सीमा बन्सल
नमस्कार. आ हा हा, असे घाबरू नका, मला माहितीये मेलेली माणसं बोलत नाहीत. पण मला बोलावेच लागेल, नाहीतर माझी कथा तुम्हाला कळणार तरी कशी? ‘एका परपुरुषासोबत हॉटेलच्या रूममध्ये मृतावस्थेत सापडलेली लंगड्या कर्नलची बायको’ ही माझी प्रतिमा भंगेल तरी कधी? मला बोलावेच लागेल…
मी सीमा बन्सल. सौ. सीमा राजवीर बन्सल… माझे खरे नाव ‘मुक्ता’; म्हणजे लग्नाआधीचे बरं का. पण लग्नानंतर झाले ‘सीमा’. नियतीने आणि माझ्या नव-यानेही माझ्या नव्या नावातून जणू माझ्या भविष्याची झलक मला दाखवली होती म्हणा ना. पण मी बावळट ते समजू शकले नाही. कर्नल राजवीरसारख्या गर्भश्रीमंताच्या घरात मुलगी नांदणार म्हणून आई-बाबा खूश होते. एक समंजस, सुंदर आणि मान वर करून न बोलणारी सून घरात येणार म्हणून विजयाबाई खूश होत्या आणि चार लोकांच्यात मिरवायला स्वतःची बुद्धी नसलेली बाहुली मिळणार म्हणून राजवीर खूश होता (अर्थात हे मला नंतर समजले). आणि मी? नाही… माझ्या मनाची काळजी कोणालाच नव्हती… अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नव्हती…
‘हवे ते मिळवायचेच!’ ही बन्सलांची खानदानी प्रवृत्ती; त्याला राजवीर कसा अपवाद असेल? सुट्टीवर आलेल्या राजवीरने मला पाहिले आणि मी त्याला हवीशी झाले. दोनच दिवसांत विजयाबाई आमच्या घरी हजर झाल्या. त्यांच्याच वाड्यावर हिशेब सांभाळणा-या माझ्या बाबांना तर आकाशाच दारात उतरल्यासारखे झाले. पुढच्या अर्धा तासात बोलणी ‘पक्की’ होऊन मला ‘आहेर’ करून विजयाबाई गेल्या देखील. पुढच्या सहा दिवसात मी सौ. सीमा राजवीर बन्सल बनून नव्या घरात प्रवेश केला आणि महिन्याभरात इतिकर्तव्य पार पाडल्याच्या समाधानात विजयाबाईंनी जगाचा निरोप घेतला. विजयाबाई गेल्या आणि माझ्या ख-या परीक्षेला सुरुवात झाली…
राजवीरना सगळे जागच्या जागी आणि वेळच्या वेळी लागायचे. मिल्ट्रीची शिस्त आणि खानदानी मग्रुरी यांचे एक अजब मिश्रण म्हणजे राजवीर होय! घरातील प्रत्येक गोष्ट अगदी बायकोपासून ते मांजरापर्यंत सगळे काही नजरेच्या धाकात हवे. सकाळी उठल्या उठल्या चहाशेजारी पेपर आणि सिगार हवा, ब्रेकफास्ट आठ वाजता टेबलला लागायलाच हवा, जेवणात गोड पदार्थ असायलाच हवा आणि रात्री… बायकोची इच्छा असो नसो… तिच्या शरीराने साथ द्यायलाच हवी! नाहीतर मग गाल आणि पाठ लाल करून घ्यायची तयारी हवी…
विजयाबाईंच्या जाण्यामुळे वाढवून मिळालेली राजवीरची सुट्टी संपली, आणि ते पुन्हा कामावर रुजू झाले. तो तीन महिन्याचा काळ माझ्यासाठी काय तो सुखाचा होता. ‘मालकीण’ म्हणून तोरा मिरवायची मला कधी इच्छा देखील नव्हती, पण आजूबाजूला प्रत्येक आज्ञा झेलण्यासाठी दोन-चार लोक असतील, तर कुठेतरी ते मनाला आणि शरीराला देखील सुखावतेच की. त्या तीन महिन्यात जेवढी सुंदर बंगल्याची बाग मोहरली, तेवढीच बहुदा त्याहूनही सुंदर मी मोहरले होते. आजूबाजूच्या सगळ्यांच्याच नजरा तेच सांगत असायच्या. पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. राजवीरला जाऊन तीन महिने होतात न होतात, तोच पोलो खेळताना घोड्यावरून पडण्याचे निमित्त झाले आणि तडातड पाय टाकत ड्युटीवर गेलेले राजवीर स्ट्रेचरवरूनच परत आले. डॉक्टर येऊन जात होते, विश्वास देत होते पण राजवीरना जी चाकाची खुर्ची चिकटलीये ती कायमचीच हे सत्य लपवणे बरेचदा त्यांनाही अवघड जायचे. राजवीर काय विचार करत होते माहिती नाही, पण या अपघातानंतर आमच्या दोघांचेही आयुष्य बदलले ते कायमचेच. राजवीरच्या आयुष्यात आता अपंगत्वाचा राग, दुस-यावर अवलंबून असल्याचा संताप, लोक आपली कीव करतात ही भावना आणि संग्रामच्या आगमनानंतर बायकोविषयी येऊ लागलेला संशय अशा ब-याच नव्या गोष्टींनी प्रवेश केला होता.
माणसाचे जनावरात कसे रूपांतर होते ते मी डोळ्यासमोर बघत होते, तो रानटीपणा अनुभवत होते. वाटायचे पळून जावे… पण जाणार कोणाकडे? आई अंथरुणाला खिळलेली आणि राजवीरच्या पैशांनी होणा-या उपचारांनी तिचे श्वास चाललेले. दूर कुठेतरी अनोळखी ठिकाणी पळून जावे; तर धड शिक्षण नाही आणि धाडस त्याहूनही नाही. पुन्हा आयुष्यभर सन्मानाने जगलेल्या आईवडिलांची काळजी होतीच. शेवटी जीव द्यावा ही इच्छा मनात प्रबळ होत असतानाच देवाने जणू माझा धावा ऐकला आणि संग्राम माझ्या आयुष्यात आला…
—-
कर्नल राजवीर बन्सल
मी या बाईला अजून जिवंत का ठेवलंय? का सहन करतो मी हिला? एकेकाळी मान वर करायचे धाडस नसलेली आणि समोर उभी राहिली तरी थरथरणारी ही बाई, आज माझ्यासमोर स्लीव्हलेस ब्लाऊज अन् कमरेखाली साडी नेसून त्या संग्रामला भेटायला जाते? माझे जेवण झाल्याशिवाय जेवायला देखील न बसणारी आज माझ्यासमोर बसून दारूचे पेले रिचवते? तेही माझ्याकडे बघत कुत्सित हसत? वाटतं त्या क्षणी तिचा गळा दाबावा, उपसून काढावेत ते छद्मी हसणारे डोळे… पण ते शक्य नाही. एकतर मी हा असा लोळागोळा होऊन पडलेलो आणि त्यातून या एकेकाळच्या हरिणीचे आता धूर्त कोल्हिणीत झालेले रूपांतर. माझ्या मनातले भाव हिला कधी आणि कसे समजले माहिती नाही, पण एक दिवस माझे पिस्टल अचानक नाहीसे झाले आणि सीमा देखील दाराला आतून कडी लावून वेगळ्या खोलीत झोपायला लागली.
सीमाच्या या रूपांतराला कुठेतरी मीच कारणीभूत नव्हतो का? कधी कधी स्वत:चाच राग येतो… आपण केलेल्या चुका डोळ्यासमोर उभ्या राहतात. या चुकांपैकीच एक चूक म्हणजे, संग्रामला सोबती बनवणे. एकटेपणामुळे चिडचिड वाढत गेली आणि तिला जोड लाभली ती बेसुमार दारू पिण्याची. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, कधीही न अनुभवलेल्या लहान सहान शारीरिक तक्रारी. शेवटी डॉ.नाडकर्णींचा सल्ला मानला आणि त्यांच्याच ओळखीने हा संग्राम बुद्धिबळात माझा भिडू म्हणून हजेरी लावू लागला. संग्रामचा भूतकाळ काही फारसा चांगला नव्हता. विनयभंगाच्या गुन्ह्यात तो कैद भोगून आला होता. पण डॉ. नाडकर्णींचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. ‘भाबडे कोकरू’ म्हणायचे त्याला ते. संग्राम कसाही असेल, पण त्याच्या येण्याने आयुष्यात रंगत आली होती हे नक्की!
संग्राम खेळात जेवढा हुशार होता; तेवढाच तो बोलण्यात चतुर होता. सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन तास त्याच्या सहवासात कसे जायचे ते समजायचे देखील नाही. शिक्षण आणि मिल्ट्रीमुळे भारतातल्या काही भागांचा अनुभव मी देखील घेतला होता. पण संग्रामने विविध नोक-या, उद्योग यापायी अर्धा भारत पालथा घातला होता. त्याचे विविध अनुभव आणि ते अनुभव खुलवून सांगायची शैली भारावून टाकणारी होती. मुख्य म्हणजे संग्राम माझ्या पैशापुढे, अधिकारापुढे कधीच दबलेला नसायचा. त्याने अगदी माझ्या गळ्यात हात टाकायची चेष्टा केलेली नसली, तरी तो कधी माझ्यासमोर ‘लीन’ देखील झाला नाही. ज्याला एक ‘सोबत’ म्हणता येईल, त्यासाठी संग्राम अगदी परफेक्ट होता. पण माझा हा गैरसमज लवकरच दूर होणार होता…
—-
सीमा बन्सल
संग्राम घरी यायला लागला आणि राजवीर पुन्हा एकदा माणसात परतले. माणसात परतले, तरी त्यांचा माझ्याशी असलेला दुरावा कायमच होता. मी लग्न करून या घरात आले, त्या दिवसापासून एक ‘भोगवस्तू’ यापलीकडे त्यांनी तसेही माझ्याकडे कधी पाहिलेच नव्हते. ‘बायकांची अक्कल चुलीच्या पुढे जात नाही’ हा समज तर शिक्षण देखील बदलू शकलं नव्हतं. बन्सलांचे पिढ्या न पिढ्यांचे रक्त अंगात वाहात होते ना. त्यात आता खुर्चीत अडकलेले ते आणि अव्यंग अशी मी… त्यांच्या रागाचा सतत भडका उडणे यात नवल ते काय!
पण आता गोष्टी हाताबाहेर जायला लागल्या होत्या. पूर्वी एकदोनदा संग्रामसमोर माझा अपमान करून झालाच होता; पण हातातली लहान-सहान वस्तू फेकून मारण्यापर्यंत देखील त्यांची मजल जायला लागली होती. का सहन करत होते मी हे सगळे? एक दिवशी मात्र माझ्या संतापाचा स्फोट झाला आणि एका नव्या सीमाचा जन्म झाला. तो दिवस नेहमीसारखाच राजवीरच्या आरडाओरडीने सुरू झाला. उठल्याबरोबर समोर चहा दिसला नाही म्हणून भडका उडालेला होता. माझ्या तोंडूनही कधी नाही ते दुरुत्तर गेले आणि पुन्हा एकच भडका उडाला. बहुदा माझ्याकडून त्यांना दुरुत्तर काय, तर उत्तराची देखील अपेक्षा नसावी. राजवीर अक्षरश: संतापाने पेटून उठले होते. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा माझ्या चारित्र्यावर संशय घेतला; आणि तो देखील संग्रामसारख्या माणसावरून. मी फक्त कोसळून पडायची बाकी राहिले होते. आज राजवीरची इथवर मजल गेली? त्या संग्रामला काय मी घरात घेऊन आले होते? मला तर चहा देण्याशिवाय समोर येण्याची देखील परवानगी नव्हती. ते देखील सखू कुठे बाहेर गेली असेल तर. अन्यथा संग्राम आल्यावर सगळी सरबराई तीच बघायची.
तो दिवस कसा मावळला हे देखील माझ्या भण्ण डोक्यात आले नाही. रात्रभर तळमळ चालूच होती माझी. झोप तर दूरदूरवर पसार झाली होती. पुढचे काही दिवस मी जेवणाशिवाय खोलीबाहेर येणे देखील टाळत होते. त्यावरून देखील आरडाओरडी ऐकायला मिळाली होतीच. पण यावेळी मी सगळ्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या संतापाला ती वाट सुचली का, माझ्याच मनातला सैतान जागा झाला मला माहिती नाही, पण कोणत्या तरी एका क्षणी तो विचार माझ्या मनात अवतरला. राजवीरनी आपल्यावर जो आरोप केला, तो खरा असता तर? रादर, तो खरा ठरला तर? संग्रामचा रुबाबदार चेहरा, त्याचे ते बोलण्यातले माधुर्य… क्षणात मला स्वतःच्याच विचारांची लाज वाटली… मुस्काड फोडून घ्यावे वाटले स्वत:चे! मी पटकन उठले, स्वच्छ चेहरा धुतला आणि पहिल्यांदा देवापुढे दिवा लावला. क्षणात मला प्रसन्न आणि पवित्र वाटले. पण तो भ्रम होता… मनात नकळत कुठेतरी विषारी अंकुर उमलायला सुरुवात झालेली होती…
—-
राजवीर बन्सल
मी एक वाईट नवरा आहे! मला मान्य आहे ना. अंगातली रग असेल, पिढ्यान पिढ्यांचा बाईला कमी लेखण्याचा वारसा असेल… माझा माज देखील असेल; मी कधीही एखाद्या प्रेमळ शब्दाने किंवा कटाक्षाने बायकोला सुख देखील दिले नसेल… पण म्हणून मी मरण्याच्या लायकीचा होतो? आजूबाजूला येवढी रसरशीत जिवंत माणसे सतत चालता बोलताना, हसताना, जीवनाचा भरभरून आनंद लुटताना दिसत असताना असा लोळागोळा होऊन पडलेलो मी स्वत:चा किती धिक्कार करत असेन? या बाईला एकदाही मला समजून घ्यावेसे वाटले नाही? सतत नवरा माझा कसा रागराग करतो, मला कशी हीन वागणूक देतो याचे प्रदर्शन करत हिंडायचे…
नक्की कोणत्या क्षणी ते घडले मला माहिती नाही, पण इतक्या दिवसात पहिल्यांदा संग्रामच्या कपड्यांना मला परफ्यूमचा वास आला आणि मी सावध झालो. संग्राम तसा रुबाबदार, नीटनेटका राहणारा पण त्याला कधी असे अत्तराचे फवारे उडवून आलेले मी बघितले नव्हते. पण ही तर सुरुवात होती; अजून बरेच धक्के मला सहन करायचे होते. मी ते धक्के सहन केले देखील पण डॉ. नाडकर्ण्यांचे नाव पुढे करत, मला चक्क झोपेची गोळी द्यायला सीमाने सुरुवात केली आणि मी ख-या अर्थाने सावध झालो.
डॉ. नाडकर्णींसारख्या माणसाकडून मला अशी अपेक्षा कधीच नव्हती. पण पैसा भल्याभल्या माणसाला कसा मोहात पाडतो ते मी प्रत्यक्षात पाहत होतो. सीमाच्या ऑफरला मला फक्त दुप्पट करावे लागले आणि माझे भविष्य काय असणार आहे, हे मला नाडकर्णी नावाच्या त्या पोपटाने घडाघडा बोलून दाखवले. संग्राम खेळातल्या बुद्धिबळाच्या चाली आता ख-या आयुष्यात खेळायला लागला होता तर. त्यात राणी देखील त्याच्या बाजूला असल्यावर त्याला डर कसली म्हणा?
असो. तर माझ्या भविष्यात ‘स्लो पॉयझन’ होते हे तर मला कळले होतेच म्हणा. पण त्या जोडीला पैसा नावाचे शस्त्र कसे काम करते याचा अनुभव देखील आला होता. तेच शस्त्र तर चालवले मग मी संग्रामवर. ‘स्लो पॉयझन’ने मी हळूहळू मरत जाण्याची वाट बघायची… एखाद दोन वर्षे तरी सहजच, तोवर जगाला खोटे का होईना घाबरत लपून छपून सीमाला भेटत राहायचे आणि माझ्या मृत्यूनंतर पुन्हा जगाची, रीती-भातीची काळजी घेत निदान वर्षभर तरी सीमाशी लग्न अशक्य! त्यातून जगाला फाट्यावर मारून एकत्र आलेच आणि मी सगळी संपत्ती दान केल्याचे कळले तर? हे सगळे सहन करत राहायचे, एक खून देखील करायचा आणि मग हाताला यश लागेल तेव्हा लागेल. यश म्हणजे तरी काय? मिळाला तर थोडाफार पैसा आणि गळ्यात ही सीमा नावाची घोरपड. आता तर तिचे आकर्षण तरी उरले आहे का? पण, पण, पण… एकच खून करायचा आणि एकरकमी तीन कोटी घ्यायचे आणि पुन्हा कधीही एकमेकांच्या आयुष्यात यायचे नाही! संग्रामला सौदा पटला.
एकदा संग्रामला सौदा पटल्यावर पुढच्या गोष्टी सोप्या होत्या. नाडकर्ण्यांनी दिलेल्या दोन पिवळ्या गोळ्या मी संग्रामसमोरच घेतल्या. त्यानंतर थेट सहा तासानंतर जागा झालो.. नो साइड इफेक्ट! संग्रामला आता फक्त रविवारच्या हॉटेलमधील भेटीत सीमाला दोन लाल गोळ्या खायला घालायच्या होत्या आणि स्वत: दोन पिवळ्या गोळ्या घ्यायच्या होत्या. ‘प्रेमात यशस्वी होणे शक्य नसल्याने प्रेमी युगलाचा आत्महत्येचा प्रयत्न! तरुणीचा मृत्यू पण तरुणाला वाचवण्यात यश’. मी सोमवारच्या बातमीचा सुचवलेला मथळा माझ्यासकट संग्राम आणि नाडकर्णींना खळखळून हसवून गेला.
संग्राम गाणे गुणगुणत टिचक्या वाजत बाहेर पडला आणि मी नाडकर्णींना फोन लावला. दोन लाल गोळ्यांची ताकद दोन पिवळ्या गोळ्यात आणण्याची बुद्धिमत्ता माझ्याकडे थोडीच होती?
(लेखकाचे गुन्हेगारी कथालेखनावर प्रभुत्व आहे)