पावसाळा या ऋतूत अग्निमांद्य होते, म्हणजे पचनशक्ती कमी होते. त्यामुळे शक्यतो हलका आणि शाकाहारी आहार घ्यावा असा पारंपरिक विचार आहे. इथे कोणतीही धार्मिक बाजू अथवा औषधशाखा, विचारप्रणाली न आणता शास्त्रीय दृष्टीने बघावे. या हंगामात मासेमारी बंद असते, कारण हा माशांच्या प्रजननाचा काळ. त्यामुळे ते खाऊ नयेत. पावसाळ्यात नवे गवत आलेले असते, प्राणी ते खूप खातात आणि त्यांच्या पचनक्षमतेवर परिणाम होतो. पर्यायाने माणसाला त्रास होतो. मांसाहार करायचाच तर जपून आणि मर्यादेत करावा इतकेच.
आता शाकाहार करायचा, तर काय रोज रोज वरण भात खायचा? हा प्रश्न येतोच आणि तो पूर्ण मान्य आहे. यावेळी भूक कमी होत असल्याने हलके आणि द्रवपदार्थ खावेत. म्हणजे खिचडी, सूप, कढण किंवा तत्सम. सूप म्हणजे फक्त भाजीचं किंवा मांसाहारी असते असे नाही, तर मोड आलेल्या कडधान्याची सुरेख चवदार सूप किंवा कढणं होतात. हल्ली बहुतेक लोक घरून काम करतात. सकाळी पूर्ण जेवले की रात्री तितकी भूक असते असे नाही. अशा वेळी अशी सूप्स किंवा खिचडी उत्तम ठरू शकते.
भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात मोड काढलेली कडधान्ये वापरण्याची पद्धत आहे आणि आज जगभरात अशी मोडवलेली धान्ये पौष्टिक गणली जातात. त्यातही आपले हिरवे मूग, मटकी, कुळीथ, ही धान्ये पचायला हलकी आणि पोषक आहेत असे मानले गेलेय. कोकणात किंवा देशावर मुसळधार पावसात भिजून काम करून घरी आले की शेतकरी कष्टकरी घरात हुलग्याचे/ कुळीथ माडगे कढण होतेच. कुळीथ तसे प्रचलित किंवा लोकप्रिय नाहीत. मटकी, चवळी, राजमा, वाल, छोले हे माहिती असतात पण कुळीथ नाही. कोकण, मावळ भाग, देशावर, उत्तरांचल, गढवाल इथे कुळीथ खूप वापरले जातात. या भागात त्यांचे पीक उत्तम येत असल्याने ते परवडण्याजोगे असते. पारंपरिक अन्नाचे हेच वैशिष्ट्य आहे. पिकते ते खायचे.
आज आपण कुळीथ कढण आणि मटकी खिचडी हे दोन पदार्थ बघूया. दोन्ही पदार्थात आवडीनुसार तुम्ही बदल करू शकता. नेहमीच्या पिझ्झा फ्राईड राइस आणि हॉट सोर सूपऐवजी या देशी सुपाचे भुरके खिचडीसोबत मारा. नक्की आवडेल.
इथे एक सांगावेसे वाटते की आपण मराठी लोक छोले, राजमा, पनीर, पालक यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतो! ते का? आपली मटकी, मसूर कुळीथ आणि वाल तितकेच चवदार असतात. कोणी जेवायला येणार किंवा पार्टी आहे, तर प्रथम काय येते तर पनीर आणि छोले!! इथे कोणत्याही प्रांताच्या पदार्थाचा अपमान करायचा नाही. पण आपण आपले देशी, मराठी जेवणखाण विसरू लागलोय. सर्व खा, सगळ्या प्रकारच्या अन्नाचा आस्वाद घ्या पण आपल्या मराठी जेवणाला विसरू नका. प्रांतिक अस्मिता आणि आदर अश्या लहान लहान गोष्टीतून दिसली तर जाणवते. नाहीतर आहेच की, पूजेला पनीर आणि लग्नाला लाहोरी आलू..
कुळीथ कढण
साहित्य : कुळीथ अख्खे : (नीट निवडून साधारण ५/६ तास भिजत घालून रात्री बांधून ठेवायचे की दुसर्या दिवशी सुरेख मोड येतात.) – १ वाटी
आले + मिरची + लसूण वाटून चवीनुसार
छोटा कांदा बारिक चिरून
मिरी जिरे कुटून थोडे
हळद
आमसूल : एक दोन चुरडून.
मीठ
तूप
कृती : कुळीथ निवडून, खडे काढून, कांदा, आले मिरची वाटण, हळद आणि थोडे मीठ यासोबत छान मऊ उकडून घ्यावेत. नरम असावेत.
गार झाले की थोडे कुळीथ खरबरीत वाटून घेवून, बाकी कुळीथात घालावे.
मिरी + जिरे पूड घालून, आमसूल चुरडून घालून, हवे तितके सरसरीत करुन, मीठ बघून, मंद आगीवर दहा एक मिनिटे उकळू द्यावे.
तूप गरम करून हिंग घालावा, थोडी लसूण चेचून त्यात लाल करावी आणि ही फोडणी कढणात ओतावी.
कुळीथ सूप तयार आहे.
आवडीनुसार यात मसाले, तिखट इत्यादी घालू शकता.
हवे असल्यास ओले खोबरे/ नारळ दूध, आंबट ताकसुद्धा लावता येते. वेगळी चव येते.
कुळीथ कढण पावसाळ्यात जरूर खायचे. भूक वाढते. मधुमेह असणार्यांना तर उत्तम आणि सर्वात महत्वाचे वजन कमी करणार्या लोकांसाठी तर वरदान.
इथे तुम्ही मूग, मसूर, मटकी, चणे ही कडधान्ये पण वापरू शकता.
मटकी खिचडी
साहित्य : मटकी : ५ ते ६ तास भिजवून बांधून त्याला मोड आणावेत : १ वाटी
इंद्रायणी किंवा तत्सम तांदूळ : १ वाटी
कांदा चिरून : २ मोठे
आले लसूण
गोडा/ गरम मसाला
हळद
गूळ
मीठ
ओले खोबरे थोडे
कृती : तांदूळ धुवून निथळून घ्यावेत
कुकरमध्ये तेल/तूप तापवून त्यात राई, हिंग, जिरे, कढीलिंब घालून, कांदा घालावा आणि गुलाबी लालसर करावा.
आले लसूण घालून मग मटकी घालावी.
परतून त्यात निथळवलेले तांदूळ, हळद, मसाला, गूळ घालून मंद आगीवर थोडा वेळ परतावे.
दोन वाट्या गरम पाणी, मीठ घालून, दोन शिट्ट्या द्याव्या.
वाफ गेली की, बाजूने तूप आणि लिंबू रस सोडून वाढावे. वरून ओले खोबरे.
यात मटकी ऐवजी मसूर, चणा, पावटा, मूग घालता येतात. मोड काढले तर चव वाढते.
– शुभा प्रभू साटम
(लेखिकेचे पारंपरिक अन्न या विषयावर प्रभुत्व आहे)