळ मिळाले, मैदान वाचले. याच मैदानाने शरदला केलेला लाल सलाम कदाचित याच प्रामाणिक भावनेमधून आला असावा…
क्रिकेट नसते किंवा त्याच खेळात त्याची पत्रकार म्हणून कारकीर्द झाली नसती तर शरदने काय केले असते? असा प्रश्न जेव्हा आपणाला सतावतो तेव्हा हा माणूस त्यासाठीच जन्माला आला आहे, हे उत्तर मिळते. रुईया कॉलेजचा हा अर्थशास्त्राचा पदवीधर. या विषयातील त्यांचा अभ्यास आणि इंग्रजीवर त्याची पकड वाखाणण्याजोगी. कदाचित तो चांगला शिक्षक सुद्धा होऊ शकला असता. पण, एका जागेवर शांत बसेल तो शरद कसला! सतत त्याची धावपळ. काही तरी शोधात असलेला. यामुळे आयआयटी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील चांगल्या पगाराच्या नोकर्‍या सोडून तो पूर्णवेळ पत्रकारितेत आला. करमरकर यांच्या भाषेत सांगायचे झाले तर तो ‘श्रमिक पत्रकार’ झाला. त्यावेळी खेळांवर लिहिणारे बरेचसे पत्रकार हे अर्धवेळ होते. म्हणजे बँका, विमा, महापालिका किंवा अन्य सरकारी नोकर्‍या सांभाळून हे काम करत. त्यामुळे माझ्याबरोबर १९९०मध्ये तो महाराष्ट्र टाइम्समध्ये नोकरीला लागला तेव्हा आम्हाला सर्वांना धक्का बसला. ‘चांगली सुखाची नोकरी सोडून रात्रीची पाने लावत, कुठे सखाराम बाईंडर व्हायला आलास,’ असे त्याला बोललो तेव्हा तो खळाळून हसला. एखाद्या छोट्या निष्पाप मुलासारखा! कदाचित हेच त्याचं जगणं असावं. दिवसभर क्रिकेटच्या मैदानात फिरायचे आणि रात्री पानं लावायची. पण, त्यावेळी मटामध्ये काम करण्याची खूप अभिमान होता, समाजात मान होता. करमरकर हे क्रीडा विभाग प्रमुख होते आणि आम्ही त्यांच्यासोबत एका क्रीडा पानासाठी काम करणारे त्यांना धरून सहा पत्रकार होतो. वसंत भालेकर, चंद्रशेखर संत, प्रवीण टोकेकर आणि शरद कद्रेकर. खरेतर सहा पत्रकारांना एक पान म्हणजे किस झाड की पत्ती. पण, एक ध्यास म्हणून क्रीडा पत्रकारितेत आलेल्या करमरकरांनी सोबतच्या पत्रकारांना सुद्धा त्याच पूर्णत्वाकडे नेण्याचा सतत प्रयत्न केला. एक एक बातमी, एक एक लेख म्हणजे तावून सुलाखून नेणारा. खणखणीत वाजणारा. दुसर्‍या दिवशी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत चर्चा घडवून आणणारा.
मटाच्या या क्रीडा विभागातील आमच्या आधीचे पूर्वसूरी सुद्धा तितक्याच ताकदीचे. आ.श्री. केतकर, शिवाजी सावंत, सुहास फडके असे एकापेक्षा एक सरस लेखणी असलेले! मटाच्या इतर विभागांतील पत्रकार क्रीडा विभागाला काश्मीर म्हणत. ३७० कलम असलेले आणि संपादकांना सुद्धा ढवळढवळ करण्याची मनाई असलेले. कदाचित या सर्व वातावरणामुळे शरदची लेखणी सुद्धा धारदार होत गेली. खेळांच्या, खेळाडूंच्या, संघटनाच्या, संघटकांच्या काळजीचा विचार करणारी. त्यांचा विकास करणारी. क्रिकेटला या देशात लोकाश्रयाबरोबर आज देशात राजाश्रय मिळाला. पण, कबड्डी, कुस्ती आणि खो खो या देशी खेळांनाही थोडाफार न्याय मिळाला. त्याचे श्रेय मटाला जाते. मटाच्या क्रीडा विभागामुळे हे खेळ जगले, बहरले आणि यामधील खेळाडूंना कायमस्वरूपी नोकर्‍या मिळाल्या. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला!

करमरकर यांनी चालवलेल्या क्रीडा चळवळीत शरद योद्धा म्हणून उभा राहिला, यासाठी त्यांच्या नावाचा त्याला पुरस्कार मिळावा, हा नियतीने केलेला न्याय असावा.
साड्या, चोळ्या, फरसाण, फाफडा आणि नटनट्या यांच्या उपमा देत क्रिकेटवर लेख लिहून अमाप प्रसिद्धी मिळवणारे आणि कायम दिग्गज क्रिकेट खेळाडूंची देवाशी तुलना करणारे, त्यांच्या मागे मागे फिरणारे पत्रकार खूप होते आणि आहेत. पण, खेळाडूंना मोठे करण्यापेक्षा खेळ मोठा झाला पाहिजे, क्रिकेट मोठे झाले पाहिजे, गुणवान खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आजतागायत झटत आहे तो शरद कद्रेकर. या क्रिकेट जगलेल्या माणसाने खरंतर आपला पन्नासपेक्षा अधिक काळाच्या अनुभवाच्या जोरावर क्रिकेटवर पुस्तके लिहायला हवी होती. आम्ही सारेजण त्याला नेहमी त्याला सांगतो, जितक्या वेगाने तू भरभर चालतोस, बोलतोस त्या वेगाने आणि तुझ्याकडे असलेल्या अफाट माहितीच्या आधारे पुस्तक लिही ना… पण, तो सांगतो, ‘मी किती दिवस सुद्धा बोलू शकतो. पण, एका जागेवर बसून, ठाण मांडून मला लिहिता येत नाही. मी केलाय बर्‍याच वेळा प्रयत्न. पण, मला जमले नाही. खरे असेल कदाचित. कारण तो एका जागी बसू शकत नाही, हे मी नक्की सांगू शकतो. त्याच्या सोबत दोन दशके काम केल्यानंतर माझा हा अनुभव आहे. त्याला मीच काय, कोणीही भेटला की तो सतत क्रिकेट आणि इतर खेळांवर बोलणार. आपण फक्त ऐकत बसायचे. त्याची नॉन
स्टॉप कॉमेन्ट्री सुरू.
एकदा तो माझ्या घरी वेंगुर्ल्याला आला होता. काही दिवस होता सोबत. त्याचे अखंड बोलणे सुरू. आई म्हणायची, ‘शरदचा त्वांड दुकना नाय काय रे. किती भरभर बोलता तो.’ स्वभाव हा त्याचो, असे सांगत मी हसल्यावर ती सुद्धा हसायला लागली. ‘आपलं महानगर’ला असताना त्याला क्रिकेटवरील मुलाखतीसाठी यू ट्यूब चॅनेलवर बोलावले की एक प्रश्न विचारल्यावर याचा माहितीचा महापूर यायचा. त्याला थांबवायला लागत असे. याच वेगात त्याने शाश्वत लिखाण केले तर पुढच्या पिढ्यांसाठी तो अमूल्य ठेवा होईल… अजूनही वेळ गेलेली नाही, शरदने आता तरी ते मनावर घेतले पाहिजे.
अजातशत्रू असणारा हा माझा सहकारी, मला मित्र म्हणून सुद्धा लाभला, याचा मनापासून अभिमान वाटतो.

लाल सलाम शरद!!

Previous Post

तीन दिवसांचं युद्ध केवढं लांबलं…

Next Post

घुसखोरी माणसांची,बदनामी वन्यजीवांची!

Next Post
घुसखोरी माणसांची,बदनामी वन्यजीवांची!

घुसखोरी माणसांची,बदनामी वन्यजीवांची!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.