विजय दांडेकर हे प्रसिद्ध विषाणूतज्ञ होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल वेपन या राष्ट्रीय संस्थेत ते वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत होते. २५पेक्षा अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, इंग्रजी, मराठी भाषेत केलेले अनेक पुस्तकांचे लिखाण, शोधनिबंध या कामांत गढून गेल्यामुळे ते अविवाहित होते. ५५ वर्षांच्या विजय यांना आता एकटेपणाची जाणीव होऊ लागली होती. या वर्षात आपण जीवनसाथी शोधावी, लग्न करावे, अशी इच्छा त्यांना झाली होती, म्हणून त्यांनी मॅट्रिमोनियल साइटवर नावनोंदणी केली. त्यावर आपली सर्व माहिती दिली. लग्नासाठी जात, धर्म अशी काहीच अट नसल्याचेही नमूद केले. कारण दांडेकर यांनी जगभरात काम केले होते, त्यामुळे त्यांच्यावर वैश्विक विचारसरणीचा प्रभाव होता. मॅट्रिमोनियल साइटवर त्यांनी आपल्याशी जुळेल असे प्रोफाइल शोधले, परंतु ते त्यांना सापडले नाही, त्यामुळे त्यांनी स्थळ शोधण्याचा नाद सोडून दिला.
एक दिवस फेसबुकवर कुणाशी तरी संवाद साधत असताना फेसबुकने त्यांना वर्षांपूर्वी मॅट्रिमोनियल साइटवर नावनोंदणी केली असल्याची आठवण करून दिली. त्यानंतर का कोण जाणे, पुन्हा विजय यांना सहचारिणी हवी, असे तीव्रतेने वाटू लागले. अनुरूप जोडीदाराचा शोध नव्याने सुरू झाला.
एक दिवस अचानक फेसबुकवर फ्रान्समधून उर्मी कश्यप नावाच्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. आपण हिला कुठे भेटलो होतो का, हे दांडेकर यांना आठवत नव्हते. बराच वेळ विचार केल्यानंतर फ्रान्समध्ये काही वर्षांपूर्वी एका परिषदेसाठी गेलो होतो, तेव्हा बहुधा तिची गाठ पडली असावी, असा विचार करून त्यांनी उर्मीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यांनी तिला मेसेंजरमध्ये त्या परिषदेची आठवण करून दिली, तेव्हा भेटलो होतो का, अशी विचारणा केली. त्यावर ती चटकन हो म्हणाली. त्यामुळे विजय यांना खात्री पटली.
आपण फ्रान्समध्ये पत्रकार म्हणून काम करत असल्याचे मेसेजमध्ये सांगून उर्मी म्हणाली, माझे काम रिसर्च बेस्ड असते. विजय म्हणाले, मी विषाणूतज्ञ म्हणून काम करतो. त्यावर ती म्हणाली, सर, मला तुमचे काम चांगलेच माहीत आहे, तुमचे अनेक शोधनिबंध मी वाचलेले आहेत. माझे वडील मूळचे भारतीय आणि आई स्पॅनिश.
त्यामुळे माझ्या चेहर्यामध्ये युरोपियन सौंदर्य असलं तरी भारतीय संस्कृती मला चांगली माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या गणपती उत्सवात मी आले होते, ढोल ताशांचा गजर, आकर्षक रांगोळ्या, काय तो माहोल, वॉव… असे वर्णन उर्मी करत होती, त्यामुळे दांडेकरांचा तिच्यावरचा विश्वास हा मिनिटागणिक अधिकाधिक दृढ होत चालला होता. हळुहळू संवाद वाढत गेला. विजय यांना उर्मीबद्दल आकर्षण वाटू लागले. दिवसातून दोन दोन तास त्यांच्या विविध विषयांवर गप्पा सुरू असायच्या.
जून महिन्यात पॅरिस इथे एक परिषद होणार होती, तिच्यासाठी जाणार्या शिष्टमंडळात विजय यांनी आपली वर्णी लावून घेतली. या दौर्याच्या निमित्ताने आपली आणि उर्मीची भेट होईल, आपला संपर्क वाढेल, ओळख घट्ट होईल, तिचे रूप न्याहाळता येईल, असे अनेक विचार मनात आल्याने विजय यांची सारी धडपड सुरू होती. आपण १५ जून रोजी पॅरिसला येत असल्याचे विजय यांनी उर्मी हिला कळवले. पण, दुर्दैवाने तिचा लगेच मेसेज आला की मला काही कामानिमित्ताने स्वीडनला जावे लागणार आहे, त्यामुळे आपली भेट काही होऊ शकणार नाही. तुम्हाला तिथे काही मदत लागली तर माझी एक मैत्रीण लाना मदत करेल. विजय यांचे आदरतिथ्य करण्याची जबाबदारी उर्मीने लानावर सोपवली होती.
ठरलेल्या दिवशी विजय पॅरिसमध्ये पोहचले. विमानतळावरून हॉटेलला रवाना झाले. आपण कुठे थांबणार आहोत, याची माहिती विजय यांनी ऊर्मी हिला दिली होती, त्यामुळे लाना अगोदरच तिथे पोहचली होती. विजय फ्रेश होऊन लानाला भेटण्यासाठी खाली आले. कॉफी घेत दोघांच्या गप्पा सुरू झाल्या, तेव्हा आकर्षक व्यक्तिमत्त्वाची लाना म्हणाली, मी देखील अविवाहित आहे. माझे आई-वडील इथेच असतात. एका छोट्या फर्ममध्ये मी काम करते. त्या दोघांमध्ये बराच काळ गप्पा सुरू होत्या. शेवटी, दुसर्या दिवशी संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी डिनरला या, असं निमंत्रण लानाने विजय यांना दिलं.
दुसर्या दिवशी विजय लानाच्या घरी जाऊन पोहचले, तेव्हा ती घरी एकटीच होती. गप्पाच्या ओघात मध्ये मध्ये वाईन घेणे सुरू झाले. कँडल लाइटमध्ये डिनरचा कार्यक्रम अगदी साग्रसंगीत पार पडला. हे सगळे होत असताना विजय आणि लाना या दोघांमधली जवळीक वाढत होती. इथे आपल्याला ओळखणारे कुणी नाही, त्यामुळे एक पाऊल पुढे टाकत या दोघांमधली गोष्ट शरीरसंबंध प्रस्थापित करण्यापर्यंत जाऊन पोहोचली.
विजय परिषद आटपून पुन्हा भारतात परतले. त्यानंतर त्यांचे पुन्हा उर्मीबरोबर बोलणे सुरू झाले, तेव्हा तुमची ट्रिप कशी झाली, लानाने तुम्हाला सगळी मदत केली ना, म्हणून तिने विचारणा केली. पण अर्थातच त्यावर चर्चा करणं विजय यांनी टाळलं. दरम्यान, उर्मीला विजय आणि लाना यांच्यातील जवळिकीचे व्हिडिओ आणि फोटो मिळाले. त्यावरून तिने विजय यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. या विषयावर ती त्याच्याशी बोलत असतानाच लानाचा खून झाल्याची बातमी आली, ती उर्मीने विजय यांना सांगितली. हे ऐकून विजयच्या पायाखालची वाळू सरकली. आता काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. तुम्ही लानाच्या घरी गेला होतात, ते सगळं सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे, त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, असे उर्मीने विजय यांना सांगितले. तुमच्या संस्थेला हे समजले तर ते तुम्हाला कामावरून काढून टाकतील, अशी भीतीही तिने घातली. पण, त्याचवेळी, काळजी करू नका, माझी पोलिसात ओळख आहे, ते प्रकरण तुमच्यापर्यंत येणार नाही, याची काळजी मी घेईन, असा विश्वासही उर्मीने विजय यांना दिला. विजय यांनीही उर्मीची माफी मागून या प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्याची विनंती केली. उर्मीने देखील काही काळजी करू नका, म्हणून विजय यांना धीर दिला. दोन दिवसांनी हे सगळे प्रकरण शांत झाले, त्यानंतरच विजय यांचे कामात लक्ष लागले.
एक दिवस विजय घरच्या संगणकावर काम करत बसले होते, इतक्यात उर्मीचा मेसेज आला, मला थोडी मदत हवी आहे ती तू करशील का? त्यावर विजय म्हणाले, तू एवढ्या मोठ्या प्रकरणातून मला वाचवले आहेस, त्यामुळे तू म्हणशील ती मदत मी तुला करेन, बोल काय मदत हवीय तुला? मी एका विषयावर संशोधन करते आहे. चीनने काही दिवसांपूर्वी एक बायोलॉजिकल वेपन तयार केलेले आहे, त्यावर माझे संशोधन सुरू आहे. तुमचे ज्ञान त्यात अधिक आहे, त्यामुळे तुम्ही मला माहिती जमा करण्यासाठी मदत करा, असे ती म्हणाली. मग या विषयावर त्यांची चर्चा सुरू झाली. उर्मी विजय यांना वेगवेगळी माहिती विचारू लागली. तुम्ही ज्या संस्थेत काम करता तिथे कोणत्या प्रकारचे संशोधन झालेले आहे, त्याचा काही भाग चीनमधल्या भागाशी मिळताजुळता आहे का, असे सवाल उर्मी विचारत होती. तिच्या प्रेमात आकंठ बुडालेले विजय तिला सगळी माहिती पुरवत होते. इतकेच काय, तर आपल्या संस्थेत इतक्यात नवे काय संशोधन झाले त्याचा तपशीलवार अहवालच विजय यांनी उर्मीला पाठवला. उर्मी पण गोड बोलून ही सगळी माहिती जमा करत होती.
दरम्यान, कोलकात्यामधून एक बातमी आली, वायुसेनचा एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला, त्याला एनआयएच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू होती, तेव्हा तो उर्मी कश्यप या महिलेशी बोलत असल्याचे आढळून आले होते. एनआयएच्या अधिकार्यांना तपासात विजय दांडेकर हेदेखील त्याच महिलेशी फेसबुकवर चॅट करत असल्याचे आढळून आले होते. उर्मी ही पॅरिसमध्ये राहणारी महिला नव्हती, तर ती पाकिस्तानमधील आयएसआयकडून चालवण्यात येणारे एक फेक अकाउंट होते. आकर्षक फोटो, लाघवी बोलणे याच्या प्रेमात पडून दांडेकर अलगदपणे या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले होते. विजय यांनी देशविघातक कृती केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. लग्न जमवण्याच्या नादात त्याच्याकडून झालेल्या या चुकीची किंमत त्यांना जेलची हवा खात चुकती करावी लागली.
हे लक्षात ठेवा…
फेसबुकवर कोणतेही प्रोफाइल दिसले, त्यावर आकर्षक महिलेचा फोटो दिसला तर त्यावर लगेच क्लिक करू नका. अनोळखी फ्रेंड रिक्वेस्टकडे दुर्लक्ष करा, ती अॅक्सेप्ट करू नका. आपण फेसबुकवर जी माहिती पाहत आहोत, ती खोटी आहे, असेच गृहीत धरा. जोपर्यंत अन्य मार्गाने ती खरी असल्याची आपली पक्की खात्री होत नाही, तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवू नका. फेसबुकवर अनोळखी व्यक्तीला कोणतीही माहिती देऊ नका, आपल्या आजूबाजूला काय आहे, आपली व्यक्तिगत माहिती, आपण काय करतो, कुठे काम करतो, घरी कोण असते, आदी. कोणत्याही मोहाला अजिबात बळी पडू नका. मॅट्रिमोनियल साइटवर पार्टनर शोधतानाही योग्य ती काळजी घ्या. आंधळा विश्वास ठेवून कोणताही निर्णय घेऊ नका. योग्य मध्यस्थीमार्फत पार्टनर शोधा, म्हणजे फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत.