• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कलियुगी रावण!

- प्रभाकर प. वाईरकर (चित्रकथा)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 25, 2022
in भाष्य
0

ब्रिटन आणि अमेरिकन सैन्याने इराकवर तुफान हल्ले करण्यास सुरुवात केली. परंतु सद्दामचा एक केसही दृष्टोपत्तीस पडत नव्हता. वॉक्ल्व्हरिन–१/२ ही शोधमोहीम आखण्यात आली. त्यामध्ये आधुनिक तोफखाना, गरुडासारखी लक्ष्यावर अचूक झडप घालणारी लढाऊ विमाने, घोडदळ, निपुण इंजिनिअर्स आणि इतर सैनिकांबरोबर सहाशे खास प्रशिक्षित अत्याधुनिक शस्त्रधारी सैनिकांचा समावेश केला गेला. ‘डेल्टा फोर्स’ आक्रमण करण्यास सज्ज झाले.
– – –


ज्याप्रमाणे तलवारीची दोन पाती एकाच म्यानामध्ये बस्तान बसवू शकत नाहीत, त्याचप्रमाणे नीती आणि हव्यास हातात हात घालून चालू शकत नाहीत. बलाढ्य, शूरवीर, शंकराचा निस्सीम भक्त, लंकाधिपती असलेला रावणही हव्यासामुळे नीतीमत्तेचा बळी देवून, सीताहरण करून, सोन्याच्या लंकेसहित स्वतःच्या नाशास कारणीभूत झाला आणि रामायणाचे अध्याय लिहिले गेले. तसाच प्रकार २००३ साली अरबी देशात अरब प्रदेश काबीज करण्याच्या राक्षसी नीतीपोटी घडला. आखाती खाड्या गरम रक्ताने उसळी मारू लागल्या, स्थावर मालमत्ता आणि अमूल्य संपत्ती यांचे अगणित नुकसान झाले. त्यासाठी कलियुगात रावणाने पुन्हा जन्म घेतला हुकूमशहा सद्दाम हुसेनच्या रूपात. ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती पाणी भरत होत्या. मदिरेच्या धबधब्यात इष्काचे प्याले तो दिन-रात रिचवत होता. स्वतःकडे असलेल्या तेलसाठ्यावर जगाला नाचवत होता. त्याची हाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. इजिप्तच्या वर्चस्वाचा बिमोड करून आखातातील तेलसाठे त्याला गिळंकृत करावयाचे होते.
त्यासाठी बॉम्बचा भडीमार करणारी लढाऊ विमाने, बॉम्ब, आग ओकणारे आधुनिक रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि हजारो सैनिकांच्या हातात अचूक वेध घेणारी अत्याधुनिक शस्त्रे देऊन त्याने अरब देशांवर आक्रमण केले. हजारो सैनिक, नागरिक धारातीर्थी पडले. भयानक स्कड क्षेपणास्त्राचा वापर त्याने पहिल्यांदा या युद्धात केला. याचा परिणाम जागतिक शांततेवर झाला. अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांची झोप उडाली. सद्दाम हुसेनबद्दल गूढ वाढत गेले. संशय आणि अफवांचे भूत अमेरिका-ब्रिटनचा पिच्छा पुरवू लागले. अरब देशातून तेलाचा पुरवठा अमेरिका आणि युरोपिअन देशांना होत असल्याने सद्दाम हुसैनने तेलाच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या. त्याचबरोबर तेलाच्या उत्पादनावर बंधन आणले तर आपली अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, या विचाराने अमेरिका व मित्र देश गर्भगळित झाले.
सद्दाम हुसेन ‘वेपन्स फॉर मास डिस्ट्रक्शन’ (डब्ल्यूएमडी) परमाणू अस्त्रे, जैविक शस्त्रे आणि रासायनिक विषारी वायूयुक्त क्षेपणास्त्रे ही महासंहारक हत्यारे वापरतोय अशी कथित माहिती त्यांच्या गुप्तहेर संस्थेने दिल्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू. बुश यांनी मित्रराष्ट्रांच्या मदतीने इराकवर ‘करो या मरो‘ या उक्तीप्रमाणे हल्ला करण्याचा विडा उचलला. अल-कायदा ही मानवतेला कलंक असलेली दहशतवादी संघटनाही सद्दामच्या सैन्याबरोबर हल्ले करीत आहे असा संशय बळावला.
ब्रिटन आणि अमेरिकन सैन्याने इराकवर तुफान हल्ले करण्यास सुरुवात केली. परंतु सद्दामचा एक केसही दृष्टोपत्तीस पडत नव्हता. वॉल्व्हरिन–१/२ ही शोधमोहीम आखण्यात आली. त्यामध्ये आधुनिक तोफखाना, गरुडासारखी लक्ष्यावर अचूक झडप घालणारी लढाऊ विमाने, घोडदळ, निपुण इंजिनिअर्स आणि इतर सैनिकांबरोबर सहाशे खास प्रशिक्षित अत्याधुनिक शस्त्रधारी सैनिकांचा समावेश केला गेला. ‘डेल्टा फोर्स’ आक्रमण करण्यास सज्ज झाले.
सुरुवातीलाच सद्दाम हुसैनला इराक सोडण्याची धमकी देण्यात आली. सद्दामने ती धमकी पायदळी तुडविली. मित्रराष्ट्रांचे सैनिक पेटून उठले. जमीन-आकाशमार्गे भडिमार चालू ठेवला. पण व्यर्थ! नवीन क्लुप्ती लढवण्यात आली. सद्दाम हुसैनच्या बाथ पक्षाच्या समर्थकांची व त्यांच्या सगे-सोयर्‍यांची पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत कसून तपासणी करून घरांचा तिळाएवढा कोपराही झडती घेण्यापासून सोडायचा नाही, अशी मोहीम सैनिकांनी अमलात आणली. पण सर्व यत्न निरर्थक ठरले.
दुर्दैवी सद्दाम हुसैनच्या गुप्ततेच्या अभेद्य किल्याला त्याच्याच बाथ पक्षाच्या एका गुप्तहेराने सुरुंग लावला. तिक्रित हे सद्दामचे गाव असून तेथील दूरस्थ शेतात सद्दाम एका भुयारात लपला आहे या अमेरिकेसाठी अगणित डॉलर्स किमतीच्या गुपिताचा ऐवज त्या बंडखोराने मित्रराष्ट्रांच्या फौजेच्या हातात दिला.
एखाद्या भक्ष्यावर रानटी श्वापदे लचके तोडण्यासाठी चारही बाजूने तुटून पडतात त्याच प्रकारे डेल्टा फोर्सचे सैनिक त्या भुयारावर तुटून पडले, अत्याधुनिक शस्त्रे व शास्त्रासहित. परंतु इराकी अभियंत्यांनी अशा काही युक्त्या आणि तंत्रज्ञान वापरले होते की त्या बोगद्यामध्ये कसा प्रवेश करावा, याचा विचार करता करता तंत्रज्ञानात अव्वल असणार्‍या मित्रराष्ट्रांच्या सैनिकांच्या मेंदूत मुंग्यांनी वारूळ उभे केले. शेवटचा उपाय म्हणून डेल्टा फोर्सने त्यावर हातबॉम्ब टाकून त्याला भोक पाडले. त्याला ‘स्पायडर होल‘ असे संबोधण्यात आले. अचानक त्या सैनिकांनी ‘जॅकपॉट’ असा नारा दिला. कारण ते ज्या सावजाचा शोध जुलै ते डिसेंबर २००३ या कालावधीत घेत होते ते सावज अचानक दृष्टोत्पत्तीस पडले… इराकचा राष्ट्राध्यक्ष, हुकूमशहा सद्दाम हुसैनच्या रूपात…
मातीच्या विटांनी बांधलेला, चौकोनी, साधारण सात फूट खोली, दोन माणसे चिकटून बसतील एव्हढा रुंदी, वायुविजनाचा अभाव असलेला खड्डा/बंकर, त्यात एकेकाळी जगाचा थरकाप उडवणारा, इहलोकाची सर्व सुखे भोगलेला सत्ताधीश, भित्र्या सशाप्रमाणे लपलेला, खंगलेला, दाढी आणि केस अस्ताव्यस्त वाढलेला सद्दाम, नजरेच्या टप्प्यात आला. त्या सैनिकांनी त्याचे हात धरून वर उचलून बाहेर काढला. कसलाही विरोध न करता तो संपूर्ण शरण गेला. बांगलादेश स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानी सैनिकांनी भारताकडे जशी शरणागती पत्करली, अगदी तशीच. अपेक्षित रक्तपात झालाच नाही.
मित्रराष्ट्रांच्या फौजेला सद्दामव्यतिरिक्त विश्व संहारक असे काहीही हाती लागले नाही… ना परमाणू क्षेपणास्त्रे, ना रासायनिक शस्त्रे किंवा जैविक अस्त्रे. हा केवळ बलाढ्य अमेरिकेचा जागतिक दादागिरी, संशयी वृत्ती व विशिष्ट हेतू ठेवून गुप्तहेर संघटनेने मांडलेला खेळ ठरला. स्वतःकडे जागतिक उच्चांक मोडणारी क्षेपणास्त्रे, अस्त्रे व शस्त्रे असतानाही गलितगात्र सद्दामचे केस न् केस, तोंडाचा जबडा, दात, संपूर्ण शरीर अतिशय काटेकोर पद्धतीने तपासण्यात आले, एखादे अस्त्र लपवून ठेवले असेल या संशयाने. सैनिकांनी माती खाल्ल्यासारखी त्यांची अवस्था झाली. स्वतः अमेरिका अस्त्र-शस्त्रांच्या भांडाराने परिपूर्ण असूनही तिची दांभिक आणि दडपशाही वृत्तीची पोल-खोलण्यासाठीच सदरचे व्यंगचित्र रेखाटण्यात आले.
खाडीयुद्ध म्हणजे दोन वृत्तींचे युद्ध. एखाद्याची वृत्ती जर दुसर्‍याला लुबाडणे, विश्वासघात करणे किंवा जबरदस्तीने अन्याय्य करून स्वार्थ साधणारी अशी असेल, तर ती व्यक्ती उच्चशिक्षित, श्रीमंत, अत्याधुनिक साधनसामुग्रीमध्ये लोळणारी असेल तरीही तो वृत्तीचा गुलाम होणार.
आजच्या युगात जागोजागी समाजात, शिक्षणक्षेत्रात, साहित्याच्या बाजारात, उद्योग-धंद्यात, प्रशासनात, राजकारणात, इत्यादी पातळींवर किंवा घरातही हव्यासाला बळी पडलेले अनेक सद्दाम सापडतील… पावलोपावली संशयाने पछाडलेले, दांभिक वृत्तीचे स्वार्थी बुश सापडतील. संशयाने जगामध्ये अनेक उलटापालटी झाल्यात. धोब्याने संशय घेतल्याने रामाने सीतेला वनवासात ढकलले. अशा अनेक अप्रिय घटनांचे हे व्यंगचित्र प्रतिनिधित्व करते.
संशय अजगराच्या कारकचलेल्या मिठीसारखा असतो, त्यापेक्षा खरे-खोटे, तराजूत तोलून-मापून पाहा…

Previous Post

झाले मोकळे आकाश

Next Post

ती सध्या काय करते?

Next Post

ती सध्या काय करते?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.