ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, मंगळ, बुध सिंह राशीत, रवि, शुक्र कर्क राशीत, मंगळ, बुध सिंहेत, प्लूटो मकर राशीमध्ये, केतू तूळ राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीमध्ये. विशेष दिवस : ३ सप्टेंबर संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९.१९ वाजता, ६ सप्टेंबर कालाष्टमी, श्रीकृष्ण जयंती, ७ सप्टेंबर गोपाळकाला.
मेष : युवा वर्गासाठी आगामी काळ चांगले यश मिळवून देणारे राहणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. काही जणांच्या बाबतीत मान सन्मान मिळवून देण्याचे योग आहेत. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्याला नरमाईची भूमिका घ्यावी लागले. मनाची स्थिती नकारात्मक ठेवू नका. कोणतेही काम करताना आत्मविश्वास दाखवा. संसर्गजन्य आजारापासून सांभाळा. व्यसनी मंडळींपासून दोन हात दूरच राहिलेले बरे ठरेल, त्यांच्यामुळे वायफळ पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक मंडळींची आर्थिक आवक चांगली राहील.
वृषभ : कामाच्या ठिकाणी कोणतीही प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. एखादे प्रकरण अंगाशी येऊ शकते, त्यामुळे मन:स्तापाचे प्रसंग घडू शकतात. त्यामुळे शांत राहा, म्हणजे फार त्रास होणार नाही. काही मंडळींना नव्या नोकरीची संधी चालून येईल. कोणाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. देवदर्शन, सहलीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणे होईल. नोकरीच्या ठिकाणी काम करताना चूक होणार नाही याची खबरदारी घ्या. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेऊ नका. गुरुची चांगली साथ मिळेल, त्यामुळे अडकलेली कामे मार्गी लागतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तरुणांना यश मिळवून देणारा काळ आहे. प्रेमप्रकरण सुरु असेल तर जरा जपून.
मिथुन : अचानकपणे एखादी समस्या निर्माण होऊ शकते, त्यामुळे अचानक खर्च वाढू शकतो. आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करा. नोकरी, व्यवसाय या ठिकाणी आपली स्थिती चांगली राहील. काही व्यावसायिक मंडळींना चांगले आर्थिक लाभ होतील. तरुण मंडळींनी अतिउत्साह दाखवण्याचे टाळावे. घरातील वातावरण आनंदी राहील. ज्येष्ठ मंडळींच्या मताचा अनादर करू नका. मित्रांच्या बरोबर वागताना बोलताना काळजी घ्या, चेष्टा मस्करीपासून दोन हात दूर राहिलेले बरे, त्यामुळे मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो. घरात छोटेखानी समारंभ होईल, त्यामुळे नातेवाईकांची गाठभेट होईल. बहिण-भावाबरोबर किरकोळ कुरबुरीचे प्रसंग घडतील.
कर्क : नवीन गुंतवणूक कराल, त्यामधून चांगले रिटर्न मिळतील. सार्वजनिक ठिकाणी वादाचे प्रसंग टाळा, अन्यथा कोर्ट कचेरीच्या फेर्या माराव्या लागतील. एखादी आनंददायी बातमी कानावर पडेल, त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. देवदर्शनासाठी जाणे होईल, त्या ठिकाणी दान धर्म होईल. काही मंडळी सामाजिक कामात मन रमवतील. आयटीमध्ये काम करणार्या मंडळींना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणार्या मंडळींच्या कानावर नवीन घडामोडी पडतील. बँकेची कामे करताना काळजी घ्या, चुकीच्या ठिकाणी सही करू नका.
सिंह : नोकरीच्या ठिकाणी वागताना-बोलताना काळजी घ्या. तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊन वादाचे प्रसंग घडू शकतात. बुद्धिजीवी मंडळींना चांगले लाभ मिळवून देणारा काळ राहणार आहे. अधिकचे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग खुले होतील. काहीजणांना नव्या संकल्पना सुचतील, त्याला आकार देण्यासाठी थोडा वेळा द्या. घाई करून कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक प्रलोभनापासून दोन हात दूर राहा. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल, त्याचा भविष्य काळात चांगला फायदा होईल. काही जणांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. शेअर, लॉटरी यामधून पैसे मिळू शकतात. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्या.
कन्या : आपल्या मनासारख्या घटना घडतील. अनेक दिवसांपासून अडकून राहिलेली कामे मार्गी लागतील. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न सुरु असतील तर ते पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून नवी वास्तू घेण्याचा प्रयत्न सुरु असेल तर तो आता मार्गी लागताना दिसले. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट एजंट, मेडिकल क्षेत्रात काम करणार्यांसाठी चांगला काळ रहाणार आहे. महिलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पती-पत्नी यांच्यामध्ये विसंवाद होईल. त्यामुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. संसर्गजन्य आजारापासून जपा. डोळ्याची काळजी घ्या. विशेष म्हणजे घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
तूळ : नव्या नोकरीची संधी चालून येऊ शकते. पण त्याचा निर्णय घेण्याच्या अगोदर विचार करा आणि निर्णय घ्या. कोणाला उधार-उसनवारीने पैसे देण्याचे टाळा. जुन्या गुंतवणुकीतून चांगले पैसे मिळतील. तरुण मंडळींसाठी उत्कर्ष घडवून देणारा काळ राहाणार आहे. नव्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील, त्यामधून चांगले फायदे मिळू शकतील. कोणतेही काम करताना घाई अजिबात करू नका, त्यामुळे विकतचे दुखणे मागे लागू शकते. नव्या वास्तूच्या प्रश्न मार्गी लागेल. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लागेल. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक : जुने वाद उकरून काढू नका, त्यामुळे त्ाुमची प्रतिमा खराब होऊ शकते. मुलांच्या वागण्याबोलण्याकडे लक्ष द्या. शेजारी मंडळी तक्रार करतील. व्यावसायिक मंडळी विस्तार करण्याच्या प्रयत्न करत असतील तर त्यांचे काम मार्गी लागले. तरुण मंडळींचे प्रश्न मार्गी लागतील. नव्या गुंतवणुकीचा विचार लांबणीवर टाका. मित्र मंडळींबरोबर वागताना काळजी घ्या. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. दंतविकार, डोळ्याच्या तक्रारी असे प्रश्न त्रास देऊ शकतात. योगा, ध्यानधारणा यासाठी वेळ देताल. कलाकार, साहित्यिक, पत्रकार या मंडळींचे मानसन्मान होतील. सामाजिक कार्यासाठी वेळा द्याल.
धनु : अधिक पैसे मिळवण्याच्या मोहात फसवणूक होऊ शकते हे विसरू नका. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. संसर्गजन्य आजारापासून स्वत:ला दूर ठेवा. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याची संधी मिळू शकते. बाहेर खाताना थोडी पथ्ये पाळा. पोटाचे विकार डोके वर काढू शकतात, वाहन चालवताना काळजी घ्या, वेगावर नियंत्रण ठेवा. छोटा अपघात होऊ शकतो. गुरुकृपा राहील, त्यामुळे अडचणीचे प्रश्न मार्गी लागतील. तरुण मंडळींसाठी उत्तम काळ राहणार आहे. काहीजणांच्या बाबतीत शुभ घटना कानावर पडतील. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगती घडवून देणारा काळ.
मकर : नोकरीच्या ठिकाणी उत्तम स्थिती रहाणार आहे. मनासारख्या घटना घडतील, त्यामुळे आपल्यामधली सकारात्मक ऊर्जा वाढलेली दिसेल. रियल इस्टेट मध्ये काम करणार्या मंडळींसाठी चांगला काळ रहाणार आहे. आर्थिक बाजू चांगली रहाणार असली तरी उधार-उसनवारी नको. आरोग्याची काळजी घ्या, जुनाट आजार डोके वर काढू शकतो. व्यावसायिक मंडळींनी काम करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कागदपत्रे तपासा, कामगार वर्गावर लक्ष ठेवा. पर्यटनासाठी कुटुंबाला घेऊन जाल. वाहन चालवताना काळजी घ्या. कोणाला सल्ला देऊ नका आणि वादात पडू नका.
कुंभ : आपली आर्थिक बाजू भक्कम रहाणार आहे. संशोधक, शिक्षक यांच्यासाठी चांगला काळ. काहींचा मानसन्मान होईल. मोजकेच बोला आणि काम पूर्ण करा. नोकरीच्या ठिकाणी जेवढयात तेव्हढेच राहा. क्रिया-प्रतिक्रिया देणे नकोच. मौजमजेसाठी पैसे खर्च होतील. काहीजणांची शेअरमधून चांगली कमाई होऊ शकते. मित्र, नातेवाईक यांना आर्थिक मदत करताना परिस्थिती पाहून निर्णय घ्या. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होणार आहे, त्यामधून मानसिक शांती लाभेल. बाहेरचे खाताना जीभेवर नियंत्रण ठेवा, सरकारी कामे मार्गी लागतील.
मीन : कोणतेही काम करताना आपल्याला ते संयमाने करावे लागणार आहे. गुरूमुळे आपले बहुतेक प्रश्न सुटतील. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी चांगली स्थिती राहील. प्रमोशन, बदली, पगारवाढ याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत चांगली बातमी कानावर पडेल. घरात बोलताना-वागताना काळजी घ्या. ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. प्रेमप्रकरण सुरु असेल तर कोणत्या कारणामुळे मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या, अन्यथा वाद होऊ शकतात. महिलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यावसायिक मंडळींनी इतर कोणाच्या सांगण्यावरून नवीन गुंतवणूक करण्याचे टाळावे.