
महाराष्ट्रात २०२९पर्यंत कुठलीही मोठी निवडणूक नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आपापला पक्ष विस्तार करण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी वेळ आहे. तशी सुरुवात काही राजकीय पक्षांनी केली आहे. पण सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, जो २र्४ें७ सतत इलेक्शन मोडमध्ये असतो, तो विरोधी पक्षासह मित्रपक्षांनाही कमजोर करण्याची खेळी खेळत आहे. सुप्तपणे नियोजन पद्धतीने ‘ऑपरेशन लोटस’चे काम सुरू आहे. याचे परिणाम २०२९च्या लोकसभा निवडणुकीआधी दिसतील.
आधी प्रादेशिक पक्षांशी युती करून त्यांच्या जोरावर त्या प्रदेशात भाजप वाढवायचा आणि नंतर गरज सरली की युती तोडून प्रादेशिक पक्षाला संपवायचा ही भाजपची रणनीती आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. गोव्यातील महाराष्ट्र गोमांतक पक्ष, पंजाबमधील अकाली दल, आसाममधील आसाम गण परिषद, ओडिसामधील बिजू जनता दल, कर्नाटकातील देवगौडांचा जनता पक्ष, महाराष्ट्रातही शिवसेनेत फूट पाडली. बिहारमध्येही संयुक्त जनता दलाची स्थितीही नाजूक बनवून ठेवली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राज्यसभेवर पाठवले गेल्याने नितीश आणि त्यांच्या पक्षाचे राज्यातील वर्चस्व संपुष्टात येण्याच्या वाटेवर आहे.
भाजपाने जून २०२२ साली शिवसेनेत फूट पाडून ‘शिंदेसेना’ तयार केली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. पण २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची उपमुख्यमंत्री पदावर बोळवण केली. नाराज शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास विलंब केला. भाजपचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हापासून शिंदेसेनेचे पंख छाटण्यास पद्धतशीरपणे सुरुवात केली आहे. संधी मिळेल तिथे शिंदेंचे महत्त्व भाजप कमी करते. मुख्यमंत्रीपदाच्या काळात चौफेर उधळलेल्या शिंदेंच्या वारूला रोखण्याचा फडणवीस प्रयत्न करीत आहेत. त्यांनी शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या अव्यवहारी/ अवाजवी निर्णयांना स्थगिती दिली. तर काही रद्द केले.
त्यामुळे नाराज होऊन शिंदे अधून-मधून दिल्ली गाठतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून मी ‘ऑपरेशन टायगर आणि तुतारी’ राबवतो अशी फुशारकी मारतात. शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी (शप) पक्षाचे खासदार व आमदार फोडून एन.डी.ए.त आणतो असा प्लान त्यांना दाखवतात. पण भाजपाचे शीर्षस्थ नेते अशा थापांना/फुशारकीला भुलणारे नाहीत. त्यांना महाराष्ट्रात भाजप हाच नंबर १ पक्ष हवा आहे आणि एकहाती सत्ता हवी आहे. ते शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठे होऊ देणार नाहीत. गेल्या सहा महिन्यांतील काही घटना तेच अधोरेखित करतात.
भोंदूबाबा अशोक खरात यांना राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी अनेक फोन कॉल्स केले. खरातबरोबरच्या मैत्रीमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. पण त्याचबरोबर शिंदेसेनेचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचे संबंध उघडकीस आणले गेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरातला १८ फोनकॉल केले, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. शिंदे व केसरकर हे खरातसमवेत पूजा-होम करीत असल्याचे फोटो विरोधक माध्यम व समाजमाध्यमावर दाखवत आहेत. शिंदे व शिंदे सेनेतील नेत्यांना बदनाम करण्यासाठी कोण पुढाकार घेत आहे हे सुज्ञास सांगणे न लगे. अंजली दमानिया या देवेंद्र फडणवीसांनी ऑर्डर दिल्यावर कामाला लागतात, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
फडणवीसांनी शिंदेंना आणखी एक धक्का देत मुंबई महानगरपालिकेची एक हजार कोटींची कंत्राटे रद्द केली आहेत. मुंबईत प्रशासकीय राजवट असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते होते. मनपात नगरसेवक नसताना प्रशासकीय राजवटीत नगरविकास खात्याच्या आशिर्वादाने फुटपाथ रेलिंग, थर्मोप्लॅस्टिक पेंटद्वारे लेन मार्किंग, प्राणी संग्रहालय विस्तार, शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदीसाठी काढलेल्या टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला आहे. पालिकेतील प्रशासकीय राजवट संपताच वादग्रस्त कामांची १ हजार १३५ कोटी रुपये किंमतीची टेंडर रद्द करण्यात आली आहेत. कॉन्ट्रॅक्टर पुरस्कृत टेंडर रद्द केले, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार अमित साटम यांनी लगावला. तेव्हा त्यांचा रोख कुणाकडे होता हे सुज्ञास सांगणे न लगे.

बॉक्सिंग फेडरेशनच्या निवडणुकीत भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्यात फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून चांगलीच ‘बॉक्सिंग’ पाहावयास मिळाली. शेवाळेंना राज्यसभा खासदारकी मिळाली नाही म्हणून ते बीएफआयच्या माध्यमातून दिल्ली गाठायचा प्रयत्न करत असल्याचे दरेकर म्हणाले. त्यावर दरेकरांनी माझ्या राजकीय भवितव्याची काळजी करू नये. मी राजकीय मार्गानेच दिल्लीला जाईन असे उत्तर शेवाळे यांनी दिले आहे. शेवाळेंना बॉक्सिंगमधले काय समजते? शेवाळे यांच्या निवडीचा प्रकार कायदा गुंडाळून झाला. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर रडीचा डाव सुरू आहे. निवडणूक धर्मादाय आयुक्तांनी घेतली आहे, असे दरेकर म्हणाले. त्यावर शेवाळे म्हणाले, दरेकरांनाच अभ्यास करण्याची गरज आहे. मला बॉक्सिंगमधले काय कळते असे दरेकर विचारतात. माझा मुलगा बॉक्सर आहे. या खडाखडीनंतर हेच लक्षात येते की भाजप जिथे संधी मिळेल तिथे वर्चस्व गाजवते. कला-संस्कृती आणि शिक्षणसंस्थासह क्रीडासंस्थांवर देखील त्यांना भाजप-संघाची पकड घट्ट करायची आहे.
सातारा जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाने सत्ता मिळवण्यासाठी शिंदेसेनेवर कुरघोडी केली. तेव्हा शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी थयथयाट केला. भाजपला सत्तेसाठी पाच सदस्य कमी पडत होते. ते त्यांनी शिंदेसेनेतून फोडले आणि अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा शिंदेसेनेच्या तोंडातील घास हिरावून घेतला. मतदानासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनाही पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. उपाध्यक्षपदी निवड झालेल्या भाजपच्या प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. शिंदेंना आणि सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या पक्षाचा आमदार सांभाळता आला नाही. एवढेच नाही तर निवडणूक दरम्यान बंदोबस्तासाठी असणार्या पोलिसांबरोबर देसाई यांची झटापट झाली. ते काहीसे जखमी झाले. या सर्व प्रकरणात जिल्हा पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांची उचलबांगडी करावी अशी मागणी देसाई यांनी विधिमंडळात केली. उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी तशा सूचना राज्य सरकारला दिल्या. या सूचनेला मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी केराची टोपली दाखवली. सातारा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने पोलिसी बळाचा वापर केला असा आरोप शिंदेसेनेने केला. चोराच्या उलट्या बोंबा असतात त्या अशा. २०२२मध्ये शिवसेना फोडताना पोलिसांच्या बळाचा वापर त्यांच्या नेत्याने केला हे ते सोयीने विसरतात. पेरले तसे उगवणारच. ती वेळ जवळ येत चालली आहे. सर्व ठिकाणी भाजपाला एकहाती सत्ता हवी आहे. तेव्हा महायुतीतील मित्रपक्षांना असे धक्के मिळणारच.
बुलढाण्यात भाजपचे माजी आमदार विजयराजे शिंदे आणि शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात सतत वाग्युद्ध सुरू असते. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने अंबरनाथ, बदलापूरचे नगरसेवक फोडले. मग शिंदेसेनेने भाजपचे नगरसेवक फोडले. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) यांना रायगड व नाशिकचे पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून फडणवीस यांनी अजून पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत वाद पेटतच राहिला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी फडणवीसांचे निकटवर्तीय गिरीष महाजन यांना ‘कुंभमेळा मंत्री’ म्हणून सर्व जबाबदारी देऊन टाकली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातही भाजप-शिंदेसेनेत वर्चस्वासाठी सतत धुसफूस सुरू असते. थोडक्यात काय तर मित्रपक्षांना एकमेकांत झुंजवत ठेऊन आणि मित्रपक्षाची कोंडी करून आपले इप्सित साधण्याचा प्रयत्न भाजप सतत करते, करीत आहे.
शिंदेसेनेने सत्तेसाठी कल्याण-डोंबिवली मनपात मनसेची साथ घेऊन भाजपाची कोंडी केली. त्याचे उट्टे भाजपाने नवी मुंबईत काढले. रायगड जिल्ह्यातही राष्ट्रवादी पक्षाला बरोबर घेऊन भाजपने शिंदेसेनेची कोंडी केली.
‘सत्तेसाठी वाटेल ते’ हे सूत्र निर्दयपणे भाजप राबवत आहे. त्यासाठी शिंदेसेना व राष्ट्रवादी पक्षाची ताकद क्षीण करण्यासाठी भाजप सर्व तर्हेचे फंडे वापरणार, राजकारण करणार. यापुढे शिंदेसेनेला बळ मिळेल असे कुठलेही पाऊल भाजप उचलणार नाही. उलट, शिंदेसेना व राष्ट्रवादी (अप) हे मित्रपक्ष २०२९ पूर्वी कमजोर कसे होतील, याचीच रणनीती भाजपा आखत आहे. छुप्या रीतीने भाजपाचे हे ‘ऑपरेशन लोटसच’ सुरू आहे.

