यूजर फ्रेंडली म्हंजे वापरायला सोप्पे. आता वापरायला सोप्पे म्हंजे वापरकर्त्याला म्हंजे जो वापरतो त्याच्यासाठी सोपे, बरोबर? तथापि माझ्यासारख्या तंत्रज्ञानात माठ असणार्या अडाणी जनतेसाठी अनेक गोष्टी डोक्याला शॉट होऊन राहिल्यात. तंत्रज्ञान आयुष्य सोप्पे करते असे म्हणतात, पण वास्तविक तसे नसते.
पुरावा हवा?
कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूच्या कस्टमर केअर हेल्पलाईनवर फोन करा… पहिल्यांदा आपले आभार मानून मग एक दाबा, दोन दाबा करत एक घास चिऊचा, एक घास काऊचा अशी आकडेवारी करत एक घास घुबडाचा, एक घास वटवाघळाचा इथपर्यंत आकडे दाबत पोहोचायला लागतं… आणि तोपर्यंत आपली तक्रार काय आहे हेच मी विसरते. बरं अर्धा तास एवढी बटणं दाबून अखेरचं बटण दाबलं की कळतं की सर्व ग्राहक तक्रार निवारण प्रतिनिधी अतिशय ‘व्यस्त’ असून आपल्याला थांबावं लागेल… आपला कॉल यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, असं सांगत सांगत हे आपल्याला त्यांच्या जाहिराती किंवा भिकार संगीत ऐकवत साडे बावीस तास वगैरे पण लटकवून ठेवू शकतात… त्यात नेमका दुसरा महत्त्वाचा फोन येऊन हैराण करतो, ते वेगळंच.
एकेकाळी आमच्या नव्या मुंबईत किनई अधून मधून वीज यायची. म्हणजे, जास्त करून ती गायबच असायची राव, तर तेव्हा म्हंजे साधारण पंचवीस तीस वर्षे आधी, सोने देऊन मिळवलेल्या लँडलाईनवरून एमएससीबी कार्यालयात फोन केला की लाईन खराब असल्यामुळे आपला फोन लागू शकत नाही, हे साधारण अर्धा तास ऐकावे लागायचे. तेव्हा वाटायचे की पहिल्या रिंगला फोन उचलला गेला पाहिजे असे कधी होईल का? तसे झाले आताच्या काळात, पण फोन उचलून सुद्धा ‘वाट पाहुनी जीव शिणला’ हा प्रकार काही बंद झालेला नाही. खोटे वाटते तर तुम्ही स्वतः प्रयत्न करा.
हे एक उदाहरण. दुसरे म्हणजे नासामधे असतात तशी यंत्रं असणारी महागड्या हॉटेलांमधली बाथरूम. हॉटेल जितकं महाग तितकं बाथरूम क्लिष्ट. गॅसवर गरम केलेले पाणी बादलीत घेऊन वरून नळाची तोटी फिरवून ते पाणी गार करणारे आम्ही लोक… आधी असली बाथरूम बघून बुचकळ्यात पडतो. मग पुढील उपाय म्हणून सर्व तोट्या सगळीकडे फिरवत बसतो, ज्यात अनेकदा सचैलं भिजणं होतं. पण गरम पाणी कसं आणायचं, शॉवर कसा चालू करायचा, हे कळत नाही. एकदा तर चक्क इलेक्ट्रिक केतलीत पाणी गरम करून त्याने भुश्श केले होते.
हे कमी म्हणून की काय यांच्या बेसिन नळाला हॅण्डल नसतं, तोटीचं डोकं दाबा, नळाला धक्के द्या, असे माझे प्रयत्न चालतात. आणि साधारण पाचेक मिनिटं असली झटापट केली की कोणतरी मिलेनियल कार्टी किंवा बारके पोर येऊन एका मिनिटात पाणी सुरू करते आणि जाता जाता, कुठून कुठून येतात गाववाले, असा तुच्छ दृष्टिक्षेप टाकून निघून जातात. एकवेळ हातही धुणे परवडले, पण हे मात्र डोक्याला शॉट होते.
मुद्दा काय की साधे, सरळ, सोप्पे असे काही आजकाल मिळत नाही. हॉटेलात गेल्यावर मेन्यू कार्ड घेऊन आधी उजवी बाजू बघून मग सावध ऑर्डर देणार्या पिढीतील आम्ही. आजकाल गेलो की हातात टॅबसदृश यंत्र देतात. मग हवी ती डिश निवडा. स्वाइप करा की तुमच्या ऑर्डरीत येईल असे सांगून वाढपी जातो (आता वेटर न म्हणता सर्व्हर म्हणायचे बरं का!). मग माझी झटापट सुरू. ठळक टायपात छापलेले वाचायची सवय असणार्या! मला हे फारच कठीण जाते राव. परत नावे पण गुलजार अशी की आपण नक्की काय खाणार आहोत, हे कळतच नाही. अनेकदा अशा ठिकाणी माझा तेजोभंग झाला आहे. त्या दुर्योधनाला पण पाण्याच्या हौदात पडल्यावर कमी लाज वाटली असावी. मग मी केसातील रुपेरी छटेचा गैरफायदा घेऊन बाजूच्या टेबलवर बसलेल्या तरूण जनतेला विनंती करते. अर्थात नंतर त्या वेटरला (सर्व्हर असेल आपल्या घरचा) टिप न ठेवता सूड उगवते म्हणा. पण डोक्यात जाते यार असले काही. आता म्हणाल तुझ्याकडे बाकी कोणी नाही का जरा हुशार, तर बाकी जनता आजही हाताने लिहून पत्र धाडणारी अशी आहे. वासरात लंगडी गाय अशी मीच.
तर मुद्दा काय की स्वच्छ, सरळ, सोप्पे असे आजकाल काहीही राहिले नाही. खोटे वाटते तर आजकालच्या बहुचर्चित बहुराष्ट्रीय कंपनीच्या शोरुममधे जाऊन फर्निचर बघा आणि ते घ्या. एकवेळ चायनीज आणि हिब्रू भाषा सहज शिकाल, पण ते मॅन्युअल वाचून त्याबरहुकूम जुळणी करणं कर्मकठीण. आता म्हणाल की जगभरात लोक करतातच की ती जुळणी, आपल्याला काय धाड भरलीये. तर आधीच सांगते की बरीचशी भारतीय मनोवृत्ती आजही सरंजामी आहे. नळाचा वॉशर बदलणे इथपासून ते ट्यूबचा चोक लावणे इथपर्यंत सगळ्यासाठी आपल्याकडे मोक्कर मदत मिळते. त्यामुळे, मोठी वस्तू सोडा, बारके काही आणले तरी ते मॅन्युअल वाचून समजणं म्या पामराला शक्य नसते. एक तर ते हजार भाषांमधे असते, त्यात इंग्लिश शोधेपर्यंत दम निघतो.
हे झालेच, पण अजूनही खूप आहे. इंटरनेटवर, मोबाइलवर कशालाही पासवर्ड ठेवणे, हा डोक्याला एक मोठा शॉट झालेला आहे. आपण कोणताही शब्द (हल्ली शब्द, आकडे आणि स्पेशल कॅरेक्टर असं काँबिनेशन निवडायला लागतं, म्हणजे ट्रिपल शॉट) निवडला की त्यात हे नाही, ते हवे, हा शब्द आधी घेतला गेलाय, अशा सूचना येतात. आधीच मी शीघ्रकोपाr, त्यात पुन्हा असले काही येऊ लागले की पारा चढतो आणि मग त्यातून चारचौघात उच्चारायला कठीण असा पासवर्ड जन्माला येतो आणि एकेकाळी अनौरस संततीला कसे बघून न बघितल्यागत केले जायचे तसे वर्तन माझ्याकडून होते. आणि यात माझी चूक काहीएक नाही. एकदा तर वैतागून मी, ‘झुक्याच्या आवशीचा घोव’ असा पासवर्ड टाकला होता, आणि चक्क अॅप्रुव्ह झाला.. आता बोला!!! अर्धा तास वेगवेगळे पासवर्ड टाकूनही काम होत नसेल, तर तुम्ही काय कराल? या प्रश्नावर तुम्ही जर शांतपणे ही परिस्थिती हाताळू असे उत्तर दिले, तर मग तुमचा पत्ता फोन नंबर द्या, तुमच्याकडेच येईन पुढील वेळी.
काळी पिवळी टॅक्सी वापरणारे आम्ही लोकं हल्ली उबर करतो, त्यातही ओटीपी यायला लागलाय. एकदा माझ्या एका माठ मैत्रिणीने ओटीपीला, टॅक्सी नंबर समजून ती शोधण्यात पंधरा मिनिटे खर्च केली होती.
साधी रोकड बँकेतून घेताना अथवा देताना शंभर वेळा मोजणारी आमची पिढी कोरोना काळात जी-पे वापरायला लागली पण मी आजही ते वापरत नाही. भीती एकच, चुकून एखादे शून्य जास्त पडले तर??
तसेच पूर्वी एस्टी किंवा ट्रेन बुकिंग करायचे, म्हणजे रात्री डेपो/ स्टेशनवर जाऊन रांग लावणार्या पिढीचे आमचे लोक. भारतीय रेल्वे, त्यातही कोकण रेल्वेचे बुकिंग गणपती, होळी, दिवाळी, वार्षिक सुट्ट्या अशावेळी तुम्ही चुटकीसरशी ऑनलाईन करून दाखवले, तर माझा दंडवत तुम्हाला! एक वेळ गुलबकावलीचे फूल, कामधेनू मिळू शकेल, पण इथे हवे ते बुकिंग… अशक्य.
आधी घराच्या दरवाजांना खणखणीत कुलूप असायचे, मग लॉक्स आली आणि आताच्या स्मार्ट बिल्डिंगमधे हात डोळे यांचा ठसा घेऊन मग दरवाजा उघडण्याचे तंत्र. ओळखीच्या एका मैत्रिणीला तिच्या मुलीने ते शिकवले, आणि घरात राहणार्या सर्वांचे डोळे ठसे त्यात भरले. काही दिवसांनी मैत्रिणीचे मोतीबिंदू ऑपरेशन झाले आणि ती हिंडा-फिरायला लागल्यावर ते चांडाळ कुलूप उघडेना राव. ही आपली डोळा त्याच्यासमोर ठेवतेय, ठेवतेय पण नाही, अशा झटापटीनंतर तो अलार्म कोकलायला लागला, ऑफिसातील मुलीला फोन गेला, सोसायटीचे सुरक्षारक्षक गोळा झाले, थोडक्यात चारचौघांत लाज गेली. अर्थात भारतात एकदा का विशिष्ट वय गाठले की वृद्ध आहे याखाली खूप गैरवर्तन चालून जाते. त्यामुळं फार काही न होता निभावले म्हणा.
मुद्दा काय की नव्या युजर फ्रेंडली गोष्टींचे नवे तापच होऊन राहिलेत राव.
अर्थात पोस्टकार्ड ते ईमेल ते फेस टाईम ते व्हिडिओ कॉल इथपर्यंत सर्व बदल आमच्या पिढीने पाहिलेत. बर्याच बदलांशी जुळवून घेतले आहे, पण तरीही तो मेला पासवर्ड आणि पॉश बाथरूम इथे आमची ‘दे हाता या शरणागता’ अवस्था होते. त्यावर तातडीने उपाय निघायला हवा अध्यक्ष महोदय!! नेशन वाँट्स टू नो.