कविवर्य मंगेश पाडगावकर यांची प्रेमावरची एक कविता प्रसिद्ध आहे, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं…’ पण सगळ्यांचं तसं नसतं, काही माणसं वेड्यासारखं प्रेम करून स्वतःला विसरून जातात. हरवलेलं प्रेम विसरू न शकलेल्या आणि बारा वर्षं उलटली तरीही त्या क्षणात अडकलेल्या एका तरुणाची गोष्ट जेनेलिया देशमुख निर्मित आणि रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या सिनेमात पाहायला मिळते.
अलिबागमध्ये वास्त्यव्याला राहणारा एक क्रिकेटवेडा तरुण सत्या (रितेश देशमुख). आईविना वाढवलेले मूल म्हणून बाबांचा लाडका. सत्याचे बाबा रेल्वेमध्ये नोकरी करतात. सत्याच्या आयुष्यात निशा (जिया शंकर) येते. निशा एका नौदल अधिकार्याच्या कुटुंबात वाढलेली मुक्त विचारांची, स्वच्छंदी मुलगी. पठडीतल्या प्रेमकथेप्रमाणे निशाची सत्यासोबत एका गैसमजातून तयार झालेली तेढ आधी मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेमात रूपांतरित होते. प्रेमात सगळं काही सुरळीत सुरू असताना निशा सत्याला सोडून जाते आणि तो मात्र दारूसोबत तिच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. सत्याच्या शेजारी राहणारी एक मुलगी आहे, श्रावणी (जेनेलिया देशमुख). ती सत्यावर बालपणापासून त्याच्या नकळत प्रेम करते. तिला त्याची अवस्था पाहवत नाहीये. श्रावणीच्या आणि वडील दिनकररावांच्या (अशोक सराफ) आग्रहाला बळी पडून तो तिच्याशी लग्न करतो, पण जवळपास एक दशक लोटलं तरी दारूच्या नशेत बुडालेला सत्या अजूनही निशाच्या आठवणीत आहे. तो त्याचं पहिलं प्रेम विसरू शकला नाही. बदलणारी परिस्थिती आणि आपण चुकतोय ही जाणीव सत्याला पुन्हा काही तरी करायला भाग पाडते, पण त्याच्या याच प्रयत्नादरम्यान त्याचा भूतकाळ पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात त्याच्या समोर येऊन उभा राहतो, ज्याची त्याने कल्पनाही केली नसते. सत्या आणि श्रावणी आलेल्या आव्हानाला कसे समोर जातात, निशा सत्याच्या आयुष्यात पुन्हा येईल का, सत्या निशाला विसरेल का, सत्या श्रावणीला पत्नी म्हणून स्वीकारेल का, या सर्व गोष्टीची उत्तरं शोधणारा प्रवास म्हणजे ‘वेड’ हा चित्रपट आहे.
मूळ ‘मजिली’ या दाक्षिणात्य चित्रपटावर बेतलेल्या या सिनेमाची पटकथा नेहमीच्या लव्ह स्टोरीच्या पठडीतील असली तरीही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात ती यशस्वी ठरते. रितेश देशमुख यांनी दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. सिनेमात वेगवान गतीने गोष्टी घडत जातात. एक दोन प्रसंग सोडले तर प्रेक्षक सिनेमात गुंतून राहतात. प्रेम तूही केलंस आणि मीही… प्रेम तुझ्यातही आहे आणि माझ्यातही… ज्याचं आपल्यावर प्रेमच नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुखणं तुम्हाला नाही कळणार… असे प्राजक्त देशमुख यांचे प्रेमाच्या भाषेतील संवाद कथेला अर्थपूर्ण बनवतात. अभिनयाच्या बाबतीत, रितेश देशमुख यांचा स्टायलिश हिरो एन्ट्रीपासूनच प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्या घेतो. तारुण्यातील निरागस प्रेमवीर ते प्रेयसी सोडून गेल्यावर दाढीमिशा वाढवून सदैव दारूच्या नशेत वावरणारा मध्यमवयीन तरुण हे दोन्ही फेजमधील वेगळेपण रितेशने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगवले आहे. मराठी सिनेमात या चित्रपटातून पदार्पण करणार्या जेनेलियाचा पडद्यावरील वावर सहज होता. तिच्या सुंदर दिसण्याने या सिनेमाला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. मराठी भाषेतील अस्पष्ट उच्चारांनी थोडा हिरमोड होऊ शकतो, पण चांगला अभिनय आणि भरपूर स्लो मोशन सीन्स या जोरावर जेनेलिया प्रेक्षकांना आपलंसं करते. जिया शंकर यांनी रंगवलेली निशा, तारुण्याच्या उंबरठ्यावरील अवखळ, स्वच्छंदी गर्ल तरुणांना प्रेमाचं वेड लावणारी आहे. सत्याच्या वडिलांच्या भूमिकेतील अशोक सराफ दारू पिऊन वाया चाललेल्या मुलाच्या वडिलांची तगमग उत्कृष्ट रीतीने मांडतात. शेजारी राहणारे मुरली (विद्याधर जोशी) यांनी त्यांच्या विनोदाच्या टायमिंगने धमाल उडवली आहे. सावलीसारखा सत्याच्या भल्याबुर्या अवस्थेत साथ देणार्या मित्राच्या भूमिकेत शुभंकर तावडेने (जाँटी) आपली छाप सोडली आहे. बालकलाकार खुशी हजारे हिने आपल्या बेधडक अभिनयाने अनुभवी कलाकारांच्या मांदियाळीत स्वतःची दखल घ्यायला भाग पाडली आहे. मराठी चित्रपटसृष्टीला एक दमदार खलनायक या सिनेमातून रविराज केंडे यांच्या रूपाने मिळाला आहे. भास्कर अण्णा या भूमिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात राग, चीड निर्माण करण्यात रविराज यशस्वी होतात. अजय अतुल यांनी दिलेलं या चित्रपटाचे संगीत श्रवणीय आहे.