काँग्रेस पक्ष या देशात इतकी वर्षं कसा टिकला आणि त्याच्या हातात स्वातंत्र्यानंतर इतका काळ कशी सत्ता राहिली, याचं आता आश्चर्य वाटतं… मुंबई महाराष्ट्राला द्यायला तो पक्षही तयार नव्हता. हे कॉस्मोपोलिटन महानगर सगळ्या देशासाठी आदर्शवत स्वप्ननगरी आहे, त्यावर सर्व देशवासीयांचा अधिकार असावा, या स्वप्नाळू कल्पनेतून म्हणा किंवा सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिल्लीच्या खुराड्यात हवी, या निखळ व्यावहारिक भावनेने म्हणा- मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची, म्हणजे केंद्रशासित करायची आणि तिचं मिनी भारत हे रूप अधिक ठसठशीत करायचं, हा प्रयत्न काँग्रेसच्या सरकारांनीही अव्याहत केला होता. त्यावेळी ‘वारुंगळ, मुंबई नम्मुडियाधु धान’ (तामीळमध्ये या, मुंबई आपलीच आहे) असं जणू आवतन दिल्याप्रमाणे दक्षिणेतून लोंढेच्या लोंढे मुंबईत येत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठी जनतेने मराठी माणसाचं महत्त्व त्याच्या राजधानीतच कमी करण्याचा प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडला आणि त्यात काँग्रेसमधल्या मराठी नेत्यांनीही अप्रत्यक्षपणे साथ दिली होती, हा इतिहास आता सर्वज्ञात आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा तोच प्रयत्न आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेही कसोशीने चालवला आहे, पण दोन्हीत फरक आहे. मुंबईचं ‘मिनी भारत’ असं रूपांतर करण्यात भाजपला काही रस नाही- त्यांना मुंबईवर गुजराती सत्ता प्रस्थापित करायची आहे. मुंबई गुजरातचीच आहे, असा-ब्रिटिशांनी सवलती देऊन इथे आणून वसवलेल्या- गुजरातींचा समज होऊन बसला आहेच. मात्र, मुंबई थेट गुजरातला देणं सहज शक्य नाही म्हटल्यावर आधी मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी आधी इथले महत्त्वाचे उद्योगधंदे, राष्ट्रीय कार्यालयं, काही व्यवसाय गुजरातला स्थलांतरित केले गेले. पण, कितीही गिफ्ट सिटी उभ्या केल्या आणि अहमदाबादचं कितीही सुशोभिकरण केलं तरी सर्वसमावेशक आणि गतिमान मुंबईची सर येणं कठीण आहे, हे लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यामुळे आता मुंबई फक्त तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्रात ठेवून बाकी सर्व अर्थांनी भाजपच्या मतदारगोठ्याच्या ताब्यात द्यायची आणि गुजरातच्या टाचेखाली ठेवायची, असं बेरकी बेपार्यांनाच सुचू शकेल असं कारस्थान रचलं गेलं आहे. ‘आवो, मुंबई आपणूज छे’ या अघोषित योजनेखाली मुंबईतून गुजरातला जाणार्या ट्रेन किती आणि कोल्हापूरला जाणार्या गाड्या किती, महाराष्ट्राशी मुंबईची कनेक्टिव्हिटी किती, अगदी रस्तेमार्गही कोणते कसे आहेत, कसे बांधले जात आहेत, त्याचा अभ्यास केला तर हे कारस्थान समजून जातं.
आजवर भाजप मराठी माणसांना वचकून होती. पण निवडणूक आयोगाच्या सक्रिय साथीने आणि पाठिंब्याने विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचं अस्तित्त्वच जर्जर करून टाकल्यानंतर या पक्षाचे खायचे दात वेगाने बाहेर पडू लागलेले आहेत. मराठी माणूस बोटचेपा झालेला आहे, भाजपच्या भोंदुत्वाच्या भजनी लागून हिंदी भाषेचा आणि हिंदीभाषकांचा गुलाम बनायला स्वेच्छेने तयार झालेला आहे, असा अंदाज आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करण्यापासून ते हिंदी पट्ट्यातल्या कर्मचार्यांसाठी महाराष्ट्राच्या राजधानीत स्वस्तात भाड्याची घरं उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या सगळ्या महाराष्ट्रद्रोही घोषणा बिनधास्तपणे सुरू केल्या आहेत. मराठी भाषा भवन राहिलं बाजूला, इथे इतर प्रांतांच्या भवनांना प्राधान्य दिलं जातंय. यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री मुंबईच्या उपनगरांमध्ये जाऊन ‘इथे आलं की मला हिंदीच बोलावं लागतं हो’ असं कौतुकाने सांगतात… हे बोटचेपे निलाजरे बाळासाहेबांचा अस्सल वारसा सांगतात, हा त्यातला सगळ्यात दुर्दैवाचा भाग!
फडणवीस आणि त्यांच्या मातृसंस्थेला माहिती आहे की आता ‘कोणी वाचा आणि थंड बसा’ असं लिहीलं तरी त्याने काही फरक पडत नाही. कारण, मराठी माणूस व्हॉट्सअपवर आयटी सेलने घातलेले थापेबाज पो सोडून काही वाचत नाही आणि वाचलं असतं तरी त्याच्यात काही फरक पडला नसता इतका तो थंड गोळा होऊन बसला आहे. तो आयडेंटिटी क्रायसिसमध्ये सापडला आहे. आपण आधी मराठी आहोत, हा मराठी प्रांत आहे, हेच तो विसरला आहे. त्यामुळेच मराठीवर अन्य भाषा लादणार्यांना तो लाचारपणे निवडून देतो आहे आणि आपण फार मोठं राष्ट्रीय कर्तव्य करतो आहे, अशी भ्रमिष्ट भावना त्याच्या मनात घट्ट मूळ धरू लागलेली आहे.
मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसांचाच असला पाहिजे, हा बाणा मराठी माणसाने स्वत:च अरबी समुद्रात वाजत गाजत विसर्जित केलेला असल्याने फडणवीस आपल्या भावी मतपेढीला ‘आयीं, बंबई हमनी के ह!’ अशी भोजपुरीत आवतन देणारी हाळी बिनधास्तपणे घालू शकलेले आहेत. ते असेही मूळ स्वतंत्र विदर्भवादी. अगदी विदर्भ स्वतंत्र झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारे. त्यांची मातृसंस्था आणि पक्षही विदर्भवादी, शिवाय हिंदीवादी. एक देश, एक धर्म, एक भाषा असं त्यांचं धोरण. एकचालकानुवर्तित्वाच्या हुकूमशाही सत्तेपुढे मान हलवणारे नंदीबैल निर्माण करण्यासाठी ते उपयोगी पडतं. त्यांना ना महाराष्ट्राचं प्रेम, ना मराठीची माया. या एकचालकानुवर्ती बुलडोझरच्या विरोधात संघर्ष करणारे प्रांत फार कमी. दक्षिणेतली चार राज्ये, बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र. पण्ा, आपल्या संकुचित हिंदुत्वाची बुटी उगाळून गुटी पाजल्यावर मराठी माणूस पुरता निपचीत पडतो, हे लक्षात आल्यावर त्यांनी इथे वारकरी परंपरेपासून सगळ्या सर्वसमावेशक परंपरा नासवण्याची पद्धतशीर प्रयोगशाळा उघडली आहे. लव्ह जिहाद, तुकडे तुकडे गँग वगैरे, कसलाही ठोस पुरावा नसलेली काल्पनिक भुतं नाचवून सामाजिक सौहार्द कायमचं बिघडवून टाकायचं, मराठी माणसांना एकमेकांत भांडत ठेवायचं आणि मुंबई महाराष्ट्रात ठेवून तिच्यावरचा मराठी ठसा पुसून टाकायचा, असा कार्यक्रम आता जोमाने सुरू झाला आहे.
त्यामुळे बा मराठी माणसा, तू आता झोपूनच राहा. असेही जागे होऊन तुला आपल्या राज्यात परक्या भाषेतच बोलायचं आहे आणि देशाच्या दोन मालकांची गुलामीच करायची आहे. जागा झालासच तर तूही उत्तरेकडे तोंड करून उभा राहा, चेहर्यावर लांबरुंद हास्य आण आणि फडणवीसांपाठोपाठ एकसुरात हाळी दे, आयीं, बंबई रऊरे के ह!… या, मुंबई तुमचीच आहे!!
