
मागच्या आठवड्यातील डांबरगोळीच्या गंधाबद्दलच्या लेखावर खूप प्रतिक्रिया आल्या. अगदी कशावर लिहिशील काही नेम नाही इथपासून ते किती वेगळा विषय निवडलास इथपर्यंत. तो काहीसा औषधी स्वरूपाचा आणि अनेकांना नावडणारा वास जर तुला विचारखाद्य देऊ शकतो, तर ‘माझ्या व्यवसायाच्या म्हणजे वैद्यकोपचारांच्या, रुग्णाला शब्दशः पुनरुज्जीवित करणार्या आश्वासक गंधावर तर नक्कीच लिहावेस तू’ असा प्रेमळ आग्रह केला माझ्या बहिणाबाईनं, मृणालने! अनेकांना नकोसा वाटणारा तो वास मला प्रेरणा तर देतोच रे, पण वैद्यक क्षेत्रात काम करण्याची ऊर्जाही देतो, असं म्हणताना मृणालने मलाही नकळत त्या वासाच्या आठवणींची सफर घडवली!
औषधं आणि दवाखाने यांच्याशी आपला संबंध ते आवडो नावडो, पण येतोच नाही का? अगदी लहानपणीच्या आठवणींत आमच्या ढब्बू डॉक्टरांच्या दवाखान्याचा आणि पांडू ह्या त्यांच्या कंपौंडरने दिलेल्या लाल रंगाच्या औषधाचा वास खोलवर दडलाय. काहीसा नकोसा वाटला तरी पटकन बरं करणारा! तीच तर्हा अरुदादाकडच्या गोळ्यांची- होमिओपॅथीच्या त्या साखरेच्या गोळ्या आवडत असल्या तरी त्या बनवताना घातले जाणारे औषध मात्र त्याचा गंध सोडून जायचे. तो एक संमिश्र गंध भरलेला असे त्या खोलीत, त्या गंधाने आणि त्याचबरोबर डॉक्टरदादाच्या दिलखुलास गप्पांनी दुखणं पळून जायचं हे नक्की.
अलिबागच्या बाहेर शिक्षणासाठी पडलो नी ह्यातल्याच एका गंधाने कायम साथ दिलीये, आम्ही लहान असताना आईला व्हिक्स लावायची सवय होती, झोपताना तो गंध- खरंतर सुगंध- असला की कसं नकळत आश्वस्त वाटतं… अजूनही!! बाकी पुण्यात स्वतःसाठी किंवा अनेक आप्तांसाठी निरनिराळ्या रुग्णालयांशी बरेचदा संबध आला. नकोसे वाटत असले तरी असे प्रसंग नाकारताही येत नाहीत आणि टाळताही येत नाहीत. मला त्या वातावरणाचे, त्या गांभीर्याचे प्रारंभी दडपण यायचे, ती स्वच्छता, वातावरणातील अदृश्य ताण आणि औषधांचा कडसर वास हे सगळं फारसं रुचायचं नाही. मात्र अनुभवांती त्या सगळ्याचेच महत्व तर पटलेच पण नकळत त्या सगळ्याशी मैत्र पण जुळले. ती शिस्त, तो कडूपणा हा रुग्णाच्याच फायद्याचा असतो आणि त्याला पुनरुज्जीवित करण्यात ह्या सगळ्याचा एक मौलाचा वाटा असतो, नाही का? अशा वरकरणी नकोशा पण परिस्थितीनुसार आवश्यक ठरणार्या वैद्यकोपचारांना पर्याय नसतो, हेच खरे!!
शिस्तीचा आणि वरकरणी कडूपणाचा वसा अनेकदा ह्या व्यवसायासारखाच आपल्यालाही अंगिकारावाच लागतो बरं. शिस्तीचे महत्व तर कित्येकदा अधोरेखित झाले आहेच, अनिवार्य गोष्ट आहे ती प्रत्येकासाठी आणि जीवनाच्या प्रत्येकच टप्प्यावर! वैद्यकोपचारांसारखी सद्हेतुक कटूताही प्रसंगी तशीच अपरिहार्य ठरते बरं. माझ्याच बाबतीत लागू पडलेला असाच एक डोस म्हणजे आठवण सांगतो. मी शिकायला अकोल्याला गेलो तेव्हाची गोष्ट. घरापासून लांब आणि सर्वार्थाने निराळ्या वातावरणात मी सुरुवातीचे काही महिने अजिबातच रुळत नव्हतो. दर आठपंधरा दिवसांनी अलिबाग किंवा नागपूरची फेरी असायची आणि तक्रारींचा पाढा आईबाबा किंवा आजीकडे वाचला जायचा. हरप्रकारे समजावले तरी माझ्या तेव्हाच्या बालबुद्धीला फार काही रुचत नव्हते सगळे. बरेचदा समोरासमोर बोलता न येणार्या गोष्टी लिहून दिल्या की सोपं तर जातंच, पण परिणामकारकही ठरतं ह्या सूत्राचा वापर आजीने केला मग एकदा. पत्रामधून मला चार समजुतीच्या तर काही कानउघडणीच्या गोष्टी अशा काही लिहिल्या की मला परिस्थीतीची जाणीव प्रकर्षाने झाली. आजवर कायमच केवळ माया करणारी हीच का ती आजी, असा विचार करायला भाग पाडले; पण माझ्या विचारांची दिशा मात्र सुयोग्य बदलली. नावडत्या गोष्टींपेक्षा इतर महत्वाच्या गोष्टी, नवी क्षितिजं खुणावू लागली आणि बघता बघता त्या काही अंशी निराशेच्या गर्तेत गेलेल्या मनाला पुनरुज्जीवन लाभले. केवळ समजुतीचे, प्रेमाचे गोड शब्द जे करू शकले नाहीत ते काम त्या वास्तवदर्शी कटुतेने केले हेच खरे!
रणांगणावर अर्जुनाला गीता सांगणारा श्रीकृष्ण तसेच काहीसे कठोर रूप घेतो नाही का? क्षात्रधर्माची, कर्तव्याची जाणीव करणारा तो युगंधर यथायोग्य फटकारतो आणि अखेरीस अर्जुनाला युद्धास सज्ज करतो. सत्याचा जय तर होतोच, पण त्यासाठी वेळोवेळी आपल्या कर्तव्यांचे पालन, धर्माचे आचरण तर करावेच लागते. आजच्या ह्या युगात आपापल्या वकुबानुसार कधी अर्जुनाची तर कधी श्रीकृष्णाची भूमिका निभावत असतो आपण. एकमेकांच्या अनुभवांतून शिकण्यातच शहाणपण असते, कारण सगळेच अनुभव स्वतः घेण्याएवढा वेळ हाती असतोच असे नाही. मग जर सद्हेतूने दिले-घेतलेले वरकरणी कटू वाटलेले अनुभवाचे बोल स्वीकारले तर बिघडले कुठे?
एखाद्या आजाराच्या चक्रातून बाहेर पडायला जशी ती वैद्यकोपचारांची साथ मोलाची ठरते नं अनेकदा, तसेच मनाला, विचारांना दिशा द्यायलाही असे प्रामाणिक आणि स्पष्ट, वरकरणी कटू पण मुळात गुणकारी विचार नाकारून कसे बरे चालेल? तेच आपल्या मानसिक पुनरुज्जीवनाचा पाया ठरतील आणि नवी भरारी घ्यायचे बळ देतील हे निश्चित.
