बाळासाहेबांचे फटकारे
व्यंगचित्रकाराची त्याच्या कलेवर हुकुमत असली की तो किती विस्मयकारक दृश्यरचना करू शकतो, ते दाखवणारं हे व्यंगचित्र. यात दिसतायत ते जुन्या भारतीय जनता पक्षाचे अतिशय लोकप्रिय आमदार दिवंगत रामभाऊ म्हाळगी. त्यांनी सत्ताधारी पक्षाबद्दल एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला होता… ते म्हणाले होते की प्रचंड बहुमताने निवडून आलेला पक्ष एकतर मस्त होतो किंवा झोपी जातो. निवडणुकांनंतर साडे चार वर्षं झोपी जायचं आणि सहा महिने (प्रचारापुरतं) जागं राहायचं, असा त्यांचा नित्याचा प्रघात असतो. या कुंभकर्णांना जागं ठेवण्यासाठी आम्हाला त्यांच्या कानाशी नगारे वाजवायला लागतात… सत्ताधार्यांच्या कानाशी नगारा वाजवणारे म्हाळगी दाखवताना बाळासाहेबांनी चक्क सत्ताधारी ‘आडवे’ केले आहेत… अशी अफाट दृश्यरचना तेच करू जाणेत! बाकी म्हाळगी म्हणत होते, ते त्यांच्या पक्षाच्या बाबतीतही तेवढंच सत्य सिद्ध झालं… फक्त नगारे वाजवणार्यांवर आता देशद्रोहाचे शिक्के मारले जातात आणि गुन्हेही दाखल केले जातात!