पाक्षिक प्रबोधनच्या १६ जूनच्या अंकात प्रबोधनाची जीवनक्रान्ति या अग्रलेखात सातार्यातून पुण्यात झालेल्या स्थलांतरामागचं वैचारिक वादळ शब्दांमधून व्यक्त झालंय. अचानक सातार्यातलं बस्तान हलवावं लागणं, हा प्रबोधनकारांना बसलेला मोठा धक्का होता. तरीही ते याकडे अत्यंत सकारात्मकपणे संधी म्हणून पाहत होते.
– – –
प्रबोधनच्या १६ मे १९२४च्या अंकात प्रबोधन कचेरीचा पत्ता सातारा रोडचाच आहे. मुख्य प्रिंटलाईनच्या बरोबरच पत्रव्यवहारासाठीही सातारा रोडचाच पत्ता दिलेला आहे. पण १ जूनच्या अंकात पहिल्या पानावरच पुण्याच्या प्रबोधन प्रिंटिंग प्रेसच्या जाहिराती आहेत. बुधवार पेठेतल्या मोरोबादादांच्या वाड्यात हा छापखाना उभा राहिला होता. यापूर्वी सविस्तर उल्लेख झाल्याप्रमाणे प्रबोधनकारांचे सहकारी बापूसाहेब चित्रेंनी प्रबोधनच्या नावाने हा छापखाना पुण्यात सुरू केला होता. त्यामुळे कूपरशेठच्या कारखान्यात वादळ उठलं आणि १६ जूनच्या अंकातून प्रबोधन पुण्यातून प्रसिद्ध होणार असल्याची द्वाही फिरवण्यात आली. तांत्रिक कारणांमुळे या अंकाच्या प्रिंटलाईन आणि मास्टहेडला सातारा रोडचाच पत्ता आहे. पुढच्या म्हणजे १ जुलैच्या अंकात मात्र प्रबोधन अधिकृतपणे पुणे शहरात प्रकाशित होऊ लागलेला दिसतो.
१ जूनच्या अंकातल्या एका छोट्या चौकटीत प्रबोधनकारांनी घोषणा केलीय की पुढील अंकात जपानचे औद्योगिक प्रबोधन हा लेख येईल. पण प्रत्यक्षात पुढच्या म्हणजे १६ जूनच्या अंकात त्याऐवजी पहिल्या पानावरच ‘प्रबोधनाची जीवनक्रान्ति’ हा अग्रलेख दिसतो. त्याविषयी या अग्रलेखातही उल्लेख आहे, तो असा, गेल्या वर्षी १६ जूनच्या १७व्या अंकासाठी `जपान राष्ट्राचे प्रबोधन हा अग्रलेख लिहिणारा प्रबोधनकार चालू वर्षाच्या त्याच अंकासाठी जपान राष्ट्राचे औद्योगिक प्रबोधन हा अग्रलेख लिहिणार, तोच त्याला प्रबोधनाची जीवनक्रान्ति हा अग्रलेख लिहिणे भाग पडावे यालाच क्रान्ति असे म्हणतात.’ दादर ते सातारा ही क्रांती ३० मिनिटात घडली होती, तर सातारा ते पुणे ही क्रांती ३० दिवसांच्या विचारविनिमयाने घडून आली आहे, असंही प्रबोधनकारांनी या अग्रलेखात स्पष्ट केलंय.
संपादकाच्या आर्थिक, सामाजिक, शारीरिक मर्यांदाचे परिणाम वर्तमानपत्रांवर होत असत. प्रबोधनकार तर प्रबोधनचे सर्वेसर्वा होते. ते एकहाती अंक काढत होते. त्यामुळे कधी त्यांच्या आजारपणामुळे अंक दोन दिवस उशिरा आलेला दिसतो. त्यामुळेच प्रबोधनमधल्या मजकुरावरही एखाद्या अंकात परिणाम झालेला दिसतो, तर सातारा रोडवरच्या आर्थिक पाठबळामुळे प्रबोधनची पानं वाढलेली दिसतात. तसंच प्रबोधनकारांच्या बरोबरच प्रबोधनचंही बिर्हाड दादर ते पुणे व्हाया सातारा असं फिरलेलं दिसतं. या सगळ्याची जाणीव प्रबोधनकारांनी प्रबोधनच्या वाचकांना करून दिलेली दिसते, प्रबोधन ही किती जरी जाज्वल्य शक्ती असली, तरी तिचा नियंत्रता जात्याच एक अशक्त माणूस. त्याचे मन जरी प्रत्यक्ष पोलादी परिमाणूंचे असले, त्याची महत्त्वाकांक्षा जरी मेल्या मारल्या मरणारी नसली आणि त्याच्या निश्चयाचा खंबीरपणा खुद्द मेरूलाही लाजविणारा असला, तरी अखेर बोलून चालून तो माणूसच!… ज्याच्या जीवनशक्तीवर प्रबोधनाचे जीवन आपल्या कार्यक्रमाची पावले टाकणार, त्या प्रबोधनावर त्या आधिव्याधींचा परिणाम का होणार नाही? विशेषत: प्रबोधनाचा संप्रदाय अजून अस्तित्वात आलेला नाही. त्याला पक्ष पंथ पार्टी काही नाही. तो स्वतंत्रमतवादी आहे. स्पष्टच बोलावयाचे तर ही एका खांबावरची द्वारका आहे. खांब उभा आहे तोवर द्वारका, पडला की त्याच्या कार्याच्या एकजात खारका!
पण या अडचणींमुळे प्रबोधनकार निराश झालेले दिसत नाहीत. कारण त्यांना वाचकांचा पाठिंबा कायम मिळत राहिलेला आहे. ते सांगतात, व्यक्तिश: आम्हाला यांत मुळीच निराशा वाटत नाही. आम्ही एकलकोंडे एकटे आहो, असा भाससुद्धा कधी होत नाही. प्रबोधनाच्या कुटुंबाचा व्याप अखिल महाराष्ट्रभर पसरलेला आहे. लौकिकी भावाबहिणींना आणि काकामामांना आमची अतिपरचयादअवज्ञा करण्याची जरी लहर आली, तरी प्रबोधनाला आपला सख्खा पाठचा भाऊ मानणार्या भावाबहिणींची संख्या हजारांनीच मोजावी लागणार, हे काय कमी भाग्य? कोण या सुखाचे मोल करील?
इतर व्यापारी वर्तमानपत्रांप्रमाणे प्रबोधन हे फायद्यासाठी चालत नाही, अशी प्रबोधनकारांची स्षष्ट भूमिका होती. त्यामुळे जो त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळेच प्रबोधनमधील विचारांना धार मिळते आणि वाचकांचा प्रतिसाद मिळतो, असंही त्यांना वाटतं. सातार्यातून देशोधडीला लागल्यानंतर प्रबोधनकार हे लिहीत आहेत, हे महत्त्वाचं. प्रबोधन पैशाकरिता नव्हे, पैसा प्रबोधनाकरिता नव्हे. पैशाच्या राशीवर धिक्काराने थुंकण्याचा मान या निर्धन प्रबोधनकाराला या जन्मांत अनेक वेळा लाभलेला आहे. पैशाच्या जोरावर प्रबोधनाची मते विक्रीस काढणारे अनेक सट्टेबाज व्यापारी गेल्या ३ वर्षांत हिरमुसले होऊन परतले आहेत. या सर्व तापसहस्रांनी तापलेली आणि अनेक व्यावहारिक संकटांचा व अनुभवांच्या चुल्हाणावर आत्म्याला पीळ पडेपर्यंत शिजलेली मनोवृत्ती जेव्हा आपल्या मनीचे खोल बोल प्रबोधनद्वारा अस्खलित बोलू लागली, तेव्हा या बोलानेच अखिल महाराष्ट्राच्या हृदयाच्या हृदयातून दिव्य निर्व्याज प्रेमाची साद या प्रबोधनकाराला दिली. या एवढ्याच भांडवलावर त्याच्या जनसेवेच्या व विचारक्रांतीच्या धडपडी अखंड चालू आहेत. इतर लौकिकी भांडवलाचे व भांडवलवाल्यांचे गोत्र प्रबोधनाशी व्यस्तच प्रमाणात पडत असते.
सातार्यातल्या अनुभवांमधून प्रबोधनकरांना खूपच शिकायला मिळालं, पण त्यांचं ध्येय मात्र तसूभरही हललेलं दिसत नाही, परमेश्वरी योगायोग अतर्क्य असतात! दादरहून सातारा रोड व सातारा रोडहून पुणे! क्रांतिचक्राची नवलाई मोठी कौतुक उत्पन्न करण्यासारखी आहे. तीत त्रास असेल, क्लेश असतील, प्राणहानी असेल, पण प्रगति-प्रगतीचा वेग मात्र अव्याहत आहे, यात मुळीच संशय नाही. सातारा रोडवरील वनवासाचा नऊ महिन्यांचा अनुभव फार फार किमतीचा आहे. लाख्खो रुपये ओतले तरी मिळणारा नव्हें. मातेच्या उदरी नऊ महिन्यांची वस्ती करणार्या जीवाला कविवर्णित सुखदु:खांची जाणीव नसते. पण परिस्थिती-मातेच्या उदरांत आम्ही अनुभवलेल्या नऊ महिन्यांचा अनुभव कितीही बिनमोल असला तरी त्याचे यथार्थ शब्दचित्र रेखाटण्याइतकी या जनसेवक प्रबोधनकाराची लेखणी आजच कमजोर झालेली नाही. परिस्थिती बदलली, जीवनात क्रांती झाली किंवा व्यावहारिक संसारांत विलक्षण उलथापालथ झाली, तरी प्रबोधन आपल्या निश्चित ध्येयमार्गापासून रोममात्र च्युत होणार नाही.
केवळ स्वत:च्या मालकीचा छापखाना मिळावा, या उद्देशाने प्रबोधनकार दादरहून सातार्याला गेले होते. पण हा सातार्यात हा साधा व्यवहारही जमत नव्हता. स्वातंत्र्याची गळचेपी तर प्रबोधनकार सहन करणार नव्हतेच, पूर्वीच्या स्थलांतराचा शुद्ध व्यावहारिक उद्देश अशुद्ध होऊं लागल्यामुळेच प्रस्तुतची क्रांती आम्ही होऊन घडवून आणलेली आहे. ज्या मतस्वातंत्र्यासाठी सरकारी सेवावृत्तीची रौप्यशृंखला तोडली गेली, त्याच उद्देशाने सातारा रोडवरील व्यवहाराचा स्फोट झाला. उत्तम झाले! सातारा रोडवरील नऊ महिन्यांच्या वनवासाच्या शैताना, शांत हो, शांत हो!! आमच्या एका लाडक्या अपत्याचा बळी घेतलास, आता तरी शांत हो! रात्रंदिवस जाग्रणाच्या व अक्षरश: मजूरदारी थाटाच्या खस्ता खात असताना शोषून घेतलेल्या रक्तप्राशनाने तुझी पिपासा शांत होऊ दे.
सातार्यातून पुण्यात येताना प्रबोधनकार अत्यंत सकारात्मकतेने भारलेले दिसतात. स्वतःच्या हक्काचा, छोटासा का होईना, पण एक छापखाना असावा, इतकंच त्यांचं मागणं होतं. तिथे निर्भयपणे आपली मतं मांडता येतील असं प्रबोधन काढत राहण्यासाठी त्यांचा आटापिटा होता. अशा चंद्रमौळी मठीचं स्वप्न घेऊन ते पुण्यात पोहोचले. ते त्यांच्याच शब्दात वाचायला हवं, मतस्वातंत्र्याचा व निर्भिडपणाचा संप्रदाय कोणा थोरामोठ्यांच्या भीडभिकेवर चालणेच शक्य नाही. त्यासाठी मोडकी तोडकी का होईना, अडीअडचणीची का असेना, शुद्ध चंद्रमौळी का असेना, स्वत:च्या मालकीची मठी पाहिजे. तेथे मनाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. तेथे अमुक रुपयाला अमुक मत द्या सांगणारा माणूस येताना सात वेळ ठेचाळून पडला पाहिजे. श्रीमंतीच्या गुर्मीची उर्मी त्या मठाचे दर्शन होताच जळून खाक झाली पाहिजे. त्या ठिकाणी सरकारच्या सीऐडी माणसाला बिनधोक येता जाता यावे आणि कारस्थानी नरपशुंनाही आपल्या पशुत्वाची चिळस उत्पन्न व्हावी. इतके ते प्रबोधक कल्पनांनी सुगंधित व उज्वळ रहावे. असले ठिकाण प्रबोधनाला पुण्यात स्थापन करण्याची शक्ती क्रांतिचक्रनेत्या जगदीशाने दिलेली आहे व तो तिकडे आता जाणार. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.