अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू वृश्चिकेत, शुक्र-मंगळ-चंद्र धनूमध्ये त्यानंतर शुक्र-मंगळ-शनी-बुध-प्लूटो आणि चंद्र षष्टग्रही मकरेत, गुरू-रवी-नेपच्यून कुंभेत, गुरू (अस्त). दिनविशेष – १ मार्च रोजी महाशिवरात्री, २ मार्च रोजी माघ दर्श अमावस्या.
मेष – आगामी आठवड्यात नुसता कामाचा व्यापच वाढणार नाही तर मानसिक कसोटी पाहणारा हा काळ राहणार आहे. मंगळाचे दशमातील मकरेतील भ्रमण त्यासोबत बुध आणि प्लूटो, त्यामुळे धावपळ वाढणार आहे. २८ फेब्रुवारीनंतर होणारी षष्ठग्रहीही दशमात होणार आहे. व्यापार-नोकरीच्या संदर्भातील निर्णय महत्वाचा राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बदली, बढती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनपेक्षित बदल, वृद्धी यासारखे सकारात्मक बदल घडतील. नव्या संधी सहजपणे चालून येतील, त्यांचा योग्य फायदा घ्या.
वृषभ – कामाच्या नवीन संधी चालून येतील. त्यामुळे हे करू की ते करू अशी अवस्था निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. शुक्राचे राश्यांतर मकरेत, २८ फेब्रुवारीला होणारी षष्टग्रही राजयोगकारक शनी भाग्यात, उच्चीचा मंगळ, दशमातील रवी-गुरूमुळे चांगल्या संधी मिळतील. नवीन संधी येणार आहे, त्यामुळे बिनदिक्कतपणे साहस करा, यश नक्की मिळेल. पण त्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. तरच यशाची पायरी गाठता येईल. विद्यार्थी, कामगार मंडळी यांच्यासाठी अनुकूल काळ राहणार आहे.
मिथुन – येत्या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. बुध अष्टमात असल्यामुळे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. शनी-मंगळ-शुक्र यांचा विपरीत राजयोग अनपेक्षित लाभाचा राहणार आहे. वडिलोपार्जित मालमत्ता, वारसाहक्क, विमा या माध्यमातून लाभ होण्याची शक्यता आहे. नवी गुंतवणुकीचे नियोजन कराल. अनपेक्षित लाभाच्या माध्यमातून पैसे येतील पण खर्च करताना मोह टाळा. अष्टमात शनी-मंगळ असल्यामुळे वाहन चालवताना या आठवड्यात काळजी घ्या. डोक्याला इजा होण्याची दाट शक्यता आहे.
कर्क – सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी, क्रीडापटू यांच्यासाठी कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याचा काळ आहे. या मंडळींना चांगले यश मिळेल. निंदानालस्तीचे प्रसंग निर्माण होतील, पण त्याकडे फार लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने विदेशात स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर ते स्वप्न दृष्टिपथात येईल. कामाच्या निमित्ताने प्रवास होतील. व्यावसायिक भागीदार, वैवाहिक जोडीदार यांच्यासोबत हितसंबंध जपा. वाद विकोपाला जाणार नाहीत, याची दक्षता घ्या. लाभातल्या राहूमुळे अनपेक्षित बदल घडतील. अचानक धनलाभ होतील.
सिंह – रवी सप्तमात, रवी-गुरू-नेपच्यून युती, षष्ठम भावात होणारी षष्ठग्रही यांच्यामुळे प्रकृतीची काळजी घेण्याचा काळ आहे. प्रवासात एखादा महत्वाचा दस्तऐवज, वस्तू हरवू शकते, त्यामुळे काळजी घ्या. महिलांना आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. सुखस्थानातील केतू, दशमातील राहू यांच्यामुळे कौटुंबिक सौख्यात बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रवासात नव्या ओळखी होतील. महत्वाचे पत्रव्यवहार मेल, सांभाळून ठेवा. भविष्यात उपयोगी ठरणार आहेत.
कन्या – येणार्या आठवडयात संमिश्र घटनांचा अनुभव येणार आहे. बुध मकरेत पंचमस्थानी, षष्ठग्रही पंचमभावात त्यामुळे बुद्धीचा सदुपयोग करून यश मिळवण्याचा काळ आहे. यश दाराशी उभे आहे. क्रीडा, संगीत, साहित्यक्षेत्रात चमकण्याची संधी आहे. दाम्पत्यजीवनात थोडी कुरबुर होईल. पण त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी चांगला काळ आहे. २८ फेब्रुवारी ते दोन मार्चपर्यंतचा काळ अनपेक्षित लाभाचा राहणार आहे. एखाद्या जुन्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैद्यकीय क्षेत्रासाठी उत्तम काळ.
तूळ – सौख्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. घरासंबधीचा प्रश्न मार्गी लागेल. जमीन, प्रॉपर्टी यासंदर्भात अनपेक्षित कार्यसिद्धी सफल होणार आहे. त्यामुळे आठवडा आनंदात जाईल. घरात एखादा कौटुंबिक कार्यक्रम होईल. त्यामुळे नातेवाईक, जुने मित्र यांच्या भेटीचा योग चालून येईल. विद्यार्थ्यांना चांगली यशप्राप्ती होईल. नवे वाहन घेण्याचा विचार करत असतात, तर त्यादृष्टीने हालचाली होतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, म्हणजे पुढच्या समस्या निर्माण होणार नाहीत.
वृश्चिक – तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढलेला दिसेल. त्यातून कर्तृत्व सिद्ध होईल, त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी पदरात पडू शकते. नव्या ओळखी होतील, पण त्यांच्यावर लगेच आंधळा विश्वास ठेवू नका. प्रवासात वेळ खर्च होईल. त्यामुळे दगदग होण्याची शक्यता आहे. काही जणांना त्यामुळे अचानकपणे दवाखान्याची पायरी चढावी लागू शकते. त्यामुळे काळजी घ्या. गृहसौख्य उत्तम राहील.
धनू – अनेक दिवसांपासून प्रलंबित असणार्या गोष्टींचा निर्णय या आठवड्यात लागेल. गुरू (अस्त) पराक्रम भावात, रवी-गुरू युती, द्वितीय भावात षष्टग्रही, त्यामुळे हा काळ आशादायी राहील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. सरकार दरबारी, राजकीय क्षेत्रात महत्वाची जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळेल. आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींना चांगले अनुभव येतील. विवाहेच्छुंचे लग्न जमण्याचे योग आहेत. नोकरीत अनपेक्षितपणे बढतीचे पत्र हातात पडेल, त्यामुळे खूष असाल. शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, अभियंते यांच्यासाठी अनुकूल आठवडा राहणार आहे.
मकर – आठवडा कटकटीचा जाणार असला तरी काही गोष्टी मनासारख्या होतील. शनी लग्नी, साडेसातीचा काळ, शनी-मंगळ एकत्र त्यामुळे चिडचिड वाढेल. कलाकार, संगीतप्रेमी, गायक यांच्यासाठी चांगला काळ राहणार आहे. काही जणांना सन्मानप्राप्तीचा अनुभव येईल. ओळखीचा चांगला फायदा होईल. दाम्पत्यजीवनात चढउतार जाणवतील. पण त्यामुळे फारसे नाराज होण्याचे कारण नाही. सुटीच्या दिवशी मौजमजेचा मूड असेल, पण काही कारणाने बेत बिनसेल. पण त्यामुळे नाराज होऊ नका. सुटीचा आनंद घ्या.
कुंभ – वेगळ्या कामाचे नियोजन केलेले असेल तर ते पूर्णपणे कोलमडणार आहे. व्ययस्थानातील षष्टग्रहीमुळे खर्चात भर पडलेली दिसेल. व्यावसायिक कामाच्या निमित्ताने लांबचे प्रवास होतील. वाहन चालवताना काळजी घ्या. संमिश्र स्वरूपाच्या फायद्याचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. शनी-मंगळाची सप्तमदृष्टी षष्ठ भावावर त्यामुळे आरोग्य, पथ्यपाणी सांभाळा. काही जणांना डॉक्टरच्या सल्ल्याची गरज भासेल.
मीन – आगामी आठवड्यात भाग्यकारक घटनांचा अनुभव येईल. नोकरीतील सर्व प्रकारचे प्रतीक्षित लाभ या काळात मिळतील. नवीन वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. राजकीय क्षेत्रात, सरकारी ठिकाणी काम करणार्या मंडळींना अनपेक्षित लाभ मिळतील. उद्योग-व्यवसायात अचानकपणे वृद्धी होताना दिसेल. कायदेपंडितांसाठी चांगल्या कमाईचा आठवडा राहणार आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काम करणे टाळा, ते महागात पडू शकते.