पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौर्यावरून परतल्यावर विमानतळावरच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना प्रश्न विचारला, ‘देशात काय सुरू आहे?’
देशाच्या पंतप्रधानाला विदेश दौर्यातही देशात काय सुरू आहे याची मिनिटामिनिटाला खबर असते; त्यासाठी यंत्रणा असतात, सोबत अधिकारी असतात. असे असताना मोदींनी येताच नड्डा यांना हा प्रश्न विचारणे काहींना हास्यास्पद वाटू शकेल. पण, यानिमित्ताने मोदी यांना देशात काय सुरू आहे, याची किमान उत्सुकता आहे, हे फारच दिलासादायक आहे.
त्यांच्या बहुचर्चित अमेरिका दौर्याच्या आधी देशगौरव वाढवणार्या कुस्तीगीर कन्या आंदोलन करत होत्या, मणिपूर जळत होते, अजूनही जळतेच आहे. देशात असूनही त्यांना या घडामोडींची माहिती किंवा फिकीर आहे, असे वाटत नव्हते. आता त्यांनी किमान देशातल्या घडामोडींविषयी प्रश्न तरी केला आहे, त्यामुळे भविष्यात ते त्या घडामोडींवर विचारही करतील आणि काही निर्णयही करतील, हस्तक्षेप करतील, किमान काही भाष्य तरी करतील, अशी आशा या एका प्रश्नाने निर्माण झाली आहे.
मणिपूर वांशिक हिंसाचारात जळत असताना मोदी देशासाठी सामरिक आणि व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा असलेला अमेरिका दौरा करायला निघून गेले, याबद्दल अनेकांनी टीका केली आहे. मुळात मणिपुरात इतक्यात निवडणुका नाहीत, तिथे भाजपचेच सरकार आहे, ते राज्य हिंदीप्रभावित पट्ट्यातले नाही, भाजप आणि मोदी यांच्या राजकीय भवितव्यावर या छोट्याशा राज्यातल्या स्थितीने काहीही फरक पडण्याची शक्यता नाही. मग ते या किरकोळ विषयावर काही बोलतीलच का? जे पुतीन आणि झेल्येन्स्की यांना सबुरीचे दोन दोन शब्द ऐकवून (भले भक्तांच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड्सपुरतीच का होईना) युद्धबंदी घडवून आणू शकतात, अशा आंतरराष्ट्रीय उंचीच्या महापुरुषाने चिटुकभर मणिपूरमध्ये मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करावी, ही अपेक्षाच चुकीची आहे.
अर्थात, घरातली आग जळत ठेवून ज्या कामासाठी मोदी अमेरिकेत गेले होते, ते काम बर्याच अंशी पूर्ण झाले, हे मान्य करायला हवे. या दौर्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय सहकाराचे नवे पर्व सुरू झाले. आपल्यासाठी आवश्यक असे अनेक करार झाले. मोदी यांचे बायडेन यांनी खुल्या दिलाने स्वागत केले. मात्र, न्यूयॉर्कमध्ये मोदी यांच्या स्वागताला फुटकळ अधिकारी पाठवून, मोदी यांनी ट्रम्प यांच्याबरोबर ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ या बाष्कळ उपक्रमांत ‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा देऊन दाखवलेल्या अनाठायी अतिउत्साहाचा हिशोबही चुकता करण्यात आला.
मोदी यांनी अमेरिकेत किंवा जगाच्या पाठीवर कोठेही जाणार्या त्यांच्या वयाच्या, त्यांच्या वृत्तीच्या कोणत्याही हौशी व्यक्तीच्या उत्साहाने अमेरिकेतील वास्तव्याचे अनेक फोटो क्षणाक्षणाला ट्वीट केले. बायडेन आणि त्यांच्या सरकारने मात्र त्यांच्या कामाच्या गोष्टींपुरतेच ट्वीट केले. भारत देशाचे प्रमुख यांचे आपण स्वागत करतो आहोत, ते मोकळेपणाने करतो आहोत (कारण चीन या नव्या महाशक्तीच्या विरोधातील व्यूहनीतीमध्ये भारत महत्त्वाचा आहे), असा आणि एवढाच बायडेन प्रशासनाचा अधिकृत, औपचारिक नूर होता. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वागताला तत्कालीन अध्यक्ष प्रोटोकॉल मागे ठेवून आले होते, त्यांनी नेहरूभेटीला दिले तेवढे महत्त्व तर दूरच राहिले; पण, अलीकडच्या काळातच बराक ओबामा यांनी केलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्वागतात जी व्यक्तिगत ऊब दिसत होती, जो आदर दिसत होता, त्याचा या भेटीत संपूर्ण अभाव होता. त्यामुळे मोदी या दौर्यात कुठेही बायडेन यांचा ‘माझे मित्र ज्यो’ असा एकेरी उल्लेख करू धजले नसावेत.
शीतयुद्धाच्या काळापासून आजवर रशियाशी घनिष्टता राखून असल्याने अमेरिकेशी कायम बिचकत वागणार्या भारताने यावेळी खुल्या दिलाने अमेरिकेबरोबरचे नाते घट्ट केले, असे विश्लेषण अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केले आहे. हे पुढचे पाऊल दोन्ही देशांनी चीनला शह देण्यासाठीच उचललेले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. शिवाय, आज देशाला स्वस्त संरक्षण सामग्री आणि स्वस्त कच्चे तेल यांचा पुरवठा रशियातून होतो. वॅग्नर उठावातून सावरल्यानंतर रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे या दोस्तीबद्दल काय भूमिका घेतात, यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतील. त्यातूनच हे साहस देशाच्या अंगी लागणार की अंगाशी येणार, ते ठरेल.
मोदी यांचे आधीचे दौरे आणि आताचा दौरा यांच्यातला एक महत्त्वाचा फरक म्हणजे अमेरिकेत त्यांच्या कल्टमध्ये झालेली घट. गोदी मीडियाने २४ तास ‘गाऊ त्यांना आरती’ हाच कार्यक्रम दाखवला असला तरी अमेरिकन भारतीयांमध्ये मोदीविरोधी गटही मोठ्या प्रमाणावर आहेत, ते मोदींची तुलना हिटलरशी करतात, बायडेन सरकारने मोदी यांच्या भेटीला दिलेल्या महत्त्वामुळे ७५ सिनेटर्ससह देशातील लोकशाहीवादी जनतेचा एक मोठा हिस्साही नाराज झाला, हेही अनेक माध्यमांतून पुढे येत राहिले. मोदी यांना व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत पूर्वनिश्चित का होईना दोन प्रश्नांना सामोरे जावे लागले आणि त्यात भारतातील अल्पसंख्याकांवरच्या अत्याचाराच्या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ केल्याचेही सगळ्या जगाने पाहिले. तिथे त्यांनी भारतातल्या लोकशाहीचे गोडवे गाऊन दाखवले असले, तरी त्यात तेवढा दम नव्हता. अमेरिकेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनाला उद्देशून मोदींनी केलेल्या भाषणापेक्षा त्यात इंग्लिश शब्द वापरताना झालेल्या शाळकरी गफलतींचीच चर्चा अधिक झाली.
देशाच्या पातळीवर अपेक्षित यशाची खुशी घेऊन आलेला हा दौरा मोदी यांच्या प्रतिमासंवर्धनाच्या दृष्टीने मात्र बरेच गम घेऊन आलेला दिसतो… त्यामुळेच त्यांना परतताक्षणी देशात काय सुरू आहे, असे विचारावेसे वाटले असावे… तेच या दौर्याचे सर्वात मोठे फलित म्हणायचे!