• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गांधीवादी समाजवाद ते (बेगडी) हिंदुत्व!

योगेश वसंत त्रिवेदी (चौफेर)

marmik by marmik
April 25, 2026
in भाष्य, विशेष लेख
0
गांधीवादी समाजवाद ते (बेगडी) हिंदुत्व!
सत्तेने मदमस्त झालेल्या एकछत्री राजवटीचा अंमल धुडकावून लावीत लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी १९७७ साली मोठ्या मेहनतीने, अथक परिश्रमाने  संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल या विविध विचारप्रणालींच्या चार पक्षांची मोट बांधून जनता पक्ष स्थापन केला. स्वतः पंतप्रधान होण्याऐवजी मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार स्थापन केले. परंतु, राजनारायण, मधु लिमये आदी समाजवाद्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आदींवर दुहेरी निष्ठेचा (हे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जातात असा) नाहक सवाल उभा करीत जनता पक्ष फोडण्यासाठी प्रवृत्त केले.
अखेर पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघामधील नेत्यांनी ६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत महाअधिवेशन भरवले आणि जनता पक्षातून फुटून जनसंघाच्या नावातील ‘भारतीय’ हा शब्द तसाच ठेवून ‘भारतीय जनता पक्ष’ या नावाने नवा पक्ष स्थापन केला. आपल्याला भारतीय राजकारणात टिकायचे असेल तर गांधीवादी समाजवाद हा सिद्धांत स्वीकारण्याशिवाय तरणोपाय नाही, असे वाजपेयी यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे ९५ विरुद्ध ५ अशा प्रचंड बहुमताने ़फेटाळण्यात आलेले ‘गांधीवादी समाजवाद’ हे तत्त्व केवळ वाजपेयी यांच्या हट्टाग्रहाने भाजपने स्वीकारले. वाजपेयी, आडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे अशा श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचे पाईक असलेल्या महानुभावांनी भाजप पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यांनी भाजप वाढवला, फुलवला तो एका तत्वाने, विचाराने, सिद्धांताने, प्रामाणिकपणे. त्यामुळे तत्कालीन भाजप हा लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागला.
१९८० साली स्थापन झालेल्या भाजपने ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसला तब्बल ४०४ जागा मिळाल्या आणि भाजपचे केवळ दोन खासदार निवडून आले. डॉ. ए. के. पटेल आणि चंदुपातला जंगा रेड्डी यांनी काँग्रेसच्या लाटेतही भाजपला विजय मिळवून दिला. गुजरातमधील मेहसाणा मतदारसंघातून पटेल विजयी झाले, तर चंदुपातला जंगा रेड्डी आंध्र प्रदेशातील हनमकोंडा मतदारसंघातून खासदार झाले. अटलजी हे स्थापनेपासून सुमारे सहा वर्षे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
शिवसेनाप्रमुखांच्या खांद्यावरून झेप 
१९८७ साली विलेपार्ले येथे महाराष्ट्र विधानसभेची पोट निवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीत डॉ. रमेश प्रभू हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे होते. जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा आणि काँग्रेसचे प्रभाकर  ़कुंटे हेही निवडणूक लढवीत होते. नव्याने (सात वर्षाचा) स्थापन झालेल्या भाजपने या निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी शिवसेनेच्या डॉ रमेश प्रभू यांना समर्थन दिले. या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, अशी हिंदुत्वाची व्याख्या निवडणूक प्रचारात सांगितली. परिणामी शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू हे निवडून आले. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून येऊ शकते हे भाजपचे चाणाक्ष चाणक्य प्रमोद महाजन यांनी हेरले आणि शिवसेनाप्रमुखांशी चर्चा करून शिवसेनेबरोबर भाजपची युती घडवून आणली. १९८९ साली लोकसभा आणि १९९० साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती म्हणून मैदानात उतरले. शिवसेनाप्रमुखांनी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांना स्पष्ट सांगितले की देशात भाजप मोठा भाऊ तर महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ म्हणून निवडणूक लढवील. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने ही भूमिका मान्य केली.
विदर्भात स्वतंत्र विदर्भ ही भाजपची भूमिका होती तर शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला विरोध होता. शिवसेनेच्या भूमिकेला विदर्भात चांगले समर्थन मिळाले होते. १९८५ साली गुलाबराव गावंडे यांनी मराठा महासंघाचे शिवसेनेत विलीनीकरण करून शिवसेनेत स्वतः ला झोकून दिले. शिवसेना आणि भाजप युती म्हणून १९९०च्या निवडणुकीत अनुक्रमे १७१ आणि ११७ जागा लढवीत होती. परंतु प्रमोद महाजन यांनी चाणाक्षपणे विदर्भात भाजपचे जास्त उमेदवार उभे करीत ज्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसशिवाय दुसरे पक्ष टिकाव धरू शकत नाहीत अशा ठिकाणी शिवसेनेला जास्त आणि भाजपने कमी जागा लढविल्या. परिणामी १७१ जागा लढविणार्‍या शिवसेनेला ५२ आणि ११७ जागा लढविणार्‍या भाजपच्या ४२ जागा निवडून आल्या. मतांच्या टक्केवारीत शिवसेनेपेक्षा भाजपची टक्केवारी जास्त झाली हे ओघानेच आले. शिवसेनेच्या खांद्यावर उभे राहून गगनाला गवसणी घालण्याचा आणि पायाने शिवसेनेला खाली दाबण्याचा भाजपचा डाव होता. परंतु बाळासाहेबांसमोर काही चालत नव्हते.
बाबरी मशीद पाडली तेव्हा…
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत राममंदिर प्रश्नावर कारसेवकांनी प्रचंड प्रमाणात आंदोलन केले आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त व्ाâेली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंह भंडारी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, बाबरी का ढांचा किसने गिराया? बाबरी मस्जिद गिराने वाले कौन थे? या प्रश्नावर घुमजाव करीत, ‘नहीं, वह भारतीय जनता पार्टीके नहीं थे, बजरंग दल के नहीं थे, विश्व हिंदू परिषद के नहीं थे’ असे सांगितले. फिर वह कौन थे ? या प्रश्नावर सुंदर सिंह भंडारी पटकन बोलून गेले की, वह शायद शिवसेना के होंगे. भंडारींच्या घुमजाव वर तत्काळ कलानगरातून एकच डरकाळी फोडली गेली ती म्हणजे जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. लगेचच धर्मवीर आनंद दिघे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू हैं !’ अशा घोषणेचे आणि बाबरी मशीद पाडतानाचे फलक झळकावले, दिनदर्शिका काढल्या. पण त्या जप्त करण्यात आल्या. भाजपचे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचे कचखाऊ धोरण सार्‍या जगासमोर आले. शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेमुळे त्यांना हिंदुहृदयसम्राट हा किताब जनतेनेच दिला.
युतीचे सरकार, मोदींना अभय
१९९५ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती सत्तेवर आली. ४५ अपक्ष आमदारांनी युतीला पाठिंबा दिला होता. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री म्हणून तर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शिवतीर्थावर ऐतिहासिक अभूतपूर्व सोहळ्यात शपथ घेतली. अरबी समुद्राला लाजवेल अशा अथांग जनसागराच्या साक्षीने हा शपथविधी सोहळा झाला. २००२ साली गोध्रा येथे जळीतकांड झाले. कारसेवकांच्या गाडीला आग लावण्यात आली. त्यात कारसेवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरातेत धार्मिक दंगली उसळल्या. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी. या प्रकरणी अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर वक्रदृष्टी ठेवत त्यांना हटवण्यासाठी विचार केला. परंतु शिवसेनाप्रमुखांनी आडवाणी यांना सुस्पष्ट शब्दांत सांगितले की, नरेंद्र मोदी को हात मत लगाओ, मोदी गया तो समझो गुजरातसे भारतीय जनता पार्टी गई. मोदींवर कारवाई टळली.
गडकरी, मुंडे आणि फडणवीस
२०१३ साली भाजपचे घटनादुरुस्ती अधिवेशन मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाले. या अधिवेशनात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून द्यावा तद्वतच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाही तीन वर्षे मुदत वाढवून देण्यात यावी, अशी घटनादुरुस्ती करण्यात आली. नितीन गडकरी हे राष्ट्रीय अध्यक्ष तर सुधीर मुनगंटीवार हे प्रदेशाध्यक्ष होते. नव्या घटनादुरुस्तीमुळे नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्येकी तीन तीन वर्षे मुदतवाढ मिळणार होती. परंतु गडकरी यांच्या पूर्ती कारखान्याच्या कथित घोटाळ्याचे प्रकरण पुढे करण्यात आले. परिणामी गडकरी यांनी राजीनामा दिला आणि राजनाथ सिंह हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. दुसरीकडे मुनगंटीवार यांच्या मुदतवाढीला गोपीनाथ मुंडे यांनी आक्षेप घेतला. ते प्रदेशाध्यक्ष पदावर राहिले तर मी पक्ष सोडून जाईन, अशी भूमिका मुंडे यांनी घेतली. मुनगंटीवार यांनी समंजस भूमिका घेतल्याने प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा मार्ग सुकर झाला. मुंडे यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचविले. सर्वच जण बुचकळ्यात पडले. मुंडे यांनी गडकरींच्या माणसाची कशी काय शिफारस केली? परंतु फडणवीस हे तर ना गडकरींचे किंवा ना मुंडे गटाचे. ते होते रेशीमबागेचे. अर्थात रा. स्व. संघाचे. देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले.
फडणवीस यांचा उदय
२०१४मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाची यादी आली. नितीन गडकरी यांचा पक्षातील ज्येष्ठताक्रम लक्षात घेता त्यांचे नाव केंद्रीय मंत्री म्हणून मुक्रर झाले परंतु गोपीनाथ मुंडे हे बीड लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून येऊनही त्यांचे नाव केंद्रीय मंत्रिमंडळ यादीत नव्हते. मुंडेंची घालमेल सुरू झाली. त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांना दिल्लीत बोलावून घेतले. पण मोदी यांना कसे समजावून सांगणार?  अखेर फडणवीस हे मोदी यांच्या दरबारात हजर झाले. त्यांनी युक्तिवाद केल्यावर मुंडे यांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला. दुर्दैवाने मुंडे यांचे ३ जून २०१४ रोजी अपघाती निधन झाले. महाराष्ट्रात भाजप पूर्णतया देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आला.
२४ सप्टेंबर २०१४ रोजी एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या बरोबरची २५ वर्षे जुनी युती तोडण्याची घोषणा केली. (आपल्याला तसे करायला सांगितले गेल्याचा खुलासा खडसे यांनी केला आहे). काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची लोकशाही आघाडीसुद्धा अर्ध्या तासात तुटली. ऑक्टोबर २०१४मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. भाजप १२३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. ६५ जागा जिंकणारी शिवसेना दुसर्‍या क्रमांकावर आली. तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. भाजपची रणनीती पूर्णपणे बदलली. वाजपेयी आडवाणी यांचा पक्ष म्हणून असलेली ओळख मोदी शाह यांच्या नावाने बदलण्यात येऊ लागला. भारताला स्वातंत्र्यच मुळात १९४७ ऐवजी २०१४मध्ये मिळाल्याचे देशातील १४० कोटी नागरिकांच्या मनावर बिंबवणे सुरू झाले. जे काही केले ते सर्वकाही नरेंद्र मोदी यांनीच केले. अर्थात नोटबंदी, आधार कार्ड, जीएसटी अशा गोष्टी मोदी यांनीच केल्या. नाही म्हणायला शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्यानुसार घटनेचे ३७०वे कलम रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. लाल किल्ल्यावर भाषण करताना एका बाजूला भ्रष्टाचारमुक्त भारत आणि काँग्रेसमुक्त भारत अशा राणा भीमदेवी थाटात घोषणा करण्यात आल्या. पण पुढे दरवर्षी हेच पालुपद. पण प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचारयुक्त भाजप आणि काँग्रेसयुक्त भाजप अशी परिस्थिती निर्माण झाली. परिवारवादाबद्दल भाजपचे नेते बोलूच शकत नाहीत अशा प्रकारे सर्वांचे सर्वच नातेवाईक या ना त्या पदावर विराजमान करून ठेवले आहेत. कमी होते म्हणून की काय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून लोकशाही मार्गाने आलेले महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकून घटनेच्या १० व्या अनुसूचीला धाब्यावर बसवून असंवैधानिक पद्धतीने सरकार स्थापन केले.
आज जो भाजप भला मोठा दिसतोय तो सूज आलेला, अन्य पक्षातील राजकारणी लोकांना घाऊक पद्धतीने आपल्या पक्षात प्रवेश देत मोठा केलेला आहे, हे नाकारता येणार नाही. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणतात की, नंदीबैलाला झूल पांघरण्यासाठी हे सर्व करावेच लागते. निष्ठावंत मधू चव्हाण, माधवराव भांडारी आदी नेते अडगळीत आणि अशोक चव्हाण चार दिवसात राज्यसभेवर. हीच भाजपची शोकांतिका आहे. ६ एप्रिल १९८० रोजी भाजप स्थापन झाला हे पक्षाच्या नवहिंदुत्ववादी नेत्यांनाच माहीत नाही. ‘सौगात ए मोदी’ चालते, रोजा सोडण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या मेळाव्यात फर  कॅप घालत शीरकुर्मा ओरपलेले चालते, असंख्य मुस्लिम नेते/कार्यकर्ते भाजपत आलेले चालतात. मैं कुरेशी बननेको तैय्यार हुं असे मुस्लिम बांधवांना खुष करण्यासाठी केलेले विधान चालते. मुख्तार अब्बास नकवी, शहानवाज हुसेन, अब्दुल अलीम खान भाजपचे नेते झालेले/भाजपात आलेले चालतात. मजारीवर भाजपचे नेते चादरी चढवतात हे चालते. सर्वात कहर म्हणजे सरकारी अधिकृत कार्यक्रम नसताना इस्लामाबादला जाऊन नवाज शरीफ यांची गळाभेट केलेले चालते. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणे याचा अर्थ हिंदुत्व सोडणे, असा सोयीस्कर अर्थ लावला जातो! याला काय म्हणावे?
आज भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते असे आहेत की त्यांना ‘कमळातला वाघ’ म्हटले जाते. असंख्य कार्यकर्ते हा आपलाच पक्ष आहे का, असे कुचेष्टेने खासगीत बोलतांना आढळतात. भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या आणि भाजपच्या धुलाई यंत्रात जाऊन स्वच्छ, शुद्ध झालेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. मोदी यांचा उद्धार करणारे राष्ट्रीय नेते/प्रवक्ते मोठमोठ्या पदांवर नियुक्ती होत ‘निष्ठावंतांचे’ श्रेष्ठ बनतात. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पर्याय म्हणून भाजप नवनाथ बन यांना पुढे आणल्याचे सांगण्यात येते. पण दोघांची तुलना तरी होऊ शकते का?
असो, निष्ठावंतांना पायघड्या घातल्या गेल्या तर भाजपची सुवर्णमहोत्सवी वाटचाल खर्‍या अर्थाने चांगली ठरू शकेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न किताब जाहीर करण्यात आले, तर सर्वांना निश्चितच आनंद होईल. ‘सरकारे आएगी, सरकारे जाएगी; लेकिन देश टिकना चाहिए,’ असे म्हणणार्‍या लोकांच्या हृदयात अटल स्थान मिळविणार्‍या कविमनाच्या अटलबिहारींच्या स्वप्नातील हिंदुस्थान निर्माण होवो हीच भावना!
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.) 
Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

इथियोपिया वि. टिग्रे

Next Post
इथियोपिया वि. टिग्रे

इथियोपिया वि. टिग्रे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.