• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

इथियोपिया वि. टिग्रे

निळू दामले (युद्धाची चटक)

marmik by marmik
April 25, 2026
in युद्धाची चटक
0
इथियोपिया वि. टिग्रे

टिग्रे विरूद्ध इथियोपियाचं केंद्र सरकार यांच्यामध्ये युद्ध झालं. टिग्रे हा इथियोपिया या देशातलाच एक प्रांत आहे. ३ नोव्हेंबर २०२० ते ३ नोव्हेंबर २०२२ असं दोन वर्षं हे युद्ध चाललं. मृतांची संख्या २ लाख ते ६ लाख. निर्वासितांची संख्या २० लाख. युद्धामध्ये आणि युद्धाने निर्माण केलेल्या दुष्काळामुळं माणसं मेली.

युद्धासाठी लागणारी शस्त्रं, सैनिकांवरचा खर्च इत्यादी मिळून इथियोपियानं किती खर्च केला? इथियोपियाचा आकडा ५०.२ कोटी डॉलर्सचा. एरिट्रिया आणि सोमालिया यांनीही युद्धात भाग घेतला होता, त्यांचा खर्च किती झाला त्याचा आकडा सापडत नाही.
टिग्रे उद्ध्वस्त झालं. टिग्रेच्या नव्यानं उभारणीसाठी अंदाजे २३ अब्ज डॉलर खर्च होतील असं जाणकार म्हणतात.
युद्धातला विध्वंस, नासाडी, खर्च यामुळं इथियोपियाची अर्थव्यवस्था कोसळली. महागाई ३७ टक्क्यांवर गेली. परकीय चलनाची गंगाजळी आणि तिजोरीतली शिल्लक महिनाभरही देश चालवता येणार नाही इतकी घसरली. देशाच्या उत्पन्नाच्या ४३ टक्के येवढं कर्ज इथियोपियावर झालं.

****
१९४५ साली अ‍ॅबिसिनिया हा देश स्वतंत्र झाला, युनायटेड नेशन्सचं सभासद होत असताना त्या वर्षी अ‍ॅबिसिनियाचा इथियोपिया झाला. टिग्रे युद्ध समजण्यासाठी इथियोपिया हे प्रकरण समजून घेणं आवश्यक आहे. इथियोपियात टिग्रे (६.१ टक्के), अम्हारा (२७ टक्के), ओरोमो (३४.४ टक्के) आणि सोमाली (६.२ टक्के) हे चार मुख्य सांस्कृतिक घटक आहेत. त्यांच्या दीर्घ घट्ट सांस्कृतिक परंपरा आणि ओळखी आहेत. प्रत्येक सांस्कृतिक गटाचं स्वतंत्र राज्यही आहे.

इथियोपिया हा शेतीप्रधान, गावांचा, देश आहे. सर्वसामान्य जनता आपापली स्वतंत्र ओळख जपते, पण व्यापक पातळीवर आपण इथियोपियन आहोत असं मानते. शहरातले लोक, उच्च वर्गातले लोक आणि राजकारणातले लोक मात्र आपल्या स्वतंत्र सांस्कृतिक ओळखी दाखवत असतात. इथियोपियातलं राजकारण सांस्कृतिक गटांच्या तालावर चालत असतं. प्रत्येक सांस्कृतिक गटाच्या स्वतंत्र राजकीय संघटना (राजकीय पक्ष) आहेत आणि त्यांच्या सशस्त्र टोळ्या (मिलिशिया) आहेत. हे घटक लक्षात घेतले तर प्रत्येक सांस्कृतिक घटक आणि राज्य हे स्वतंत्र देशच (नेशन) आहेत.

युद्ध सुरू होण्याच्या आधी टिग्रेमध्ये सर्व जमातीची माणसं आपापला दुरावा जपत एकत्रित नांदत असत. वस्ती मिश्र असे. टिग्रेवाल्याच्या शेजारी ओरोमो रहात असे किंवा अम्हारा रहात असे. संकटप्रसंगी माणसं एकमेकांना मदत करत असत. आधुनिक राज्यशास्त्रात लेनिननं अशा समाजगटांना नेशन अशी संज्ञा वापरली आहे. यातला सैन्याचा भाग वगळला तर भारतातल्या भाषिक ओळखी/धार्मिक पंथिक ओळखीही नेशन म्हणून ओळखल्या जात असत, भारतात अनेक नेशन्स आहेत असं म्हटलं जात असे. मुस्लीम आणि हिंदू ही दोन नेशन्स आहेत, असं मानलं जात असे. पुढं तीच संज्ञा महंमद अली जिन्ना आणि विनायक दामोदर सावरकर यांनी वापरली.

पुराव्यासहित मिळणार्‍या माहितीनुसार, इसवी दुसर्‍या शतकापासून (अ‍ॅक्सम या राजाचं राज्य) इथियोपिया जगाला माहित झाला. चौथ्या शतकात तिथे ख्रिस्ती प्रचारक पोचले. सोळाव्या शतकात मुस्लीम धर्म (अहमद ग्रॅने- हा अम्हरिक उच्चार, सोमाली उच्चार गूरे- दोन्हीचा अर्थ डावखुरा, १५२०) पोचला. एकोणिसाव्या शतकात इथियोपियाला (सम्राट तिवोद्रोस दुसरा, १८८५) एक सम्राट लाभला. आजचा भौगोलिक इथियोपिया राजा मेनेलिक (१८६६ ते १८८९) यानं तयार केला. मेनेलिक अम्हारा होता. त्यानं अम्हारा राज्याला ओरोमोंचं राज्य जोडलं. मग दक्षिणेतले इतर प्रांत जिंकून आपल्या राज्यात सामील केले. उत्तरेतला एरिट्रिया मात्र मेनेलिकला सोबत ठेवता आला नाही, इटलीनं तो घेतला. इटलीनं एरिट्रिया जिंकला तेव्हा एरिट्रियाची फाळणी झाली. दक्षिण एरिट्रिया झाला टिग्रे. उत्तर एरिट्रिया झाला एरिट्रिया.
मेनेलिकच्या कारकीर्दीत पहिलं महायुद्ध झालं. त्याच कारकीर्दीत इटलीनं इथियोपियावर आक्रमण करून एरिट्रिया जिंकला होता.
मेनेलिकनंतर हेले सेलासी (१९३० ते १९७४) या राजाची कारकीर्द झाली.

मेनेलिक ते हेले सेलासी अशा राजांनी इथियोपिया हा एक एकसंध देश आहे असं मानलं. प्रत्यक्षात मात्र अम्हारा राज्य असंच त्या राज्याचं स्वरूप होतं.

हेले सेलासीच्या कारकीर्दीत दुसरं महायुद्ध झालं. त्यात ब्रिटिशांनी इटलीवर (म्हणजे एरिट्रियावर) हल्ला करून एरिट्रिया जिंकलं आणि त्याचा समावेश पुन्हा इथियोपियात केला. १९७४ मध्ये लष्करी मार्क्सवादी बंड झालं, हेले सेलासीचा पाडाव झाला. इथियोपियात मार्क्सवादी कारकीर्द सुरू झाली.

१९९१मध्ये ईपीआरडीएफ या संघटनेनं बंड करू मार्क्सवादी राजवट उलथवली. तिथपासून २०१८ पर्यंत ईपीआरडीएफची राजवट होती. २०१८ नंतर एबी अहमद पंतप्रधान झाले आणि त्यांनी ईपीआरडीएफ या पक्षाचं नाव विकास पक्ष असं केलं. २०१९ साली एबी अहमद यांनी एरिट्रियाला स्वतंत्र होण्याची परवानगी दिली.

२०२० साली टिग्रे युद्ध झालं

१९३०पासून २०२०पर्यंत इथियोपियात बर्‍याच उलथापालथी झाल्या. एरिट्रिया हा प्रांत इथियोपियात सामिल झाला नंतर फुटला. इथियोपियाच्या शेजारच्या सोमालियाबरोबर युद्धं झाली. खुद्द इथियोपियातल्या वांशिक गटांमध्ये मारामार्‍या झाल्या. प्रत्येक वांशिक गटाला वाटे की केंद्रीय राज्य त्यांच्यावर अन्याय करतं. कधी मोठ्या गटानं आपल्यावर अन्याय केला असं वाटे, तर कधी छोटा गट असूनही तो आपल्या मोठ्या गटावर अन्याय करतोय असं वाटलं.

ख्रिस्ती धर्म व त्याचे पंथ या प्रभावाखाली एकत्र बांधली गेलेली विविध वंशांची मोट असं इथियोपियाचं स्वरूप विसाव्या शतकापासून होतं. विसाव्या शतकाच्या टोकाला आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला इथियोपियातल्या नव्या पिढीचा जगाशी संपर्क वाढला. काही काळ रशिया-चीन यांचा प्रभाव तरुण पिढीवर पडला. संस्कृती दुय्यम, आर्थिक प्रश्न महत्वाचे या समाजवादी विचारानं तरुण प्रभावित झाले.संस्कृती आणि धर्म हे घटक काहीसे मागे पडले, काहीसे नव्या रूपात राजकारणात वापरले गेले.

एबी अहमद यांचा उदय झाला आणि इथियोपियावरचा अमेरिकेचा प्रभाव वाढला. एबी अहमद यांच्या कारकीर्दीत बाजारवाद, मुक्त अर्थव्यवस्था, समाजातलं पैशाचं स्थान, शहरीकरण हे घटक प्रबळ ठरले. इथियोपियाच्या राजधानीचं तीनचारशे वर्षांपासून तयार झालेलं रूप बदललं. जुने राजवाडे, जुन्या इमारती, रस्ते, बाजार सारं काही जाऊ लागलं. गगनचुंबी इमारती, मॉल, फ्लायओव्हर, रूंद रस्ते, प्रशस्त चौक, कार आणि विमानं ठळकपणे दिसणं इत्यादी गोष्टी आल्या. एआय आलं. नागरिकांच्या हालचाली, नागरिकांचे विचार यांच्यावर सरकार लक्ष ठेवू लागलं, त्या गोष्टी नियंत्रित करू लागलं. रशियाच्या प्रभावाखाली असतानाही तेच घडत होतं. अमेरिकेचा प्रभाव सुरू झाला तेव्हा तंत्रज्ञानात खूप प्रगती झाली असल्यानं लक्ष ठेवण्याचं तंत्र अधिक विकसित झालं होतं एवढंच.

एकोणिसाव्या शतकात मेनेलिक राजवट सुरू झाली तेव्हा राजा, राजाची जमात या राज्यव्यवस्थेचा मुख्य घटक असत. राज्यातल्या घडामोडींचा मुख्य बिंदू राजाची जमात असे. मेनेलिक ते हेले सेलासी या काळात अम्हारा जमातीचं प्राबल्य होतं. मेनेलिक ते हेले सेलासी या राजवटींना इतर जमातींची सत्तेत सामिल होण्याची इच्छा लक्षात घ्यावी लागे, जमाती बंड करत, राजे ती बंडं बळाचा वापर करून शमवत असत. अशा स्थितीत सर्व जमातींना काही तरी करून सामावून घेऊन गप्प करण्याची खटपट राजांनी केली. इथियोपिया हे अम्हारांचं राज्य नसून सर्वांचंच आहे, इथियोपिया ही राजेशाही असली तरी एकच देश आहे असं ठसवण्याचा प्रयत्न राजे करत. राजेशाहीच्या जागी कम्युनिस्ट राजवट आली. त्यांनी तर जमातींचं अस्तित्वच तत्वतः अमान्य केलं, लोकशाही समाजवादी राजवट सुरू केली. परंतु जमाती, पंथ, संपले नाहीत, ते सतत डोकं वर काढत असत.

उत्तरेतले डोंगराळ प्रदेशातले टिग्रे. चिवट, सडसडीत, प्रहार झेलण्याची ताकद, तग धरण्याची क्षमता. भांडकुदळ. आपलं म्हणणं कधी सोडणार नाहीत. अम्हारा राजवटीतही ते राज दरबारात, कारभारात, सैन्यात महत्वाच्या पदी असत. प्रत्येक राजवटीसमोर या भांडकुदळांना सांभाळून कसं घ्यायचं अशी समस्या असे. एकूणात असं की ही टिग्रे मंडळी कायम इतर जमातींना सलत असत. युद्ध सुरू झालं ते या टिग्रे लोकांमुळंच.

टिग्रे युद्ध सुरू झालं तेव्हा प्रत्येक सामाजिक घटक आपल्या भल्याचा विचार करताना आपल्या सांस्कृतिक घटकाभोवती संघटित होता. माणसांचे कपडे बदलले, जगण्याचा पोत बदलला एवढंच. हे बदल वरवरचे होते. लोकांना बांधून ठेवणारा चर्च हा घटक कायम होता, पण चर्चचं रूप बदललं. सत्तेचं राजकारण करणार्‍या ख्रिस्ती चर्चनं नवे विधी, नव्या आयडियॉलॉज्या, नवे पारिभाषिक शब्द, पैसे गोळा करण्याच्या नव्या प्रथा अंगिकारल्या.

टिग्रे, अम्हारा, ओरोमो हे तीन गट २००० साली इथियोपियात अगदी घट्ट होते. प्रत्येक गटात एक तट इथियोपिया देश रहावा आणि आपण त्यातला सत्ताधारी व्हावं असं वाटणारा असे; दुसरा तट इथियोपियापासून वेगळं तरी व्हावं आणि तसं जमलं नाही तर आपल्या विभागाला खूप स्वायत्तता मिळावी (स्वतंत्र देश असल्यागत) असं मानत होता.

एरिट्रिया, टिग्रे, अम्हारा, ओरोमो या चारही गटांच्या बलवान राजकीय-सांस्कृतिक संघटना होत्या; प्रत्येक गटाचं सशस्त्र दल होतं. टिग्रे डिफेन्स फोर्स हे टिग्रे लोकांचं दल. ओरोमो डिफेन्स फोर्स हे ओरोमोंचं सशस्त्र दल. एरिट्रियन पिपल्स लिबरेशन प्रâंट हे एरिट्रियन लोकांचं दल. फॅनो हे अम्हारा लोकांचं दल. प्रत्येक गटाला सत्ता हवी होती. २०२० सालच्या सिविल युद्धानं त्यांना पुन्हा एकदा संधी दिली.
युद्ध सुरू झालं तेव्हा केंद्रात ईपीडीआरएफ या पक्षाचं राज्य होतं. इथियोपियन पिपल्स डेमाक्रॅटिक प्रâंट. ही आघाडी इथियोपियातल्या सर्व सांस्कृतिक पक्षांना एकत्र करून तयार झाली होती. या आघाडीत टिग्रे, अम्हारा, ओरोमो हे मुख्य घटक सामील होते. टिग्रेच्या बाजूनं लढत होती टीपीएलएफ, टिग्रे पीपल्स लिबरेशन प्रâंट. ही टिग्रे लोकांची फुटीर संघटना. कधी काळी ही संघटना ईपीडीआरएफचा भाग होती. टिग्रेच्या विरोधात भाग घेतलेल्या एरिट्रियन सैन्याचा राजकीय पक्ष होता ईपीएलएफ, एरिट्रियन पिपल्स लिबरेशन प्रâंट. ही संघटना एकेकाळी फुटीर संघटना होती, याच संघटनेनं एरिट्रिया इथियोपियापासून वेगळा केला. टिग्रेच्या विरोधात लढण्यासाठी अम्हारा लोकांची स्वतंत्र मिलिशिया, खाजगी सैन्य होतं. त्याचं नाव एफेएनओ फॅनो.

२०२०च्या मार्चमध्ये इथियोपियातली कोविडची लागण लक्षात आली. कोविडच्या काळात एबी अहमद यांच्या विकास पार्टी या नव्यानं जन्मलेल्या पार्टीची सत्ता होती. अहमद यांना कोविड हाताळता आला नाही. बाजार, उद्योग महत्वाचा; लोकांना कामधंदा बंद करता कामा नये, लोकांनी घरी बसता कामा नये, कोविडचा बाऊ करता कामा नये, हे अहमद यांचं मुख्य सूत्र होतं. लागण झालेल्यांची संख्या वाढली, मृत्यू वाढले, आप्रिâकेतल्या कोविडच्या सर्वात जास्त प्रभावित देशांत इथियोपियाचा क्रमांक पहिल्या दहात होता.
इथियोपियात नेमकं काय घडत होतं ते कळत नव्हतं, कारण अहमद यांनी पेपर ताब्यात ठेवले होते, देशी-परदेशी पत्रकारांना ते फिरू देत नव्हते, जागतिक आरोग्य संघटनेला आवश्यक सवलती-मोकळेपणा अहमद देत नव्हते. लोकांमध्ये असंतोष होता. २९ ऑगस्ट २०२० रोजी देशाच्या निवडणुका व्हायच्या होत्या. केंद्रीय आणि राज्यांच्या विधिमंडळांच्या. नंतर विधिमंडळं त्यांची त्यांची स्थानिक सरकारनं निवडणार होती. कोविडमुळं निवडणुका बेमुदत पुढं ढकलण्यात आल्या.

टिग्रेमध्ये तेव्हा टीपीएलएफचं स्थानिक सरकार होतं. केंद्रात विकास पार्टीचं सरकार आणि राज्यात टीपीएलएफ म्हणजे टिग्रे लोकांचं सरकार. टीपीएलएफनं आरोप केला की पंतप्रधान एबी अहमद त्यांची हुकूमशाही देशावर लादत आहेत. निवडणुका बेमुदत बंद करून राज्य चालवण्याचा त्यांचा डाव आहे. टीपीएलएफनं स्वतंत्रपणे आपल्या निवडणुका (म्हणजे राज्य विधिमंडळाच्या) घ्यायचं जाहीर केलं. अहमद यांनी टिग्रेचा निर्णय राज्यघटनेच्या विरोधात असल्याचं जाहीर केलं, तिथल्या प्रस्तावित निवडणुका बेकायदेशीर ठरवल्या. टीपीएलएफनं सप्टेंबर २०२०मध्ये टिग्रेमध्ये निवडणुका घेतल्या. इथियोपियाच्या सरकारनं निवडणुकीच्या बातम्या पसरू नयेत यासाठी आणीबाणी जाहीर करून पत्रकारांना तिथं जायला मनाई केली. निवडणुक एकतर्फीच होती. टीपीएलएफचं सरकार निवडून आलं. अहमद यांनी टिग्रेतलं सरकार बेकायदा ठरवलं. टिग्रेला केंद्रातर्पेâ जाणारे पैसे बंद केले, टिग्रेची नाकेबंदी केली.
टिग्रेच्या सरकारनं जाहीर केली की इथियोपियन सरकार अहमद यांचं सरकार बरखास्त करावं व त्या जागी टेक्निकल कसब असणार्‍या लोकांचं सरकार नेमावं. टिग्रे आणि इथियोपियन सरकार यांच्यात जुंपली. यातून वाट काढण्यासाठी केंद्र सरकारनं आयोग नेमण्यात आला. टिग्रेनं आयोगाला सहकार्य नाकारलं. सप्टेंबर २०२०मध्ये निवडणुक झाल्या झाल्या इथियोपियन सरकारनं सैन्याची जमवाजमव सुरू केली. शेजारच्या एरिट्रियाचंही सैन्य वापरण्याची सिद्धता केली. अम्हारा सशस्त्र दलात भरती सुरू केली. देशाच्या सैन्यापेक्षा खाजगी सैन्य दलंच संख्येनं मोठी झाली.

यात एक मेख आहे. एरिट्रिया हा स्वतंत्र देश एकेकाळी इथियोपियाचाच भाग होता, एरिट्रियन ही एक स्वतंत्र जमात होती. भरपूर भांडणतंटे करून एरिट्रिया स्वतंत्र झाला होता. एरिट्रिया आणि टिग्रे यांच्यात पूर्वापारपासून चालत आलेलं वितुष्ट होतं. दोघांचा एकमेकावर खुन्नस होता. अहमद यानी एरिट्रियाला टिग्रेविरोधात वापरलं.

तिकडं टिग्रे लोकांनीही जमवाजमव सुरू केली. टिग्रेच्या लोकांना लढण्याचा दीर्घ अनुभव होता, इथियोपियन सैन्यातले निष्णात सेनापती पूर्वीपासून टिग्रेचेच होते. त्यामुळं टिग्रेचं सैन्य पटकन उभं राहिलं. अहमद यांनी टीपीएलएफ ही संघटना आणि त्यांचं सरकार दहशतवादी आहे असं जाहीर केलं. दहशतवादी आणि देशद्रोही, देशाच्या एकतेला बाधक.

ऑक्टोबर २०२०च्या शेवटल्या आठवड्यात इथियोपियन सरकारनं टिग्रेला जाणारे रस्ते बंद केली. बँका बंद केल्या. टेलीफोन तारा तोडल्या. विमान सेवा बंद केल्या. टिग्रेत बाजारातून वस्तू गायब झाल्या होत्या. महागाई शिगेला पोचली.

३/४ नोव्हेंबर २०२०रोजी इथियोपियन सरकारच्या फौजा दक्षिणेकडून टिग्रे प्रांतात घुसल्या. त्याच वेळी शेजारच्या एरिट्रिया या देशाच्या फौजा उत्तरेकडून टिग्रेत घुसल्या. दिमतीला अम्हारा सैन्य होतंच. थोडक्यात असं की टिग्रे वि. इतर अशी व्यवस्था अहमद यांनी केली.
इथियोपियन सरकारनं जाहीर केलं ‘ही एक छोटीशी कारवाई आहे, तीन आठवड्यात संपेल. ही कायदा आणि सुव्यवस्था मोहिम आहे. उत्तरेत एक टीपीएलएफ नावाचा दहशतवादी गट आहे, त्यांनी बंड केलंय, ते शमवण्यासाठी ही छोटीशी कारवाई आहे.’ ३ नोव्हेंबर २०२० रोजी उत्तरेतून एरिट्रियन सैन्य आणि दक्षिणेतून इथियोपियन सैन्य आणि दिमतीला अम्हारा सशस्त्र दल यांनी टिग्रेची कोंडी केली. इथियोपियाचे सैन्यप्रमुख विमानानं टिग्रेच्या राजधानीकडं, मेकेलेकडं निघालं. टिग्रेतल्या सैनिकांनी त्यांना विमानतळावर उतरू दिलं नाही. ते परतले. इथियोपियन सैन्यानं चढाई सुरू केली.

टिग्रेची तयारी चांगली होती. टिग्रेच्या सैनिकांना अनुभव होता. टिग्रेचा भूगोल त्यांना चांगला माहित होता. त्या मानानं इथियोपियन सैन्य कमी अनुभवी होतं. टिग्रेच्या सैन्याचा विजय होत होता. सुरुवातीच्या काळात टिग्रेच्या सैन्यानं टिग्रेमधल्याच अम्हारा वस्त्यांवर हल्ले केले आणि गावंच्या गावं जाळली, पळणार्‍या स्त्रियांवर बलात्कार केले. इथियोपियन सैन्यानं नंतर टिग्रेमध्ये घुसल्यावर टिग्रे लोकांची गावं जाळायला सुरुवात केली. हिरीरीनं जाळपोळ आणि बलात्कार केले. अम्हारांचा टिग्रेवर राग होता, एरिट्रियन लोकांचा टिग्रेवर राग होता. तो त्यांनी बलात्कार आणि क्रूर हिंसेनं व्यक्त केला. इथियोपियन सैन्याकडं घोडदळ होतं, तोफा होत्या. पण सैन्यासोबत असलेल्या सशस्त्र दलांकडं आधुनिक शस्त्रं नव्हती. त्यांच्याकडं होते चाकू, सुरे आणि भाले. त्यांचा वापर त्यांनी केला.

Previous Post

गांधीवादी समाजवाद ते (बेगडी) हिंदुत्व!

Next Post

टिळक स्मारक मंदिर कॅन्टीनचा बटाटेवडा!

Next Post
टिळक स्मारक मंदिर कॅन्टीनचा बटाटेवडा!

टिळक स्मारक मंदिर कॅन्टीनचा बटाटेवडा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.