सातार्यातल्या निवडणुकीतल्या जातिवादी प्रचाराला प्रबोधनकारांनी विरोध केला नसला तरच नवल. पण ज्यांच्यावर टीका करायचे त्या सगळ्यांसोबतच ते जातिभेदाच्या विरोधातली लढाई खांद्याला खादा लावून लढत होते. त्यामुळे ही टीका त्यांनाही विषण्ण करणारी ठरली.
– – –
सातार्यातल्या कॉन्सिल निवडणुकांना जातिवादाचा रंग आल्याने प्रबोधनकार अस्वस्थ होते. मराठ्यांची मतं मराठ्यांनाच मिळायला पाहिजेत, असं पत्रक निवडणुकीतले अपक्ष उमेदवार भास्करराव जाधव यांनी काढल्यामुळे प्रबोधनकार फारच दुखावले गेले. भास्करराव हे सत्यशोधक चळवळीतले एक विचारवंत नेते तर होतेच, पण प्रबोधनकारांचे जवळचे स्नेहीही होते. समतेच्या अनेक छोट्यामोठ्या लढाया त्यांनी छत्रपती शाहूंच्या नेतृत्वात एकत्र लढवल्या होत्या. महात्मा जोतिबा फुले यांचा विचार त्यांनी आपल्या लिखाणांतून ठामपणे मांडला होता. छत्रपती शाहू महाराज यांचे खंदे सहकारी म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे कामगिरी पार पाडली होती. असे जाधवराव फक्त निवडणूक जिंकण्यासाठी बहुजन समाजाच्या ऐक्यालाच सुरूंग लावताना बघून प्रबोधनकारांना दुःख होणं स्वाभाविक होतं.
भास्करराव जाधवांचं पत्रक प्रबोधनकारांनी थेट प्रबोधनमध्येच छापलं, असं त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे. अभ्यासकांनी प्रबोधनच्या प्रकाशित झालेल्या ९५ अंकापैकी ९१ अंक आज उपलब्ध केले आहेत. त्यातले चार अंक हे तिसर्या वर्षाचे म्हणजे प्रबोधनकारांच्या सातारा मुक्कामातलेच आहेत. यापैकी एका अंकात हे पत्रक छापलं असावं. या पत्रावर प्रबोधनकारांनी केलेली टिप्पणी महत्त्वाची होती, मेहरबान, ही वारंवार पगड्या फिरविण्याची सवय सोडून द्या. असले पगडी पटाईत पठ्ठे पुढारीच ब्राह्मणेतर संघाच्या नशिबाला लागल्यामुळे त्या संघटनेचा बोजवारा उडाला आहे आणि गरीब बिचारी भोळी जनता तोंडघशी पडली आहे.
टुडेज महाराष्ट्र या इंग्रजी अग्रलेखात प्रबोधनकारांनी ब्राह्मणेतर पक्षाच्या वैचारिक दिवाळखोरीवर जळजळीत टीका केली आहे. ब्राह्मणेतर पक्षाची वैचारिक बांधणीच नीट झाली नाही. त्याची धड घटनाही नाही. सगळ्या ब्राह्मणेतर जातींना सामावून घेण्याचा विचारच या पक्षाने केला नाही. त्यामुळे हा पक्ष फक्त नावापुरता उरला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. त्या लेखात ते लिहितात, `The Marathas, forming the major bulk of the party, presupposed that they could safely represent all the Non-Brahmin communities in Maharashtra in all respect. Not even this, but as the present situation proves, they actually concentrated their energies to develop their own communal powers under the gar of Non-Brahmanism. The Party, the League, the Conferences, all were mere farces. The Hindu idea of caste predominance secretly throbbed through all these activities and during the recent Council Elections, many Marathas actually made speeches to the effect that Non-Brahmins means Marathas. Such an attitude has at last resulted in estranging the Jain and Ligayat communities along with many others and today the Party exists in but a name only.’
कारण प्रबोधनकार रूढ अर्थाने कष्टकरी बहुजन समाजाच्या व्याख्येत बसत नव्हते. ते सुशिक्षित पांढरपेशा चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे होते. तरीही त्यांनी स्वतःहून बहुजनांना भिक्षुकशाहीच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. ती त्यांची एकट्याची कोंडी नव्हती. काही मराठा नेत्यांच्या वर्चस्ववादी कारवायांमुळे ब्राह्मणेतर चळवळीतल्या बहुसंख्य मराठेतर नेते विचारवंतांची कोंडी होत होती. पण प्रबोधनकारांना स्वतःची चिंता नव्हतीच. त्यांचा प्रश्न होता, मराठ्यांची मते जर मराठ्यालाच मिळावी, तर अस्पृश्यांनी तरी आपली मते मराठ्यांना का द्यावी?
सातार्याचे मतदारसंघ हे मराठाबहुल असले, तरी ब्राह्मणेतर पक्षाच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी अस्पृश्यांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यामुळे निवडणुका आल्या की नेत्यांना अस्पृश्यांचा कळवळा यायचा. अस्पृश्योद्धारक परिषदांचा सुळसुळाट व्हायचा, असं प्रबोधनकार सांगतात. अशीच एक परिषद तेव्हा गाजली होती. लिबरल पार्टीच्या म्हणजे मवाळ गटाच्या अधिवेशनात दरवर्षी अस्पृश्यता परिषद होत असे. २८-२९ डिसेंबर १९२३ला झालेल्या या परिषदेच्या स्वागत मंडळाने परिषदेचे अध्यक्ष म्हणून धनजीशेठ कूपर यांची निवड केली. तर स्वागताध्यक्ष म्हणून केशवराव बागडेंची निवड केली. दोघेही ब्राह्मणेतर पक्षाचे नेते होते. त्याऐवजी अण्णासाहेब लठ्ठे किंवा ठक्कर यांची निवड अस्पृश्यांचं स्वागत मंडळ करेल असं मवाळ गटाच्या धुरिणांना अपेक्षित होतं. मवाळ गटाचं नेतृत्व तेव्हाही प्रामुख्याने ब्राह्मणांच्या हातातच होतं. त्यांच्या झालेल्या अपेक्षाभंगामुळे मवाळ गटाचं मुखपत्र असणार्या ‘ज्ञानप्रकाश’ने त्यावर टीका केली. त्याची प्रबोधनकारांनी `मवाळांची भिक्षुकशाही’ अशी संभावना करत बिनपाण्याने हजामत केली.
‘ज्ञानप्रकाश’चा आक्षेप होता की निवडलेले अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष ब्राह्मणेतर पक्षाचे असल्यामुळे या परिषदेचा वापर ब्राह्मणांविषयी द्वेष पसरवण्यासाठी करतील. पण प्रत्यक्ष परिषदेत तसं काहीच झालं नाही. धनजीशेठ कूपर यांनी अध्यक्षपदावरून दिलेलं भाषणही गाजलं होतं. ते ‘प्रबोधन’च्या अंकात प्रकाशितही झालं आहे. भाषणाच्या शैलीवरून ते भाषण प्रबोधनकारांनीच लिहिलं असण्याची शक्यता वाटते. अत्यंत समतोल अशा या भाषणामुळे प्रबोधनकारांना ‘ज्ञानप्रकाश’ला आडवं करण्यासाठी रानच मोकळं मिळालं. त्यांनी मराठी आणि इंग्रजीतून अग्रलेख आणि स्फुटं लिहून मवाळांना धुवून काढलं. त्याचा एक अप्रत्यक्ष फटका धनजीशेठ कूपरनाही बसला. प्रबोधनकारांनी लिहिलं होतं, ‘मवाळांच्या भिक्षुकशाहीला जसा रामराम ठोकलात तसा अखिल स्पृश्यांच्या मध्यस्थीलाही कायमची मूठमाती देऊन आत्मद्धाराचा मार्ग निर्लेप स्वावलंबनी बाण्याने चोखाळत चला की तुमच्या सर्व आधीव्याधींचे तेव्हाच परिमार्जन होईल. जो दुसर्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला, ही समर्थवाणी अखंड नजरेपुढे ठेवा. `अस्पृश्यांनी कूपर किंवा बागडेंसारख्यांना अध्यक्ष, स्वागताध्यक्ष बनवण्याची काही गरज आहे का? आता तुमच्यामधूनच तुमचं नेतृत्व पुढे येऊ द्या, असं त्यांचं अप्रत्यक्ष सांगणं होतं. अस्पृश्यांना आपल्या हातचं खेळणं बनवून त्यांना फक्त मतं मिळवण्यासाठी वापरणार्या कूपरसारख्या नेत्यांना हे मत रूचणं शक्यच नव्हतं. त्याच अंकातल्या दुसर्या स्फुटलेखात प्रबोधनकारांनी हे स्पष्टच उलगडून सांगितलं. त्या लेखाचा मथळा होता, `अस्पृश्यांनो, स्पृश्यांपासून सावध रहा.’
अत्यंत महत्त्वाचा असा हा स्फुटलेख तेव्हाही गाजला आणि आजही फार महत्त्वाचा आहे. या लेखाला त्या वेळच्या निवडणुकीचे संदर्भ जरी असले, तरी त्यातली मांडणी काळाला पुरून उरणारी आहे. शंभर वर्षांनंतरही हा लेख आजच्या दलितांसाठी तर महत्त्वाचा आहेच, पण बहुजन विचारसरणी मानणार्या नेत्यांसाठी त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं आवाहन करणारा हा छोटा लेख आजच्या वाचकांना प्रबोधनकारांच्याच शब्दात वाचण्यासाठी पुढे जसाच्या तसा दिला आहे.
अस्पृश्य समाजाच्या वर्तमान प्रबोधनाचा अनेक लोक अनेक प्रकारांना आपल्या आत्मस्तोमार्थ उपयोग करून घेत आहेत. अस्पृश्योद्धार म्हणजे वाटेल त्या स्पृश्य प्राण्याला स्वतःच्या महतीचे एक बिनखर्ची भांडवल होऊन बसले आहे. गेल्या इलेक्शनमध्ये अस्पृश्योद्धाराच्या वल्गनांवर अनेक स्पृश्य शहाण्यानी अस्पृश्यांना हरभर्याच्या झाडांवर चढऊन आपल्या निवडणुकीचे चणे कुरमुरे सपाटून भाजून घेतले. नुसत्या अस्पृश्यताविषयक व्याख्यानांवर स्वतःस हारतुर्यांच्या थडग्यांत गाडून घेणारे वावदूक स्पृश्य वीर तर कितीतरी बोकाळले आहेत. आणि अस्पृश्यांकडे पहावे तर त्या बेट्यांची अशी समजूत होऊन बसली आहे की सगळ्या बोलघेवड्या स्पृश्य बृहस्पतींच्या हातूनच आमची अस्पृश्यता निवारण होईल, हेच आमचे वैâवारी. यांच्याच तोंडून आमच्या दुःखांचा व अपमानाचा उच्चार व्हावा. याच स्पृश्यांनी आमची वर्तमानपत्रे चालवावी. आम्ही मात्र त्यांच्या हात लाऊन `मम आत्मना’ म्हणण्यातच आमचा आत्मोद्धार मानावा. परिषदेच्या कामी सुद्धा स्पृश्यांचाच सुळसुळाट. ही परावलंबनी स्थिती जोपर्यंत आहे, तोपर्यंत आम्ही अस्पृश्यांना मुद्दाम बजावून सांगतो, तुमचा आत्मोद्धार कदापि होणे शक्य नाही. अस्पृश्यता विध्वंसनाचा प्रश्न हिंदी दास्यविध्वंसनाइतकाच समगोत्री आहे. स्वराज्य जसे मागून मिळणार नाही, तशी अस्पृश्यता घालवा म्हणून कोणीही घालविणार नाही. हक्क व अधिकार कोणी कोणाला देत नसतो. ते बळजबरीने घ्यावे लागतात. त्यासाठी आत्मयज्ञांची शिकस्त करावी लागते. स्वावलंबनाचा बाणा कडकडीत आचरावा लागतो. इंग्रेजी नोकरशाही आणि गुलाम हिंदी जनता यांचे नाते आणि स्पृश्य व अस्पृश्य यांचे नाते एकजिनसी आहे. अस्पृश्यांत जर जातिभेदाचा म्हसोबा बोकाळणार नाही आणि सर्व अस्पृश्य जाती एकोप्याने अस्पृश्यता विध्वंसनाचा व समान हक्कप्राप्तीचा प्रयत्न शुद्ध स्वावलंबनाच्या बळावर करतील, तर ही सात कोटी सामर्थ्याची लोकशक्ती देशांतल्या वाटेल त्या राजकारणी पक्षाला पुरून उरण्यास समर्थ होईल, असा जो इशारा अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष खा. ब. कूपर यांनी दिला आहे, त्याचे आमच्या अस्पृश्य बांधवांनी अगत्य चिंतन करावे. स्पृश्यांची मध्यस्थी ही तरी एक प्रकारची भिक्षुकशाहीच आहे. अस्पृश्यांच्या आत्मोद्धारासाठी निघालेल्या वृत्तपत्रांना स्पृश्य समाजातील भाडोत्री संपादक कशाला? अस्पृश्यांचा हितवाद अस्पृश्यांनीच केला पाहिजे. स्वराज्यवादी भारतीय आंग्ल दैनिकासाठी कोरा करकरीत टोपडा एडीटर आणणार्यांच्या स्वयंनिर्णयाच्या पुराणांत जेवढा पोकळपणा, तेवढा भाडोत्रीपणा अस्पृश्यहितवादी पत्रांसाठी स्पृश्य संपादक नेमण्यात सिद्ध होतो, हे अस्पृश्यांनी लक्षांत ठेवावे. अस्पृश्यांनी खरे पाहिले तर प्रथम स्पृश्यांवरचा बहिष्कार घालणे इष्ट आहे. स्वत:च्या पायांवर उभे राहून धिटाईने आपले माणुसकीचे व नाकरिकत्वाचे हक्क संपादन करण्यासाठी अखिल अस्पृश्य समाज ज्या दिवशी एकमुखी व एकदिली सज्ज होईल, त्या दिवशी त्यांना विरोध करण्याची कोणत्याही शक्तीला ताकदच उरणार नाही.’