उन्हाळा आला की जसा-जसा उन्हाचा पारा चढत जातो, तसा लग्नाचा बार उडवून देण्याचा मौसमही ऐन भरात आलेला असतो. रात्री उकाड्याने अर्धवट झालेल्या झोपेची दुपारी दीर्घ वामकुक्षी घेत भरपाई करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच तुमच्या दारावरची घंटी वाजते. एरवी कधी ज्यांच्या घरचे कुत्रेसुद्धा तुमच्या दारात फिरकत नसते आणि चटकन नावही न आठवणारे असे हे दूरचे नातेवाईक आपले दात दाखवत लग्नाची पत्रिका घेऊन आमंत्रण द्यायला आलेले असतात. मी सहसा असे लग्नाचे आमंत्रण काहीतरी थातुर-मातुर कारण सांगून टाळण्याचाच प्रयत्न करत असतो. एकतर उकाड्याने जीव हैराण झालेला असतो. अंगावर ठेवणीतले कपडेच काय, अगदी आतले कपडेसुद्धा नकोसे झालेले असतात. डबक्यात डुंबणार्या म्हशींचा हेवा वाटावा असे हे दिवस! नेमक्या अशा उन्हाळ्याच्या दिवसात अगदी रस्त्यावर पाऊल टाकणेही दुरापास्त झालेले असताना सप्तपदीची मनीषा उरी बाळगून असलेल्या लग्नेच्छुक वधू-वरांची धावपळ चाललेली असते. बाशिंगधारी नवरदेवाचा उत्साह तर रोज वाढत जाणार्या पार्याशी स्पर्धा करत असतो. आता तर काही उत्साही मंडळीमुळे ‘प्री वेडिंग शूट’ नावाचा एक धमाल प्रकार जन्माला आला आहे. पूर्वी लग्नाआधी काही गोष्टी निषिद्ध समजल्या जात. अगदी बायकोवर प्रेमसुद्धा पूर्वीचे खानदानी लोकं लग्नानंतर तीन-चार मुलं-बाळं झाल्यानंतर सावकाश करत असत! आता त्या बाबतीत सुधारणा होतं आहेत ही समाधानाची बाब आहे. काही ठिकाणी प्रीवेडिंग शूटला स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी विरोध केल्याच्या बातम्यासुद्धा येतात. तसे पहायला गेले तर प्री-प्री करत पार गेल्या जन्मापर्यंत शूट केले तरी त्या दोन कुटुंबाखेरीज कुणाला त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. परवा एका खेडेगावात असलेल्या एका नातेवाईकांच्या लग्नाचे आमंत्रण आले. शहरात पुष्कळ लग्ने पाहिलीत. खेड्यावरचे लग्न फार पूर्वी पाहिले होते. तेवढाच बदल म्हणून लग्नाला मुद्दाम वेळ काढून जावे असे ठरले.
शहरातील लग्ने आता फारच व्यावसायिक पद्धतीने साजरी केली जातात. लग्नाच्या प्रत्येक विधीला त्या त्या क्षेत्रातील प्राविण्य प्राप्त असलेल्या विक्रेत्या किंवा पुरवठादार मंडळींची सेवा घेतली जाते. डेकोरेशनवाले सर्व सजावटीचा भार उचलतात. त्यांच्याकडे असलेल्या अल्बममधून आपण फक्त आपल्याला हवं असलेलं डिझाईन पसंद करायचं (आणि ऑफकोर्स त्याचे पैसे द्यायचे!) की झालं काम. मेकअप करायचा आहे? बोलवा मेकअप आर्टिस्ट. त्यातही नवरीसाठी वेगळा आणि नवर्यासाठी वेगळा असे स्पेशालिस्ट मिळतील आणी जन्मदाते पालकसुद्धा ओळखणार नाहीत असा तुमचा चेहरा-मोहरा बदलवून टाकतील! नवरा-नवरीसाठी फुले चिकटवलेली कार (ड्रायवरसह) मिळेल. वरातीसाठी घोडी (मालकासह) हजर होईल. हनिमूनसाठी (नाही इथे पार्टनरसह नाही हं!) संपूर्ण पॅकेज तुमच्या बजेटनुसार तयार करून मिळेल.
पण त्यामुळे हे सगळं कसं एकसुरी झालेलं आहे. सगळीकडे तोच-तोपणा आलेला आहे. सगळीकडे बुफे टाईप जेवण आणि मेनूसुद्धा इकडून तिकडून सारखाच. तीच ती पनीर आणि वांगे-बटाट्याची भाजी, तीच स्वीट डिश आणि तेच मुखवास. नवर्याच्या अंगात लग्न-विधीसाठी शेरवानी आणि रिसेप्शनला सूट (चाळीस डिग्री तापमानात कोट!). नवरीला भडक रंगाच्या मेकअपशी स्पर्धा करणारी भरपूर जरीचे काम केलेली तेवढीच भडक रंगाची साडी.
एवढेच कशाला डेकोरेशनमध्ये कुठे गुलाबाचे फूल लावले जाईल आणि कुठे झेंडूचे हे सुद्धा तुम्ही सांगू शकाल!
एकूण काय? तर नवरा-नवरी हे नर-मादीच असतील की नाही? एवढे एक कोडे सोडल्यास, बाकीचं सर्व हिंदी सिनेमासारखं सगळं अगदी प्रेडिक्टेबल झालेलं आहे!
खेडेगावातील लग्नात छानपैकी जेवणाच्या पंगती उठतात. आपण एके जागी बसायचे आणि येणार्या वाढप्यावर एक डोळा ठेऊन पानात पडलेले जिन्नस संपवायचे. एकाच गावात असल्यामुळे वाढणारे आणि खाणारे एकमेकांना पक्के ओळखून असतात. एका लांब सतरंजीवर नाहीतर पाटावर ही पंगत बसायची. जेवण वाढायला एक क्रम असायचा. आधी मीठवाला चिमूटभर मीठ टाकून सुरुवात करायचा. मग लिंबू, कोशिंबीर, लोणचे, भाजी, पोळी अशा क्रमाने पदार्थ वाढण्यात येत. सर्वात शेवटी भात-आमटी किंवा वरण यायचे. त्यानंतर गोड पदार्थ.बुफेमध्ये हातात ताटली घेऊन वणवण भटकत खाणे कोणाला आवडते? तुम्ही पंगतीत छान आरामात भारतीय बैठक मारून जेवण करू शकता. बाजूला तुमचे मित्र किंवा नातेवाईकच असतात. ते आग्रह कर-करून तुम्हाला प्रेमळ जबरदस्तीने खायला घालतात. आपण अर्धे जेवण झाल्यावरच नको-नको म्हणायचे असते. ‘नाही’ म्हटले तर आग्रह करणारा समोरचा मनुष्य हा स्वत:चा अपमान समजत असल्यामुळे तसे करताही येत नाही. तुम्हाला ते खावेच लागते! मग खाल्लेले गळ्यापर्यंत येऊ शकते. एखाद्या ‘बाबू’ची ‘चिंगी’ पंगतीत बसलेली असली आणि वाढायला बाबू असला तर तिच्या ताटात वाटीभर जास्तीची बुंदी पडते! एखादा वात्रट मित्र वरण वाढताना भाताचा छान गोल खळगा केला असला तरी त्याच्या बाहेर सांडेल असे वरण ओततो! अशा विविध नाट्य-छटा पंगतीत पहायला मिळतात. आपापसातले स्नेहबंध असे घट्ट करण्यात येतात. छे, बुफे जेवणात असले काही नसतेच…
अशाच काहीशा आठवणी मनात आल्यामुळे पुन्हा एकदा तसे अनुभवण्यास मिळेल ह्या आशेने मुळात मी त्या गावी जाण्यास तयार झालो होतो. लग्नस्थळी आम्ही सकाळीच पोहोचलो. साडेबाराचा मुहूर्त होता. घरासमोरील जागेत अंगणात मोठा मंडप टाकून तेथे लग्नविधी होणार होते. जेवणाची सोय मात्र घरामागच्या बाजूला असलेल्या पटांगणात मंडप टाकून केलेली होती. जवळचे नातेवाईक आदल्याच दिवसापासून रात्रभर येथेच मुक्कामाला होते. त्यांचे आवरणे चालू होते. मुलांचा धिंगाणा चालू होता. त्यांच्यामागे हाका मारून-मारून कावलेल्या त्यांच्या आया-मावशांनी मधेच एखादा धपाटा दिल्याचा आवाज कानी पडत होता! यजमान लगबगीने कुठून तरी येत होते आणि घाईघाईने कुठे तरी जात होते! मधेच पिपाणीचे सूर नाहीतर ताशा वाजवून बँडवाले आपली वाद्ये तपासून पाहत होते. मुलांचा घोळका त्यांच्या वाद्याला हळूच हात लावण्याचा प्रयत्न करत होता. काहीजण त्यांच्या लाल डिझाईनच्या टोप्या आपल्या डोक्यावर ठेवून खिदळत होते. असा मस्त लगीनघरचा माहौल बनला होता.
पाहता पाहता गर्दी वाढली. उन्हे चढली आणि बराच उष्मा जाणवू लागला. शेजारच्या काकूंनी अनवधानाने चेहर्याच्या एका बाजूने हाताने घाम पुसल्यामुळे तेथील मेकअप पुसला गेला. त्यामुळे त्यांचा अर्धा चेहरा काळाशुभ्र तर अर्धा चेहरा पांढराकुट्ट असा मजेशीर दिसायला लागला! सवय नसल्यामुळे पलीकडच्या खुर्चीवर बसलेल्या वहिनींची लिपस्टिक हनुवटीवर पसरून नुकतीच शिकार करून आलेल्या वाघिणीसारखा त्यांचा चेहरा दिसत होता. पण बायकांचे सर्व लक्ष एकतर एकमेकींच्या साडीवर नाहीतर अंगावरच्या दागिन्यांंवर होते. ‘नवरा मुलगा जरा सावळा आहे हो’ अशी कुणाची तरी तक्रार होती तर कुणी ‘नवरी फारच बुटकी आहे नाही का?’ असे दबक्या आवाजात सांगत होते. पुरुष मात्र ‘लग्न करताय ना? मग निस्तरा तुम्हीच’ असा किंवा मग ‘मरूदे, आपल्याला काय करायचंय?’ असा निर्विकार चेहरा करून वावरत होते. आता पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती. घामाच्या धारा स्वत:च्या उगमस्थानापासून विलीन होण्याच्या जागेपर्यंत आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. कधी एकदा हातातल्या अक्षता फेकतो आणि जेवायला बसतो असे झाले होते.
शेवटी एकदाचे लग्न संपन्न झाले आणि आयोजकांनी जेवणाची सूचना देण्याआधीच अर्धे वर्हाड मागच्या बाजूला असलेल्या जेवणाच्या व्यवस्थेकडे स्वयंस्फूर्तीने कूच करते झाले. प्रवेशद्वारावर एकच झुंबड उडाली. पूर्वीच्या काळी ‘आक्रमण’ अशी आरोळी देत शत्रूवर आपले सैन्य तुटून पडायचे अगदी तसाच सीन सुरू होता. त्या रेटारेटीत मी आत कधी पोहोचलो कळलेसुद्धा नाही. पण हे काय? आतमध्ये पंगत नव्हतीच. एका बाजूला ओळीने मांडलेली टेबले आणि बुफे पद्धतीचे जेवण होते. समोरच असलेल्या यजमानांना मी ह्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. पण माझ्या निषेधाकडे दुर्लक्ष करून त्यांनी ‘गावातले हे पहिलेच बुफे टाइप जेवण’ असे आपली छाती फुगवून संगितले. माझी तर भूकच पळाली. बाकी गावातले लोक हे पहिलेच बुफे जेवण आहे, हे सिद्ध करत होते. रांगेत येऊन ताट हाती पडताच पळत जाऊन कोणत्याही काउंटरवर जाऊन तेथील पदार्थ घेणे सुरू होते. तेथून कुणी गर्रकन मागे फिरून शेजार्याच्या पाठीवर वरणाची पिवळी रांगोळी काढत होते.
एक पहिलवान गडी भाजी वाढणार्या केटरर्सवाल्या मुलाला ‘अय, जरा माणसासारखं वाढ की’ म्हणत त्याच्या हातातला चमचा हिसकावून घेत स्वत:च्या हाताने भाजी वाढून घेत होता. बहुतेक सर्वांनी आपली ताटे तुडुंब भरून घेतली होती. ताटात चमचाभर जागासुद्धा शिल्लक उरणार नाही याची खबरदारी घेतली होती. कुणी भाजीपेक्षा जास्त लोणचे घेतले होते. बहुदा त्याने लोणचे हे भाजी समजून तेवढ्या प्रमाणात घेतले असावे. (किंवा त्यातले काही घरी पार्सल घेऊन जाण्याचा प्लॅन असावा!) बायकांनी आपल्या पोरांना घेऊन मध्येच रिंगण घालून बसवले होते आणि त्या त्यांना भरवत स्वत:ही तेथेच बसून खायला लागल्या होत्या. तळलेले अर्धे पापड तर जागोजागी असलेल्या पंख्याच्या वार्याने उडून जमिनीवर पडले होते. चालताना त्यावर पाय पडून ‘कुर्रम-कुर्रम’ असा आवाज येत होता. मंडपाच्या कपड्याकडे तोंड करून एकजण बका-बका तोंडात घास कोंबत होता. चेहर्यावर काहीसे त्रासिक आणि हिंसक भाव होते. त्याच्या ताटात पाहिले तर वीस-पंचवीस गुलाबजामुन लुटून आणलेले दिसले! आपण एखादा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ला तर बाकीच्यांना काहीच मिळणार नाही- असा विचार त्याच्या गावी ही नव्हता. नसू दे, पण जे मिळालंय ते आनंदाने तरी खावे की नाही माणसाने?
कहर तर पुढेच होता. त्या हावर्यासारख्या ताटे भरलेल्या लोकांनी अर्धे अधिक अन्न टाकून दिले होते. मला त्या बिचार्या केटरिंगवाल्याची दया आली. मुळात ही बुफे पद्धत इंग्रज साहेबाची. जेंटलमेन म्हणतात त्या साहेबासाठी. आपल्या भारतीय गावच्या लोकांना पंगतच बरी! एक तर सर्व मेहनतीने जामानिमा जमवायचा आणि ‘कसा केटरिंगचा धंदा करतोस तेच पाहतो’ अशा इरेसरीने पेटलेले गिर्हाईक सांभाळायचे!
बरे ते सोडा, ते व्हॉट्सअपवर आलेल्या लग्न-पत्रिकेवर लग्नाला जायचे असते की नाही?
