
काय गंमत आहे पाहा! पन्नासेक वर्षांपूर्वीपर्यंत ब्रेड हा पदार्थ फार घरांमध्ये यायचा नाही. गोरगरीबांना पाव माहिती होता. चहात बुडवून खायचा, रश्शात बुडवून खायचा. स्लाइस ब्रेड ही श्रीमंतांची चंगळ होती. त्या ब्रेडचं सँडविच करून खाण्याचा विचार कुठे येणार कुणाच्याही मनात? त्या काळात सँडविच उंची रेस्टॉरंट्समध्येच मिळत असावं. पण लागोपाठ आलेल्या दुष्काळांनंतर
मॉडर्न या भारतीय चवीच्या भारत सरकारने बनवून घेतलेल्या स्लाइस ब्रेडचा उदय झाला, ब्रेड सर्वांपर्यंत पोहोचू लागला आणि गल्लोगल्ली सँडविचवाले दिसू लागले. सँडविच हे नावापासून (ब्रिटनमधल्या अर्ल ऑफ सँडविच अर्थात सँडविच परगण्याच्या सरदाराने झटपट खाण्यासाठी दोन ब्रेडच्या मध्ये चविष्ट अन्नपदार्थ भरण्याची पद्धत सुरू केली) संपूर्णपणे परदेशी. विदेशी ब्रेड बर्यापैकी बेचव आणि ओबडधोबड असतात. तिकडची सँडविच कोरडी लागतात. त्यांच्याबरोबर काहीतरी पेय घ्यावं लागतं. भारताने ब्रेड सॉफ्ट आणि गोड केला आणि मग खास भारतीय चवीच्या चटण्यांच्या संगतीने अस्सल भारतीय चवीचं सँडविच तयार व्हायला किती वेळ लागणार होता?
आज सकाळचा हलका नाश्ता असो, दुपारची सणसणीत भूक असो किंवा संध्याकाळची चोरटी भूक असो- अगदी रात्री उशिरा पोटभरीचं जेवण जेवायचं असलं तरी या सगळ्या भुका भागवायला सँडविच नेहमीच तयार असतं! आणि पुण्यात या सँडविचच्या दुनियेतला ‘चवीचा राजा’ अनुभवायचा असेल, तर तुम्हाला पुण्यातल्या सदाशिव पेठेतील चित्रशाळा चौकातल्या अंबिका सँडविचमध्ये एकदा यावंच लागेल.
दुपारचे दीड वाजले की चित्रशाळा चौकाच्या एका कोपर्यात असणार्या या दुकानात वेगळीच हालचाल सुरू होते. कडक ऊन पडलेलं असो किंवा जोरात कोसळणार्या पावसाच्या सरी असोत… अंबिका सँडविचसमोर खवय्यांची रांग लागलेली असते. ‘सर, एक ग्रिल!’ ‘माझं पेशवाई चीज बनवा…’ ‘भाऊ, एक सदाशिव स्पेशल…

थोडं एक्स्ट्रा बटर’ अशा ऑर्डर्सचा वर्षाव चालू असतो. दुकान लहानसं असले तरी इथे एक वेगळीच चव दडलेली आहे. त्या गडबडीत सचिन भगत शांतपणे, हसतमुखाने प्रत्येक ग्राहकाला ‘थोडा वेळ लागेल दादा’ असं सांगत ऑर्डर पूर्ण करत असतात. दुपारी दीड वाजता सुरू झालेला त्यांचा हात आणि ऑर्डर घेण्याचा कार्यक्रम रात्री साडेदहा वाजेपर्यंत नॉनस्टॉप सुरू असतो. इथे मिळणारे सँडविच ‘लाजवाब’ अशी प्रतिक्रिया इथे येणारा ग्राहक देतो, त्यामुळेच मध्यवस्तीमधल्या या सँडविचच्या दुकानामध्ये दररोज ग्राहकांची तुडुंब गर्दी दिसते… इथे सँडविच खायला आलात तर अर्धा तास ते मिळण्यासाठीच काढून यायचा…
अशी झाली सुरुवात
सचिन भगत त्यांच्या भावामुळे सँडविच तयार करण्याच्या व्यवसायात आले. भावाबरोबर काम करता त्यात रुची निर्माण होत गेली आणि २०१४मध्ये चित्रशाळा चौकात स्टॉल भाड्याने घेऊन त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला व्यवसाय लहान होता. त्यामुळे गॅसवर सँडविच तयार करून देत असू, असे सचिन भगत सांगतात. व्यवसाय सुरू झाला तेव्हा चटणी सँडविचच्या बरोबर ग्रिल सँडविच खाणार्या मंडळींची संख्या अधिक होती. कालांतराने सँडविचच्या प्रकारामध्ये भर पडत गेली आणि माझ्या दुकानामध्ये २५ प्रकारचे सँडविच मिळू लागले. हळूहळू त्याचा लौकिक वाढू लागला आणि ग्राहकही वाढत गेल्याचे सचिन यांनी सांगितले.
घरातल्यांची साथ आणि दर्जा…
ग्राहकांना द्यायचं ते उत्तम दर्जाचंच असलं पाहिजे, त्यात तडजोड करायची नाही, हे आमचं पहिल्यापासूनचं धोरण. सँडविचमध्ये वापरली जाणारी (आणि सँडविचची चव खर्या अर्थाने ठरवणारी) चटणी तयार करण्याचे काम माझी पत्नी आणि आई या दोघीजणी करतात. त्यामुळे ग्राहकांना नेहमी एकसारखी चव मिळते, असं सचिन सांगतात. ते सँडविचसाठी कॅम्पमधील ताज बेकारीचा फ्रेश ब्रेड आणतात आणि त्याबरोबर ब्रँडेड बटर, चीज, सॉस यांचा वापर सुरुवातीपासून करत आले आहेत. ग्राहकांना चांगल्या दर्जा आणि चवीबरोबरच पोटभरीचे सँडविच द्यायचं, हे त्यांचं तत्त्व. त्यामुळेच राज्याच्या कोपर्यातून ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्या आशिर्वादामुळेच शून्यातून उभ्या केलेल्या या व्यवसायाला चांगले यश मिळाले असल्याचे सचिन आवर्जून सांगतात.

ग्राहक दर्जासाठी वाट पाहतात…
व्यवसायाच्या सुरुवातीला ग्राहकांना गॅसवर सँडविच बनवून देण्यात खूप वेळ लागत असे. पण सँडविचची चव उत्तम असल्यामुळे थोडा वेळ गेला तरी चालेल, असे म्हणत ग्राहक थांबत असत. व्यवसाय वाढत जाऊ लागला तेव्हा मी दोन सँडविच मेकर घेतले. आता इथे एकावेळी १३ सँडविच तयार होतात. त्यामुळे कामाचा वेग वाढला आहे. ग्रिल सँडविच तयार करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो, पण चांगले खाण्यासाठी लोक घाई न करता थांबतात, हेच व्यवसायाच्या यशाचे गमक असल्याचे सचिन सांगतात.
सदाशिव ग्रिल, पेशवाई ग्रिल ते पुणेरी ग्रिल…..
अंबिका सँडविच पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये आहे, त्या जागेची ओळख ग्राहकांना करून देणारे सदाशिव ग्रिल हे सिग्नेचर सँडविच या दुकानाची ओळख बनले आहे. थोड्या स्पायसी असणार्या या सँडविचला तंदूरचा फ्लेवर आहे. इथल्या लोकप्रिय पुणेरी ग्रिल सँडविचमध्ये मिक्स व्हेजिटेबल असतात, त्याचबरोबर पेशवाई चीज सँडविचमध्ये एक खास मसाला वापरला जातो. व्हेज चीज कॉर्न सँडविचलाही मागणी भरपूर. अशी एक दोन नाही तर ५० प्रकारची सँडविच ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. इथले आणखी एक अतिशय लोकप्रिय सँडविच म्हणजे नेपोलियन सँडविच! यात काय आहे ते इथे येऊन, वाट पाहून ते खाऊनच समजू शकतं.
अंबिका सँडविचमध्ये आधीच रेडी असलेलं सँडविच विकण्याची पद्धत नाही. ग्राहकांनी ऑर्डर दिल्यानंतरच ताजं सँडविच तयार करण्यात येते. त्यामुळे साधं चटणी सँडविच घेतलं तरी ते ते फ्रेश आणि खूपच चविष्ट लागतं. अलीकडे कोणत्याही पदार्थामध्ये अजिनोमोटो, सोया सॉस, सोडा या गोष्टी टाकल्या की त्याची चव खुलते. पण हे पदार्थ आरोग्याला हानी पोहचवतात. त्यामुळे इथे त्यांचा अजिबात वापर करण्यात येत नाही. आपलं सॅन्डविच हे घरच्यासारखं हेल्दी असायला हवं, याला पहिल्या दिवसापासूनच आपण प्राधान्य देत आल्याचे सचिन सांगतात.

सँडविचचे ‘फॅन’
अंबिका सँडविचची मोहिनी खासदार उदयन राजे भोसले, अभिनेते सुबोध भावे यांच्याबरोबरच अनेक सेलिब्रेटींवर पडलेली आहे. इथे रोज सँडविच खाणार्या ग्राहकांची संख्या मोठी असून त्यामध्ये तरुणांची संख्या साहजिकच सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे पुण्याबरोबरच बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद इथून सँडविच खायला येणारे ग्राहक देखील वाढत असल्याचे सचिन सांगतात. हल्ली मुंबईवरून येणारे ग्राहकही वाढू लागले आहे. डी. नारंग नावाचे मुंबईकर ग्राहक म्हणाले, १५ दिवसांपूर्वी काही कामानिमित्ताने मी पुण्यात आलो होतो. अंबिका सँडविचबद्दल बरेच ऐकले होते. मुंबईमध्ये जे सँडविच मिळते, त्यापेक्षा इथे काय वेगळे आहे, या उत्सुकतेने मी त्याची चव घेतली आणि या सँडविचच्या प्रेमातच पडलो, असे ते म्हणाले.
सध्या आपल्याकडे पाच मुले काम करत असले तरी सँडविच तयार करण्याचे काम आपणच करत असल्याचे सचिन सांगतात. ते म्हणतात, प्रत्येक हाताच्या चवीमध्ये फरक असतो. त्यामुळे सँडविचची चव एकहाती ठेवण्याकडे आपला कल आहे. शून्यातून व्यवसाय उभा केला आहे, त्यामुळे तो वाढवताना ग्राहकांच्या मनाची तृप्ती करणे हेच आपले ध्येय राहणार आहे. सँडविचची खरी मजा ही विविधता आणि कस्टमायझेशनमध्ये दडलेली आहे. त्यामुळे अंबिका सँडविचमधलं प्रत्येक सँडविच प्रत्येक ग्राहकासाठी वेगळं आणि खास बनतं. हीच त्याची गंमत आहे.

