पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराज यांनी घोषित केलेल्या दहा-बारा राजाज्ञा ऐकून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला खरोखरच गहिवरून आले. देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी उशिरा का होईना मोदी साहेबांना अखेर साक्षात्कार झाला हे पाहून पोक्याला मनापासून आनंद झाला. पोक्या उद्गारला, मोदीसाहेबांच्या या सूचना खरोखरच देशहिताच्या आणि भारतीय बांधवांच्या भल्यासाठी आहेत. त्यांचे पालन सर्वांनीच करायला हवे. तरीही त्याबाबत मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, लाडक्या बहिणी, शाळकरी विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया घ्यायलाच हव्या, असे मला वाटते. हे बोलून तो मुलाखती घेण्याची कामगिरी फत्ते करून परत आलासुद्धा. त्याच या प्रतिक्रिया-
मुख्यमंत्री फडणवीस : विश्वगुरू मोदी साहेब एखादी गोष्ट सांगतात तेव्हा ती बरोबरच असते हे मी नेहमीच सांगत आलोय. त्यांच्या आवाहनाला स्मरुन मी आजपासून फक्त आणि फक्त सायकलवरूनच प्रवास करीन. माझ्या मोटारीसह ताफ्यातल्या सगळ्या मोटारी भंगारात विकून आलेला पैसा पंतप्रधान निधीत जमा करीन. जुने-नवे सगळे पोशाख भांडीवालीला विकून खादीचा सदरा-सुरवार परिधान करण्यास सुरुवात करीन. सोन्यासारखी पत्नी असताना मला सोने खरेदीची गरज नाही.
उपमुख्यमंत्री शिंदे : केवढा धाडसी निर्णय मोदी साहेबांचा. मी त्याचे मनापासून पालन करीन. मीसुद्धा सायकलवरून प्रवास करीन.हेलिकॉप्टरमध्ये यापुढे कधीच बसणार नाही. सालं भरकटतं ते. कपाटे भरून बंडले आहेत ती गरिबांना प्रत्येकी एक अशी देईन. सगळी प्रॉपर्टी देशाला दान करीन. तेव्हा एक आत्मिक समाधान मला लाभेल.
प्रताप सरनाईक : सर्वप्रथम माझा बहात्तराव्या मजल्यावरचा आलिशान फ्लॅट विकून आलेले पैसे मी परप्रांतीय गरीब रिक्षा-टॅक्सी चालकांना वाटून टाकीन. मराठी शिकणार्या प्रत्येक रिक्षा-टॅक्सी चालकाला घोड्यासह टांगा घेऊन देईन. फ्लॅट विकून टाकणार असल्यामुळे एखाद्या गरीब वस्तीतील पत्र्याच्या बैठ्या चाळीत भाड्याने राहायला जाईन.
शिक्षणमंत्री भुसे : शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचे मोदी साहेबांचे आवाहन ही त्यांच्या दूरदृष्टीची पावतीच आहे. शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, त्यांच्यासाठी दररोज डबा देणार्या पालकांचा कितीतरी त्रास वाचणार आहे. या मुला-मुलींच्या वार्षिक परीक्षा न घेता त्यांना दरवर्षी पुढच्या वर्गात ढकलावे अशी उपसूचना त्याबाबत करू इच्छितो. ही कम्प्युटर शिकवणी दिवसा फक्त दोन तास असावी म्हणजे मुलांना खेळायला मोकळा वेळ मिळेल आणि शिक्षक-शिक्षिकांनाही फावल्या वेळात त्यांचे छंद जोपासता येतील.
महापौर तावडेबाई : मी सुद्धा विदेशी घड्याळासारख्या महागड्या वस्तू वापरणार नाही. सभागृहाचे कामकाजही घरातून
ऑनलाईन चालवण्याचा माझा मानस आहे. नगरसेवकांनीही सभागृहात न येतात घरातूनच मला ऑनलाईन सहकार्य घ्यावे. कामकाज
जास्तीत जास्त तीन तास चालेल. म्हणजे वाहनातून जाण्या-येण्याचा, पेट्रोल डिझेलचा किती खर्च वाचेल याचा तुम्ही विचार करा. नगरसेवकांनीही जनतेच्या विकासकामासाठी दिलेल्या कोटी कोटी निधीपैकी निम्मी रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीला द्यावी, असं माझा आवाहन आहे.
अमित शहा : मी आमच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना नेहमीच सांगत असतो की पैशाची उधळपट्टी करू नका, पण ऐकतच नाही कुणी. निवडणुका आल्या की टेम्पो भरभरून पाचशेची बंडले कुठून येतात यांच्यापाशी! मत देण्यासाठी घरटी एका मताची किंमत किमान पाचशे रुपये असते, असे ऐकलेय मी. चुकीचे आहे ना हे. लोक म्हणतात, एवढा पैसा त्यांच्याकडे येतो कुठून? यापुढे हे चालणार नाही. असेल नसेल तेवढा पैसा पंतप्रधान मदतनिधीत गोळा करा आणि प्रायश्चित घ्या.
गिरीश महाजन : नाशिकच्या महाकुंभ मेळाव्यासाठी कमीत कमी खर्च कसा येईल, याचा विचार मी सध्या करत आहे. कमीत कमी लोक व तेवढेच साधू कसे येतील याची आखणी सुरू आहे. लोकांनी प्रत्यक्ष न येता ऑनलाईन पाहून आपल्या घरातून अर्घ्य वाहून पुण्य पदरात पाडून घ्यावे ही माझी विनंती आहे. साधूंनाही मी तेच सांगेन.
किरीट थोमय्या : भारतातच लग्न आणि हनीमून करा ही मोदींची सूचना रास्तच आहे. आम्ही कुठे परदेशात गेलो होतो? माझे आवाहन आहे की एखादे कोणाला माहीत नसलेले थ्री स्टार हॉटेल बघा आणि तिथे मोजक्या माणसांत लग्न करा आणि हनीमूनसाठी दुसरे कुठे जाण्याची गरज नाही. पैसाही वाचतो आणि देशकार्यालाही हातभार लागतो.
लाडक्या बहिणी : देश आर्थिक संकटात असताना आम्हाला दरमहा पंधराशे रुपये देण्याची अजिबात गरज नाही. आता आम्ही मजबूत आहोत. पुढच्या निवडणुकीत बघू.
मंगलप्रभात लोढा : आतापर्यंत मी अफाट पैसा कमावला याचा आता पश्चाताप होतोय. माझ्या सगळ्या पैशातून आणि संपत्तीतून देशभरातल्या कोट्यवधी कबुतरांसाठी मी पौष्टिक धान्य विकत घेऊन वाटीन. कबुतरांची सेवा हीच ईश्वरसेवा मानून माझे जीवन कबुतरांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित करीन.
नीलम गोर्हे : साधी राहणी आणि अति अति उच्च उच्च विचारसरणी मी एकनाथराव शिंदे साहेबांकडून शिकले. मी कोट्यवधींची कमाई इतक्या वर्षात कशी कमावली ते मलाच कळलं नाही. आता यापुढे शिंदे साहेबांचा सल्ला घेऊन माझी सगळी संपत्ती मी गोहातीला जाऊन देवीला दान करून येणार आहे. येणार्या काळात महायुतीचं काही खरं नाही. शिंदे साहेबांचा पक्ष सर्व बाजूंनी मोठा करण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांच्या मनात मीच आहे याची खात्री बाळगा.

