समोरच्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढून त्याची फसवणूक करण्यासाठी नवनवीन प्रकारचे फंडे सायबर चोरटे राबवत असतात. सोशल मीडियाच्या व्यासपीठावर असणार्या माध्यमांमध्ये नवीन फीचर येतात. त्याचा उपयोग लोकांची कामे सुलभ व्हावीत, वेळेची बचत व्हावी, काम जलदगतीने व्हावे, याच उद्देशातून केलेला असतो. पण सायबर चोरटे मात्र आपले सुपीक डोके वापरून त्याचा उपयोग समोरच्या व्यक्तीची फसवणूक करण्यासाठी करत असतात. बर्याचदा काहीजणांना नव्या फीचरची नीट माहिती नसते, त्यामुळे समोरची व्यक्ती खरे बोलत आहे, असा विश्वास ठेवून काही मंडळी स्वतःची फसवणूक करून घेतात.
आता हीच गोष्ट पाहा. व्हॉट्सअपमुळे संवाद करणे इतके सोपे झाले आहे की त्याचा वापर न करणारी व्यक्ती सापडणे कठीण. आपल्या युजरच्या सोयीसाठी व्हॉट्सअपने काही दिवसांपूर्वी स्क्रीनशेअरचे फीचर सुरू केले. लोकांसाठी ते उपयुक्त ठरणारे आहे, पण सायबर ठग मात्र त्याचा वापर फसवणूक करण्यासाठी करत आहेत.
स्नेहा एका बँकेत लेखनिक म्हणून काम करत होत्या. आर्थिक व्यवहारांशी त्यांचा नित्याचा संपर्क. त्यामुळे इथे होणारे सायबर फसवणुकीचे प्रकार त्यांना माहीत होते. पण आपल्याला सायबर फ्रॉड कसे होतात, हे माहित असले तरी फसवणूक होऊ शकते. स्नेहा यांनाही हा अनुभव आला. बँकेला शनिवारी सुटी होती. स्नेहा घरातली कामे करत होत्या. अचानक त्यांचा मोबाइल वाजला. तेव्हा फोनवर व्हॉट्सअप कॉल येत होता, तो अनोळखी नंबरवरून येत असल्याचे दिसत होते, कुणाचा फोन आहे, म्हणून स्नेहा यांनी फोन उचलला, तेव्हा समोरची व्यक्ती हिंदीतून बोलू लागली. ‘नमस्ते मॅडम, आप जिस कंपनी से पाइप लाइन गॅस लेती हो, उसी कंपनी से हम बोल रहे हैं, मेरा नाम करणकुमार है, मॅडम आपने गॅस का बिल भरा नहीं भरा है, इसलिये आपका गॅस कनेक्शन कट होनेवाला है, अगर आप उसको रुकवाना चाहती हो, तो अभी आपका जो बिल पेंडिंग है, वो पेड करो, पुरा नहीं दिया, तो भी चलेगा. २०० रुपये दिया तो भी चलेगा’.
समोरची व्यक्ती बोलते आहे ते खरे आहे का, हे तपासण्यासाठी स्नेहा यांनी त्या गॅस कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन बिलाची तपासणी केली, तेव्हा त्यांचे १२०० रुपये थकीत असल्याचे दिसत होते. कनेक्शन कट व्हायला नको, म्हणून स्नेहा यांनी डेबिट कार्ड काढले आणि त्यामधून हे बिल भरून टाकले. स्नेहा हा व्यवहार करत होत्या, तेव्हा त्यांनी
व्हॉट्सअपवर स्क्रीन शेअर केला होता, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांच्या स्क्रीनवर येणारी सगळी माहिती दिसत होती. स्नेहा यांची कार्डची डिटेल्स समोरच्या व्यक्तीने नोंद करून घेतली होती. स्नेहा यांच्या मोबाइलवर आलेल्या ओटीपीच्या सहाय्याने अवघ्या काही सेकंदात चार व्यवहार करून स्नेहा यांच्या खात्यामधून दोन लाख रुपये काढून घेतले. स्नेहा यांना त्याचा मेसेज देखील आला, हा सगळा प्रकार काय आहे, हे पाहून त्या गोंधळून गेल्या.
हा सगळा प्रकार सुरू असताना अचानक स्नेहा यांचा मुलगा तुषार तिथे आला, त्याला स्नेहा यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला, तेव्हा मुलाने तातडीने तो फोन कट केला, त्यामुळे स्नेहा पुढल्या फसवणुकीतून वाचल्या. दरम्यान, त्यांनी या प्रकाराची नोंद सायबर पोलिसांकडे केली. तेव्हा व्हॉट्सअपने सुरू केलेल्या स्क्रीन शेअरिंगच्या फीचरच्या माध्यमातून हा सगळा प्रकार घडवण्यात आला होता. जेव्हा स्नेहा यांना व्हॉट्सअपवर फोन आला तेव्हा समोरच्या व्यक्तीबरोबर बोलताना त्यांनी त्यांच्या वॉट्सअपचा स्क्रीन शेअर केला होता, त्यामुळे त्या व्यक्तीला स्नेहा यांच्या मोबाईलवरील सर्व अॅवक्टिव्हिटी दिसत होत्या. त्यांना आलेला ओटीपी देखील त्याला दिसला होता, त्याचाच आधार घेऊन त्याने स्नेहा यांचे बँक खाते रिते करण्याचा झपाटा सुरू केला होता, अवघ्या दोन सेकंदांत त्याने स्नेहा यांना दोन लाख रुपयांना चुना लावला होता.
स्नेहा यांना दरम्यान एक मेसेज देखील आला होता, तो तुम्ही ओपन करून पाहा, असा सल्ला करणकुमारने त्यांना दिला होता. पण स्नेहा यांच्या मुलाने त्यांना तो मेसेज डिलीट करण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला होता. दरम्यान, स्नेहा यांनी तत्परता दाखवता या सगळ्या प्रकाराची पोलिसात नोंद केली. पोलिसांनी देखील हे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये गेले आहेत, याचा शोध घेतला. तेव्हा ते हैद्राबादपासून काही अंतरावर असणार्या एका गावातील बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले होते. स्नेहा यांच्या खात्यामधून दोन लाख रुपयांची रक्कम गेली होती. त्यापैकी एक लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली होती, पोलिसांनी बँकेला सांगून पुढचे एक लाख रुपयांची रक्कम तातडीने गोठवली होती. त्यामुळे स्नेहा यांचे अर्धे पैसे वाचले. पण स्क्रीन शेअरिंगच्या नादात आपल्या कष्टाची एक लाख रुपयांची रक्कम त्या गमावून बसल्या होत्या.
सोशल मीडियावर असणार्या विविध माध्यमांचा वापर करत असताना आपण त्याची नीटपणे माहिती करून घेणे आवश्यक आहे. बर्याचदा अर्धवट माहितीच्या आधारे काहीजण अति आत्मविश्वास दाखवतात. आपल्याला माहिती आहे, अशा अविर्भावात स्वत:ची फसवणूक करून घेतात, स्नेहा यांना आलेला अनुभव हा त्याचाच एक प्रकार म्हणता येईल.
हे लक्षात ठेवा…
– आपल्या व्हॉट्सअपवर आलेले अनोळखी फोन उचलण्याचे धाडस करू नका, त्यामुळे फसवणूक होऊ शकते.
– व्हॉट्सअपवर बोलण्याच्या अगोदर आपला स्क्रीन शेअर झालेला नाही ना याची खात्री करा, जर चुकून तो झाला असेल तर तो बंद करून नंतरच पुढचा संवाद करा.
– मोबाइलवर आलेला अनोळखी फोनवर बोलणार्या व्यक्तीला कोणतीही माहिती देऊ नका. त्यामधून मोठी फसगत होण्याची शक्यता आहे.
– सोशल मीडियावर असणारी माध्यमे वापरताना त्यामध्ये येणारी नवीन फीचर, नवे बदल हे पूर्णपणे समजावून घ्या आणि त्यानंतरच त्याचा वापर करा. आपल्याकडे असणार्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर तो निश्चितपणे धोकादायक ठरू शकतो, हे विसरू नका.
– कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या समोर तुमची कोणतीही माहिती उघड करू नका.