प्रबोधनकाराचं ‘सीताशुद्धी’ हे नाटक १९०९ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालं. ते त्यांचं पहिलं पुस्तक होतं. मात्र या नाटकाचा प्रयोग झाला की नाही, याचा तपास लागत नाही. झाला असेल तर त्याने लोकांचं दोन घटका मनोरंजन नक्की केलेलं असेल.
…
प्रबोधनकार १९०५-०६च्या दरम्यान नाटक कंपनीत गेले. सांगलीकर नाटक कंपनीचा पहिला मुक्काम पंढरपूरच्या आषाढी वारीतला होता. म्हणजे १९०५च्या जून-जुलैमधे त्यांनी नाटक कंपनीत प्रवेश केल्याचा अंदाज बांधता येतो. त्यानंतर ते नाटकधंदा सोडून जानेवारी १९०९मध्ये कायमचे ठाण्याला भावाकडे आलेले दिसतात. म्हणजे कसेबसे साडेतीन वर्षं ते नाटक कंपनीत होते. त्यातही ते सलग एकाच कंपनीत नव्हते. त्यांनी यादरम्यान पाच सहा तरी कंपन्या बदलल्या असाव्यात. त्यामुळे अधूनमधून त्यांचा मुक्काम मुंबई किंवा पनवेलात असायचा.
अशाच एका मुंबईतल्या मुक्कामाविषयी त्यांनी नोंदवलंय, `स्वदेशी चळवळ, पत्रकारांची धरपकड, लोकांतल्या असंतोषाचा पारा वर चढलेला, अशा हंगामातली ही सांगायला विसरलेली घटना आहे. दोनतीन नाटक कंपन्यांबरोबर राहिल्यावर मी परत मुंबईला आलो. मी लिहिलेले सीताशुद्धी हे पौराणिक संगीत नाटक एका प्रकाशक संस्थेने विकत घेतले. त्याचे तीनशेपन्नास रुपये मला रोख दिले.’
‘सीताशुद्धी’ हे प्रबोधनकारांनी लिहिलेले पहिलं नाटक नाही. वासुदेव जोशींच्या स्त्रीमिश्रित सांगलीकर नाटक मंडळीला त्यांनी त्यांचं पहिलं नाटक वाचून दाखवलं होतं. त्यामुळेच त्यांना नाटक कंपनीत नोकरी मिळाली होती. आता हे नाटक कोणतं होतं आणि त्याचा पुढे प्रयोग झाला की नाही, याचा कोणताच सुगावा लागत नाही. मुळात प्रबोधनकार सांगलीकर मंडळींसोबत किती महिने राहिले, हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे तिथे त्यांचं नाटक रंगमंचावर आल्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे ‘सीताशुद्धी’ हे नाटक महत्त्वाचं ठरतं. ते पुस्तकरूपाने आलेलं त्यांचं पहिलं नाटक आहे. ते त्यांचं प्रसिद्ध झालेलं पहिलं पुस्तकही आहे.
मुंबईच्या फोर्टमधल्या `धी इंडिया पब्लिशिंग कंपनी लिमिटेड’ या प्रकाशकाने १९०९मध्ये हे पुस्तक प्रकाशित केलंय. त्यांच्या प्रकाशकीय मनोगतानुसार, `या नाटकाची रचना एकदोन नाटक मंडळ्यांच्या तालमी मुद्दाम घेऊन प्रयोगदृष्ट्या होतां होईल ती अव्यंग करून सुधारली आहे. त्यामुळे प्रयोगाची परवानगी मिळालेल्या व मिळविणार्या नाटक मंडळ्यांना रंगभूमीवर प्रयोग करताना अडचण पडणार नाही, अशी आशा आहे.’ यातून नाटकाचा प्रयोग झाला होता की नव्हता, हे कळत नाही.
ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी १९९९ साली प्रकाशित झालेल्या प्रबोधनकारांच्या पाच नाटकांच्या एकत्रित खंडाची प्रस्तावना लिहिली होती. त्यात त्यांनी ‘सीताशुद्धी’चा प्रयोग झाला की नाही, याविषयी सविस्तर मत नोंदवलंय, `कोणत्याही नाटकाचा रंगभूमीवर प्रयोग होण्यापूर्वी त्या नाटकाचं पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यावेळी प्रघात नव्हता. त्याअर्थी या नाटकाचे खेळ सुरू झाले असले पाहिजेत, असा तर्क करायला साधार वाव आहे. परंतु ते कोणत्या नाटक कंपनीने केले, कोणी भूमिका केल्या, किती प्रयोग झाले, प्रयोग कसे झाले, याचा तपशील मात्र कुठेच मिळत नाही. नाटकाच्या प्रस्तावनेत एकदोन नाटक मंडळ्यांच्या तालमीत तावून सुलाखून निघालेली रंगावृत्ती असा उल्लेख आहे. म्हणजे हे नाटक तालमीत घेतले गेले होते. त्यातील प्रत्येक पदाच्या डोक्यावर ते पद कोणत्या गाण्याच्या चालीवर म्हणायचे याचा रागासकट आणि वृत्तासकट उल्लेख आहे. म्हणजे त्या अवस्थेपर्यंत तालीम गेली होती. प्रत्येक प्रवेशाच्या सुरूवातीला स्थळनिर्देश आहे. नांदी मंगलाचरणापासून तो थेट भरतवाक्यापर्यंत घेऊन जाणार्या या परिपूर्ण नाटकाचा प्रयोग मात्र झाला की नाही, हा एक संशोधनाचा मुद्दा आहे.’
‘सीताशुद्धी’ हे केशव ठाकरे प्रबोधनकार बनण्याच्या आधीचं नाटक आहे. त्यामुळे त्यात फारसं काही प्रबोधनात्मक किंवा धक्कादायक आढळत नाही. नाटक लिहिण्याचा हेतू ते प्रस्तावनेत सांगतात, `पौराणिक काळातील कथाभाग नाट्यरचनेस घेतला असता, त्यात नीतिदर्शक अशी अनेक स्थळे सापडतात आणि मनोरंजनाच्या बरोबरच नीतीचाही बोध होण्याला तशी नाटके वाचकांना व प्रेक्षकांना पसंत पडतात. म्हणून माझ्या अल्पमतीने प्रस्तुतचे सीताशुद्धी नाटक तयार करून ते मी आज माझ्या सर्व रसिक देशबंधूंच्या पुढे ठेवीत आहे.’ हे नाटक लिहिताना प्रबोधनकारांचं वय २४च्या आतच आहे. त्यांनी त्या काळातल्या प्रेक्षकाच्या अभिरुचीला आवडेल असं एक ‘चालणारं’ नाटक लिहिलेलं दिसतं. तो त्यांच्या बेकारीचा काळ असल्यामुळे त्यातून पैसे मिळवणं, हा उद्देश होताच.
नाटकाची कथा तशी सगळ्यांना माहीत आहेच. नाटक सुरू होताना सीता लंकेत रावणाच्या ताब्यात असते. तिला सोडवण्यासाठी हनुमान लंकेत येतो. सीतेला भेटतो. लंकेत दाणादाण उडवतो. त्यानंतर बिभीषण रामाच्या पक्षात प्रवेश करतो. राम-रावण युद्ध होतं. अर्थातच सीतामुक्ती होते आणि शेवटी सीतामाई यशस्वीपणे अग्निपरीक्षा पार पाडतात. इथे नाटक संपतं. रामचरित्रातला रूढ भागच यात प्रामुख्याने येतो. नाटक पाच अंकी आहे. तब्बल एकवीस प्रवेश आहेत. प्रबोधनकारांनी पुढच्या काळात लिहिलेल्या इतर नाटकांपेक्षा हे नाटक आकाराने बरंच मोठं आहे. त्यात मोठ्या संख्येने पात्रं आहेत. खूप प्रसंग आहेत. यातल्या प्रसंगांविषयी प्रबोधनकार म्हणतात, `रामायणातील मूळ आख्यान नाटकरचनेच्या दृष्टीने बरेच नियमित आणि आकुंचित करावे लागले खरे, तथापि, ठिकठिकाणी होता होईल तो संदर्भ मात्र सोडला नाही. काही प्रवेश काल्पनिक परंतु त्या काळाला अनुसरून घातले आहेत.’
याला सरळमार्गी नाटक म्हणताना प्रभाकर पणशीकर लिहितात, `याच कथाभागावर आधारलेल्या आधुनिक नाटकात प्रभू रामचंद्राला सीता जाब विचारते, उर्मिला लक्ष्मणाला वाक्ताडन करते, अनार्य जम्बुक आंगतूकपणे कथानकात घुसून रामाची हजेरी घेतो. पण केशवराव तसं काही करीत नाहीत. अतिशय सरळ सोप्या आणि प्रासादिक भाषेत ते आपला कथाभाग मांडतात.’ दुसरीकडे सत्यशोधकी साहित्याचा इतिहास या प्रकल्पाच्या पहिल्या खंडात डॉ. श्रीराम गुंदेकर म्हणतात, `प्रस्तुत नाटकामधे कोणत्याही प्रकारचे नाविन्य नाही. औचित्यपूर्ण घटना किंवा प्रसंगांचे सर्जन नाही. प्रस्तुत नाटक सत्यशोधक प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांचे वाटत नाही. नाटक म्हणून ते अपयशी आहे. त्यामधून कोणताही नवा अर्थ देण्याचा प्रयत्न लेखकाने केला नाही. एवढेच नव्हे, तर रामायणातील घटना, प्रसंगांचा विपर्यास केला आहे. `सीताशुद्धी’ नाटकाकडे बघण्याचे हे दोन दृष्टिकोन आहेत. पुढे प्रबोधनकारांनी `टाकलेले पोर’ या नाटकातून पौराणिक प्रसंगांना आधुनिक काळाशी जोडून बघितलं, त्यातून नवे अर्थ मांडले. तशी अपेक्षा डॉ. गुंदेकर या नाटकातूनही करत आहेत. त्याच वेळेस पणशीकर मात्र तो नाटकाचा प्लस पॉइंट मानतात.
तेव्हा नाटकं रात्री सुरू होत आणि पहाटेपर्यंत चालत. एकेक नाटक पाच-सहा तास चाले. त्यानुसार ‘सीताशुद्धी’ नाटकाची रचना आहे. त्या काळात पात्रं आठवतील ते संवाद घेत. त्यामुळे ते भरमसाठ लिहून ठेवावे लागत. महत्त्व पदांना होतं. कारण तो जमाना संगीत नाटकांचा होता. गुंदेकरांनी नाटकातल्या पदांची मोजदादही केलीय. नाटकाच्या पहिल्या अंकात २७, दुसर्या अंकात २१, तिसर्या अंकात १९, चौथ्या अंकात २४ आणि पाचव्या अंकात ३९ इतकी पदं आहेत. पणशीकर त्याविषयी सांगतात ते महत्त्वाचं आहे, `नाट्याचार्य देवलांनी आपल्या आणि इतरांच्या नाटकांतही आदर्श आणि गेय भावानुकुल पद्यरचनेचा आदर्श निर्माण केला. परंतु नंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर–गडकर्यांपासून तो थेट आचार्य अत्र्यांपर्यंत अनेक नाटककारांना ते स्वतः कवी असून उत्तम नाट्यगीतं रचता आली नाहीत. ही एक वेगळीच इल्लम आहे… नाट्यपद रचणार्यावर शब्द प्रसन्न हवेतच. परंतु त्याला गायनाचं अंग असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. सुदैवाने केशवराव या दोन्ही अंगांनी समृद्ध होते.’ उदाहरणादाखल हे एक पद बघता येईल. सीतेने अग्निकुंडात उडी घेतल्यावर मारूतीच्या तोंडी हे एका कडव्याचं पद आहे.
हाय, विष हे! निघत कैसें कल्पवृक्षापासुनी ।।
अमृताने मृत्यु कैसा, दिसत विपरीत या जनीं ।।धृ।।
जानकी ही आदिमाया विश्वपालक राम हा ।।
नष्ट होतां माय तुटला विश्वस्तंभचि या क्षणी ।।१।।
पणशीकरांच्या मते या नाटकातली पदं सोपी आहेत. कमी शब्दांत योग्य आशय व्यक्त करतात. गायक नटांना आलापीसाठी आणि तान घेण्यासाठी जागा देणारी आहेत. यात कीर्तनाच्या अंगाने गायली जाणारी आर्या, साकी, दिंडी, झंपा इत्यादी वृत्तं सफाईने वापरलीत. त्यांना मारुतीच्या तोंडी असणारं `धड्ड झंझावात सुटला’ हे पद रामदास स्वामींचा प्रभाव असणारं वाटलंय.
आता आश्चर्य वाटेल, पण फक्त पदावरच नाही तर नाटकावर रामदास स्वामींचा प्रभाव आहे. नाटकाच्या पहिल्या पानावरच जय जय रघुवीर समर्थ असं लिहिलेलं आहे. शिवाय अनेक पात्रांच्या तोंडी हा घोष आहे. त्यामुळे नाटक रामायणकाळात न घडता रामदासांच्या काळात घडतंय की काय असं वाटत असल्याची तक्रार गुंदेकरांनी केलीय. ती बरोबरच आहे. त्या काळात प्रबोधनकारांच्या भोवतीचं सगळं वातावरण रामदास स्वामींच्या प्रभावातल्या उच्चवर्णीय पांढरपेशांचं होतं. त्यामुळे त्यांनी काही वर्षांनी रामदास स्वामींचं इंग्रजी चरित्रही लिहिलं. पण पुढे त्यांच्या विचारांना सत्यशोधकी परिस लागला, तेव्हा त्यात क्रांतिकारी बदल झालेला दिसतो.
या नाटकात असलेलं वनचर नावाचं रामाच्या बाजूचं पण ग्रामीण बाजाने बोलणारं विनोदी पात्रं आहे. ते हे, ह्या, ही असे शब्द वापरतं. उदाहरणार्थ, `आता आमास्नी तिचा हा लागलाया. तुजा हा उगवायला ह्ये माजं ह्ये फुररफुरू लागल्याती. अरे हे ह्या, तुला हीही करायला पायजे व्हय? अरं मर्दा नव्हं मुर्दाडा. तू इचिभन काय समजलास. तुज्या या ह्याच्यावर– मानगुटीवर ही माझी ही अशी मारूनशान तुला ठाआआर मारतो.’ त्यावर पणशीकर एक मस्त निरीक्षण नोंदवतात, `अर्वाचीन काळातल्या प्रा. मधुकर तोरडमलांच्या तरुण तुर्क, म्हातारे अर्क मधील ‘हा हा’कारी आणि किंचित चावट असलेल्या प्रा. बारटक्क्यांचा अधिक चावट असलेला आजोबा शोभावा असं हे पात्र आहे.’
– सचिन परब
(लेखक प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटचे संपादक आहेत)