प्रबोधन सातार्यातून पुण्यात आलं, ते मोठी स्वप्नं डोक्यात घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसामान्यांना तरुणांना हिंमत देण्याचा वारसा पुढे नेण्याची योजना पुण्यात येताना प्रबोधनकारांच्या डोक्यात होती. पण ही कल्पना त्यांना वास्तवात आणताच आली नाही.
– – –
प्रबोधनचे तिसर्या वर्षांचे १६ अंक सातार्यात निघालेले दिसतात. १६ जून १९२४चा सतरावा अंक पुण्यातून निघाला असावा तरी प्रकाशनाचं स्थळ म्हणून नोंद सातारा रोडचीच आहे… त्यात ‘प्रबोधनाची जीवनक्रान्ति’ हा अग्रलेख लिहून प्रबोधनकारांनी सातार्यात झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वाचकांशी संवाद साधला. पुण्यात येऊन प्रबोधनचं स्वत:चं नवं स्वतंत्र जग उभारण्याची त्यांची मनीषा त्यांनी व्यक्त केली, प्रबोधक कल्पनांनी सुगंधित व उज्ज्वल असे ठिकाण प्रबोधनाला पुण्यात स्थापन करण्याची शक्ती क्रांतिचक्रनेत्या जगदीशाने दिलेली आहे व तो तिकडे आता जाणार. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.
पण पुण्यातून खर्या अर्थाने प्रसिद्ध होणारा प्रबोधनचा पहिला अंक चार दिवस उशिराने आला. हा तिसर्या वर्षाचा अठरावा अंक १ जुलै १९२४ ऐवजी ४ जुलैला प्रसिद्ध झाला. अडचणी आणि गैरसोयी असूनही अंक वेळेत छापून तयार केल्याचं प्रबोधनकार सांगतात. पण पोष्टाच्या परवानगीला उशीर झाल्यामळे अंकाला उशीर झाला. पुढचे अंक वेळेवर प्रसिद्ध करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. पण ४ जुलै या विवेकानंदांच्या जयंतीला अंक प्रसिद्ध झाल्याचं समाधान त्यांनी संपादकीयात व्यक्त केलंय. `पुण्यात प्रबोधन’ हा अग्रलेख त्यांच्या बुलंद आत्मविश्वासाचा आणि सकारात्मक विचारांचा आरसा आहे. सर्व बाजूंनी अडचणींनी वेढलेले असताना पुण्यात नवी सुरुवात करण्याचं स्वप्न या अग्रलेखाच्या शब्दशब्दांतून वाचता येतं.
या अग्रलेखात छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे आणि त्याला महाराष्ट्राचा परमेश्वर अशी कॅप्शन दिली आहे. पुण्यातून सुरुवात करताना त्यांनी या शहराच्या इतिहासातल्या पेशवाईला टाळून प्रबोधनाला शिवशाहीच्या प्रेरणेशी जोडलं आहे. ते महत्त्वाचं असल्यामुळे हा परिच्छेद पुढे सविस्तर मांडला आहे. तो असा, प्रचलित राजकारणांत माजलेल्या नानाविध ढोंगधत्तुर्यांनी आणि त्या ढोंगांची सोंगे रंगविणार्या अनेक धूर्तांच्या चळवळींनी पुण्याच्या पुण्याईची किंमंत महाराष्ट्राच्या बाजारांत आज बरीच कमी झालेली आहे. यात संशय नाही. पुणे म्हटले की पेशवाई आठवते आणि पेशवाई आठवली की अंगावर काटा उभा राहतो. परंतु प्रस्तुतच्या पुणे शहराची घटना जरी पेशवाईची असली, तरी पुण्याच्या आत्म्याची पुण्याई पेशव्यांच्याही फार पूर्वीची आहे. महाराष्ट्राचे प्रबोधन पुण्यातच झालेले आहे. परकीय सत्तेची टांच थेट आमच्या नरड्यावर जाचत असतांहि, ज्याचा प्रतिध्वनि सह्याद्रीच्या हरएक दर्याखोर्यांतून आजही स्पष्ट ऐकू येत आहे, त्या सतराव्या शतकांतल्या दिव्य प्रबोधनाचा आत्मा प्रथम या पुण्यांतच स्फुरण पावला. महाराष्ट्रांतली मोठमोठी शहरे, श्रीमंत जहागीरदार, पिढीजात तलवार बहाद्दर आणि पट्टीचे मुत्सद्दी यांना सफाई वगळून, करीन तर लंगोट्या नांगर्यांच्या हातून हिंदवी स्वराज्याची प्राणप्रतिष्ठा करीन, या प्रतिज्ञेच्या स्फूर्तीसाठी रात्रंदिवस तळमळणारा महाराष्ट्राचा परमेश्वर याच पुनवडीत व तिच्या आसपासच्या जंगली प्रदेशात भटकत भटकत मर्हाठी जनतेच्या मनाचे प्रबोधन करीत होता. शुद्ध नांगर्यांचे मर्द मावळे याच भूमीत बनले आणि तोरण्यावर स्वराज्याचे तोरण लटकविण्याचे बातबेतही याच ठिकाणी ठरले. हिंदूधर्माची आणि हिंदू स्त्रियांची विटंबना करण्यास सवकलेल्या मुसलमान सत्ताधार्यांच्या बेगुमान अरेरावीची मुंडी झपकन कशी पिरगळावी, याचा गुरुमंत्र याच प्रबोधनभूमीतून अखिल महाराष्ट्राच्या कोनाकोपर्यांत गोफणीच्या भिंगरीप्रमाणे रोरावत गेला.
त्यानंतर इंग्रजांच्या काळात पुण्यात समाजसुधारणेच्या चळवळी सुरू करणार्या परंपरेशी प्रबोधनकारांनी आपला वारसा जोडला आहे. त्यात त्यांनी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतिबा फुले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले आणि छत्रपती शाहू महाराज यांचा उल्लेख केला आहे. एकीकडे गोखलेंना बदनाम करण्यासाठी टिळकवादी मंडळी पुण्यात प्रचंड खटाटोप करत असताना प्रबोधनकार गोखलेंचा गौरवाने उल्लेख करतात हे महत्त्वाचं. गोखलेंचं त्यांनी केलेलं वर्णन महत्त्वाचं आहे, स्वराज्य गेले म्हणून मर्हाठ्यांचे आत्मतेजकांही मेले नाही, हे पंचखंड दुनियेला छातिठोक दणकाऊन पटऊन देणारे बुद्धिसागर वैâ. नाम. गोखले. त्यांनी केलेलं शाहूमहाराजांचं वर्णनही नेमकं आहे, मेंढरापेक्षाही हतवीर्य बनलेल्या मराठ्यांना आत्मप्रत्ययाचा चिमटा घेण्यासाठी आणि त्याबरोबरच मागासलेल्या सर्रास सर्व समाजाच्या प्रबोधनासाठी तनमनधनाच्या व्ययाकडे लवमात्र न पहाता आपल्या राजेपणाला विसरून बैरागी बनलेले कै. शाहू छत्रपति.
मात्र हा अग्रलेख लिहित असतानाची पुण्याची परिस्थिती त्यांना समाधानकारक वाटत नाही. त्या संदर्भात त्यांनी पुण्यातल्या तरुणांचं वर्णन केलंय, ते आजच्या पुण्यातल्या तरुणांनाही लागू पडतं, म्हणून मुळातून वाचायला हवं, कर्तव्योन्मुख तरुणांचा पुण्याइतका भरणा इतरत्र आढळणार नाही. मुंबईत आहे, पण पुण्याच्या विद्यार्थी तरुणांत चटकन एकवटण्याची जी एकतानता आढळते, ती बकाली वस्तीच्या मुंबईत शक्यच नसते. पुण्याच्या तरुणांत उमेद आहे पण हिंमत नाही. बुद्धी आहे पण मार्ग दिसत नाही. वृत्तीचा तापटपणा आहे पण नियंत्रता नाही. धडाडी आहे पण कोणी मार्गदर्शक नाही. भावना जागृत आहेत पण त्यांच्या सदुपयोगाची किल्ली आढळत नाही. करावेसें पुष्कळ वाटते, पण हाताने घडत नाही. निश्चयाच्या मुसंडीने काही घडऊंच म्हटले तर कोणाचे उत्तेजन नाही, पाठिंबा नाही. पुढार्यांकडे पहावे तो ते आपल्याच विवक्षित मतांच्या मंडनाच्या जोडीतोडीत दंग! तरुणांच्या भवितव्यतेचा कोणीच विचार करीत नाही… आज तरुणांची जी मुस्कटदाबी झालेली आहे, पोटाच्या बंडामुळे त्यांना पदोपदी जो उपमर्द सहन करावा लागत आहे आणि उपलब्ध सर्व विद्येंत पारंगत होऊनही अखेर तिची किंमत सुक्या मीठभाकरीच्या संसारापुरतीसुद्धा भरून येत नसल्यामुळे त्यांचा एकही राष्ट्रधुरिणब्रुव विचार करीत नाही, ही अवस्था आता तरुणांनी तरी कोठवर सहन करावी?
प्रबोधनकारांनी पुण्यातल्या तरुणांच्या समस्येचं वर्णन नेमकं केलेलं दिसतं. त्यावर त्यांच्याकडे उपायही आहे. किंबहुना तो उपाय घेऊनच ते पुण्यात आले आहेत. पण त्यांनी हा उपाय या अग्रलेखात सविस्तर सांगितलेला नाही. तरी ते म्हणतात ते महत्त्वाचं आहे. पत्रकारितेचं ध्येय नेमकं काय असावं, याचंच हे वर्णन आहे. प्रबोधनकार लिहितात, तरुणांचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तिकडे राष्ट्रधुरिणांचे लक्ष जितके लवकर जाईल तितके बरे. पुढारी इकडे लक्ष देत नसले, तर तरुणांनीच हा प्रश्न हाती घेऊन संघशक्तीच्या सहायाने आपल्या अडचणींचा फडशा पाडणे प्राप्त आहे. या कामी प्रबोधन तरुणजनांना शक्य ते सहाय्य देण्यास तयार आहे. तरुण तरुणींच्या हितवादासाठीच प्रबोधनाचा जन्म आहे. विचाराने हट्टी व जीर्ण अशा म्हातार्याकोतार्यांची प्रबोधनाला मुळीच पर्वा नाही. त्यांच्याकडे तो ढुंकूनसुद्धा पहाणार नाही. प्रबोधन तरुणांकरिता आहे. पुण्यांत प्रबोधन आले आहे ते खास तरुणांच्या हितवादासाठी. हा हितवाद सक्रीय असावा. नुसती व्याख्यान पंचविशी किंवा लेखन बत्तिशीच नसावी, अशी आमची इच्छा आहे. प्रत्यक्ष भरीव कामगिरी काय करतां येईल व तिचा तरुणांना अभेदभावाने कसा फायदा घेता येईल, याचा खुलासा लवकरच प्रसिद्ध आहे.
याचा अर्थ प्रबोधनकारांच्या मनात मोठी स्वप्नं होती. प्रबोधनच्या निमित्ताने तरुणांसाठी चळवळ उभारण्याची योजना होती. ती योजना काय असेल, हे लवकरच सांगण्याचं आश्वासन त्यांनी दिलं, तरी ते कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. कारण प्रबोधनचा तिसर्या वर्षाचा पुढचा अंकच प्रसिद्ध झाला नाही. त्यानंतर जवळपास आठ नऊ महिन्यांनी चौथ्या वर्षाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यामुळे तरुणांच्या हितवादासाठी भरीव काम करण्याची प्रबोधनकारांची योजना काय होती हे गुलदस्त्यातच राहतं. ना त्यांच्या आत्मचरित्रात, ना या काळाची माहिती देणार्या`शनिमाहात्म्य` या पुस्तकात त्याच्याविषयी काही लिहिलंय. पण हा अग्रलेख असणार्या अंकातच एक छोटी चौकट आपलं लक्ष वेधून घेते, ती अशी –
स्वाध्यायाश्रम
३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर
महत्त्वाकांक्षी परंतु परिस्थितीमुळे निराश बनलेल्या तरुणांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविणारी संस्था. सध्या इंग्रजी भाषा व मराठी ध्वनिलेखन (शॉर्टहॅन्ड) शिकविण्याचे वर्ग सुरू आहेत. लवकरच बिझिनेस ट्रेनिंगचे क्लासेस सुरू होतील. स्वत: भेटा. भेटण्याची वेळ सकाळी व सायंकाळी ८ ते १०.
दादरच्या मुक्कामात प्रबोधनकारांची स्वाध्यायाश्रम ही संघटना लोकप्रिय होती. शंभरेक तरुण त्याच्याशी जोडलेले होते. प्रबोधनच्या कचेरीतच चालणारी ही संघटना अनेक सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्यक्रम आयोजित करत होती. पुस्तकं प्रकाशित करत होती. त्याहीपुढे जाऊन याच्या तरुणांनी हुंडाविरोधक संघाची स्थापना करून विशेषतः कायस्थ प्रभू समाजात हुंड्यांची पद्धत संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे प्रबोधनकारांनी अचानक सातार्यात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे तरुण विखुरले. हुंडाबंदीची चळवळ थांबली. पण क्रांतिकारक विचारांचं बाळकडू मिळालेल्या यातल्या अनेक तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यताविरोधी चळवळीत भाग घेतला, असे संदर्भ सापडतात. सातार्याला गेल्यावर प्रबोधनकारांना स्वाध्यायाश्रमाची चळवळ अर्धवट थांबल्याचं दु:ख होतं. तसंच स्वाध्यायाश्रमातल्या उत्साही वातावरणाची त्यांना सातार्यात आठवण येत असे. त्यामुळे हे अर्धवट राहिलेलं स्वप्नं पुण्यात पूर्ण करण्याचं त्यांनी ठरवलेलं असावं, असं या चौकटीतला मजकूर सांगतो.
त्या काळात सुशिक्षित तरुणाला ज्या व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज होती ती स्वाध्यायाश्रमातून देण्याचं त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी इंग्रजी भाषा शिकवण्याचे मुंबईत आधीही घेतले होते. इंग्रजी शॉर्टहँडची नवी पद्धत शिकून त्यांनी त्यात पारंगतता मिळवली होती. शिवाय ते स्वतः उत्तम सेल्ममन आणि पीआरओ होते. ही सगळी व्यावसायिक कौशल्यं तरुणांना शिकवून त्यांचं संघटन बांधण्याचं त्यांनी ठरवलं होतं, असं दिसतं. पण हे कधीच प्रत्यक्षात येऊ शकलं नाही. पुण्याच्या वास्तव्यात ते सतत नवनव्या अडचणींचा सामना करत राहिले. अर्थात इथेही अनेक तरुण त्यांच्या संपर्कात आले. काही चळवळींना त्यांच्या पुण्यातल्या वास्तव्याने बळ मिळालं. पण त्यांच्या डोक्यातलं तरुणांचं संघटन राहूनच गेलं. फार नंतर त्यांच्या चिरंजीवांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या रूपाने तरुणांना आत्मविश्वास देणार्या संघटनेचं स्वप्न वास्तवात उतरवलं, असं म्हणता येईल. त्यासंदर्भात प्रबोधनकारांनी आपल्या अग्रलेखात नोंदवलेल्या शिवरायांच्या वारशाच्या उल्लेखाला जोडून बघता येईल.