• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ती सध्या काय करते?

- सॅबी परेरा (कहीं पे निगाहें...)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 25, 2022
in कहीं पे निगाहें...
0

तुमची शाळा-कॉलेजात कुणीतरी क्रश असते. नंतर पुढील शिक्षण, नोकरी इत्यादी कारणाने तुमचा आणि तिचा संपर्क तुटतो. ती कुठेतरी गायब होते. वर्षभर तुम्हाला तिची आठवणही नसते, पण फेब्रुवारी महिना आला की तुम्हाला हटकून तिची आठवण येते. ती कुठे असेल किंवा ‘ती सध्या काय करते?’ हा प्रश्न तुम्हाला सतावू लागतो. पण मला मात्र हा प्रश्न कधीच सतावत नाही.
– – –

वसंत ऋतू आणि व्हॅलेंटाइन डे यांचा, हिंदीत म्हणतात तसा ‘चोली-दामन का साथ’ आहे. कधी वसंत पुढे आणि व्हॅलेंटाइन मागे तर कधी व्हॅलेंटाइन पुढे अन वसंत मागे अशी जणू विश्वास पाटील आणि महेश केळुस्करांची ही जोडी आहे. ही जोडी जेव्हा कॅलेंडरच्या क्षितिजावर उगवते तेव्हा मात्र माहोल बनवते. ऑनलाइन सेल लागतात. भेटवस्तूंची दुकाने ओसंडून वाहू लागतात. चॉकलेट्सचे नवनवीन ब्रँड बाजारात येतात. मॉल झगमगू लागतात. रेस्टॉरंटच्या आकर्षक ऑफर्स खुणावू लागतात. दसरा, दिवाळी, स्वातंत्र्यदिन यासारखे उत्सव किंवा गुढी पाडव्याला पैठणी नेसून, नथ लेवून, भगवे फेटे बांधून बुलेटवर मिरवणूक काढणार्‍या बायकाही फिक्या पडतील इतका उत्साह, मनाने तरुण असलेल्या लोकांत दिसू लागतो. ‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दावरील आणि प्रेमाचा आयकॉन असलेल्या सेंट व्हॅलेंटाइन या विदेशी संतांवरील लोकांची श्रद्धा पाहून मला त्या संतांच्या पायाची धूळ कपाळाला लावावीशी वाटते. अखंड हिंदुस्तानात, या प्रेमाच्या टेरिटरीत लैला-मजनू, शिरीन-फरहाद, हीर-रांझा आणि गावोगावच्या वासू-सपना अशा बर्‍याच हिट जोड्या होऊन गेल्या असल्या तरी जो टीआरपी सेंट व्हॅलेंटाइनला आज मिळतोय आणि त्याच्या नावाने जे बॉक्स ऑफिस कलेक्शन होतेय त्याच्या आसपासही दुसरा कुणी पोहचू शकत नाही.
‘व्हॅलेंटाइन डे’चा फायदा असा आहे की मनाने हिरव्या असलेल्या लोकांना या सीझनमधे पावसाळी बेडकांप्रमाणे हळद येते. भेटवस्तू, हिरेमोती आणि सोन्याच्या दुकानदाराची चांदी होते. टीव्ही वाहिन्यांना दिवसभर चघळायला ‘व्हॅलेंटाइन डे’ नावाचं च्युईंगगम मिळतं. या निमित्ताने धर्म, जात, संस्कृती, परंपरा यांच्या जिवावर उभ्या असलेल्या संस्था-संघटना-राजकीय पक्षांना दंडातल्या बेटकुळ्या फुगवून, मनगटात किती ताकद आहे हे आजमावून पाहण्याची एक नामी संधी मिळते.
सेंट व्हॅलेंटाइन या विदेशी संतांला डोक्यावर घेणार्‍या आपल्या देशातील जनतेत, ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत पुढे आलेल्या लोकल टॅलेंटला वाव देण्याची दानतच नाही. त्यामुळे काही लोकल लव्हगुरूंना बलात्काराचे आरोप डोक्यावर घेऊन कंसमामाच्या विश्रामगृहात, जुन्या दिवसात केलेल्या आसारामी ऐय्याशीच्या आठवणी रवंथ करीत खितपत पडावे लागले आहे. आपणही असे करंटे की आपल्या देशातल्या संतांकडे असं अक्षम्य दुर्लक्ष करून आपण व्हॅलेंटाइन नामक विदेशी संताला डोक्यावर घेऊन नाचत आहोत. यालाच म्हणतात घर का बोकड, पनीर बराबर!
तसं पाहता, आपल्या देशातील वातावरण प्रेमाला फारसं पोषक नाहीये. ज्या देशात निष्पाप भावनेने घेतलेल्या मुक्याला ‘पापी’ म्हणतात, तिथे प्रेम उगवणार कसं? वाढणार कसं? आणि बहरणार तरी कसं? अशा अतिशय शुष्क वातावरणातही मी मात्र सतत प्रेमाचा ध्यास घेतला होता. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्याकडे किमान एक तरी प्रेयसी होतीच. बर्‍याचदा तर एकीशी ब्रेकअप झाल्यावर दुसरी मिळेपर्यंत प्रेमाचा अमूल्य वेळ वाया जाऊ नये म्हणून मी एखादी प्रेयसी स्टँडबाय ठेवायचो. सुरुवातीपासूनच आपलं एक तत्व आहे की चॅनेल बदललं तरी चालतंय, केबल सुरू राहिली पाहिजे!
सुरवाती-सुरवातीला ब्रेकअप झाला की मला खूप दुःख व्हायचं, नैराश्य यायचं. तिच्याशिवाय आपण जगूच शकणार नाही, तिला आणि तिच्या प्रेमाला विसरूच शकणार नाही, अशी भावना व्हायची. पण हळूहळू मी या परिस्थितीला सरावलो. माझा अनुभव असा आहे की एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेल्यावर तिथे जेवण चांगले असेल तर प्रेमाचा विसर पडतो.
फेब्रुवारी महिन्याची आणि विशेषतः त्यातील ‘व्हॅलेंटाइन डे’ची आतुरतेने वाट पाहावी असं आता माझं वय राहिलं नाही. त्या प्रेयस्या राहिल्या नाहीत. ती जवानी राहिली नाही. ती उमेद राहिली नाही. तो उत्साह राहिला नाही. इतकंच काय चॉकलेट, टेडी, भेटवस्तू, रेस्टॉरंट अन लॉजिंगचे रेटही माझ्या खिशाला परवडणारे राहिले नाहीत. आज मी आयुष्याच्या अशा उंबरठ्यावर उभा आहे की १४ फेब्रुवारीला मी बायकोला लाल गुलाबाऐवजी पांढर्‍या गुलाबांचा गुच्छ देतो… आता आयुष्यात लाल-गुलाबी प्रेमापेक्षा पांढरी-सफेद मानसिक शांती इतकी जास्त महत्वाची वाटू लागलीय.
माझ्या या अशा अनरोमँटिक वागण्यामुळे बायको संतापली, रागावली, ओरडली तरीही मी शांतच राहतो. कुठलीच तक्रार करीत नाही. आर्ग्युमेंट करीत नाही. तिच्यासमोर माझी बाजूही मांडत नाही. कारण नवर्‍याने घरात कुठल्याही बाबतीत मत मांडणे म्हणजे, ‘टो’ करून नेत असलेल्या गाडीच्या ड्रायव्हरने ‘स्टिअरिंग’ फिरवण्यासारखं आहे, हे मला पक्कं ठाऊक आहे.
आमचा आप्पा म्हणाला, तुझं आणि तुझ्या बायकोचं इतकं पटत नाही तर तुम्ही कायमचे वेगळे का होत नाहीत? मी म्हटलं, एकतर घरगुती भांडणे ‘मुक्या’नेच मिटवायला हवीत अशा सकारात्मक मताचा मी आहे. दुसरं म्हणजे, हल्ली घटस्फोट इतके कॉमन झालेत की केवळ काहीतरी वेगळे करायचे एवढ्यासाठी मी आणि माझी बायको आम्ही एकत्र राहायचं ठरवलंय.
पण… तरीही… फेब्रुवारी महिन्यातली दिवेलागणीची वेळ ही खरंतर जीवे लागणीची वेळ असते. या जीवे लागणीच्या वेळी, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या वेगवेगळ्या व्हॅलेंटाईनींच्या आठवणीत बुडून जाण्यासाठी कुठलंही निमित्त पुरतं. या जीवे लागणीच्या कातर-काळाचा महिमाच असा की, आजूबाजूला भयाण शांतता असली तरी कुठूनतरी कुमार शानू येऊन आपल्या कानात ‘तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है…’ गाऊ लागतो. डोळ्यासमोरचं दृश्य धूसर होतं. ड्रीम सिक्वेन्स सुरु होतो…!
एक काळ असा होता की, कुमार शानूची दर्दभरी गाणी ऐकून मी प्रेमभंगाच्या दुःखात ढसाढसा रडायचो. मग रडण्याचा भर थोडा ओसरल्यावर माझ्या लक्षात यायचं की आपण का रडतोय? साला आपल्याला तर गर्लफ्रेंडच नाहीये! (दुधाची तहान ताकावर भागवावी त्याप्रमाणे आजकालची पोरं कुमार शानूची तहान अरिजित सिंगवर भागवतात म्हणे. कुणीतरी म्हटलं आहेच, की जो देव प्रेमभंगाचा हँगओव्हर देतो, तो हिंदी गाण्यांचा उताराही देतोच). आज सकाळी कम्प्युटरवरील एक जुनी फाईल उघडायचा प्रयत्न करीत होतो, पण पासवर्ड आठवत नव्हता. संध्याकाळी शेजारच्या घरातून अल्ताफ राजाची गाणी ऐकू आली… सगळे जुने पासवर्ड धडाधड आठवले. आठवणींचा ‘स्लाइड शो’च सुरू झाला.
मागील वर्षी फेब्रुवारीत व्हॅलेंटाईन डे रविवारी आला होता आणि लॉकडाऊनही होतं. त्यामुळे बर्‍याच लोकांची पंचाईत झाली म्हणे. ‘आय लव्ह यू’, ही मन की बात, त्यांना ज्या व्यक्तीचा चेहराही बघावासा वाटत नाही, अशा व्यक्तीशी करावी लागली म्हणे. असो, स्वतःचं दुःखं असं दुसर्‍यांच्या नावाने सांगायची वेळ वैर्‍यावरही न येवो.
माझं वय झालं म्हणून मी असं नकारात्मक बोलतोय अशातला भाग नाही. पण पूर्वीच्या तरुणींत जो एक भाबडेपणा होता, एक सच्चेपणा होता, समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर करण्याची वृत्ती होती ती हळूहळू लोप पावत चालली आहे. आमच्या तरूणपणी ‘व्हॅलेंटाइन डे’चं इतकं खूळ नव्हतं. तरीही एखाद्या पोरीला आपण प्रपोज केलं तर थेट नकार न देता, ती आपल्या आई-वडिलांची इच्छा नसल्याची, भावाचा विरोध असल्याची, जाती-धर्म वेगळा असल्याची, किंवा तत्सम काहीतरी सबब देऊन आपल्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायची. तुम्हाला सांगतो, हल्ली म्हणजे दोनेक वर्षांपूर्वी आमच्या भाच्याने एकीला ‘व्हॅलेंटाइन डे’ चा मौका साधून लग्नासाठी प्रपोज केलं, तर त्याचं प्रपोजल उडवून लावत ती म्हणाली, ‘मला नाही करायचं तुझ्याशी लग्न… तुमच्या गावात ‘जिओ’ची रेंज नाहीये!’
तुमची शाळा-कॉलेजात कुणीतरी क्रश असते. नंतर पुढील शिक्षण, नोकरी इत्यादी कारणाने तुमचा आणि तिचा संपर्क तुटतो. ती कुठेतरी गायब होते. वर्षभर तुम्हाला तिची आठवणही नसते, पण फेब्रुवारी महिना आला की तुम्हाला हटकून तिची आठवण येते. ती कुठे असेल किंवा ‘ती सध्या काय करते?’ हा प्रश्न तुम्हाला सतावू लागतो. पण मला मात्र हा प्रश्न कधीच सतावत नाही. मध्यंतरीच्या काळात आमच्या जहाजाने बर्‍याच बंदरांत नांगर टाकला असला तरी शेवटी शाळेपासून जिच्यावर प्रेम होतं तिच्याशीच माझं लग्न झाल्यामुळे ‘ती सध्या काय करते?’ हा प्रश्न मला पडत नाही. माझ्या शेजार्‍यांसकट सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर ठाऊक आहे…
ती सध्या माझ्याकडे दुर्लक्ष करते!

[email protected]

Previous Post

कलियुगी रावण!

Next Post

टपाटप तवा पुलाव…

Next Post

टपाटप तवा पुलाव...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.