‘काँग्रेस पक्ष गोचिडीसारखा सत्तेला चिकटून बसतो, अशी टीका करून नाकाने कांदे सोलणारा भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेवर आला आणि त्याने इतकी भयंकर सत्तालोलुपता दाखवली की गोचिडींनाही आता आपली पकड यांच्यापेक्षा कमी असल्याची शरम वाटत असेल… विरोधात असताना साधनशुचितेच्या गप्पा छाटणार्या या पक्षाने सत्तेत आल्यानंतर १० वर्षे जो उन्माद चालवला आहे, तो पाहून देशातील संविधानप्रेमी आणि लोकशाहीप्रेमी जनतेचा थरकाप उडाला आहे… त्यामुळेच आता देशातले वारे बदलू लागले आहेत, भाजपच्या चारशेपारच्या दिवास्वप्नाच्या ठिकर्या ठिकर्या उडू लागल्या आहेत आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता ठाकरे आठवू लागले आहेत!
याच मोदी यांच्या पक्षाने मस्तवालपणाचा कळस करून, ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लावून, मोठमोठी आमिषं दाखवून शिवसेना फोडण्याचं दु:साहस केलं होतं, तेव्हा मोदी यांना उद्धव ठाकरे हे आपले शत्रू नाहीत, याचा साक्षात्कार झाला नव्हता. शिवसेनेने सगळे काही दिल्यावर कृतघ्नपणे पक्ष सोडून बाहेर पडणारे लखोबा आधीही होतेच; पण, त्यांनी पक्ष पळवण्याची हिंमत केली नव्हती. इथे आसुरी महाशक्तीच्या पाठबळावर ती हिंमत केली गेली आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून गद्दारांना पक्षाचं चिन्ह आणि नाव बहाल करण्यात आलं. महाशक्तीच्या मिंध्यांबरोबर राज्यात बेकायदा ईडी सरकार स्थापन करताना मोदींना ठाकरेंची आणि त्यांच्या उपकारांची आठवण राहिली नव्हती. उलट त्यांच्या पक्षाने ठाकरे या आडनावाप्रमाणेच महाराष्ट्रात वेगळी ओळख असलेल्या पवारांच्या घराण्याशी तोच खेळ केला. महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू असलेली ही दोन घराणी खिळखिळी केली की मग महाराष्ट्र लुटायचा, मुंबई तोडायची, महाराष्ट्राचे तुकडे तुकडे करायचे आणि दिल्लीला आव्हान देण्याची क्षमता असलेलं एक राज्यच नेस्तनाबूत करायचे, अशी स्वप्नं रंगवली जात होती. यातून आपण महाराष्ट्राची अस्मिता डिवचत आहोत, हे सत्तालोभाने आंधळ्या झालेल्या दिल्लीश्वरांच्या लक्षात आलं नाही, इथल्या त्यांच्या मस्तवाल नेत्यांना तर मदच चढला होता.
कोरोनाकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या घराघराशी कुटुंबप्रमुखाचं नातं जोडलं होतं, त्याच भावनेने महाराष्ट्राची काळजी वाहिली होती, देशात सर्वोत्तम कामगिरी केली होती. आपल्याला वाचवणारा भला माणूस ही त्यांची प्रतिमा किती मोठी आहे, हे या तथाकथित महाशक्तीच्या लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला. ठाकरे आणि पवार घराण्यांवर घातलेले घाव मोदीचरणी अक्कल गहाण न ठेवलेल्या मराठी माणसांनी आपल्या काळजावर झेलले आणि हे घाव घालणार्या, आपल्याच गोताचे दांडे असलेल्या दिल्लीच्या कुर्हाडी अरबी समुद्रात फेकून देण्याचा चंग बांधला. महाराष्ट्रातली जनता आपल्यासोबत नाही, याचे संकेत भाजपला अनेक अंतर्गत सर्वेक्षणांतून मिळत गेले. तोवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा झंझावात सुरू झाला होता, गद्दार पालापाचोळा कचरापेटीत भरला गेल्यामुळे एकमेव अस्सल शिवसेने कात टाकली, ती नव्या नव्हाळीने उमलू लागली. नेत्यांनी गद्दारी केली तरी कार्यकर्ते आणि जनता कायम ठाकर्यांसोबतच होती आणि त्यांच्यासोबतच राहिली. उलट ईडीची छडी उगारली जाताच व्हिडिओ पार्लर बंद करणार्या माध्यमनिर्मित नेत्यांचे भ्रमनिरास झालेले अनुयायीही जथ्याजथ्याने शिवसेनेकडे येऊ लागले.
याच काळात देशातलं वातावरणही बदलायला लागलं. अब की बार, चारशे पारचा फुगा हवा भरायच्या आधीच फुटून गेला आणि मतदानाचे इनमीन दोन टप्पे पार पडेपर्यंतच भाजप बहुमत तरी गाठेल का, अशी शंका यायला लागली. ‘मार्मिक’ने ‘देशकाल’ या सदरातून दोनशे पार करता करता यांची दमछाक होईल, अशी भविष्यवाणी काही आठवड्यांपूर्वी केली होती, तेव्हा ज्यांचा विश्वास बसत नव्हता, तेही आता म्हणू लागले आहेत की भाजपला बहुमत मिळणं कठीण आहे.
उद्धव ठाकरे हे आपले शत्रू नाहीत हा साक्षात्कार पंतप्रधानांना आत्ता होण्यामागे (आणि तो खास मुलाखत देऊन सगळीकडे प्रसृत करण्याची वेळ येण्यामागे) ही पूर्वपीठिका आहे. चार जूननंतर गरज पडणारच आहे, तेव्हा चुचकारून ‘तुम्ही आमचेच’ म्हणून एनडीएमध्ये शिवसेनेला पुन्हा बोलावण्याची ही पूर्वतयारी आहेच. त्याचबरोबर शिवसेना आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर असली तरी तिचे ‘नैसर्गिक जोडीदार’ आम्हीच आहोत, शेवटी ती आमच्याकडेच येणार, असे सांगून काठावरच्या मतदारांना भ्रमित करण्याचा हा कुटील डावही आहे.
पण, मोदी महोदयांनी हे लक्षात घ्यायला हवं की पुलाखालून पाणी तर बरंच वाहून गेलेलं आहेच; आता पूलही वाहून गेला आहे. शिवसेनेचे लचके तोडणार्या लांडग्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले घृणास्पद आरोप असोत की फडतूस नेत्यांनी उद्धव यांच्यावर, त्यांच्या आजारपणावर गलिच्छ भाषेत केलेली टीका असो; त्यातून तुम्हाला शिवसेनेने आणि महाराष्ट्राच्या जनतेने पुरेपूर ओळखले आहे.
संकटात ठाकरेंच्या मदतीला येण्याच्या कसल्या गप्पा करता!
शिवसेनेवरचे, महाराष्ट्रावरचे, देशावरचे संकट तुम्हीच आहात.
चार तारखेला त्या संकटाचं निवारण होईल आणि तेव्हा मदतीचा पुकारा करण्याची वेळ तुमच्यावरच येणार आहे आणि तेव्हा तुमचा पूर्वानुभव लक्षात घेता कोण्ाीही तुमच्या मदतीला धावून येण्याची चूक पुन्हा करणार नाही!