नाही म्हणता म्हणता विकासरावांचे तीन पेग संपले होते. एरवी ते कधी इतकी पीत नसत आणि तसेही आता वयोमानाने त्यांना जास्त दारू सहन देखील होत नसे. त्यांनी घड्याळात पाहिले तर साडे दहा वाजले होते. लगेच निघालो तर पुलापाशी आरामात रिक्षा मिळेल याची त्यांना खात्री होती. त्यामुळे ते अडखळत उठले आणि मित्रांना त्यांनी टाटा केले.
‘विकास नीट जाशील ना रे बाबा? अडखळतो आहेस तू आज जरा. त्यात नेमकी आज अमावस्या आहे,’ अण्णा नायकवडी काळजीने बोलले.
‘नो वरिज! आपण काय चीज आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता आहे का,’ विकासराव झोकात बोलले आणि जायला निघाले.
‘थांब रे, रिक्षापर्यंत सोडतो,’ सतीश शेळके म्हणाले आणि विकासरावांना सोडायला निघाले. आधी विकासराव ऐकायला तयारच नव्हते पण सगळ्यांनी आग्रह केला म्हणून तयार झाले. तरी गेटपाशी येताच त्यांनी हट्टाने शेळकेंना परत जायला लावले आणि ते एकटेच पुलाकडे निघाले.
‘काय रे लगेच मिळाली रिक्षा,’ शेळकेंना लवकर परत आलेले बघून अण्णांनी विचारले.
‘तो किती हट्टी आहे माहिती ना? साठ वर्षांचा होत आलाय पण लहान पोरागत वागतो. दारापासून परत पाठवले मला. इथून मी एकटाच जाणार म्हणे…’
सगळेच जोरात हसायला लागले आणि पुन्हा पेयपानात व्यग्र झाले. विकासराव सोडले, तर सगळे तसे त्या बारच्या आसपास राहणारे. त्यामुळे घाई अशी कोणाला नव्हती. अजून तासभर बसून निघावे असाच सगळ्यांचा विचार होता. शेवटी सव्वा अकराच्या सुमाराला प्रत्येकजण निघायची घाई करू लागला आणि नेमका त्याचवेळी अण्णांचा फोन वाजला.’
‘अजयचा फोन… ह्यावेळेस?’ कपाळाला आठ्या घालत अण्णा म्हणाले. अजय म्हणजे विकासरावांचा धाकटा मुलगा.
‘अण्णा, बाबा आहेत का हो तिथे?’
‘नाही रे. तो तर तासाभरापूर्वीच बाहेर पडला इथून.’
‘पण ते अजून घरी आले नाहियेत आणि फोन करतोय तर उचलत देखील नाहियेत,’ अजयचा आवाज आता जरा घाबरल्यासारखा झाला होता. विकासराव खरेतर वक्तशीर माणूस. उगाच कुठे रेंगाळणार नाहीत का वाट वाकडी करून कुठे फिरणार नाहीत, रिक्षा उशिरा मिळाली असेल तरी पुलापासून घराचे अंतर पुढे फक्त वीस मिनिटे.
‘अरे रिक्षा मिळाली नसेल. चालत यायला निघाला असेल. कसा हट्टी आहे माहितीये ना तुला,’ अण्णा अजयला धीर देत म्हणाले खरे पण का कोण जाणे त्यांच्या मनाला काहीतरी खुपत होते.
‘ठीक आहे. मी घराकडून तिकडे यायला निघतो. वाटेत भेटतात का बघतो.’
‘शेळके तू गाडी आणली आहेस ना? जरा पुलाच्या पुढेपर्यंत जाऊन बघायचे का,’ अण्णा जरा काळजीच्या सुरात म्हणाले. त्यांच्या फोनवरच्या बोलण्यावरून काय झाले असावे त्याचा अंदाज सगळ्यांना आलेला होता.
‘अरे विचारायचे काय त्यात? सगळेच जाऊ चला.’
शेळके अगदी सावकाश रस्त्याच्या कडेने गाडी चालवत होते. आतले लोक दोन्ही बाजूने लक्ष ठेवून होते. गाडी पुलाच्या पुढे आली आणि रस्त्याच्या कडेला एक मानवी आकृतीसारखे काहीतरी पडल्यासारखे दिसले. शेळकेंनी गाडी थांबवली आणि सर्वजण तिकडे धावले. रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती पालथी पडलेली होती. शर्टावरून ते विकासराव आहेत हे सगळ्यांनी ओळखले. शेळकेंनी पुढे जाऊन विकासरावांना सरळ केले आणि समोरचे दृश्य बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. फक्त काही काळापूर्वी जिवंत असलेले विकासराव आता मृत झालेले होते. त्यांच्या छातीत गोळी मारण्यात आली होती आणि चाकूने कपाळावर फुलीची जखम करण्यात आली होती.
– – –
‘मेघा मी पळतोय ऑफिसला. अर्जंट फोन आला आहे,’ बाथरूमच्या दारावर हात आपटत जय म्हणाला आणि मेघा काही बोलायच्या आत तो दारापाशी पोहोचला देखील होता. मेघा बाहेर आली आणि तिने एकदा दरवाजा नीट बंद असल्याची खात्री केली. डायनिंग टेबलवर नाश्त्याची डिश तशीच अर्धवट पडलेली होती.
‘काम काम आणि काम.. या माणसाला कामाच्या पलीकडे काही सुचेल तर शपथ,’ मनातल्या मनात डोक्याला हात लावत मेघा पुटपुटली आणि घरातल्या इतर कामांकडे वळली. ती स्वयंपाकघरात असताना बेल वाजली आणि ती तणतणत पुन्हा दार उघडायला गेली. बाहेर राघव उभा होता.
‘कुठे आहेत साहेब?’
‘ऑफिसमधून फोन आला आणि साहेब नेहमीसारखे पळाले.’
‘काय माणूस आहे! मला म्हणाला घरी ये, एकत्र जाऊ आणि जाता जाता प्रोजेक्टवर पण बोलता येईल. म्हणून मी मुद्दाम वाट वाकडी करून आलो,’ निराश होत राघव म्हणाला.
‘तो कसा आहे माहिती ना तुला? त्यात साहेबांना आता प्रमोशन ड्यू आहे.’
‘हो आहे कल्पना. बहुदा ह्यावेळी साहेब १० दिवसांसाठी सिंगापूरला पण जातील.’
‘काय सांगतोयस?’
‘मला पण आताच ऑफिसच्या एचआरकडून समजले. मागच्यावेळी अमेरिका गाजवली ना साहेबांनी. त्याचेच फळ,’ राघवने वाक्य पूर्ण केले आणि तेवढ्यात त्याच्या फोनवर जयचा फोन आला.
‘राघव मी पुढे आलोय रे. सॉरी यार मी तुला कळवले नाही. कुठेपर्यंत पोहोचला आहेस तू?’
‘तू घरी नाही असे कळले. मग बसलोय तुझ्या बायकोबरोबर फ्लर्ट करत…’ डोळे मिचकावत राघव म्हणाला.
‘कर बाबा.. तसेही माझे प्रेम आटले आहे असे तिचे म्हणणे आहे,’ खळखळून हसत जय म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. जय देखील मग मेघाला बाय करून बाहेर पडला.
– – –
संध्याकाळी राघवच्या फोनवर मेघाचा फोन वाजला.
‘बोल गं..’
‘अरे जय कुठे आहे?’
‘म्हणजे?’
‘पाच वाजता त्याचा फोन आला की तो यायला निघाला आहे. सात वाजत आले तरी त्याचा पत्ता नाही. फोनसुद्धा उचलत नाहीये. आज अमावस्या आहे, दर्शनाला जायचे आहे देवीच्या,’ मेघा चांगलीच वैतागलेली दिसत होती. पण जय असे बेजबाबदार वागणारा माणूस नव्हता. तो कितीही कामात असला, तरी फोन उचलायचाच आणि नाही उचलू शकला तर निदान मेसेज करून कळवायचा.
‘ओ शुक्ला, जयला तुम्ही कुठल्या बाहेरच्या कामावर पाठवले आहेत का?’ राघवने एचआर डेस्कला ओरडत विचारले.
‘नो सर. वो तो पाच बजे निकल गये घरको.’
‘पण जय साहेबांची गाडी तर पार्किंगमध्येच उभी आहे,’ ऑफिस बॉय तुकारामने सहजपणे माहिती दिली.
‘मग हा गेलाय कुठे,’ पार्किंगकडे जाण्यासाठी जात असताना राघवने मोठ्या आवाजात विचारले आणि तुकाराम देखील त्याच्या जोडीने धावला. दोघेही पार्किंगमध्ये आले आणि जयच्या गाडीकडे निघाले. एका कोपर्यात जयची गाडी उभी होती. तुकाराम आणि राघव दोघांनी एकाचवेळी आत डोकावले आणि दोघेही दचकून मागे सरकले. आत जय मरून पडलेला होता. रक्ताळलेली छाती आणि कपाळावर चाकूने केलेली फुली.
– – –
‘कदम अहो काय चाललंय काय हे,’ कमिशनर साहेब समोर बसलेल्या इन्स्पेक्टर कदमांवर ओरडत म्हणाले. तीन अमावस्या आणि तीन खून, तेही एकाच पद्धतीने. ह्या शहरात एक सीरियल किलर मोकाटपणे हिंडत आहे आणि आपण हातावर हात ठेवून गप्प बसलो आहोत. अजून किती खून पडायची वाट बघणार आहोत?’
‘साहेब, पाच पथकं बनवली आहेत आणि त्या खुन्याच्या मागावर सोडली आहेत. मी स्वत: तिन्ही केस माझ्या अंडर घेतल्या आहेत आणि त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे.’
‘रिझल्टचे काय कदम? केस सीबीआयकडे सोपवायची तयारी सुरू आहे वरती? दोन महिने राहिलेत माझ्या निवृत्तीला. आता नोकरीच्या शेवटच्या काळात माझ्या नावावर काही बट्टा नका लागू देऊ,’ कमिशनर साहेब काकुळतीला येत म्हणाले.
‘साहेब, आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहोत. पण कुठलाच दुवा हाताला लागत नाहीये. खून झालेल्या तिघांचाही आयुष्यात कधी एकमेकांशी संबंध आलेला नव्हता. विकास जाधव निवृत्त लेबर ऑफिसर, जय मिराशी वेब डिझायनर आणि परवा खून झालेला तिसरा मल्ल्या तर बेवारस आणि अंडा भुर्जीच्या गाडीवर कामाला असलेला फाटका माणूस. बरं तिन्ही खून शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेत.’
‘यामागे एखादी अंधश्रद्धा तर नसेल? कपाळावर चाकूने मारलेली फुली..’
‘तोही एक अँगल विचारात घेतला आहे सर. पण खुन्याने जे रिव्हॉल्व्हर वापरले आहे, ते ग्रे निकल्ससारख्या महागड्या कंपनीचे आहे. इतकी महागडी गन वापरणारा माणूस अशिक्षित, अंधश्रद्धाळू असण्याची शक्यता फार कमी आहे.’
‘शिक्षणाचा आणि अंधश्रद्धाळू असण्याचा काही संबंध आहे आजच्या काळात? शिवाय आजकाल जमीनविक्रीने अनेकांना करोडपती करून सोडले आहे कदम. त्यात अशिक्षित, अर्धवट शिकलेले सुद्धा बरेच आहेत. एखादा गुंठामंत्री किंवा ब्रोकर वगैरे याच्या मागे नाही ना, त्याचा देखील तपास करा. लोक आजकाल पैशाचा पाऊस अन गुप्तधनासाठी वाटेल ते करायला लागले आहेत.’
‘ठीक आहे साहेब. तसा आम्ही ह्या दृष्टीने तपास करतच आहोत. आता अजून जोर लावतो त्यावर.’
‘सीसीटीव्ही फुटेज किंवा कोणी काही संशयास्पद घडल्याचे पाहिले आहे का?’
‘नो लक. विकासराव आणि मल्ल्याचे खून जिथे झालेत, तिथे दूरदूरपर्यंत कॅमेरे नाहीत आणि जयच्या ऑफिस पार्किंगमध्ये दोन कॅमेरे आहेत, पण एक नेमका बिघडलेला आहे आणि दुसरा आपल्या उपयोगाचा नाही.’
‘कदम आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मल्ल्या तर बेवारस आहे पण ह्या जय आणि विकासरावाची सगळी कुंडली काढा. त्यांच्या असतील, नसतील त्या नातेवाइकांची कुंडली काढा, फोन टॅप करा, अगदी पाळत देखील ठेवा; पण मला कुठल्याही परिस्थितीत २४ तासात पुरावा हा मिळालाच पाहिजे.’
साहेबांची भेट घेऊन कदम बाहेर पडले तेव्हा प्रचंड रागात होते. प्रमोशननंतर पहिल्यांदाच इतकी महत्त्वाची केस हातात पडली होती आणि ती देखील इतकी विचित्र. तीन खून, खून करणारा माणूस एकच, खून करण्याची पद्धत देखील तीच पण पुरावा एकही नाही. संशयित एकही नाही. खुनामागे काही ठोस कारण देखील मिळत नाही. तीन खून आणि अनेक प्रश्न तेवढे हातात हात घालून भोवती पिंगा घालत होते.
‘साहेब, आपण दोन चार मांत्रिकांना ताब्यात घेतले होते, पण त्यांच्याकडून काही माहिती मिळाली नाही. ते तिघेही निर्दोष निघाले. गंडे दोरे आणि लिंबू यापलीकडे मजल नाही साहेब त्यांची,’ हवालदार काकडे.
‘साहेब, आपण गुगलवर सर्च करायचे का,’ सब इन्स्पेक्टर छाया.
‘हो साहेब, गूगलवर सगळी माहिती मिळते,’ हवालदार कदम.
‘मग आता खुनी कोण ते गुगललाच विचारा..’ करवादलेले इन्स्पेक्टर कदम.
गेले दोन दिवस आलटून पालटून अशीच चर्चा चौकीत घडत होती. अक्षरशः तहानभूक विसरून सगळे ह्या केसच्या मागे लागले होते. सगळ्या बाजू पुन्हा पुन्हा तपासल्या जात होत्या. ओळखीच्या लोकांचे पुन्हा पुन्हा जबाब घेतले जात होते, चौकशा होत होत्या पण हाताला काही लागेल तर शपथ.
त्यातच पुढची अमावस्या लवकरच येणार होती. सगळे धास्तावलेले होते. संध्याकाळी सातनंतर शहराचे रस्ते निर्मनुष्य होऊ लागले होते. अशातच रात्री आठला इन्स्पेक्टर कदमांचा फोन खणाणला आणि एक आशेचा दिवा लुकलुकला.
‘कदम साहेब, फडतरे बोलतोय येरवडा जेलमधून.’
‘बोला साहेब, काय विशेष?’
‘तुम्ही भानामती, काळी जादू, बळी अशा केसमध्ये आत असलेल्यांची माहिती मागवली होती ना?’
‘हो हो. त्याचे काय?’
‘नरबळी प्रकरणातला एक संशयित नुकताच शिक्षा भोगून बाहेर पडलाय. तुमच्याच शहराचा आहे तो. रंग्या वेताळ नावाने तो हे सगळे धंदे करतो. त्याचे नाव, पत्ता अन फोटो तुम्हाला ईमेल करतो आहे.’
‘फडतरे, तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाहीये.’
थोड्याच वेळात कदमांनी कमिशनर साहेबांचा नंबर फिरवला.
‘कदम इतक्या रात्री?’
‘साहेब एक लीड मिळाली आहे. रंग्या वेताळ. आपल्याच शहरात मांत्रिक म्हणून लोकांना फसवत होता. नाशिकमध्ये एक केसमध्ये पोलिसांनी उचलला त्याला. माणूस नीच आणि कपटी आहे. पोलिसांच्या माराला देखील तोंड उघडले नाही त्याने. पोलिसांना खात्री होती की दोन नरबळी प्रकरणांत त्याचा हात आहे. पण कोर्टाने सबळ पुराव्याअभावी सोडले त्याला.’
‘कधी सुटला तो?’
‘पहिल्या खुनाच्या तीन दिवस आधी,’ कदमांनी बॉम्ब टाकला.
‘कदम आपल्याला हवा तो हाच इसम असावा. तातडीने शहर पिंजून काढा. दोन तासात हा माणूस माझ्यासमोर हजर करा.’
– – –
‘साहेब, काहीतरी घोळ आहे. आपल्याला हवा तो माणूस हा रंग्या नसावा.’
‘कशावरून? साहेब त्याच्या घराच्या झडतीत आम्हाला काहीही संशयास्पद मिळाले नाही. ना चाकू मिळाला, ना बंदूक मिळाली. मुख्य म्हणजे ज्या दिवशी मल्ल्याचा खून झाला त्या रात्री तो त्या ठिकाणापासून ३५ किलोमीटर लांब होता. एका दारूच्या ठेक्याजवळ असलेल्या कंपनीच्या सीसीटीव्हीत तो अंधुकसा दिसतो आहे.’
‘अंधुकसा ना? मग कशाला लोड घेताय? कदम माझ्यावर काय प्रेशर आहे तुम्हाला कल्पना नाही. कोणत्याही क्षणी केस सीबीआयकडे जाईल. तुम्ही ताबडतोब ही बातमी प्रेसला लीक करा की संशयिताला आम्ही ताब्यात घेतले आहे आणि उद्या पत्रकार परिषद घेत असल्याची घोषणा करा.’
अमावस्या आली आणि शांततेत पार पडली. अधिक तपासात पोलिसांना मल्ल्याच्या घरात एक चाकू मिळाला. जाळलेल्या कपड्यांचे काही तुकडे मिळाले. त्या रात्री रंग्याला मल्ल्याच्या गाडीवर येऊन गेल्याचे ठामपणे सांगणारे दोन साक्षीदार देखील मिळाले. इन्स्पेक्टर कदम एकाच वर्षात दोन वेळा प्रमोशन मिळवणारे आणि विशेष कामगिरीनिमित्त पदक मिळवणारे अधिकारी ठरले. कमिशनर साहेब सन्मानाने आणि शहराच्या इतिहासातील एका निर्घृण गुन्ह्याचा यशस्वी तपास करणार्या पथकाचे मार्गदर्शक म्हणून शहरभर गौरविले गेले.
बघता बघता वर्ष उलटले आणि लोक खुनाच्या प्रकरणाला विसरून देखील गेले. विकासरावांची मुले देखील झालेल्या आघातातून सावरली होती. सर्व मित्र आणि जवळच्यांच्या आग्रहाखातर मेघा आणि राघव यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. इन्स्पेक्टर कदम जातीने लग्नाला हजर होते. लग्नाच्या रात्री मोठ्या खुशीत राघवने मेघाला लग्नाचे गिफ्ट म्हणून एक चंदनी पेटी बहाल केली. मेघाने पेटी उघडली आणि आतमधले गिफ्ट पाहून ती फस्सकन हसली. आतमध्ये एक चाकू आणि ग्रे निकल्सचे रिव्हॉल्व्हर होते.
जयचा काटा संशय न येता काढण्यासाठी इतर दोन खून पडले होते आणि आपण आपला जीव का गमावतोय, ह्याची त्या बिचार्यांना कल्पना देखील नव्हती.