आजच्या डिजिटल युगात नोकरी शोधणे जितके सोपे झाले आहे, तितकेच धोकादायकही झाले आहे. मोबाईलवर येणारे मेसेज, ई-मेल, सोशल मीडियावरील ऑफर्स, सगळं काही इतकं आकर्षक असतं की अनेकदा आपण विचार न करता त्या जाळ्यात अडकतो. नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूकही अशाच प्रकारांपैकी असून अनेकदा ती हनीट्रॅपच्या स्वरूपात घडते. तुम्हाला मिळणारा जॉब इतका आकर्षक आहे की तुमच्या सगळ्या आर्थिक गरजा पूर्ण होतील, इतका पगार तुम्हाला मिळणार आहे, असे खोटे सांगून समोरच्या व्यक्तीला मोहाच्या जाळयात ओढले जाते. त्यानंतर ट्रेनिंगच्या नावाखाली त्याला पैसे भरण्यास सांगून त्याची लूट केली जाते, हा सगळा प्रकार एक ट्रॅप असतो. पण ते सगळे लक्षात येईपर्यंत समोरील व्यक्ती त्यामध्ये पूर्णपणे फसलेली असते. बनावट भरतीच्या नावाखाली हे प्रकार घडतात, त्यामुळे नोकरीसाठी जिथे तुमच्याकडे पैशांची मागणी होत असेल तर तिथे आपली फसवणूक होणार आहे, हे नक्की समजा.
ही कथा आहे आकांक्षा पटेल नावाच्या तरुणीची…
आकांक्षा ही एक हुशार, मेहनती आणि महत्त्वाकांक्षी मुलगी होती. तिने मार्केटिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं होतं आणि एका छोट्या कंपनीत नोकरी करत होती. पण तिला मोठ्या ठिकाणी नोकरी करायची होती. चांगली पोस्ट, मोठा पगार आणि उत्तम आयुष्य असे तिचे स्वप्न होते. त्यामुळे नवीन नोकरी शोधण्यासाठी दररोज ती नव्या संधीच्या शोधात वेगवेगळ्या जॉब वेबसाइट्सवर बायोडेटा अपलोड करत असे. जॉब पोर्टल्स, ई-मेल्स, अशा ज्या ठिकाणी तिला संधी दिसेल तिथे ती प्रयत्न करत होती. हे करत असताना तिच्या मनात एकच विचार सुरू होता. तो म्हणजे, कधीतरी एक मोठी संधी माझ्याकडे चालून येईल. ‘एक दिवस तिच्या मोबाईलवर एक ई-मेल आला. तो एका नावाजलेल्या मार्वेâटिंग कंपनीकडून आल्याचे दिसत होते. त्यात लिहिले होते, आम्हाला तुमचा बायोडेटा खूप आवडला आहे. आम्ही तुम्हाला थेट मॅनेजरपदासाठी निवडले आहे. पगार ६०,००० रुपये आणि विविध भत्ते मिळून तुम्हाला सव्वा लाखापर्यंत पगार देऊ शकतो. हे वाचताच आकांक्षाच्या डोळ्यांसमोर आता आपले स्वप्न पूर्ण होणार असे दिसू लागले होते. थेट मॅनेजर? आणि एवढा पगार? हे वाचून तिला थोडं आश्चर्य वाटलं होते. पण त्याचा तिला जास्त आनंद झाला होता. त्या मेलमध्ये पुढे लिहिलं होतं. ‘जर तुम्हाला ही ऑफर मान्य असेल, तर फक्त ‘भ्Eए’ असा रिप्लाय करा.’ आकांक्षाने क्षणभरही विचार न करता ‘भ्Eए’ लिहून पाठवून दिले. त्यानंतर अवघ्या एका तासात तिला उत्तर आले होते. त्यामध्ये ‘आमचे वरिष्ठ अधिकारी विजय कुमार तुमची ऑनलाइन मुलाखत घेतील.’ त्यासाठी तुम्हाला एक लिंक पाठवण्यात आलेली आहे.
त्यांनी दिलेल्या वेळेला आकांक्षाने ती लिंक उघडली. स्क्रीनवर एक नीटनेटका, कोट आणि टाय घातलेला एक प्रोफेशनल माणूस दिसत होता, त्याने आपले नाव विजय कुमार असे सांगत स्वतःची ओळख करून दिली. पहिल्या वाक्यापासून त्याने आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला,
मॅडम, तुमचा प्रोफाइल खूप प्रभावी आहे. आम्हाला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. ती मुलाखत फारशी कठीण नव्हती. काही सामान्य प्रश्न, थोडं कौतुक त्यात झाले. शेवटी विजय कुमार म्हणाला, गुड न्यूज फॉर यु, तुमची निवड झाली आहे. तुम्हाला ६०,००० पगार आणि इतर भत्ते मिळतील. हे ऐकून आकांक्षा आनंदाने भारावून गेली होती.
मुलाखतीनंतर विजयकुमार म्हणाला, मॅडम, जॉयनिंगपूर्वी आम्हाला तुमची पार्श्वभूमी तपासणी करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. असे म्हणत, त्याने त्याने एक लिंक पाठवली. त्या फॉर्ममध्ये आधार क्रमांक, पॅन कार्ड, बँक डिटेल्स, ई-मेल, फोन नंबर अशी माहिती विचारण्यात आली होती. क्षणभरासाठी आकांक्षाच्या मनात शंका आली होती. इतकी माहिती यांना कशाला हवी आहे? पण लगेच तिच्या डोक्यात दुसरा विचार आला. मोठ्या कंपन्या असंच करतात. तिने सगळी माहिती भरून पाठवली. दोन दिवसांनी तिला मेल आला. तुम्हाला लवकरच ऑफर लेटर मिळेल. आनंदात आकांक्षाने जुनी नोकरी सोडली आणि नवीन सुरुवातीची वाट पाहू लागली होती.
त्याच वेळी तिला धक्का देणारी एक घटना घडली. तिच्या खात्यातून ९०,००० रुपये परस्पर काढले गेले होते. तिने घाबरून बँकेत फोन केला. तेव्हा तिला सांगण्यात आले की हे पैसे’ तुमच्या खात्यातून ऑनलाइन ट्रान्सफर झालेले आहेत. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. आकांक्षाने लगेच बँक खातं बंद केलं. पण गोष्ट इथेच थांबली नाही. तिच्या सोशल मीडियावरून तिच्या मित्रांना मेसेज गेले. ‘मला पैशांची गरज आहे.’
हे पाहिल्यावर ती पूर्णपणे हादरली होती. तिने पोलिसात तक्रार केली. पोलीस आणि सायबर तज्ज्ञ यांनी त्याचा शोध घेतला, तेव्हा लक्षात आलं की तिला नोकरी देण्याचे जे आश्वासन देण्यात आले होते, तो नोकरी देण्याचा फसवा ट्रॅप होता. दिल्लीमधील सायबर गुन्हेगारांनी बनावट मेलच्या माध्यमातून आकांक्षाला मॅनेजरपदाची स्वप्ने दाखवत तिची सगळी माहिती काढून घेत तिचीच फसवणूक केली होती. चांगल्या नोकरीच्या शोधात असणारी आकांक्षा फसव्या प्रलोभनाला सहज बळी पडली होती. ती कंपनी, मुलाखत, विजय कुमार नावाचे पात्र, हे सगळं जाळं फसवणुकीसाठी विणलेलं होते. या सगळ्या प्रकारामुळे आकांक्षाचं स्वप्न तुटलं. नोकरी गेली, पैसे गेले आणि तिचा आत्मविश्वासही डळमळला. आपण जर थोडा विचार केला असता, तर कदाचित हे टळलं असतं, असे तिला वाटत होते. मात्र, तो पर्यंत वेळ निघून गेली होती.
अशी घ्या काळजी
१) जॉब ऑफर खूपच आकर्षक असेल तर सावध राहा. कमी अनुभवात जास्त पगार असेल तर तिथे शंका घेण्यासारखी स्थिती असते.
२) कंपनीची खातरजमा करा- अधिकृत वेबसाइट तपासा, गुगलवर रिव्ह्यू वाचा, कंपनीचा पत्ता आणि संपर्क तपासा.
३) अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ईमेल किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करताना विचार करा.
४) वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका- बँक डिटेल्स, ध्ऊझ्, आधार/पॅन, ही माहिती फक्त विश्वासार्ह आणि अधिकृत ठिकाणीच द्या.
५) नोकरी देण्यासाठी कोणी पैसे मागितले, तर लगेच नकार द्या- कोणतीही खरी कंपनी नोकरी देण्यासाठी पैसे मागत नाही.
६) सुरक्षित प्लॅटफॉर्म वापरा- मुलाखतीसाठी नेहमी विश्वासार्ह अॅप्स वापरा.
७) ईमेल आयडी तपासा- फेक ईमेलमध्ये स्पेलिंग चुका किंवा विचित्र डोमेन असतात.
८) 2FA (Two-Factor Authentication) सुरू ठेवा- त्यामुळे तुमच्या खात्यांची सुरक्षा वाढते.
९) नोकरी मिळवण्याची घाई हीच अनेकदा फसवणुकीचं कारण ठरते.

