देशात लोकसभा निवडणुकीसाठी २००९च्या सुरूवातीस बिगुल वाजले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या कारभारावर सर्वत्र टीका होत होती. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकर्यांच्या आत्महत्या, मुंबईवरील पाक-अतिरेक्यांनी केलेला २६/११चा हल्ला, काश्मीरमधील दहशतवाद्यांचे हिसंक कारनामे, बोफोर्स प्रकरणांचे भूत, सोनिया गांधीचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यावरील कथित घोटाळ्याचे आरोप आदी मुद्दे भाजपासहित विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणूक प्रचारात हिरीरीने मांडले. काँग्रेसविरोधी वातावरण तयार झाले असे वाटत होते. परंतु निकाल वेगळाच लागला आणि काँग्रेस प्रणित यूपीए सरकार पुन्हा केंद्रात सत्तेवर आले. केंद्रात सत्ता हस्तगत करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले.
शिवसेना-भाजप युतीने एप्रिल २००९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व जागा लढविल्या. देशात काँग्रेसविरोधी वातावरण होते. महाराष्ट्रात देखील त्याहून वेगळे चित्र नव्हते. लोकसभा मतदारसंघांची पुर्नरचना झाली. त्यामुळे मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाले. मुंबईत काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीला प्रत्येकी तीन जागा मिळतील असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता. त्यात मुंबई उत्तर-पश्चिममधून शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, मुंबई-उत्तर पूर्वमधून भाजपचे किरीट सोमय्या आणि मुंबई-उत्तरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक हे विजयी होतील, असा अंदाज होता. परंतु निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मुंबईत एकही जागा विरोधकांना मिळाली नाही. मनसेमुळे मराठी मतांचे विभाजन झाले. त्यामुळे सेना-भाजपला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. शिवसेनेचा पराभव हा मराठी मतांच्या विभाजनामुळे, मनसेमुळे झाला, असे विश्लेषण करणारे लेख वृत्तपत्रातून लिहिले गेले.
शिवसेना कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि सर्व शिवसेना नेते यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात महाराष्ट्र पिंजून काढला. शिवसेना-भाजप युतीच्या मुंबई व इतर ठिकाणी संयुक्त सभा झाल्या. कार्यकर्त्यांचे मेळावे झाले. परंतु अपेक्षित यश लाभले नाही. निवडणुकीचा निकाल लागला. मुंबईतून एकही जागा सेना-भाजप युतीला मिळाली नाही. एवढेच नव्हे, तर ठाण्याची हक्काची जागा शिवसेनेला गमवावी लागली. परंतु उर्वरित महाराष्ट्रात शिवसेनेला चांगले यश मिळाले. शिवसेनेचे अकरा खासदार लोकसभेत गेले. त्यांनी मुंबई व महाराष्ट्राची बाजू लोकसभेत भक्कमपणे मांडली.
विधानसभा निवडणूक २००९
लोकसभा निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता शिवसैनिकांनी आपल्याला सामाजिक कार्यात झोकून दिले. निवडणुका येतात-जातात. यशापयशाची पर्वा न करता सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित असलेले प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी शिवसैनिक सदैव तत्पर असतो. शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी जिल्ह्या-जिल्ह्यातील शिवसैनिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. शेतकरी, युवा वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेना-भाजपा युतीचे कार्यकर्ते मेहनत घेत होते. युतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा दौरा करून मेळावे, बैठका घेऊन महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित केले.
१२ सप्टेंबर २००९ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकले. शिवसेनेचा गोरेगावात गटप्रमुखांचा दणदणीत मेळावा झाला. शिवसेनेत बंडाळ्या-लाथाळ्या चालणार नाहीत. उमेदवारांची यादी माझ्याकडे तयार आहे. मात्र धनुष्यबाण हाच उमेदवार. त्याच्या विजयासाठी सज्ज व्हा, असे खणखणीत आवाहन करीत शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला. गोरेगावच्या एन.एस.ई. संकुलात झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी उसळली होती. या गर्दीच्या साक्षीनेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा भस्मासुर गाडून महाराष्ट्रावर भगवा फडकावण्याची शपथ तमाम शिवसैनिकांनी घेतली की ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही सर्व कडवट शिवसैनिक आज शिवसेनाप्रमुखांना वचन देतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या भगव्याच्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा शिवशाहीची स्थापना करू. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही या क्षणापासून कामाला लागलो आहोत.’
उद्धवजींनी आपल्या भाषणात शिवसैनिकांना साद घालत, त्यांचे स्फुल्लिंग चेतवले. उतणार नाही, मातणार नाही, भगव्याची साथ सोडणार नाही, अशी शपथ दिली. याच मेळाव्यात मी निवडणूक प्रचारात शिवसैनिकांसाठी मार्गदर्शनपर लिहिलेल्या ‘हल्लाबोल’ या पुस्तिकेचे प्रकाशन, तसेच अभिषेक घोसाळकर यांच्या ‘लोकनिर्धार’ या साप्ताहिकेचे प्रकाशन उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धवजींनी उन्हा-तान्हाची पर्वा न करता केला. शेतकर्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि कायदा, सुव्यवस्था या प्रश्नांवर काँग्रेस आघाडी सरकारला धारेवर धरले. २६/११चा मुंबईवरील हल्ला हा फक्त मुंबईवर नव्हता तर देशावर हल्ला होता. महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या. शिवसेना-भाजप युतीने या सर्व मुद्यांचा आपल्या सभांमध्ये उहापोह केला. शिवाजी महाराजांचा अवमान करणार्यांना धडा शिकवा असे आवाहन केले. सेना-भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात आणा आणि मंत्रालयावर पुन्हा भगवा फडकवा, असे आवाहन केले.
परंतु निवडणुकीचा निकाल वेगळाच लागला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा आले. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मराठी मतांच्या विभाजनाचा फटका शिवसेनेला बसला. शिवसेनेचे फक्त ४६ उमेदवार निवडून आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही हुकले. शिवसेना नेते सुभाष देसाई यांची गटनेतेपदी निवड झाली, तर भाजपा नेते एकनाथ खडसे यांची विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मधल्या काळात जुलै २००९मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी केली गेली, तेव्हा शिवसैनिकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता. त्यातून ते सुखरूप बाहेर पडले. त्यांच्या प्रकृतीत मागील १५-१६ वर्षात अनेक प्रकारचे चढउतार पाहावयास मिळाले. १९९५ साली प्रथमच त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. नीतू मांडके यांनी कौशल्य पणास लावले होते. बायपासमुळे हिंदुहृदयसम्राटांचे हृदय पुन्हा व्यवस्थित चालू झाले होते. पण बाळासाहेबांवर काही मर्यादा पडल्या. सक्तीच्या विश्रांतीचा आग्रह देखील डॉक्टरांनी केला. बाळासाहेबांची देखभाल करण्यासाठी चंपासिंग थापा व रवी म्हात्रे हे कायम सावलीसारखे सोबत असायचे. या आजारपणामुळे आणि सक्तीच्या विश्रांतीमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी काही मोजक्याच बैठकांना/सभांना हजेरी लावली. पण पक्षप्रमुख उद्धवजी सर्व शिवसेना नेत्यांसह महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत होते. या विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवायचाच, या निर्धाराने ते निवडणुकीच्या लढाईत उतरले. पण यशाने युतीला पुन्हा हुलकावणी दिली. महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले!