आपल्या खास व्यंगचित्र शैलीने सार्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस येत्या २९ जुलै रोजी ९८व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यंगचित्र कारकीर्दीचा आणि व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांचा विशेष लेख…
– – –
प्रशांत कुलकर्णी आणि मी आज आहोत, म्हणजे जिवंत आहोत ते शि. द. फडणीस यांच्यामुळे. २००५ साली प्रशांत कुलकर्णीचा मला फोन आला. `संजय, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांचा फोन आला होता. ते म्हणाले, त्यांना अहमदनगरला `शोध मराठी मनाचा’चा कार्यक्रमासाठी शि. द. फडणीस आणि आपण दोघे हवे आहोत. तू येशील का?’ मी हो म्हणालो, त्यावर प्रशांत म्हणाला, `मी एक गाडी बुक करतो, तुला मुंबईला घेतो, तिकडून पुण्याला शि. द. फडणीसांना घेऊन मग अहमदनगरला निघू’.
त्याप्रमाणे प्रशांत आदल्या दिवशी क्वालिस गाडी घेऊन माझ्याकडे आला. मी बॅग घेऊन गाडीत ड्रायव्हरजवळ बसलो. गप्पा मारत आम्ही पुण्याला शि.दं.कडे गेलो. शि.द. वक्तशीर, शिस्तशीर असल्यामुळे बॅगा भरून, आकर्षक कपडे घालून तयारच होते. आम्ही त्यांच्या घरी चहापान करून गाडीत बसायला निघालो. गाडीत बसता बसताच शि.द. म्हणाले, संजय ड्रायव्हरजवळ मी बसतो. शि.दं.चा हा बालसुलभ स्वभाव आम्हाला आवडला. सगळे हसलो. शि.द. खूप छान हसतात मन-मोकळं. लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकांसाठी अनेक वर्षे हास्यचित्रे रेखाटल्यामुळे त्यांचा स्वभाव मुलांसारखा असा मोकळा झाला असावा. प्रौढत्वी निजशैशवास जपणे म्हणजे काय हे शि.दं.कडे पाहिल्यावर कळतं.
आम्ही पुण्याहून निघालो आणि जुन्या आठवणींना उजळा देणारा गप्पांचा फड जमला. शि.द. ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले, मी आणि प्रशांत मागच्या सीटवर बसलो होतो. प्रशांतला थोडी डुलकी लागली होती. मला प्रवासात झोप येत नाही आवाजाने. त्यामुळे मी शि.दं.चीही झोप उडवत त्यांना गप्पा मारायला सक्ती करत होतो. ते पण सभ्यपणामुळे माझ्या प्रत्येक प्रश्नाचं, शंकेचं उत्तर देत होते. शि.दं.शी बोलता-बोलता माझं ड्रायव्हरकडे लक्ष गेलं, तर ड्रायव्हर सीटवर डोके टेकून झोपला होता. हायवेवरच्या गार वार्याने त्यालाही डुलकी लागली होती. मी लगेच ड्रायव्हरला हलवून जागं केलं. प्रशांतला उठवलं. गाडी हायवेच्या बाजूला थांबवायला सांगितली. स्टिअरिंगवर फक्त हात ठेवून झोपेत गाडी चालवणार्या ड्रायव्हरला खाली उतरवलं. त्याच्या तोंडावर पाणी मारायला सांगितलं आणि विचारलं की हा झोपेत गाडी चालविण्याचा काय प्रकार आहे? तो म्हणाला, सीझनला पैसे कमावण्याची संधी असते. त्यामुळे दोन दिवस दिवस-रात्र गाडी चालवत होतो… आम्ही त्याला गाडीतच पुरेशी झोप काढायला सांगितलं. त्याला अहमदनगरचा पत्ता दिला आणि तरतरीत होऊन त्या पत्त्यावर यायला सांगितलं. शि.दं.शी मी गप्पा मारत नसतो, आम्ही तिघे झोपलो असतो, तर कायमचे झोपलो असतो. शि.दं.च्या गप्पिष्ट स्वभावामुळे आम्ही जिवंत राहिलो.
त्यानंतर अहमदनगरच्या व्यासपीठावरून आम्ही कार्यक्रम गाजवला. सोबत व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिकही दाखवत असल्यामुळे प्रेक्षगृह हंशा, टाळ्यांनी दुमदुमले. कार्यक्रम झाल्यावर मी आणि शि.द. हॉटेलात एकाच रूममध्ये राहिलो होतो. प्रशांत दुसर्या रूममध्ये होता. त्यामुळे रात्रभर शि.द. आणि माझी गप्पाची मैफिल रंगली. त्यातून बर्याच गोष्टी कळल्या. शि.द. वयाच्या विशीत कुर्ल्याला, म्हणजे मी राहतो तिथे राहायचे. माझ्या घरापासून सायन किल्ला अगदी जवळ. शि.द. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये असताना त्याच सायन किल्ल्यावर पेंटिंग करायला जायचे. त्यांनी सायन किल्ल्याचेही पेंटिंग केले आहे. हे कळल्यावर कुर्ला परिसराबद्दल गप्पा झाल्या. त्यांनी ७५ वर्षांपूर्वी कुर्ला कसा होता हे सांगितलं. मी त्यांना सांगितलं, अजून त्या कुर्ल्यात काही फरक पडला नाही. आहे तसाच आहे. त्यावर आम्ही दोघे हसलो.
पहाटे हॉटेलच्या रूममध्ये खुडबुड ऐकू आली. पहाटेचे पाच वाजलेले असावेत. त्यावेळी माझी मध्यरात्र. मी गाढ झोपेत होतो. हळूच पांघरुणातून डोळे मिचमिचे करून पाहिलं तर शि.द. योगासने करीत होते. ते योग करीत होते आणि मी झोपेचे भोग घेत होतो. मलाच माझी लाज वाटली. त्यांना मी आळशी वाटू नये म्हणून मी काही स्ट्रेचिंग व्यायाम केले. त्यांनाही आनंद झाला. त्यावेळी मी पाहिलं की शि.दं.ची कपड्यांच्या बाबतीतही रसिकता आहे. आकर्षक शर्ट-पँटवर जाकीट, कधी मफलर, पॉलिश केलेले शूज, चप्पल, शूजसाठी वेगळी पिशवी. एवढंच नव्हे, तर स्टेजवर कार्यक्रम करण्यासाठी आयत्या वेळी बोर्ड, ईझल मिळत नाही म्हणून त्यांनी सहज नेता येईल असा खास घडीचा ड्रॉईंग बोर्ड बनवून घेतला होता. चित्रे लांबून प्रेक्षकांना दिसावीत यासाठी रेषा, बोल्ड ठळक लागतात. त्यासाठी खास बोल्ड, जाड मार्कर स्पंजचा बनवला होता. होतकरू व्यंगचित्रकारांनी त्यांच्याकडून कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
मी `मार्मिक’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करीत असे. त्यावेळी `मार्मिक’तर्फे आम्ही भरपूर जाहीर कार्यक्रम करीत असू. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुभाषजी देसाई यांचे कायम सहकार्य मिळत असे. `मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक असल्यामुळे आणि मी व्यंगचित्रकार असल्याने त्या आयोजनात माझाही सल्ला घेतला जात असे. एकदा `मार्मिक’चे त्यावेळचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत आणि सल्लागार संपादक वसंत सोपारकर म्हणाले, संजय यावेळी `मार्मिक’ वर्धापन दिनाच्या १३ ऑगस्टच्या अंकावर मुखपृष्ठावर काही वेगळं करता येईल का?’
मी म्हणालो, कुणीतरी खूप प्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकाराकडून मुखपृष्ठासाठी व्यंगचित्र काढून घेता येईल. त्यांना ती कल्पना आवडली. त्यांनी मला होकार दिला. म्हणून मी वसंत सरवटेंना फोन केला. कॅरिकेचरला `अर्कचित्र’ हा शब्द त्यांनीच दिला आहे. त्यांचा माझा चांगला परिचय होता. अनेकवेळा त्यांच्या जाहीर मुलाखती मी घेतल्या आहेत. अलिबागला विद्याधर गोखले, रमेश मंत्री, राजेंद्र मंत्री यांच्यासोबत आम्ही दोघेही जीपने `साहित्य यात्रा’ कार्यक्रमासाठी फिरल्यामुळे मैत्री झाली होती. अलिबागच्या वाचनालयात भर पावसात मी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे मला नाही म्हणणं त्यांना अवघड वाटलं असावं. त्यांनी `मार्मिक’चे मुखपृष्ठ बनवायला होकार दिला, पण दोन दिवसांनी ‘कामाच्या व्यापामुळे मुखपृष्ठ करायला जमणार नाही’ असं सांगितलं. मीच पुढाकार घेतलेला असल्याने आणि मुखपृष्ठ छपाईला चारच दिवस उरल्यामुळे आता काय करावं याचं माझ्यावर दडपण आलं. डोळ्यासमोर पटकन शि.द. फडणीसांचं नाव आलं. मी लगेच त्यांना फोन केला. त्यांनी लगेच होकार दिला. एवढंच नव्हे, तर दुसर्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हातात ब्रश घेतलेलं अप्रतिम चित्र पाठवून दिलं. ते चित्र तातडीने `मार्मिक’मध्ये आणायची कुशल जबाबदारी सामनाचे, प्रबोधनचे सुदेश म्हात्रे यांनी सांभाळली आणि ते चित्र `मार्मिक’च्या मुखपृष्ठावर छापून आले.
त्यानंतर `मार्मिक’चा व्यंगचित्र पुरस्कार कुणाला द्यावा अशी आमच्या संपादक मंडळात चर्चा झाली. माझी सगळ्या व्यंगचित्रकारांशी चांगली मैत्री असल्यामुळे मलाही शिफारस विचारण्यात आली. विकास सबनीस हे माझे अतिशय प्रिय मित्र असल्यामुळे मी त्यांचे नाव सुचविले. पण सबनीस `मार्मिक’चं मुखपृष्ठ आणि `रविवारची जत्रा’ करीत असल्यामुळे घरच्याच माणसाला पुरस्कार देणं बरोबर दिसणार नाही म्हणून मला दुसर्या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराचे नाव सुचविण्यास सांगण्यात आले. मला शि.दं.बद्दल आदर असल्यामुळे आणि आयत्यावेळी आम्हाला `मार्मिक’च्या मुखपृष्ठासाठी साथ दिल्यामुळे शि.द.चं नाव सुचवलं. सगळ्यांना ते आवडलं आणि विलेपार्ले येथे मा. बाळासाहेबांच्या हस्ते शि.दं.ना पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी शि.दं.ची जाहीर मुलाखत घ्यायला मला सांगण्यात आले.
कार्टूनिस्ट कंबाईन ही व्यंगचित्रकारांची संस्था १९८३ साली मा. बाळासाहेबांनी शिवसेना भवनात स्थापन केली. पण ते व्यस्त असल्यामुळे या संस्थेची वाटचाल बाळासाहेब आणि शि.दं.च्या मार्गदर्शनाखाली केली. दरवर्षी पुण्याला बालगंधर्व, पूनम हॉटेल येथे आमच्या चर्चा होत. शि.दं.चं तरूण व्यंगचित्रकारांना मार्गदर्शन मिळे. मी `कार्टूनिस्ट कंबाईन’चा अध्यक्ष झालो, तेव्हा प्रिय मित्र चारुहास पंडित आणि मी शि.दं.च्या घरी गेलो. त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यांचं महागडं कॉफी टेबल बुकही स्वाक्षरी करून मला भेट दिलं.
आणखी आठवणही रंजक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साठ वर्षे पूर्ण झाली होती. तेव्हा पुण्याच्या प्रकाश देवळे यांनी ‘बाळासाहेबांची साठी’ या विषयावर पुण्यातील बालगंधर्व नाट्य मंदिरात एक व्यंगचित्र प्रदर्शन आणि निवडक व्यंगचित्रकारांचा बाळासाहेबांच्या हस्ते सत्कार असा कार्यक्रम ठेवला होता. मी पुण्याला गेल्यावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार द. अ. बंडमंत्री यांच्या सोबत आधी देवळे यांच्या कार्यालयात गेलो. त्या कार्यालयाचे बाळासाहेबांच्या हस्ते उद्घाटन होते. मी चहा पिऊन निघत होतो, तेवढ्यात देवळे म्हणाले, `थांबा, आता बाळासाहेब इथेच येत आहेत.’ देवळे यांचं बोलणं पुरं होतं न होतं तोच बाहेर पाच मिनिटे फटाक्यांची माळ लागली. बाळासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्या आणि त्यांचे एका अनभिषिक्त सम्राटासारखे, रुबाबदार पावले टाकीत आगमन झाले. प्रचंड आत्मविश्वास असलेली देहबोली, आवाजातला दरारा, डोळ्यांतली धाक आणि चेहर्यावरचं स्मितहास्य यांनी बाळासाहेबांनी तिथे आल्या आल्याच सगळ्यांना जिंकलं.
त्यावेळी कार्यालयात साहेबांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्ही सात-आठ जणच होतो. देवळे यांनी साहेबांशी ओळख करून दिली. बाळासाहेब आम्हा व्यंगचित्रकारांच्या जवळ येताच म्हणाले, यांना मी ओळखतो आणि त्यांनी दुसर्या दिवशी कोण येणार आहेत, याची माझ्याकडे चौकशी केली. मी दोन मिनिटांत बाळासाहेबांना कोण कोण सत्काराला आहेत, ते सांगितलं. माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी शि. द. फडणीस, विजय पराडकर, मी, खलील खान, बंडमंत्री यांचा सत्कार झाला. बालगंधर्व नाट्यमंदिरात आम्ही सगळे एकत्र गेलो. पण बाळासाहेब आल्यामुळे हॉल तुडुंब भरलाच होता. अनेक लोक खाली बसले होते आणि हॉलबाहेरचा परिसरही गर्दीने व्यापला होता. आमचा सत्कार, पण आम्हाला चेहर्याने कुणी ओळखत नसल्यामुळे कुणी आत सोडेना. कार्यक्रम आत सुरू झाला.
तेवढ्यात बालगंधर्वच्या कॅन्टिनमध्ये शि. द. फडणीस यांना कल्पना सुचली. ते म्हणाले, मी मागच्या दाराने बाळासाहेबांना जाऊन भेटतो. बघतो काय म्हणतात ते! शि.दं.ना महाराष्ट्रात, पुण्यात नावाने, कीर्तीने, चित्रांतून आणि चेहर्यानेही लोक ओळखत असल्यामुळे त्यांना एकट्याला हॉलमध्ये सोडण्यात आलं. काही वेळाने शि.द. हसतमुखाने बाहेर आले. त्यांचा चेहरा कायम हसतमुखच असतो, त्यामुळे आम्हाला आत घेणार की नाही ते कळेना. शि.द. म्हणाले, `बाळासाहेबांनी सगळ्यांना आत बोलावलंय. चला लवकर.’
आम्ही खूश होऊन मागच्या दाराने आत हॉलमध्ये गेलो आणि दाराजवळ उभे राहिलो. कारण आम्हाला बसायला खुर्च्याच नव्हत्या. आम्हाला उभे असलेले पाहून बाळासाहेबांनी हातात माईक घेतला आणि पहिली रांग आमच्यासाठी रिकामी करायला सांगितली. त्यानंतर बाळासाहेबांच्या हस्ते आमचा सत्कार झाला. त्यानंतर त्यांच्यासोबत चहा आणि गप्पा झाल्या. शि.दं.नी कल्पकता आणि धाडस दाखवल्यामुळेच ही भेट झाली होती.
गेल्या वर्षी मी आमच्या कार्टूनिस्ट कॅफे क्लबच्या विद्यार्थ्यांना घेऊन शि.दं.ची मुलाखत घ्यायला घेऊन पुण्याला गेलो होतो. चारुहास पंडित यांनी त्यांची सृजन आर्ट गॅलरी मुलाखतीसाठी दिली होती. त्यावेळी शि.दं.चे वय पाहून आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा हात धरायचा प्रयत्न केला. पण शि.द. तरुणाच्या उत्साहाने चालत बोलत होते, हे पाहून विद्यार्थी अवाक् झाले आणि त्यांचा हात धरायला गेलेल्या तरूण व्यंगचित्रकारांच्या हे लक्षात आलं की शि.दं.चा हात कुणीही धरू शकणार नाही.
विद्यार्थ्यांना आम्ही शि.दं.ची दोनदा भेट घडवून आणली. ती मुलाखत फेसबुक यूट्यूबवर लाइव्ह झाल्यामुळे हजारो लोकांपर्यंत पोहोचली. त्या मुलाखती शि.दं.नी सगळ्या व्यंगचित्रकारांना तरूण व्यंगचित्रकरांना जो सल्ला दिला त्या सल्ल्यानेच हा लेख संपवितो. शि.द. त्यावेळी म्हणाले, `चित्राचा कॅनव्हास छोटा असला तरी चालेल. मनाचा कॅनव्हास मोठा असावा.’
व्यंगचित्र प्रदर्शनातून फडणीस यांना मानवंदना
कार्टूनिस्ट कंबाईन या संस्थेने व्यंगचित्रकलेला, व्यंगचित्रकारांना चांगले दिवस यावेत, व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून असंख्य कार्यक्रम करत असते. जेष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या ९८व्या वर्षात पदार्पणाचे निमित्त साधत संस्थेने एका आगळ्यावेगळ्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात फडणीसांच्या प्रसिद्धीला साजेशी व्यंगचित्रे लावली जातील. आलेल्या प्रचंड व्यंगचित्रातून निवडक व्यंगचित्रे निवडण्यासाठी अनुभवी, जाणकार व्यंगचित्रकारांची निवड समिती नेमण्यात आली आहे. हे व्यंगचित्र प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कलादालनात २९, ३० आणि ३१ जुलै या कालावधीत भरणार आहे.