प्रबोधन आणि प्रबोधनकारांचा पुढचा प्रवास पाहण्याआधी शंभर वर्षांपूर्वीचं हे नियतकालिक आजही महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं का ठरतं, याचा मागोवा घ्यायला हवा.
– – –
`प्रबोधन` नियतकालिकाने घडवलेली जागृती हा महाराष्ट्राच्या समाज प्रबोधनाच्या, समाज सुधारणेच्या आणि पत्रकारितेच्या इतिहासाचा फार महत्त्वाचा भाग आहे. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीयुगाला सामोरं कसं जावं याविषयी महाराष्ट्र गोंधळलेला होता. त्याचबरोबर वेदोक्त प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद टोकाला गेल्याने महाराष्ट्र हादरलेला होता. या पार्श्वभूमीवर `प्रबोधन`चा जन्म झाला. त्यानंतरच्या, म्हणजे १९२०च्या दशकातल्या जवळपास नऊ वर्षांच्या महत्वाच्या नोंदी `प्रबोधन`मध्ये आहेत. किंबहुना `प्रबोधन` हा या सगळ्या सामाजिक आणि राजकीय घुसळणीचा एक भाग आहे.
पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका आणि जपान यांचा महासत्ता म्हणून होणारा उदय, असहकार आंदोलन, मोपल्यांचा मलबार येथील हिंसाचार, खिलाफत चळवळ या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, तसंच १९२३ची प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका, त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतल्या हालचाली, ब्राह्मणी वर्चस्ववाद्यांच्या कारवाया, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांमुळे झालेले वाद, मुळशी सत्याग्रह या महाराष्ट्रातल्या घडामोडींवर प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या महाराष्ट्रभर उत्तम जनसंपर्क असलेल्या अभ्यासू संपादकाने केलेली भाष्यं हा आज एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. तसंच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे, इतिहासाचार्य राजवाडे अशा या काळातील व्यक्तिमत्त्वांशी संबंधित ऐतिहासिक नोंदीही या लेखांमध्ये वाचता येतात. शिवाय स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांच्या चरित्राचे काही तपशीलही त्यांच्या साहित्यातून समोर येतात.
त्यापेक्षाही महाराष्ट्रातल्या सामाजिक संघर्षाचा तपशीलवार पट `प्रबोधन`मधून उभा राहतो, तो महत्त्वाचा आहे. `मराठी वृत्तपत्रांचा इतिहास` या ग्रंथात रा. के. लेले म्हणतात, `ठाकरे यांच्या `प्रबोधन` पत्राची कारकीर्द अवघी पाचसहा वर्षांचीच होती. पण तेवढ्या अल्पावधीत त्याने केलेली वृत्तपत्राच्या व सामाजिक चळवळीच्या क्षेत्रांतील कामगिरी न विसरता येण्यासारखी आहे. ठाकरे ह्यांच्या पत्राचे स्वरूप राजकीय प्रश्नांवर भर देणारे नव्हते. आगरकरांप्रमाणे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारे हे पत्र होते. आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा पाया अत्यंत शास्त्रशुद्ध होता. पण त्यांनी ज्या सुधारणांचा पुरस्कार केला, त्या पांढरपेशा वर्गापुरत्याच मर्यादित होत्या. त्यांच्या सुधारणावादाचे आवाहन बहुजन समाजापर्यंत पोचले नाही. त्यांनी म. जोतीराव फुले यांनी प्रसृत केलेले विचार व केलेले कार्य ह्यांची दखल घेतल्याचेही आढळत नाही. या दृष्टीने पाहिले तर ठाकरे ह्यांनी प्रबोधनाद्वारा ज्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला त्या अधिक व्यापक होत्या… या दृष्टीने ह्यांचे `प्रबोधन` आगरकरांच्या पुढे काही पावले गेलेले होते.`
`प्रबोधन`ने त्याच्या प्रकाशनकाळात महाराष्ट्रावर कसा प्रभाव टाकला, हे समकालीन पत्रकारांचे पुढे दिलेले दोन उतारे वाचून कळू शकेल. १९३०च्या दरम्यान नागपूरहून अॅड. गोविंदराव प्रधान, शांतारामपंत देशपांडे आणि गोपाळराव दळवी मिळून `जनता` नावाचं नियतकालिक काढत. या `जनता`ने ९ जानेवारी १९३०च्या अंकात `प्रबोधन`विषयी अभिप्राय दिलेला आहे, `प्रबोधनाने पांच वर्षांत निर्भीड व कल्पनारम्य लिखाणाने महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. प्रबोधनकार ठाकरे व त्यांची तडफदार लेखणी महाराष्ट्राच्या चिरपरिचयाची आहे. त्यांची लिखाणे म्हणजे त्रस्त जीवांचे हाल पाहून भडभडून आलेल्या अंतःकरणाचे पडसाद आहेत. त्यांच्या लेखांतील प्रत्येक ओळींत व अक्षरांत धर्म व राजकारण ह्यांच्या नावाखाली छलवाद करणार्या स्वार्थी सोद्यांचा निषेध दर्शविणारा जळजळीत संतापातिरेक दिसून येतो. मि. ठाकरे यांचे लिखाण म्हणजे डायनॅमिट. ते भटशाही, लाटशाही व भांडवलशाही यांच्या अभेद्य ठरलेल्या स्वार्थी तटांना आपल्या लेखणीच्या सुरुंगाने पार उडवून देते.`
आचार्य अत्रे `प्रबोधन`विषयी लिहितात, `अच्युतराव कोल्हटकर यांच्या `संदेश` या पत्राने महाराष्ट्रात जी जागृती आणि खळबळ केली, तशाच प्रकारची खळबळ ठाकरे यांच्या `प्रबोधन`ने करून सोडली, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. सदर मासिकामध्ये पाच सहा वर्षेपर्यंत निरनिराळ्या सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर खळबळीत लेखमाला आणि निबंध लिहून ठाकरे यांनी बहुजन समाजाचे अक्षरशः`प्रबोधन` केले, यात संशय नाही. भिक्षुकी वृत्तीच्या आणि सनातनी दृष्टीच्या ब्राह्मण समाजावर अनेक निकराचे हल्ले त्यांनी आपल्या या पाक्षिकात चढविले, त्यामुळे `कोदण्डाच्या टणत्कारा`पासून ब्राह्मण विद्वानांत अप्रिय झालेले त्यांचे नाव अधिकच तीव्रतेने त्या समाजाच्या डोळ्यांत सलू लागले. तथापि, सनातनी भिक्षुक समाजात हे जितके अप्रिय ठरले, तितकेच ब्राह्मणेतर समाजामध्ये ते लोकप्रिय होऊन बसले.`
प्रबोधनकारांनी मराठी समाजातले अनेक दोष १०० वर्षांपूर्वी दाखवलेले आहेत, जे आजही जसेच्या तसे आहेत. हुंड्याच्या विरोधात त्यांनी आंदोलनही केलं. पण आजही हुंडा थांबलेला नाही. भिक्षुकशाहीच्या विरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकलं होतं. पण आज जुनीच भिक्षुकशाही नवे मुखवटे घालून तसंच शोषण करते आहे. महाराष्ट्रातील इतिहास अजूनही स्वजातिभिमानाच्या चिखलात रुतून बसलाय. महिला सक्षमीकरणाची प्रबोधनकार सांगत असलेली निकड अजूनही कायम आहे. पूर्वीइतकी तीव्र अस्पृश्यता उरली नसली तरी जातिभेदाचे दुष्परिणाम महाराष्ट्र अजूनही भोगतोच आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाला `मानसिक गुलामगिरीविरुद्ध बंड` करण्याची ताकद आजही प्रबोधनकारांचे हे लेख देऊ शकतात. बहुजनवाद, हिंदुत्ववाद, गांधीवादच नाही तर कम्युनिझमविषयी आजच्या संदर्भात विचार करताना त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.
प्रबोधनकारांचं लिखाण का महत्त्वाचं आहे, हे आचार्य प्र. के. अत्रेंनीच सांगितलेलं आहे. ते नव्याने वाचकांसमोर आणण्याची गरज सांगताना ते १६ सप्टेंबर १९४५ मध्ये नवयुग साप्ताहिकातल्या लेखात लिहितात, `आजपर्यंत ठाकरे यांनी लिहिलेले सर्व प्रबोधक आणि तेजस्वी वाङ्मय एकत्रित करून ग्रंथरूपाने जर प्रकाशात आले तर महाराष्ट्राची सामाजिक क्रांती घडवून आणण्याच्या कामी या बंडखोर ब्राह्मणेतराने एका कालखंडात केवढी तेजस्वी कामगिरी करून ठेवलेली आहे, हे महाराष्ट्राला कळून आल्यावाचून राहणार नाही. अशा मान्यतेचा आणि गौरवाचा मुजरा महाराष्ट्र या कलमप्रभूला मोठ्या आनंदाने करील!`
प्रबोधनकारांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची धारदार भाषा. ठाकरी भाषा ही गोष्ट आज महाराष्ट्रात सगळ्यांना माहीत आहे. तिला प्रबोधनकारांनी जन्म दिलेला आहे आणि `प्रबोधन`च्या माध्यमातून ही ठाकरी भाषा महाराष्ट्रभर पसरली. त्या भाषेची सगळी वैशिष्ट्यं आपल्याला `प्रबोधन`च्या लेखांतून बघायला मिळतील. सडेतोड शब्दांमधून व्यक्त होणारी प्रामाणिक तळमळ हे त्यांचं खरं सौंदर्य आहे. त्यामुळे ज्यांना या भाषेचे तडाखे बसले, अशांनीही तिचं कौतुक केलेलं आढळतं. प्रबोधनकारांच्या भाषाशैलीविषयी समकालीन वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेले अभिप्राय पुढे देत आहे.
प्रबोध, धुळे : लेखणीच्या जबरपणात उभ्या महाराष्ट्रात रा. ठाकर्यांची बरोबरी क्वचितच कोणी करू शकतो, ही गोष्ट प्रसिद्ध आहे.
भारत, गोवा : महाशय ठाकरे यांची विचारसरणी सर्वसंमत असते असें जरी म्हणता येत नसले, तरी त्यांच्या भाषासरणीत झळकत असलेले तेजस्वी ओज अद्वितीय असते, याविषयी दुमत असणे शक्य नाही.
केसरी, पुणे : प्रबोधनकारांची लेखणी म्हणजे ज्वालामुखीचा भडका. त्याच्यापुढे आपपर भेद काहीच नाहीत.
सेवक, कोल्हापूर : ठाकरे यांनी संपादन केलेली कीर्ती त्यांच्या विशिष्ट लेखनपद्धतीच्या पोटी जन्म पावलेली आहे. त्यांच्या भाषेत जोम आहे, तडफ आहे. त्यांच्या विचारसरणीत स्वतंत्रपणा आहे, ताजेपणा आहे, जिव्हाळा आहे, म्हणूनच त्यांच्या लिखाणाची पक्कड विचारी मनाला जाणवते.
मन्वंतर, यवतमाळ : रा. ठाकर्यांची लेखणी म्हणजे अश्वत्थाम्याची झणझणीत तरवार. जोरदार मराठी भाषा लिहिणारा त्यांच्यासारखा लेखक दुसरा आजकाल नाही. त्यंची खरमरीत टीका वाचताना मोठी करमणूक होते.
जागृति, बडोदा : रा. ठाकरे यांचे लेखन अंतःकरणाच्या कळकळीचे असल्याने वाचकांच्या हृदयास जाऊन भिडते. रा. ठाकर्यांच्या भाषेत शब्दावडंबरापेक्षा जिवंतपणाच अधिक असल्याने वाचकांच्या मनोवृत्ती एकदम जाग्या होतात.
परीक्षक, बेळगाव : मे. ठाकरे यांच्याशी कोणाचे कितीही मतभेद असोत, आमचेही आहेत, पण त्यांच्या लेखांत जो अत्यंत वंदनीय गुण आहे तो त्यांच्या अंतःकरणांतील तीव्रतम खर्या कळकळीचा निस्पृहपणा, निर्भिडपणा किंबहुना निर्दयीपणा होय. आणि या त्यांच्या श्रेष्ठ गुणाच्या जोडीस शोभणारी अशीच त्याची अप्रतिम भाषासरणीही आहे. निर्भय निस्पृहपणा व सुंदर भाषाप्रभुत्व ही त्यांच्या लेखांत दृष्टीस पडतात.
ज्ञानप्रकाश, पुणे : रा. ठाकरे यांची आपली प्रगमनशील मते सणसणीत रीतीने मांडण्याबद्दलची प्रसिद्धी आज कित्येक वर्षे जनतेत दुमदुमीत आहे. सामाजिक अशी कोणतीही बाब असो, तीवरील त्यांची मते ठणठणीत रीतीने व्यक्त व्हावयाची, हे साधारणतः ठरल्यासारखेच आहे. त्यांच्या भाषेत जशी ओजस्विता असते तशीच वाचकांच्या मनास गंमत वाटेल अशी तिची घडणही असते. जुन्यापुराण्या कल्पनांबद्दल त्यांना जसा तीव्र स्वरूपाचा तिरस्कार वाटतो, त्याचप्रमाणे तो व्यक्त करण्यासंबंधांतही ते कशाचीही पर्वा बाळगीत नाहीत. स्वमतनिदर्शनार्थ त्यांच्या हातून होणारी शब्दयोजना कधीही सौम्य किंवा मिळमिळीत अशी आढळून येत नाही. प्रसंगवशात समर्पकता, संगति किंवा सद्भिरुची यांचा भंग झाला तरी त्यांची शब्दयोजना दणदणीत असते. आणि त्यांचे लेखन सर्वसामान्य वाचकांस स्वादिष्ट वाटते.
पां. वा. गाडगीळ, संपादक, दैनिक लोकमान्य : ठाकरे यंची लेखणी तिखट पण तडफदार असून ते मार्मिक व रसग्राही टीकाकार आहेत. `प्रबोधन` मासिकात व इतरत्रही त्यांनी लिहिलेले कित्येक टीकात्मक चर्चात्मक निबंध टिकाऊ वाङ्मयाच्या दर्जाचे आहेत. साठी उलटली तरी त्यांच्या लेखणींतले तेज अजून कायम आहे.