अभिनेते भारत गणेशपुरे यांची प्रस्तुती असलेला, मानवेंद्र आर्टस् व व्ही. आर. प्रॉडक्शन निर्मित ‘आवर्त’ हा सत्यघटनेवर आधारलेला स्त्रीपात्री दीर्घांक रंगभूमीवर आला आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच विलेपार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. निर्माती–दिग्दर्शिका रमा नाडगौडा यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले असून लेखन त्यांनीच सुचरिता या नावाने केले आहे. त्यांना आलेल्या अनेक अनुभवांतून व त्यांना जाणवलेल्या प्रश्नांवरून या कलाकृतीची निर्मिती झाली आहे. त्या स्वत: अभिनेत्री, लेखिका, कवयित्री असून अनेक मालिका, चित्रपट व नाटकांत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या झी मराठीवर सुरू असलेली ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत त्यांनी साकारलेली कावेरी आजी लोकप्रिय झाली आहे.
माणसाचं रंग, रूप, स्थिती काहीही असो- ईश्वरानं दिलेल्या सगळ्या सुखांवर प्रत्येकाचा हक्क असतोच. कुरूप काळ्या देहालाही मृद्गंध भावतो, गुलाब आवडतो, पाऊस भिजवतो, देह हाकारतो आणि मन भुलवतं. सुखाचा अधिकार देवदत्त असतो. दैव आड येतं आणि मग सगळं जगणंच बिनसून जातं. अशाच सरी या नायिकेचा जीवनपट ‘आवर्त’मध्ये उलगडण्यात आला आहे. अव्यक्त वेदनांना वाचा मिळाली नाही तर त्या घुसमटून मिळेल तो मार्ग शोधतात. अशाच एका कोंडीची ही गोष्ट आहे.
आवर्त म्हणजे भोवरा, ज्यात अडकलेला जीव प्राणपणाने झुंजत रहातो. भोवर्यात गरगरून जाताना त्यातून बाहेर पडण्यासाठी सामान्य स्त्रीनं केलेल्या एकाकी संघर्षाची ही गाथा आहे. ‘अनेक सत्यघटनांवर आधारित नाटक आहे. रमा नाडगौडा यांनी नेपथ्य, संकल्पना, वेशभूषा यांचीही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. शिवकांता सुतार यांनी सरीची व्यक्तिरेखा साकारली आहे. सलग दीड तास, कोठेही कंटाळवाणे होऊ न देता एकपात्री नाटक सादर करणे हे एक मोठं आव्हान असते. शिवकांता यांनी ते समर्थपणे पेलले आहे. शिवकांता या अभिनेत्री व लेखिका असून अनेक चित्रपट, नाटक तसेच मालिकांमध्ये त्यांनी अभिनय व संवाद लेखन केले आहे. आजवर जवळपास १० वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अनिल नगरकर यांनी संदीप या पुरुष व्यक्तिरेखेसाठी समर्पक पार्श्वसंवाद म्हटले आहेत. दादा परसनाईक यांनी संगीत दिले असून या नाटकाचे सुत्रधार गोट्याकाका सावंत आहेत. भारत गणेशपुरे यांनी नाटकाचे निवेदन केले असून सयाजी शिंदे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी आणि अनिता दाते यांनी अभिप्राय दिला आहे.
—– —– —–
…आणि मला अनन्या सापडली!
प्रचंड इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती कशीही आली तरी आपण त्याला तोंड देऊ शकतो, हे दाखवणारा ‘अनन्या’ हा, याच नावाच्या गाजलेल्या मराठी नाटकावर आधारित मराठी चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित होतोय. मूळ नाटकाचे नाटककार-दिग्दर्शक प्रताप फड यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून ऋता दुर्गुळे शीर्षकभूमिकेत झळकते आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमवीव्हर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते आहेत ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया.
ऋता दुर्गुळे म्हणते, ‘या चित्रपटासाठी मला शारीरिक मेहनत घ्यावी लागणार, हे सुरुवातीपासूनच ठाऊक होते आणि त्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर राहणे आवश्यक होते. सगळ्यात आधी माझ्यासमोर वजन कमी करण्याचे आव्हान होते. या दरम्यानच माझे योगा आणि व्यायामाचे प्रशिक्षण सुरू होते. या काळात मी अक्षरश: रडायचे, कळवळायचे. एका वळणावर असे वाटत होते नको हे काही… सगळे सोडून द्यावे. परंतु मग चित्रपटाच्या टॅगलाईननेच मला स्फूर्ती दिली… ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे.’ मला दोन्ही हात नाहीत, हेच मी डोक्यात ठेवून पुढे वावरायला लागले आणि तेव्हाच मला ‘अनन्या’ सापडली. मी ‘अनन्या’शी एवढी एकरूप झाले होते की, पडद्यामागेही माझ्यात ‘अनन्या’च असायची.’
लेखक-दिग्दर्शक प्रताप फड म्हणाले, एकदा एके ठिकाणी वाचलेल्या या विषयावर काहीतरी करावं असं मला वाटलं. काही काळाने, २००८मध्ये रुईया कॉलेजची एकांकिका बसवण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी अनन्यसाधारण ‘अनन्या’ची कथा लिहिली. विशेष टॅगलाइनचं वाक्य एकांकिकेतदेखील होतं, नाटकातही आहे आणि आता सिनेमातदेखील तसंच ठेवलं आहे.
एकांकिकेत स्पृहा जोशी हिने नायिकेचे काम केले होते, तर या नाटकात ऋतुजा बागवेने रंग भरला होता; मग ऋता दुर्गुळेची निवड कशी केली, विचारता ते म्हणाले, सिनेमा करायचा ठरला तेव्हा मी ऋतुजाचीही ऑडिशन घेतली. ती या भूमिकेला न्याय देणारच. पण सिनेमाच्या पडद्यावर ‘अनन्या’चा चेहरा वेगळा असावा, यावर रवी जाधव आणि माझं पूर्वीच एकमत झालं होतं. रवी जाधव यांनी ऋताचे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक पाहिले आणि तिचे नाव त्यांनी मला सुचवले. मग रीतसर ऋताची ऑडिशन झाली आणि मग सिनेमाच्या पडद्यावरची ‘अनन्या’ मिळाली, असेही ते म्हणाले.