राज शांतपणे मागे वळला आणि त्याने हवालदार राणेंना आवाज दिला, ‘राणे जरा ते बॅरिकेड बाजूला घ्या. माझ्या मीडियातील मित्रांनो, मला कल्पना आहे की तुम्ही विविध चॅनेल्स आणि वर्तमानपत्रातून आलेला आहात. पण आज मला तुमचे सहकार्य हवे आहे. तुमच्यापैकी कोणीही तीन पत्रकार आणि एक कॅमेरामन यांना निवडा. त्या चार लोकांना घेऊन मी आत जाणार आहे आणि तिथे मिस्टर गंगाराम आपल्याला चांदनीचा खून कसा झाला हे समजावून सांगणार आहेत. हा मृत्यू संशयास्पद कसा आहे, हे देखील समजावून सांगणार आहेत.’
– – –
‘हॅलो राज…’
‘येस सर… बोला…’ सकाळ सकाळ कमिशनर साहेबांचा फोन आल्याने राज थोडा सावध झाला होता. एकतर साहेब कधी स्वतःहून फारसा फोन करत नाहीत आणि करतात तेव्हा डोक्याला शॉट लागणार हे नक्की पकडायचे.
‘राज, तुला पाली हिलचा अभिनेत्री चांदनीचा बंगला माहिती आहे?’
‘हो सर… जवळपास अख्ख्या मुंबईला माहिती आहे तो.’
‘ताबडतोब इकडे निघून ये. मी इकडेच आहे.’
‘एनीथिंग राँग सर?’
‘मिस चांदनी इज डेड!!’
‘काय?’
‘हो… आणि मीडियाला खबर लागून दंगा उसळायच्या आत तू इथे आलेला बरा!’
‘मी निघतोय सर लगेच…’
फोन ठेवला आणि कमिशनर साहेबांचा ताण जरा हलका झाला. एकतर आधीच हाय प्रोफाइल केस, त्यात ती अभिनेत्री चांदनीसारख्या व्यक्तीची. टेन्शन तर येणारच ना. म्हणूनच त्यांनी तातडीने इन्स्पेक्टर राजला बोलावून घेतले होते. इन्स्पेक्टर राज खत्री म्हणजे जनतेच्या आणि मीडियाच्या गळ्यातला ताईत होता. अवघ्या दोन वर्षात त्याने भल्या भल्या गुन्हेगारांना कायद्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडले होते. त्यातून कारभार स्वच्छ आणि राहणीमान साधे सरळ. मीडिया तर त्याला डोक्यावर घेऊन नाचत होती. पण हा मात्र सगळ्यांशी सतत फटकून असायचा आणि म्हणूनच पोलिस दलात देखील स्वतःची आब राखून होता. कमिशनर साहेब राजच्या विचारात गढलेले असतानाच, त्याची गाडी पोर्चमध्ये शिरली आणि राजने गाडी थांबायची वाट देखील न बघता खाली उडी घेतली.
‘गुड मॉर्निंग सर…’
‘से बॅड मॉर्निंग राज. आजची सकाळ प्रचंड त्रास देणार आहे हे नक्की!’
‘काय घडले आहे सर नक्की?’
‘राज… हॉरिबल… प्रसिद्ध अभिनेत्री मिस चांदनी हिने आत्महत्या केली आहे आणि हाताला ठोस काही लागले नाही, तर मीडिया आणि वरिष्ठांना तोंड देणे अवघड होणार आहे.’
‘काळजी करू नका सर. मी हाताळतो हे प्रकरण,’ वाक्य संपवता संपवता राज बंगल्यात शिरला देखील होता.
हॉलमध्ये सोफ्यावरच चांदनीचे प्रेत पडलेले होते. फोरेन्सिकची टीम त्यांच्या कामाला जुंपली होती. त्यांना डिस्टर्ब न करता, राजने निरीक्षणाला सुरुवात केली. चांदनीच्या प्रेताशेजारीच एक गन पडलेली होती. चांदनीने तिच्यातूनच गोळी झाडून घेतलेली असावी. डोक्याखाली रक्ताचे थारोळे पसरलेले होते. टीपॉयवरच एक व्हिस्कीचा ग्लास आणि अर्ध्याच्यावर संपलेली ‘शिवास रिगल’ पडलेली होती. बाकी हॉलमधील सर्व वस्तू जिथल्या तिथे होत्या. झटापट झाल्याची कोणतीही निशाणी दिसत नव्हती. राजने आपला मोर्चा डॉक्टर प्रबोधकडे वळवला.
’डॉक काही माहिती?’
‘राज… बंदूक अगदी कानाच्या वर चिकटवून गोळी मारून घेतलेली आहे. गोळी मेंदूतून आरपार गेली आहे आणि उजव्या हाताला जे पेंटिंग दिसते आहे, त्याच्या खालच्या बाजूला भिंतीत शिरली आहे. चांदनीला मरून अंदाजे चार ते पाच तास झाले आहेत, म्हणजे साधारण रात्री दोन ते तीनच्या सुमाराला तिने आत्महत्या केली आहे. सध्या इतकेच सांगू शकतो.’
‘थॅन्क्स डॉक’ राजने मान कलती केली आणि त्याने घरातील इतर खोल्यांकडे मोर्चा वळवला.
‘राज…’ कमिशनर साहेबांनी आवाज दिला आणि राज शोकेसमधल्या चांदनीच्या शेकडो बक्षिसांकडे बघता बघता भानावर आला.
‘राज बाहेर मीडिया गोळा झालेली आहे. तू जरा सांभाळून घेतोस का?’ साहेबांचे वाक्य संपता संपता राज बाहेर पोर्चच्या दिशेने निघाला देखील होता.
राज बॅरिकेडस ओलांडून बाहेर आला आणि पत्रकारांनी त्याला एकच गराडा घातला.
‘मिस्टर राज, चांदनीजींचे निधन झाले, हे खरे आहे का?’
‘दुर्दैवाने तुमची माहिती खरी आहे. काल रात्री ही घटना घडली आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी असा सध्या तरी आमचा अंदाज आहे. पुढील तपासात सत्य बाहेर येईलच.’
‘मिस चांदनीने आत्महत्या केली हे तुम्ही ठामपणे कसे सांगू शकता? त्यांनी काही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली आहे का?’
‘नाही आम्हाला अशी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही.’
‘म्हणजे त्यांचा खून देखील झालेला असू शकतो,’ एका जाड भिंगाचा चष्मेवाला तरुण कोकलला आणि राज पूर्ण वैतागला.
‘हे बघा, मी तुम्हाला तेच सांगतो आहे की अजून आमचा तपास सुरू आहे. पोलिसांना थोडा वेळ द्या.’
‘तुम्हाला काय वाटते मिस चांदनीचा खून कोणी केला असावा?’ पुन्हा एकदा तोच चष्मेवाला. आता मात्र राजचा पारा चांगलाच वाढला होता.
‘काय नाव तुमचे?’ राजने जरा रागाने विचारले.
‘गंगाराम…’ समोरचा तरुण आढ्यतेने म्हणाला, पण त्याचे नाव ऐकून उगाचच खसखस पिकली.
‘मिस्टर गंगाराम, तुम्हाला खात्री आहे मिस चांदनीचा खून झालाय म्हणून?’
‘हो! येवढी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली आणि कुणाल मल्होत्रासारख्या अरबोपतीशी जिचे सूत जुळलेले होते, ती आत्महत्या करेलच कशाला?’
राज शांतपणे मागे वळला आणि त्याने हवालदार राणेंना आवाज दिला, ‘राणे जरा ते बॅरिकेड बाजूला घ्या. माझ्या मीडियातील मित्रांनो, मला कल्पना आहे की तुम्ही विविध चॅनेल्स आणि वर्तमानपत्रातून आलेला आहात. पण आज मला तुमचे सहकार्य हवे आहे. तुमच्यापैकी कोणीही तीन पत्रकार आणि एक कॅमेरामन यांना निवडा. त्या चार लोकांना घेऊन मी आत जाणार आहे आणि तिथे मिस्टर गंगाराम आपल्याला चांदनीचा खून कसा झाला हे समजावून सांगणार आहेत. हा मृत्यू संशयास्पद कसा आहे, हे देखील समजावून सांगणार आहेत.’ राजने गंगारामकडे पाहिले आणि गंगारामच्या पोटात जोरदार कळ उठली.
—
‘राज तुझ्या डोक्यात नक्की आहे तरी काय?’
‘सर परिस्थितिजन्य पुरावे बघता चांदनीने आत्महत्या केली आहे असेच दिसते. पण तिने आत्महत्या का करावी ह्याचे ठोस कारण अजूनही आपल्या हाताला लागलेले नाही.’
‘बरं मग?’
‘सर, तुम्हाला त्या दिवशीचा तो पत्रकार आठवतो? मिस्टर गंगाराम? का कोणास ठाऊक पण त्याचे एकूण ठामपणे चांदनीचा खून झाला म्हणणे, त्याचा तो आत्मविश्वास आणि नंतर अचानक त्याचे फरार होणे मला कुठेतरी फार खटकते आहे!’
‘राज, कदाचित तुझ्या बोलण्याने घाबरून तो…’
‘तो घाबरला असेल देखील सर पण चांदनीचा खून झालाय हे सांगताना त्याच्या आवाजात जो ठाम आत्मविश्वास मला जाणवला त्याचे काय?’
‘चौकशीसाठी बोलावून घे मग त्याला…’
‘दोन दिवस तोच प्रयत्न करतोय सर, पण गंगाराम गायब आहे.’
‘काय???’
‘हो सर. घर, ऑफिस, मित्र कुठेही त्याचा ठावठिकाणा नाही. मी तर अगदी शहरातले लॉज देखील पालथे घातले, पण तो मिळाला नाही.’ राजचे बोलणे संपले आणि त्याचवेळी हवालदार राणे गडबडीने दार वाजवत आत शिरले.
‘राज सर, तुम्ही तुम्हाला आलेला मिस कॉल ट्रेस करायला सांगितला होतात.’
‘हो बरोबर. त्याचे काय?’
‘सर तो नंबर पत्रकार गंगारामचा आहे.’
‘व्हॉट?’
‘हो सर. पण तो नंबर आता बंद आहे. लास्ट लोकेशन माहीम रेल्वे स्टेशनचे आहे.’
‘राणे ताबडतोब माहीम स्टेशनला माणसे पाठवा. माहीम पोलिसांकडे गंगारामची चौकशी करा.’
—
‘सर गंगाराम सापडला. सिटी हॉस्पिटलला अॅडमिट आहे. लोकलमधून कोणीतरी धक्का दिला त्याला. नशीब म्हणून बचावला.’
राजने तातडीने गाडी काढली आणि सिटी हॉस्पिटल गाठले. गंगाराम जवळजवळ ’ममी’ अवस्थेत बेडवर पडलेला होता. बहुदा पन्नास साठ हाडांची जागा इकडून तिकडे हाललेली असावी.
‘साहेब… मोजून दहा मिनिटे. त्यावर पेशंटला जास्ती त्रास देऊ नका.’
‘गंगाराम… कसे आहात?’ राजच्या प्रश्नावर गंगारामने मोठ्या कष्टाने मान हालवून प्रतिसाद दिला.
‘तुम्ही मला फोन केला होतात ना?’ गंगारामच्या चेहर्यावर अचानक भीती दाटून आली.
‘नो नाही….’
‘गंगाराम घाबरू नका. तुम्ही आता अगदी सुरक्षित आहात. तुमचे मला फोन करणे आणि त्यानंतर तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न होणे हा योगायोग नक्की नाही. तुमच्याकडे अशी काही माहिती आहे, जी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू नये म्हणून कोणीतरी प्रयत्न करते आहे. खरे ना?’
‘साहेब… चांदनीने आत्महत्या केलेली नाही.’
‘कशावरून गंगाराम?’
‘त्या रात्री ती घरी एकटी नव्हती?’
‘कोण होते तिच्याबरोबर? आणि तुला कसे माहिती सगळे?’
‘साहेब, त्या दिवशी योगायोगाने मी कपूर स्टुडिओमध्ये असताना मला चांदनी मॅडमचे व्हॅनिटी व्हॅनमधले बोलणे कानावर पडले. त्या फोनवर कोणाला तरी सांगत होत्या की मी सगळी तयारी केली आहे, तू रात्री बिनघोर ये. मी एकटीच असणार आहे.’
‘साहेब, मला वाटले काहीतरी सनसनाटी बातमी मिळेल, चांदनीचे लफडे कळेल म्हणून मी रात्री आठपासूनच तिच्या घरावर पाळत ठेवून होतो. रात्री साडेसातच्या सुमाराला तिचा ड्रायव्हर, नोकर सगळे एक एक करत बाहेर पडले आणि बंगल्यातला प्रकाश देखील मंद झाला. काही वेळातच एक गाडी थांबल्याचा आवाज झाला आणि एक व्यक्ती ’ऑडी’ गाडीतून उतरून चांदनीच्या बंगल्यात शिरली. मी देखील पाच मिनिटात हलक्या पावलाने तिचे कुंपण ओलांडून आत शिरलो. हॉलमध्ये मंद प्रकाश तेवत होता आणि चांदनी जोरजोराने कोणाशी तरी बोलत होती. मी जवळजवळ पळतच खिडकीच्या दिशेने गेलो आणि मला एक बारीकसा फटाका फुटल्याचा आवाज ऐकू आला. मी खिडकीजवळ पोहोचलो, तोवर चांदनी रक्ताच्या थारोळ्यात फरशीवर पडली होती आणि एक सुटाबुटातली व्यक्ती घाईघाईने दाराबाहेर पडत होती.’
‘त्या व्यक्तीला परत पाहिले तर ओळखशील?’
‘नाही साहेब. एक तर ती व्यक्ती पाठमोरी होती आणि मी जे काही बघितले त्यामुळे मी आधीच सुन्न झालो होतो. पण साहेब एक विचित्र गोष्ट मला आठवते आहे.’
‘ती कोणती?’
‘साहेब त्या माणसाच्या कोटावर मिकी माऊसचा मुखवटा होता मागच्या बाजूला.’
‘नक्की सांगतो आहेस?’
‘शंभर टक्के साहेब. तो मिकी माऊसचाच मुखवटा होता!’ गंगारामने ठामपणे सांगितले आणि राजच्या चेहर्यावर मंद हास्य पसरले. त्याला राहून राहून चांदनीच्या शोकेसमधले एक खास बक्षीस आठवत होते; त्यावर देखील मिकी माऊसचा चेहरा होता.
—
‘नमस्कार, मी इन्स्पेक्टर राज. करण साहेब आहेत?’
‘या ना बसा. मी निशा… मिसेस करण मल्होत्रा. करण येईलच इतक्यात तुम्ही बसा तोवर.’ राज आश्चर्याने समोरच्या सुंदर स्त्रीकडे पाहत राहिला. अरे, घरी इतके अस्सल जातिवंत सौंदर्य असताना, या करण मल्होत्राला चांदनीसारख्या कचकड्याच्या बाहुलीत काय भावले असावे? असो…
‘मिस्टर राज… फक्त पाच मिनिटे. कमिशनर साहेबांनी स्वत: विनंती केली म्हणून मी तुमच्यासाठी पाच मिनिटे दिली आहेत. एरवी कमिशनर साहेबांशी देखील माझे वकीलच चर्चा करत असतात,’ करण अत्यंत माजाने बोलला.
‘चार मिनिटे करण साहेब. मी फक्त चार मिनिटे तुमच्यासाठी ठेवली आहेत. चांदनी मरण पावली त्या रात्री तुम्ही तिच्या घरी कशासाठी गेला होतात, ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की मी निघालो.’ राजने डबल माज दाखवत करणकडे पाहिले आणि करणचा चेहरा पांढराफटक पडला.
‘मी चांदनीला ओळखत होतो ह्याचा अर्थ असा नाही की मी वेळी अवेळी तिच्या घरी जात होतो.’
‘मग त्या रात्री तुम्ही कुठे होतात मिस्टर करण?’
‘ते तुम्हाला सांगायला मी बांधील नाही आणि ह्यापुढचे तुमचे प्रश्न तुम्ही माझ्या वकिलाला विचारा इन्स्पेक्टर.’
राज मंदपणे हसला आणि सोफ्यावरून उठला. बाहेर जाताजाता तो अचानक मागे वळला आणि हॉलच्या भिंतीकडे चालत गेला. भिंतीवर करण मल्होत्राचे एक लाईफसाइज फोटो लावलेला होता. त्यात एका हातात करणने जॅकेट पकडलेले होते आणि त्यावरचा मिकी माऊसचा चेहरा मिष्किलीने राजकडे बघून हसत होता.
राज करणच्या बंगल्याबाहेर पडला आणि सहजपणे त्याचे लक्ष पार्किंगमधल्या ’ऑडी’ वर पडले. गंगारामने देखील चांदनीच्या बंगल्याबाहेर ऑडी गाडी थांबल्याचाच उल्लेख केला होता. कुतूहलाने राज गाडी बघायला गेला आणि गाडीचे
बॉनेट उघडून काहीतरी काम करणारा ड्रायव्हर आयताच त्याच्या जाळ्यात सापडला.
—
समोरच्या खुर्चीत बसलेल्या करण मल्होत्रा आणि त्याच्या बायकोकडे राज मोठ्या मिष्किलीने बघत होता. आदल्या दिवशीचा करणचा माज पूर्णपणे उतरलेला दिसत होता. बहुदा रात्री झोप देखील लागलेली नसावी.
‘अरे वा… वहिनी पण बरोबर आल्यात,’ राज उपहासाने म्हणाला.
‘बायको बरोबर असली की मीडियाला कुटुंबवत्सलता दाखवता येते ना..’ करणची बायको फणकार्याने म्हणाली आणि करणचा चेहरा अजूनच पडला.
‘तर करण साहेब, तुम्ही अजूनही माझ्या कालच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाहीत. चांदनीचा खून झाला, त्या रात्री तुम्ही कुठे होतात?’
‘चांदनीचा खून झालाय? पण ती तर आत्महत्या…’
‘अरे, तुम्हाला कल्पनाच नसेल ना? हो.. चांदनीचा खून झालाय. त्या रात्री
ऑडी गाडीतून आलेल्या आणि मिकी माऊसचे जॅकेट घातलेल्या व्यक्तीने खून केलाय असे आमच्या तपासात निष्पन्न झाले आहे.’ शांतपणे करणच्या चेहर्यावरचे हावभाव टिपत राज बोलला. ‘पण त्याचा आणि आमच्या ड्रायव्हरला अटक करण्याचा काय संबंध?’ ‘अटक नाही केलेली सर. फक्त चौकशीसाठी त्याला थांबवून घेतले आहे. त्या रात्री गाडी घेऊन आपण चांदनी मॅडमच्या बंगल्यावर गेलो होतो असा कबुलीजबाब दिला आहे त्याने.’
‘पण तो एकटा तिकडे कशाला जाईल?’
‘एकटा नाही मिस्टर करण, तो आपल्या साहेबांना घेऊन तिकडे गेला होता.’
‘पण मी तर त्या रात्री…’ बोलता बोलता करण एकदम थांबला आणि त्याने निशाच्या चेहर्याकडे पाहिले.
‘त्या रात्री काय करणजी?’
‘त्या रात्री मी ज्युलीकडे होतो आणि सकाळीच एकदम घरी आलो,’ निशाकडे बघणे टाळत करण बोलला.
‘नक्की? कारण त्या रात्री तर स्वत: तुम्हाला ड्राइव्ह करत चांदनीच्या बंगल्यावर नेल्याचे तुमचा ड्रायव्हर शपथेवर सांगत आहे.’
‘तो खोटे बोलतोय… का माहिती नाही, पण खोटे बोलतोय हे नक्की!’
‘तो खरे सांगतोय मिस्टर मल्होत्रा… शंभर टक्के खरे. फक्त आपण साहेब म्हणून ज्याला नेतो आहोत ते साहेब नाहीत ह्याची त्याला कल्पना नव्हती!’ गंभीर आवाजात राज म्हणाला आणि करण एकदम दचकून उठला.
‘म्हणजे?’
‘म्हणजे, आपले साहेब म्हणून साहेबांच्या वेषात जे कोणी मागच्या सीटवर बसले आहे ते साहेब नाहीत हे त्याला काय माहिती ना?’
‘मला काहीच कळत नाहीये..’ करण हताशपणे म्हणाला.
‘तुम्हाला कळतंय ना, मी काय म्हणतोय ते? मिसेस निशा मल्होत्रा?’ खाडकन राजने प्रश्न विचारला आणि निशा शांतपणे म्हणाली, ‘आय कन्फेस!’
—
‘राज ग्रेट आहेस बाबा! हे कोडे सुटले तरी कसे?’ कमिशनर साहेब कौतुकाने विचारायला लागले.
‘गंगारामकडून मला मुख्य सुगावे मिळालेच होते, पण तपासात त्या रात्री करण ज्युलीकडे असल्याचे उघड झाले आणि मी चक्रावलो. त्यातच त्या दिवशी करणच्या बंगल्यात मला त्याच्या ड्रायव्हर भेटला; तो तर ठामपणे मी ’साहेबांनाच गाडीतून नेले’ म्हणून सांगत होता. मी अधिकच चक्रावलो. त्याच्याशी बोलता बोलता मला कळले की, करणच्या बायकोने निशाने त्याला फोन करून गाडी तयार ठेवायला सांगितले होते. साहेबांना तातडीने बाहेर जायचे आहे, गाडी तयार ठेव आणि साहेब टेन्शनमध्ये आहेत त्यामुळे बडबड न करता गाडी चालव,’ असे देखील सुनावले होते. हे ऐकल्यावर माझी ट्यूब पेटली की, सवतीमत्सराने काय घडवले असावे. चांदनीच्या घरी त्या दिवशी गाडी करणचीच गेली होती, ड्रायव्हरही करणचाच होता फक्त करणच्या वेषात निशा होती.’ राजने आपले बोलणे संपवले आणि बाहेर मीडियाला सामोरे जायला तो दरवाज्यातून बाहेर पडला.