निद्रानाशाचा त्रास सुरू झाल्यावर सगळे अस्वस्थ होतात. पण प्रबोधनकारांनी त्याचाही फायदा उचलायचं ठरवलं. दिवसरात्र शेक्सपियरचा अभ्यास केला.
– – –
प्रबोधनकार लिहितात, `विवाह झाला का स्वाध्याय होत नाही, असे अनेक म्हणतात. माझा अनुभव अगदी उलटा आहे. स्वाध्यायाची खरी ओढ मला विवाहोत्तरच लागली.` त्यांचं लग्न झालं १९१०ला, म्हणजे वयाच्या २५व्या वर्षी. त्यांचा व्यासंग शाळकरी वयापासूनच सुरू होता. तरीही व्यासंगाची खरी समज यायला काही वर्षं जाऊ द्यावी लागतात. नवे प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं मिळवल्याशिवाय राहता येत नाही. तसं हे वय अभ्यासाची समज आणि पर्यायाने गोडी लागण्याचं वय होतं. विसाव्या शतकातल्या दुसर्या दशकातलं महाराष्ट्रातली सामाजिक-राजकीय परिस्थितीही वातावरण ढवळून काढणारी होती. त्याचाही प्रभाव प्रबोधनकारांसारख्या संवेदनशील बुद्धीच्या आणि वयाच्या अभ्यासकावर होणं स्वाभाविक होतं.
त्याशिवाय प्रबोधनकारांचा लग्नानंतरचा हा वर्षांचा काळ हा तसा सांसारिक आणि आर्थिक स्वास्थ्याचा होता. १९१४पासून ते सरकारी नोकरीतच लागले. हा त्यांचा आयुष्यातला व्यासंगासाठी कदाचित सर्वाधिक पोषक काळ असावा. अर्थात या नोकरीआधी आणि नंतरही त्यांचा अभ्यास सुरूच होता. पण या काळात ते अधिक निवांतपणे वाचन आणि लेखनही करू शकले.
लग्न झाल्यानंतर संसारात गुंतल्यामुळे अनेकांचा व्यासंग सुटतो. तसा प्रबोधनकारांचा सुटला नाही, याचं श्रेय त्यांच्या पत्नी रमाबाईंना नि:संशय द्यायला हवं. प्रबोधनकारांनीही ते दिलेलं आहे. आधी एकदा उद्धृत केलेले त्यांचे उद्गार इथे या संदर्भात पुन्हा द्यायला हवेत, `सौ.ने मला त्या संसारी जंजाळात कधी पडूच दिले नाही. माझ्या दैनंदिन गरजा काय, याचा तिने चोख आढावा घेतल्यामुळे बाह्य जगाच्या दलामलीत मला यथेच्छ भाग घेता आला. मुलेबाळे झाल्यावरही संसाराच्या कसल्याही विवंचना तिने माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाहीत. फक्त दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आम्ही रोख खंडणी भरली की `राज्याचा बंदोबस्त कसा काय आहे?` विचारण्याची जरूरच पडायची नाही.`
प्रबोधनकारांचे ते दिवस त्यांच्या मनासारखे मजेत सुरू होते. दिवसभर मुंबईच्या चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या ऑफिसात नोकरी. घरी आल्यावर जेवणानंतर रात्री ११ वाजेपर्यंत गाण्याबजावण्याची मैफल. त्यानंतर बिछान्यावर पडून १२ ते १ असं वाचन. आवश्यक असेल तर ते वाचन रात्री दोन वाजेपर्यंत चालायचं. त्यामुळे त्या काळाच्या मानाने उशिरा म्हणजे सकाळी आठनंतरच उठणं व्हायचं. शिवाय दादर ते ग्रँटरोड या लोकल प्रवासातही वाचन व्हायचं. तेव्हा आगगाड्या होत्या. त्यामुळे प्रवासात वेळ मिळायचा आणि कोपर्यातली निवांत जागाही.
ऑफिसातलं त्यांचं वेळापत्रकही अभ्यासाभोवती फिरायचं. ते हेड स्टेनोग्राफर होते. त्यांना मदतीला दोन टायपिस्ट होते. सव्वा अकराला टाइपरायटर उघडून ठेवला, शेजारी शॉर्टहँडची छोटी वही ठेवली की त्यांचं ग्रंथवाचन सुरू व्हायचं. अधूनमधून अचानक मोठा साहेब किंवा त्यांचे असिस्टंट टेबलाजवळ येऊन एखादं पत्रं डिक्टेट करायचे. ते वहीत शॉर्टहँडच्या चिन्हांनी उतरवून घेतलं की पुन्हा ग्रंथवाचन सलग दोन वाजेपर्यंत सुरू राहायचं. दोन ते तीन दुपार टिफिन, चहा आणि गप्पाटप्पा व्हायच्या. तीन वाजता मात्र टाइपरायटर फुलस्पीड सुरू व्हायचा. टिपून ठेवलेली किंवा लिहून दिलेली कितीही पत्रं असेनात, पाच वाजेपर्यंत सगळी पत्रं टाइप करून आवश्यक तिथ रवानाही व्हायची. सरकारी नोकरीच्या दहा वर्षांत दोन वाजेपर्यंत लेखन-वाचनाचा हाच क्रम सुरू राहिला. त्यातून पाच-सहा पुस्तकांचं लेखन झालं, असं प्रबोधनकार सांगतात. ऑफिसातल्या साहेबांनाही त्यांचं हे व्यासंगाचं व्यसन माहीत होतं. पण त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही, कारण रोजची कामं रोज वेळेत होत असल्यामुळे ऑफिसचं कोणतंही काम कधी अडलं नव्हतंच.
प्रबोधनकारांना एकदा अचानक निद्रानाशाचा आजार झाला. त्यांना झोपच येत नव्हती. दोन तीन दिवस झोपेशिवाय गेल्यावर ते त्यांचे फॅमिली डॉक्टर डॉ. अनंतराव रामचंद्र यांच्याकडे गेले. त्यांनी औषध सुरू केलं. पण गुण आलाच नाही. रात्री झोप नसली तरी त्यामुळे दिवसभर काम करताना थकवाही येत नव्हता. डॉक्टरांनीही हात टेकले. निद्रानाशावर तेव्हा ब्रोमाईड औषध म्हणून देत असत. त्याचा कमाल डोस बिनकामाचा ठरला. संध्याकाळी थंड पाण्याने आंघोळ करून डोक्याला ब्राह्मी तेल लावण्याचा प्रयोगही पाच-सहा दिवस चालला. त्याचाही काही उपयोग झाला नाही.
निद्रानाशामुळे दुसरा कुणी बेचैन झाला असता. पण प्रबोधनकारांनी निद्रानाशाचा फायदा घ्यायचं ठरवलं. ते लिहितात, `विचार केला. झोप येत नाही ना? न येऊ दे. बाकी प्रकृती ठाकठीक आहे. थकवा नाही. हापिसातले नि घरचे स्वाध्यायाचे, लेखनाचे काम पूर्वीसारखेच जोमदार चालू आहे. मग कराच कशाला झोपेची एवढी पर्वा? लागेल तेव्हा लागेल.` निद्रानाशामुळे मिळालेल्या वाढीव वेळेचा फायदा घेण्यासाठी त्यांनी शेक्सपियरच्या नाटकांचा समग्र आणि शास्त्रशुद्ध अभ्यास करायचं ठरवलं. त्यासाठी गोविंदरावांच्या दुकानातून शेक्सपियरच्या नाटकांचा आकर्षक संच आणला. सोबत जेम डिक्शनरीही आणली. ही जगातली सर्वात लोकप्रिय मिनी डिक्शनरी होती आणि आजही ती लोकप्रिय आहे. त्यांना पुस्तकं उत्तम बांधलेलीच लागत. फाटकी पुस्तकं चालत नसत. त्यामुळे एखादं दुर्मिळ पुस्तक फाटलेलं मिळालं तरी नेहमीच्या बाइंडरकडून शिवून घेत.
नव्या पुस्तकांच्या सोबत त्यांनी शेक्सपियरचा रात्रंदिवस अभ्यास सुरू केला. शब्द अडला की डिक्शनरी सोबत असेच. ते लिहितात, `एका इंग्रेज लेखकानेच दिलेली सूचना आम्ही तंतोतंत पाळली होती. ती अशी, मेक डिक्शनरी युअर स्लेव्ह.` शेक्सपियरच्या नाटकांत सुंदर रचना आढळली की लाल रेघ आणि एखादा तात्त्विक विचार किंवा सुभाषित आढळलं की निळी रेघ, असं सुरू झालं. रात्रंदिवस, घरीदारी, लोकलमध्ये, ऑफिसमध्ये हेच सुरू होतं. दोन महिन्यांनी झोप येऊ लागली. तोवर निद्रानाशाचा पुरेपूर फायदा घेऊन झाला होता. सहा नाटकं आणि सर्व सॉनेट यांचा अभ्यास होत आला होता.
एक दिवस कल्पना सुचली की निळ्या रेघांनी ठळक केलेली शेक्सपियरची सुभाषितं विषयवार टिपून काढली तर, एक चांगला संदर्भग्रंथच तयार होईल. इतका मजकूर हाताने लिहिणं हाडाच्या टायपिस्टला मान्य नव्हतंच. त्यासाठी टाइपरायटर हवा होता. ३५० रुपयांचा टाइपरायटर नेहमीच्या ७५ रुपये पगारात परवडणारा नव्हता. हे माहीत असूनही प्रबोधनकारांना त्याची ओढ लागली होती. डोक्यात दुसरा विषयच येईना. रात्री त्याचीच स्वप्नं पडायची. चर्चा गप्पांतही तोच विषय असायचा. जवळपास तीन महिने असं सुरू होतं. अखेर त्यांच्या इच्छाशक्तीचा विजय झाला.
दादरच्या शिवाजी पार्कची संकल्पना रचणारे आर्किटेक्ट इंजिनिअर द्वारकानाथ राजाराम उर्फ बाळासाहेब वैद्य यांचं एक काम आलं. त्यांच्या एका अशिलाला लंडनच्या प्रीव्ही काऊन्सिलमध्ये अपिलात जायचं होतं. त्यासाठी जवळपास साडेतीनशे पानांचं बिनचूक आणि रेखीव टायपिंग करून हवं होतं. एका पानाला दोन रुपये ठरले. त्यानुसार सातशे रुपयांपैकी साडेतीनशे रुपये वैद्यांनी अडव्हान्स म्हणून दिला. आणि त्यातून कोरोना कंपनीचा टाइपरायटर घेऊन ते घरी आले. ते काम पंधरा दिवसात करून दिलं. मग मात्र त्यावर शेक्सपियरची सुभाषितं लिहायला सुरुवात केली. त्यांचे जानी दोस्त बाबूराव बेंद्रे डिक्टेट करायचे आणि प्रबोधनकार टाइप करायचे, असा क्रम सतत तीनचार महिने रोज रात्री आणि रविवारी असा चालला. दोघांनाही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची अनिवार इच्छा होती. या प्रयत्नातून ते साध्य होत होतं.
शेक्सपियरची सुभाषितं टाइप केलेली प्रत घेऊन प्रबोधनकार गोविंदरावांकडे गेले. गोविंदरावांचं फक्त पुस्तकाचं दुकानच नव्हतं, तर ते स्वतः प्रकाशकही होते. त्यांना आवडलं तर ते प्रकाशित करतील आणि नाही जमलं तर इंग्लंड अमेरिकेतल्या एखाद्या प्रकाशकाकडे पाठवतील, असा प्रबोधनकारांचा विचार होता. गोविंदरावांनीही ती प्रत बारकाईने चाळली आणि त्यांनी `द ब्युटीज ऑफ शेक्सपियर` हे रेव. विल्यम डॉडचं पुस्तक प्रबोधनकारांसमोर धरलं. ते पुस्तक बघून प्रबोधनकार थक्कच झाले. त्यांनी केलेल्या सुभाषितसंग्रहासारखंच काम डॉड नावाच्या ब्रिटिश अभ्यासकाने आधीच करून ठेवलं होतं. त्यावर गोविंदराव म्हणाले ते महत्त्वाचं होतं, `केशवराव, वरमण्याचं कारण नाही. डॉड आणि इतर विद्वानांनी शेक्सपियरची सुभाषितं विषयवार एकत्र करण्याचे जे परिश्रम केले आहेत, तेच तुम्ही केलेत. हे काही कमी लेखण्यासारखे नाही. परिश्रमांची त्यांची नि तुमची पातळी एकच आहे. एवढे जबरदस्त परिश्रम तुम्ही केलेत, याबद्दल मला तुमचा खरोखरच अभिमान वाटतो. तुमच्या स्वाध्यायशीलतेची ही मख्खी जाणूनच माझे दुकान मी तुमच्या उपयोगासाठी मुक्तद्वार वापरू देत असतो. विचारलंय का कधी तुम्हाला बिलासाठी? नाही ना? अहो, आहेत कुठे असले अभ्यासू लोक? हे डॉड्ज ब्युटीज ऑफ शेक्सपियर मी तुम्हाला बक्षीस देत आहे.`
विल्यम डॉडने शेक्सपियर सुभाषितसंग्रह अठराव्या शतकातच तयार केला होता.
डॉड हा एक बिलंदर धार्मिक प्रवचनकार होता. त्याने केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे त्याला फाशीवर चढवलं होतं. पण आजही तो त्यासाठी नाही तर शेक्सपियरवरच्या पुस्तकांसाठीच आठवला जातो. प्रबोधनकारांचे हे परिश्रम पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले नाहीत, तरी वाया निश्चितच गेले नाहीत. त्यांनी पुढे उत्तम नाटकं लिहिली. शिवाय त्यांच्या इतरही लिखाणात, वक्तृत्वात आणि जगण्यातही जबरदस्त नाट्यमयता दिसते. त्यावरचा एक प्रभाव हा या शेक्सपियरचाही आहेच.