• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कोयाडं

शुभांगी जोशी (चवदार साठवण)

marmik by marmik
May 15, 2026
in चवदार साठवण
0
कोयाडं

संध्याकाळ झाली की आजोबांसोबत गोठ्यात जायचे, ते धारा काढीत. गडी पण होता, पण आम्ही कंदील धरायला जात असू. दुधं काढून झाली की झोपाळ्यावर बसून रामरक्षा स्तोत्र, पाढे, मारुती स्तोत्र, इत्यादी म्हणत असू. तोपर्यंत खरंच डोळे जड होत असत. दिवसभर उनाडक्या केल्यावर काय होणार?

नावावरून हा कोयीचा काहीतरी विचित्र प्रकार असणार असे तुम्हाला वाटणार याची मला पूर्ण खात्री आहे. पूर्ण मे महिना कोकणात आजीकडे लहानपणी सुट्टीत जायचो. आंब्याची, फणसाची, नारळ, कोकम यांची भरपूर झाडे अवतीभोवती होती. परत लागात मामाने ८०० कलमं हापूस आंब्याची लावलेली, त्याच्यासोबत काजूपण. केळी तर परसदारी होत्याच. विहिरीजवळ चमेलीचा मांडव, कडेला अबोली, गावठी गुलाबाची झुडूपे, कातरलेली जास्वंद, पांढरा व लाल चाफा. थोडे पुढे आत्याचं घर. तिच्या दारात बकुळीचा वृक्ष पसरलेला.
आमच्या कवाडीच्या बाहेर पिस्त्याचे झाड होते त्याच्या पानावर छोटीशी बियावजा फळं असत… ती वार्‍याने पडत, ती गोळा करून सोलून आम्ही खात असू. जांभाचे झाडसुद्धा याचं दिवसात बहरायचे, लागात जाताना करवंदाच्या जाळ्या असत.

आजीची खास परसबाग होती, छोटीशी. त्यात तिचे खास वांईग (वांगी) रोप लावलेलं असे. जवळच मिरचीचे झाड, भोपळ्याचा वेल. डाळवांगं करण्यासाठी जणू सर्व नियोजन कायम असे.

तिथेच पुढे चूल होती पाणी तापवण्यासाठी. त्यावरती एक मोठी तपेली कायम असे. त्याखाली लाकूड सारलेले असे. त्याजवळ एक दगडी द्रोण पाण्याने भरलेला असे. पाच पावलांवर मोठी विहीर. विहिरीला रहाट होताच. त्यातून पाणी शेंदायला फार मजा वाटायची. पूर्वी मी बैलरहाट पण पाहिलेला आठवतोय. बैलांच्या गळ्यात नाजूक घुंगरू बांधलेले असायचे. ते बैल गोल फिरायला लागले की त्या घुंगरांचा सुंदर नाद यायचा. छोट्या-छोट्या लोट्यातून पाणी वर यायचे. ते पन्हाळीत खाली पडताना बघण्याचा छंदच लागायचा.
दुपारच्या वेळेत आजोबा जुना पत्र्याचा डबा हातात देत आणि एक काठी. कारण या शांत वेळी वानरसेना हल्लाबोल करत. मग काय आंबा म्हणू नका, केळी, जांभ वाट्टेल ते, हाती लागेल त्यावरती आक्रमण आणि नासधूस. म्हणून आमच्या हाती काठी व पत्र्याचा डबा. मग आमची बच्चे टोळी डबा वाजवीत त्यांना हाकलून देण्यासाठी मैलभर पळत सुटायचो.

मला आई खास तपकिरी पेटीकोट शिवायची, कारण करवंदं खायची हात पेटीकोटला पुसायचे, करवंद काढताना जाळीतले काटे लागले की रक्त हमखास यायचे. केळीच्या सोप्यात बकुळीचा गजरा गुंफायचा मग केळीचा डाग लागणारच, कोकम खायचे, काजूचे डाग, अंगणात लाल माती त्यावर खेळणार, चिर्‍यांवर बसणार, एक ना दोन… किती गोष्टी या पेटीकोटने व मी रंगवल्या आहेत.

संध्याकाळच्या ४ ते ५ या दरम्यान रिक्षेतून गावात नाटकाची जाहिरात केली जात असे. जाहिरात करताना रिक्षेतील माणूस जाहिरातीचे कागद भिरकावीत असे. ते पकडण्यासाठी आम्ही रस्त्यांनी पळत सुटायचो. जिवाचा आटापिटा करून या जाहिराती मिळवायच्या. जाहिरातीत काय लिहिले आहे, नाटक कशावरचे आहे हे सर्व कळण्याचे ते वय नव्हतेच. तरीदेखील मामाकडे जाऊन हे नाटक आम्हाला पहायचे आहे असा हट्ट करायचा. मामा सांगायचा ही नाटके पिटातली आहेत. तुम्हाला ते बघणे जमणार नाही. पिटातले नाटक म्हणजे लाल मातीत आपापले गोणपाट घालून, त्यावर बसून बघायचे नाटक. त्यातल्या त्यात श्रीमंत मंडळी आपापल्या घडीच्या लोखंडी खुर्च्या नेऊन, त्या उलगडून त्यावर बसून, टेचात ही नाटके पाहत असत. नाटकांची तहान नारायणाच्या देवळात होणारी बुवांची कीर्तने ऐकून व पाहून भागवावी लागायची.

संध्याकाळ झाली की आजोबांसोबत गोठ्यात जायचे, ते धारा काढीत. गडी पण होता, पण आम्ही कंदील धरायला जात असू. दुधं काढून झाली की झोपाळ्यावर बसून रामरक्षा स्तोत्र, पाढे, मारुती स्तोत्र, इत्यादी म्हणत असू. तोपर्यंत खरंच डोळे जड होत असत. दिवसभर उनाडक्या केल्यावर काय होणार? भूक तर लागलेलीच असे. मग नेहमीचा प्रश्न, ‘आई, भाजी काय केली आजीने?’ मग आई सांगायची,’ कोयाडं आणि गरमागरम भात जेवा.’

झाले… माझी कुरकुर सुरू. आजी चांगली नाही, काहीतरी भाज्या करते. कोईची कधी भाजी करतात? आजी पडलेल्या आंब्याचे कातळे काढून आम्हा नातवंडांना द्यायची. मला राग यायचा. माडीवरती मोठ्या रसाळ आंब्याची आढी लावलेली असे. त्यातला आंबा का नाही कापून देत? आई म्हणायची ‘तो आंबा काय नी हा आंबा काय, खायला फोड गोड लागते ना? निमूट खायचं.’ ते आंबे व्यापारासाठी होते म्हणून आजी हे करत असे. पण ते वय या गोष्टी समजण्याचे नव्हते. पटकन राग येत असे.
तर कोयाडं म्हणजे काय, हे समजून घेताना कथाच सांगत बसले. काय करू आठवणी येतातच ना.
कोयाडं म्हणजे रायवळ आंब्याचा केलेला एक प्रकार. भाजी नसली तर वेळ निभावणारा पण रुचकर प्रकार.
साहित्य :
१) ६ रायवळ (लिटीचे) आंबे पिकलेले
२) तीन चमचे तेल व फोडणीचे साहित्य
३) दोन चमचे गूळ
४) १/२ चमचा मोहरीची पूड
५) चवीनुसार मीठ व तिखट

कृती :
१) आंबे धुवुन घ्या, पातेलीत आंबे ठेवा व आंबे बुडतील एवढे पाणी घालून गॅसवर उकळत ठेवा. सालीला मऊपणा येऊ सालीचा रंग बदलला की गॅस बंद करायचा. आता टोपलीत आंब्ो निथळत ठेवायचे व चांगले गार होऊ द्यायचे.
२) एका कढईत तीन चमचे तेल घ्या. ते तापले की मोहरी, हिंग व हळद याची खमंग फोडणी करून ठेवा. यात कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची काही लागत नाही.
३) आंबे गार झाले की आंब्याची नुसती साल बाजूला काढा व बाठ गरासकट बाजूला ठेवा. सालीतील रस काढून घ्या, मग त्यात गूळ, मीठ, तिखट चव बघून घाला. आंबा आंबट असेल तर गुळाचे प्रमाण वाढवा.
४) कढईत फोडणीत बाठी घालायच्या व सालीतील रस पण त्यावर घालायचा व एकच उकळी आणायची.
५) १/२ मोहरी पूड पाण्यात दोन तास भिजवून ठेवा, नंतर रवीने चांगली घुसळा. मग ती वरील कोयाडंमध्ये मिक्स करा. छानच वास व चव येते कोयाडंला.
६) आपले कोयाडं तयार आहे.

हे कोयाडं चविष्ट लागतेच.पण करायलाही सोपे व थोड्या जिन्नसात. रायवळ आंबा नसेल तर इलाज नाही; मग तुम्ही दुसर्‍या आंब्याचे करू शकता. मग करून बघा आणि अभिप्राय कळवा.

Previous Post

फेक जॉब ऑफर ट्रॅप

Next Post

अंगत-पंगत

Next Post
अंगत-पंगत

अंगत-पंगत

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.