प्रायोगिक रंगभूमीवर संहितेपासून सादरीकरणाच्या शैलीपर्यंत अनेक नवनवीन प्रयोग हे होत असतात. त्यातून नव्या संकल्पना आकार घेतात. त्यात एका आविष्कारात तर संपूर्ण काव्यसंग्रहाचे पुस्तक हीच नाटकाची संहिता बनली आणि आश्चर्य म्हणजे काव्य आणि नाट्य, शब्द आणि अर्थ याची मस्त मैफलच अनुभवण्यास मिळाली, जी रंगभूमीला एक वळण देणारी रंगवाट म्हणावी लागेल.
कविवर्य किरण येले यांच्या ‘बाईच्या कविता’ या पुस्तकावर आधारित नाट्यरूपांतर म्हणजे ‘स्त्री, जातं, ओवी आणि कविता.’ दिग्दर्शक-नेपथ्यकार सुनील देवळेकर यांनी याचा कल्पकतेने सादर केलेला प्रयोग हा विलक्षण नाट्यानुभव ठरलाय, जो काव्य आणि नाट्य यांना एका सुरात-तालात आणतोय.
शब्दांशिवाय संवाद हा अशक्यच. शब्दांचं वैभव आणि त्यातील जादू ही काव्यातून अलगद येते खरी. रसिकांच्या बदलत्या अभिरुचीत काव्यालाही नाट्यगृहांची दारे उघडी होतांना दिसत आहेत. अर्थात मराठी काव्याला मानाचं अन हक्काचं स्थान
प्रा. विसुभाऊ बापट यांनी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या काव्यात्मक कार्यक्रमातून दिले आणि ते जागतिक विक्रमांचे मानकरीही ठरले. सलग १५ तास कविता सादरीकरणाचे सीमोल्लंघनही त्यातून झाले होते. त्याहीपुढे एक पाऊल टाकून इथे कवितासंग्रहालाच नाट्यरूप दिलेय.
मालिका आणि काव्यलेखन करणारे किरण येले यांचा ‘बाईच्या कविता’ हा काव्यसंग्रह ग्रंथाली प्रकाशनाने २०१० साली प्रसिद्ध केला. आजवर त्याच्या पाच आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. यातील आशयप्रधान आणि कमीतकमी शब्दात असणारी काव्ये दर्दी वाचकांनी पसंत केली. ‘बाईचं बाईपण’ शोधणार्या या कवितेत प्रत्येक बाईच्या मनातली सल कुठेतरी अस्वस्थ करते. आजही काव्यप्रेमींच्या दुनियेत ‘बाईच्या कविता’ला मागणी कायम आहे. हौशी मंडळींनी या कवितांची अक्षरशः पारायणेही केलीत. या काव्यसंग्रहात एकूण पन्नास कविता आहेत. त्या नाटकाच्या चौकटीत बंदिस्त करून सादर केल्या, तर भन्नाट नाट्य जन्माला येईल, या विचारांनी दिग्दर्शक सुनील देवळेकर यांनी त्यांना रंगरूप दिलं आणि त्यातूनच या दीर्घांकाचा जन्म झालाय. प्रत्येक काव्याचा विषय, आशय हा वेगळा असला, तरी रंगमंचावर त्याचे सादरीकरण करण्याचं आव्हान त्यांनी पेललेलं आहे, याची प्रत्येक टप्प्यावर प्रचिती येते.
बाई
नखं
वाढवते
आणि
आयुष्यभर
रंगवत राहाते!
ही छोटी पण अर्थपूर्ण कविता खूप काही सांगून जाते. फक्त सात शब्द तरीही त्यातील अन्वयार्थ खोलवर काही सांगून सांगू इच्छितो.
‘बाईच्या विरोधात
कुंभाड रचू लागते
बाईच्या आतली
‘मंथरा’
दिसू लागते’
किंवा दुसरीकडे
‘लक्षात घे महामाये,
तुझ्यात खच्चून भरलीय
वासना, ईर्ष्या, मोह आणि माया
पण आयुष्यभर तू केरसुणीनं
स्वतःला झाडत राहिलीस…
या आणि अशा कवितेतून बाईला जागं करण्याचा प्रयत्नही त्यामागे आहे. मनाचा वेध आहे. अशा पन्नास कविता जेव्हा एकापाठोपाठ रंगमंचावर आकार घेतात, तेव्हा त्या रंगमंचासाठीच खास तयार केल्यात, असे वाटते. यातच दिग्दर्शकाला पावती मिळते. कुठेही त्यात भडकपणा नाही तसेच प्रसन्न वातावरणनिर्मिती ही देखील लाजवाबच. अशा शैलीदार नाटकातील स्त्रीस्पंदने एरवी क्वचितच प्रगट होतात.
घर चालविण्यासाठी रस्त्याच्या कोपर्यावर भरगर्दीत उभी असलेली भाजीवाली; वेगवान लोकल ट्रेनचे वेळापत्रक धावपळ करीत सांभाळणारी नोकरदार गृहिणी; घराबाहेर पडण्याची इच्छा असूनही परवानगी न मिळणारी तरुणी; हक्काच्या घरातच बहिष्कृत जिणं जगणारी एकाकी स्त्री… अशा कितीतरी स्त्रियांचं जगणं प्रत्येक वळणावर टिपण्याचा व मांडण्याचा ‘प्रयोग’ यात दिसतो. तो आपण कुठे आहोत, याचा शोध घ्यायला लावतो… ‘काळ, वेळ बदलला, पण समाजाच्या मनोवृत्तीत बदल झालाय का?’ हे प्रश्नचिन्ह उभे राहते.
अमृता रावराणे, कविता मानकर आणि प्रेरणा निगडीकर या तिघीजणींनी या कवितांना नाट्यरूप दिलेय. त्यांची देहबोली शोभून दिसते. तिघीजणी तीन वयोगटांचे प्रतिनिधित्व करतात. एक जात्यावर बसून ओवी म्हणणारी, नऊवारी साडीतलं आई-आजीपण जपणारी. दुसरी साडीतून बदलत्या वयाचं सूतोवाच करणारी, तिसरी ड्रेसमध्ये तरुणाईचा स्पर्श असणारी. काव्यवाचन किंवा अभिवाचन यापलीकडे जाऊन त्या काव्यातलं नाट्य साकार करतात. अभिनय तसेच शब्दोच्चार यावर त्यांची चांगलीच हुकमत असल्याचेही पदोपदी दिसते. बाईचं देवपण, श्रेष्ठत्व याहीपेक्षा तिचं बाईपण शोधण्याचा जो ‘प्रयोग’ कविवर्यांनी केलाय, तोच या तिघींनी सादरीकरणातून नेमकेपणानं आणलाय. त्यात सहजता आहे.
आता कालबाह्य वाटणार्या जात्याचा अर्थपूर्ण नेपथ्य म्हणून वापर; त्याभोवती दोर्यांची गुंतवणूक; लाल रंगाच्या वर्तुळातील प्रकाशकिरणे; काही बंदिस्त खोके-लेव्हल्स हे सारं काही नाट्य रंगविण्यास पूरक ठरते. नृत्याचा ताल, त्याचे आलेखन, तसेच पार्श्वसंगीतही चांगले जमले आहे. या पडद्यामागल्या सार्या जबाबदार्या एकहाती सांभाळून देवळेकरांनी स्त्रीमनाचा वेध घेतलाय. नाट्याला मध्यंतर नसल्याने त्याचा कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्णानुभव रसिकांना मिळतो. दीड तास या तिघीजणी काव्याच्या नाटकाचा खेळ मस्त रंगवितात. हे नाट्य कुठेही रेंगाळत नाही किंवा कालबाह्यही ठरत नाही, हे विशेष!
या नाटकाचे शीर्षक पाच शब्दांचे लांबलचक आहे. ते उच्चारताना दम लागतो. ते छोटे केले तर उत्तम. नाटकाची जाहिरात अक्षरलेखनापासून ते मांडणीपर्यंत आकर्षक व कल्पक आहे. तिचा योग्य वापर सहज शक्य आहे. त्यावरही विचार व्हावा. नेपथ्य एका बंदिस्त पेटार्यात नेण्याची व्यवस्था असल्याने छोटेखानी सभागृहात, गच्चीत, मंडपात, मैदानात अशा ठिकाणीही याचे प्रयोग होऊ शकतात. मराठी काव्य व नाट्य हे मराठी रसिकांच्या दारापर्यंत पोहचू शकेल, हीच यामागली अपेक्षा. आणि ‘बाईच्या कविता’ असल्याने महिला मंडळांना ही तर पर्वणीच ठरू शकेल!
मराठी रंगभूमीवर महिलांचे प्रश्न मांडणारी अनेक नाटके आजवर आलीत. अनेक शैलींतून आणि विषयातून त्यातील बारकावे टिपण्याचा प्रयत्नही झालाय. आपल्या देशात बायकांची जीवनपद्धती फार पूर्वीपासून समाजाने एका कडक चौकटीत अडकवून ठेवली आहे. बरीच बंधने तिच्याभोवती उभी केलीत. अगदी तिच्या जन्मापासून तिचे नकोसेपण सुरू होते ते शेवटपर्यंत. पुरुषप्रधान समाजरचनेचा काहीदा ती बळीही पडते. शारीरिक आणि मानसिक हा कोंडमारा या संवेदनशील काव्यातून पुढे येतो.
वसंत कानेटकरांचे ‘पंखाला ओढ पावलांची’ हे नाटक शांता निसळ यांच्या ‘बेघर’ कादंबरीवरून लिहिले होते. पुढे डॉ. जब्बार पटेल यांनी त्यावर ‘उंबरठा’ हा चित्रपट केला, जो हिंदीतही ‘सुबह’ या नावाने आला. नव्या युगातल्या सुशिक्षित स्त्रीला असलेली अस्तित्त्व, कर्तृत्त्व दाखवण्याची महत्त्वाकांक्षा त्यात होती. पण चारही बाजूंनी समस्यांचे अडथळे उभेच असतात. बायकांकडे नकारात्मक बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन तिच्या अपयशाला कारणीभूत होता. असो.
इथे तुलना करण्याचा प्रश्न नाही, पण ‘बाईपणाचा’ प्रांजळ शोध अशा दर्जेदार कलाकृतीतून निश्चितच घेतला जातोय. मग ती कादंबरी असो, कविता असो वा नाटक. या वाटेवरून जाणारा हा एक प्रायोगिक प्रसन्न आविष्कार ही समाधानाची बाब आहे. काव्यात कुठेही उपदेशाचे डोस नाहीत किंवा प्रचारी आंदोलनाची आक्रमक भाषा नाही. तरीही त्यामागल्या भावभावना मनाची पकड घेतात. काव्यसंहिता आणि सादरीकरणातली हळुवारता भुरळ पाडते.
व्यावसायिक रंगभूमीवर हल्ली सर्कसच्या तंबूतील विदूषकाप्रमाणे नाटकांचा खेळ मांडला गेलाय. ‘काहीही करा पण विनोदी मालमसाला घुसवा,’ असा जणू अलिखित नियमच बनलाय. त्या पार्श्वभूमीवर समांतर, प्रायोगिक रंगभूमीवर विषय आणि शैलीचा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न या नाट्यनिर्मितीतून झालाय. रोजच्या वापरातील सहजसुंदर शब्दांचा आधार घेऊन एकूणच ‘बाईंच्या’ मानसिकतेवर यावरलं भाष्य आहे. हे एक वास्तव विचारनाट्य काहीदा भेदक ठरते, काहीदा नाजूकपणे बोल मांडते. छोट्या शब्दरचनेतून नाट्यबिंदू पकडून ते उत्कर्षबिंदूपर्यंत पोहचविण्याचा हा रंगखेळ रसिकांनी अनुभविण्यास हवा, जो अविस्मरणीय काव्यात्मक नाट्यानुभव ठरेल.
स्त्री, जातं, ओवी आणि कविता
काव्यसंहिता : किरण येले
दिग्दर्शन : सुनील देवळेकर
नृत्य : सचिन गजमल
पार्श्वसंगीत : महेंद्र वेंगुर्लेकर
निर्मात्या : सायली देवळेकर/ डॉ. जयश्री कापसे-गावंडे
निर्मिती : शब्दाक्षर