गजाननराव वैद्यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना ही प्रबोधनकारांच्या आयुष्यातलीही एक महत्त्वाची घटना होती. गजाननरावांच्या व्यक्तिमत्वाने आणि विचारांनी त्यांच्यावर खोल प्रभाव टाकला होता.
– – –
गजाननराव वैद्यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीचा अजेंडा स्पष्ट होता. मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मात गेलेल्या हिंदूंना पुन्हा एकदा हिंदू बनवणं. संस्कृत पंडित असणार्या गजाननरावांनी त्यासाठी नव्या काळानुसार नवा विधी तयार केला होता. त्यांच्या या संकल्पाला प्रतिसादही भरपूर मिळत होता. ते टिळक युग होतं. अशा उपक्रमांसाठी योग्य ती पार्श्वभूमी लोकमान्यांच्या प्रभावाने तसेच स्वामी दयानंद सरस्वतींसारख्या धर्मसुधारकांच्या घुसळणीने तयार झाली होती.
हिंदू मिशनरी सोसायटीच्या स्थापनेच्या घोषणेला मिळणार्या प्रतिसादाविषयी प्रबोधनकार नोंदवतात, `सन १९१८ सालच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता हिराबागेत गजाननराव वैद्य हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना करणार, ही बातमी वृत्तपत्रात झळकताच, हिंदुमात्रांत एका नवचैतन्याचा साक्षात्कार सणाणला. अनेक ठिकाणांहून अभिनंदनाच्या तारांचा, पत्रांचा वर्षाव होऊ लागला.`
प्रबोधनकार हिंदू मिशनरी सोसायटीच्या स्थापनेच्या आधीपासून गजाननरावांच्या सोबत होते. मुळात गजाननराव स्वतःच विद्वान होते आणि चळवळीत काम केलेले कार्यकर्तेही होते. त्यामुळे त्यांनी सोसायटीच्या स्थापनेसाठी भक्कम वैचारिक पाया उभा केला होता. त्यात त्यांना प्रबोधनकारांची साथ मिळाली असावी. या काळातला गजाननराव वैद्यांचा प्रबोधनकारांवरचा प्रभाव त्यांच्या लिखाणातून स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे हिंदू मिशनरी सोसायटीच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला प्रबोधनकार सहाजिकच हजर होते. त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे, `हिराबागेत जिज्ञासू प्रेक्षकांची अलोट गर्दी जमली. आजवर जे कधी कोठे घडलेच नाही ते आज घडणार, या उत्कंठेने जनतेची उत्सुकता शिगेला गेली.`
हिराबागेची देखणी एकमजली कौलारू इमारत आजही गिरगावातल्या कावसजी पटेल टँक म्हणजे सी. पी. टँक सर्कलवर उभी आहे. तिच्या गेटवर लिहिल्यानुसार ती १९०५मध्ये बांधण्यात आली आणि त्यात सेठ हिराचंद गुमानजी धर्मशाळा आहे. त्या इमारतीच्या सभागृहात हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना झाली. त्याचं सविस्तर वर्णन प्रबोधनकारांनी केलंय.
ऊग्र धुपाच्या सुगंधाने ते सभागृह भरून गेलं होतं. व्यासपीठावरचं अग्नीसाठीचं एक भांडं फुलांनी सजवलं होतं. त्यात चंदनाची लाकडं आणि कापूर ठेवला होता. दोन्ही बाजूंना समया तेवत होत्या. बरोबर सहा वाजता अग्निहोत्री बनलेले सुंदरराव वैद्य निळा झगा आणि लाल पगडी घालून आले. पाठोपाठ तशाच वेषात गजाननराव आणि बाळासाहेब राजेही आले. आल्यानंतर लगेचच सुंदररावांनी अग्नी पेटवून धीरगंभीर आवाजात वेदमंत्रांचा घोष सुरू केला. जवळपास अर्धा तास हे विधी झाल्यावर गजाननरावांनी सोसायटीचे उद्देश आणि कार्यक्रम यावर दीड तास प्रवचन दिलं. त्याचं प्रबोधनकारांनी केलेलं वर्णन असंय, `वैद्यांच्या वाणीत अपरंपार जिव्हाळा, विनयशाली रसाळपणा आणि हिंदुत्वाबद्दल निष्ठावान भक्ती ओसंडून जात होती.`
या कार्यक्रमाला काही ख्रिश्चन धर्मगुरूही आले होते. गजाननरावांनी त्यांचं स्वतः स्वागतही केलं होतं. कार्यक्रम झाल्यानंतर त्यातल्या वेलिणकर नावाच्या मिशनरी धर्मगुरूला प्रबोधनकारांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर वेलिणकर म्हणाले, `विलक्षण साधूपुरुष आहेत हे तुमचे वैद्य. आम्ही काय सांगणार?`
`होवो जगाचा गुरू आर्यधर्म, देवा जगी वाढवी हिंदुधर्म` असं सोसायटीचं ब्रीदवाक्य होतं. त्यानुसार गजाननरावांनी बाटलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी उपनयन विधी तयार केला होता. ते त्याला तेव्हाच्या शिरस्त्याप्रमाणे शुद्धी म्हणू इच्छित नव्हते. ते त्याला उपनयन म्हणत. त्याविषयी त्यांची भूमिका अशी होती, `एखाद्याला आपण प्रथम अशुद्ध ठरवायचे आणि मग त्याला शुद्ध करून घेण्याचा अहंकार मिरवायचा, हे योग्य नाही. ते आपण होऊन हिंदुधर्मात येताहेत, त्यांचे आपण फक्त उपनयन करावे. म्हणजे त्यांना जवळ करावे.` वैद्य प्रभावी वक्तृत्वातून ही भूमिका सातत्याने मांडत राहिले. त्यासाठी त्यांनी `हिंदू मिशनरी` नावाचं साप्ताहिकही चालवलं. त्यामुळे लवकरच जाहीर उपनयन विधीचा पहिला कार्यक्रम आयोजित करावा लागला.
एक दिवस एक पंच्याहत्तरीचा मुसलमान म्हातारा गृहस्थ त्याच्या वहिदुद्दिन नावाच्या तरूण मुलाला घेऊन गजाननरावांकडे आला. त्या वृद्धाचं म्हणणं होतं, `मी धर्माने मुसलमान असलो तरी सारी हयात श्रीकृष्णभक्तीत घालविली नि घालवत आहे. त्यामुळे माझ्या मुलाला तुम्ही हिंदू धर्माची दीक्षा द्या.` वडिलांच्या इच्छेनुसार मुलाचा उपनयन विधी होऊन वहिदुद्दीनचा गोपालदास झाला. त्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलूनच गेला. याच सुमारास लोकमान्य टिळक मुंबईला आले होते. तेव्हा गजाननरावांनी या गोपालदासाला त्यांच्या पायावर घातलं. प्रबोधनकार लिहितात, `टिळकांना गहिवर आला आणि ते म्हणाले, गजाननराव, प्रथम मला तुमच्या कार्याचा पल्ला नीटसा अंदाजता आला नाही. पण आता मात्र मी या कार्याला मनःपूर्वक आशीर्वाद देतो. सामाजिक कार्याला असल्या धार्मिक क्रांतीची बरीच आवश्यकता आहे.`
गजाननराव वैद्यांचं घर वैद्यभुवन गिरगावातल्या भाई जीवनजी लेनवर असल्याची नोंद प्रबोधनकारांनी केलीय. या घरी रोज कुणी ना कुणी हिंदू धर्मप्रवेशासाठी येऊ लागलं होतं. त्यात ज्वरबिंदू या सर्व तापांवर उपयुक्त असणार्या औषधासाठी प्रसिद्ध असणारे डॉ. गोवंडेही होते. १९०९साली `मनोरंजन` या प्रसिद्ध नियतकालिकाचा पहिला मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. त्यातही ज्वरबिंदूची जाहिरात होती आणि `पाक्षिक प्रबोधन`च्या १९२१–१९२२ सालातल्या अंकांत ही जाहिरात आढळते. याचा अर्थ डॉ. गोवंडे दीर्घकाळ कार्यरत आणि प्रसिद्ध होते. रेवरंड ना. वा. टिळकांचा बाप्तिस्मा १० फेब्रुवारी १८९५ला भेंडीबाजारातल्या अमेरिकन चर्चेच्या चॅपलमध्ये झाला होता. त्याच काळात डॉ. गोवंडेंचं कुटुंबही ख्रिश्चन झालं होतं. मात्र हिंदू मिशनरी सोसायटीचं काम सुरू होताच हिंदू धर्मात पुन्हा येण्यासाठी आसुसलेल्या डॉ. गोवंडेंनी संपर्क साधला. गजाननरावांनी एका जाहीर सभेत डॉ. गोवंडे यांना पत्नी आणि दोन मुलांसह पुन्हा हिंदू धर्मात आणलं. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरींमध्ये खळबळ माजली. प्रबोधनकारांनी त्याचं वर्णन `क्रिश्चॅनिटीला पहिला सुरूंग` असं केलं आहे. हिंदू धर्मात आल्यानंतर धर्मांतरितला पुन्हा त्याच्या जुन्या जातीत सामावून घेणं कठीण असतं. पण गोवंडेंच्या चित्पावन समाजात मात्र त्या काळात उत्सुक हिंदुत्ववाद्यांची वानवा नसल्यामुळे ही समस्या राहिली नाही. नागपूरचे चिंतामण हरि मराठे यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न डॉ. गोवंडेंच्या एका मुलीशी लावून दिलं. तर दुसर्या मुलासाठी मित्राची मुलगी शोधली. ही लग्नं थाटामाटात झाल्याने सोसायटीच्या कार्याला आणखी जोर आला.
मुंबई ते उरण पट्ट्यातली कोळी मंडळी त्या काळात बहुसंख्येने ख्रिश्चन असतील, हे कुणालाच माहीत नव्हतं. कारण ती गौरी गणपतीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करत. कार्ल्याच्या एकविरा देवीच्या यात्रेला गर्दी करत. पण ख्रिश्चन धर्मगुरू त्यांचे बाप्तिस्मा, लग्न आणि अंत्यसंस्कार हे तीन विधी करत. एका दसर्याला गजाननरावांनी अनेक कोळी कुटुंबांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला. गजाननरावांच्या मृत्यूनंतरही त्यांचे भाऊ सुंदरराव यांनी अनेक कोळी कुटुंबं हिंदू धर्मात आणली.
हिंदू मिशनरी सोसायटीच्या स्थापनेच्या दिवशी मुंबईच्या गवर्नर ऑफिसने इंग्लंडला तारेने कळवलं होतं की आज ही संस्था छोटी आणि निरुपद्रवी असली तरी तिच्या कार्याचे परिणाम दीर्घकालीन आहेत. ही प्रबोधनकारांनी दिलेली माहिती कदाचित ऐकीव असू शकेल, पण मुंबई प्रांताचे ख्रिस्ती धर्मगुरू बिशप स्वतःहून गजाननरावांना भेटायला आल्याचं त्यांनी स्वतः पाहिलं होतं. वैद्यभुवनाच्या माडीवर दोघांची एक तासभर चर्चा झाली. माडीवरून उतरत असताना बिशपना प्रबोधनकार आणि मित्रांनी विचारलं की चर्चा कशी झाली? त्यावर बिशप पाणावलेल्या डोळ्यांनी उत्तरले, `आजवर आम्ही क्रिस्ताला बायबलातच पहात होतो. पण आज मला वैद्यांच्या रूपाने साक्षात क्रिस्तदेव भेटल्याचा साक्षात्कार झालासा वाटला.` एक मुलासमान धर्मगुरूही गजाननरावांना भेटायला आला होता, तेव्हाही असंच घडलं होतं.
गजाननराव वैद्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि विचारांचा प्रभाव प्रबोधनकारांवर त्या काळात अत्यंत खोलवर झाला होता. त्यामुळे त्यांचे अनुयायी बनून प्रबोधनकारांनी हिंदू मिशनरी सोसायटीच्या कामात पुढची दोनेक वर्षं तरी झोकून दिलं होतं.