• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘अभ्यासोनि प्रकटावे’!

योगेंद्र ठाकूर (बेधडक)

marmik by marmik
May 8, 2026
in बेधडक
0
‘अभ्यासोनि प्रकटावे’!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे केले, तेव्हा आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांच्यासह उत्तरेतील मोगल आणि बाहेरच्या देशातून आलेले इंग्रज, डच,  फ्रेंच या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर गुडघे टेकले होते. हा जाज्वल्य इतिहास निर्विवादपणे प्रस्थापित झालेला असताना बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी सार्वजनिक मंचावरून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान केला. नागपूरजवळील जामठा येथील भारतदुर्गा मंदिराच्या शिलान्यास सोहळ्यादरम्यान धीरेंद्र म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज सततच्या युद्ध आणि संघर्षांनी थकले होते. ते एकदा समर्थ रामदास स्वामींकडे गेले, आपला मुकुट त्यांच्या चरणी ठेवला आणि म्हणाले की, आता माझ्यात लढण्याची ताकद उरलेली नाही, हे राज्य तुम्हीच सांभाळा. महाराजांनी राज्य सोडण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा समर्थांनी विचारले की, मी कोण? शिवाजी महाराज उत्तरले, तुम्ही गुरू! तुम्ही कोण? तर शिष्य. शिष्याने गुरूचे ऐकायचे असते. तो मुकुट पुन्हा महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि सांगितले की, ‘राज्य माझे असेल, पण ते चालवण्याची जबाबदारी तुझी असेल.’ त्यांच्या या अनैतिहासिक, बेलगाम आणि शिवरायांची थेट बदनामी करणार्‍या वाचाळ वक्तव्यावर महाराष्ट्रात टीकेची झोड उठली आणि शिवप्रेमी संतापले.

रामदास स्वामी जर शिवाजी महाराजांचे गुरु असते तर… ६ जून १६७४ ला झालेल्या महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समयी रामदास कुठे होते? ते राज्याभिषेकाला हजर का नव्हते? अफझलखानासोबत झटापटीचा जीवघेणा संघर्ष करून आल्यानंतरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना भेटल्याचा पुरावा आहे का? पन्हाळगडाच्या वेढातून सुटका झाल्यानंतर महाराजांची या रामदासांनी विचारपूस केल्याचा पुरावा आहे का? औरंगजेबासारख्या बलाढ्य राज्याच्या तावडीतून सुखरूप छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतरही हे गुरू राजांची भेट घेत नाहीत, याचा अर्थ काय? जिजाऊंच्या मृत्यूसमयी ते का उपस्थित नव्हते? शिवरायाचांच्या मृत्यूसमयी देखील ते हजर का नव्हते?

छत्रपती शिवाजी महाराज हे शिवउपासक होते. रामदास स्वामी हे राम आणि मारुतीचे उपासक होते. गुरु-शिष्यांमध्ये एवढी भिन्नता का होती? शिवरायाचा जयघोष ‘हर हर महादेव’ होता आणि रामदासांचा जयघोष ‘जय जय रघुवीर समर्थ’! रामदास जर गुरू असतील तर त्यांच्या आणि शिवाजी महाराजांच्या जयघोषात फरक का? जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास येथील ब्राह्मणांनी, शिवराय शूद्र आहेत क्षत्रिय नाहीत म्हणून, नकार दिला. तेव्हा रामदास स्वामींनी या ब्राह्मणांना अक्कल का शिकवली नाही? रामदास स्वामी शिवाजी राजांचे गुरू होते तर त्यांनीच शिवाजी राजांचा राज्याभिषेक का केला नाही? त्यासाठी गागाभट्टाला काशीहून बोलवावे का लागले? अशा अनेक बिनतोड प्रश्नांची उत्तरे ही मंडळी देऊ शकणार नाही.

समर्थ रामदास स्वामींना बळेबळेच शिवाजी महाराजांचे गुरू दाखवण्यासाठी स्वतःला धर्मरक्षक म्हणवणारेच शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान करत असतील, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. शिवाजी महाराजांनी आयुष्यभर देव, देश आणि धर्मासाठी संघर्ष केला होता, हे सत्य नाकारता येणार नाही,’ असे नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत डॉ. मुधोजी राजे भोसले म्हणाले. तर, ‘धीरेंद्र कृष्ण शास्त्रीचे विधान धादांत खोटे असून रामदास स्वामी आणि शिवरायांची भेट झाल्याचा पुरावा नाही’ असे मराठा सेवा संघाचे दिलीप खोडके यांनी नमूद केले.


तर धीरेंद्र शास्त्रीच्या वक्तव्याला सनातन धर्मगुरू स्वामी आनंद स्वरूप यांनी वेगळे अकलेचे तारे तोडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला दुय्यम ठरवले आहे. ते म्हणतात, ‘‘युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचे झाले. शिवाजींनी कधी युद्ध मैदानात लढले नाही तर फक्त छापेमारी केली. पेशव्यांनी मात्र युद्धाच्या मैदानात लढाई केली. धीरेंद्र शास्त्री जे बोलले त्याचं मी शब्दशः समर्थन करतो. त्यांनी माफी मागायची गरज नव्हती.’ हे गरळ ओकले गेल्यानंतरही स्वतःला छत्रपतींचा वारस म्हणवणारे खासदार-आमदार नेतेमंडळी मौन बाळगतात. त्यांचे रक्त सळसळत नाही. सत्तेचे गुलाम! दुसरे काय?

यावेळी आठवतो प्रबोधनकारांचा ठाकरी बाणा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेल्या ‘ग्लिम्प्सेस ऑफ इंडिया’ या इंग्रजी पुस्तकात अफझल खान प्रकरणी शिवाजी महाराजांना खुनी ठरवून नेहरूंनी कुत्सित टीका केली होती, तेव्हा प्रबोधनकार ठाकरे यांचा स्वाभिमान आणि स्वदेशाभिमान खडबडून जागा झाला. त्यांनी ‘रायगडची गर्जना’ ही छोटेखानी पुस्तिका लिहून नेहरूंच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. इंग्रजीतूनही लेख लिहून नेहरूंच्या कुत्सित टीकेला ऐतिहासिक पुराव्यासह उत्तर दिले होते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पंडित नेहरूंनी जाहीर केले की मी तुरुंगात असताना आणि विशेष कागदोपत्री पुरावा नसताना लिहिल्यामुळे चूक झाली. संतप्त मराठ्यांनी मला क्षमा करावी. पुढच्या आवृत्तीत योग्य ती सुधारणा मी अगत्याने करीन. अशा विकृतींवर वेळीच कृती केली की ती परिणामकारक ठरते हे प्रबोधनकारांनी तेव्हा दाखवून दिले.

२५ वर्षांपूर्वी घडलेल्या जेम्स लेन प्रकरणातही अशीच जिजामाता व शिवाजी महाराजांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चुकीच्या माहितीद्वारे झाला होता. तो पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटमधील शिवद्वेष्ट्या विद्वानांनी मुद्दाम घडवून आणला असा आरोप शिवप्रेमी संघटनांनी केला होता. अमेरिकन लेखक जेम्स लेन यांनी ‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांच्या अनुषंगाने जिजामातेचे चरित्रहनन करणारे लिखाण केले होते. शिवप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकारने या पुस्तकावर २००४ साली बंदी घातली. जेम्स लेन याने देखील माफी मागितली. त्या माफीत त्याने स्पष्टपणे म्हटले की, मला भांडारकर इन्स्टिट्यूटमधील काही विद्वानांनी माहिती दिली. शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि कार्याला कमी लेखण्यासाठी महाराष्ट्रातील एक वर्ग महाराज हयातीत असताना सुद्धा कार्यरत होता आणि आज ४०० वर्षानंतरही हा वर्ग कार्यरत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या, मोदी सरकारच्या कार्यकाळात, गेल्या १०-१२ वर्षांत या वर्गाची भीड चेपत चालली आहे आणि त्यामुळे तशा घटनाही वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर शिवछत्रपतींचा पवित्र जिरेटोप चढवणारे राष्ट्रवादीचे लाचार नेते प्रफुल्ल पटेल, शिवाजी महाराजांची अवहेलना करणारे भाजपचे श्रीपाद छिंदम आणि प्रशांत परिचारक या लोकप्रतिनिधींवर कसलीही कारवाई झाली नाही. भाजपाचे प्रवक्ते व खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी ‘शिवाजीने औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली’ असे धादांत खोटे विधान केले तरी भाजपाने साधा निषेधही नोंदवला नाही. संघपुरस्कर्ते अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत ठोकून दिले की, ‘शिवाजी महाराज आग्य्राहून रायगडला पेटार्‍यातून गनिमी काव्याने आले नाहीत तर ते रितसर औरंगजेबाची सही शिक्का असलेले परवानगीपत्र घेऊन आग्य्रातून बाहेर पडले. त्यासाठी शिवाजी महाराजांना काही हुंड्या वटवाव्या लागल्या होत्या.’ तसेच समर्थांशिवाय शिवाजींना कोण विचारेल असे मूर्खपणाचे विधान महाराष्ट्राचे काळी टोपी भाज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शिवाजी महाराज हे रामदास स्वामींमुळे घडले, या भूलथापेचा प्रचार केला होता. हे सर्व लोक महाराष्ट्राच्या भूमीवरच हे गरळ ओकले. तरी भाजपचे नेते गप्प राहिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘बंच ऑफ थॉट्स’ या संघाच्या वैचारिक हँडबुकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण केले आहे. वीर सावरकर यांनीही ‘सात सोनेरी पाने’ या पुस्तकात छत्रपती शिवराय आणि शंभूराजांबद्दल घाणेरडे व विकृत लिखाण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नीट अभ्यास न करता प्रगटणारे हे सर्व महाभाग एका विशिष्ट मनोवृत्तीचे, कोत्या मनाचे आणि शिवरायांचा द्वेष नसा-नसात ठासून भरलेले विकृत मानसिकतेचे लोक आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या विचारांनी देशाला आणि महाराष्ट्राला दिशा दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे विचारच संविधानातही आहेत. हाच विचार व छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व भाजपा व रा. स्व. संघाला मान्य नाही म्हणून महाराजांची सातत्याने बदनामी करणे, त्यांचा अपमान करणे आणि महाराजांच्या इतिहासाची विकृत मांडणी करणे हे भाजपा व रा. स्व. संघाचे राष्ट्रीय धोरण आहे. शिवरायांबद्दल भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्री अपमानकारक बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विरोधाचा एकही शब्द उच्चारला नाही. त्यांनी त्याला थांबवले पाहिजे होते. राज्यभरात या विरोधात तीव्र संताप प्रगट झाला आहे. शिवरायांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा मनुवादी भाजप-संघाचा ठरवून केलेला हा कट आहे का? महाराष्ट्र धर्माला संपवण्याचा हा घाट आहे का? या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे, महाराष्ट्र धर्माला नख लावणार्‍या प्रत्येक वृत्तीला वेळीच चाप बसला पाहिजे! महाराष्ट्रात सर्वत्र काँग्रेस, मूळ शिवसेना आणि शिवप्रेमींनी या घटनेवर संताप व्यक्त केला. पण स्वतःला ‘छत्रपतींचा आशीर्वाद’ म्हणवणार्‍या भाजपसह गद्दार शिंदेसेनेने बागेश्वर बाबाला खडे बोल सुनावले नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. शिवराय आणि शंभूराजेच नव्हेत, तर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, वल्लभभाई पटेल,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी थोर महापुरुषांवर टीका-टिप्पणी करताना त्यांच्या कार्याचे-शौर्याचे नीट आकलन करून समर्थ रामदास सांगतात त्याप्रमाणे ‘अभ्यासोनी प्रगटावे’ हेच बरे!

Previous Post

राशीभविष्य (९ ते १५ मे २०२६)

Next Post

शिव्या हेच आपले छुपे वैभव!

Next Post
शिव्या हेच आपले छुपे वैभव!

शिव्या हेच आपले छुपे वैभव!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.