भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना टीव्हीचा बूम समोर आला की नेमकं काय होतं ते त्यांच्या जवळच्या माणसांनाही कळत नाही. एरवी बोलायला एवढे जबाबदार, सुसंस्कृत वाटणारे दादा- पण, टीव्हीचा बूम आणि कॅमेरा समोर आला की त्यांच्या अंगात संचारतं… आणि त्यानंतर ते जे काही तारे तोडतात त्यावर टीव्ही चॅनल्स, सोशल मीडियाचे दोन दिवस निघतात.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर त्यांना कुठूनतरी माहिती मिळाली की विरोधक मतदारांकडून माहिती गोळा करताहेत, त्यात बँक खात्याची माहितीही विचारून घेतली जात आहे. म्हणजे पेटीएमद्वारे मतदारांना एकेक हजार रुपये देणार आहेत. आता कोण शहाणा माणूस मतदारांना मतांसाठी पेटीएमवरून पैसे देऊन कायद्यात अडकेल? पण दादांना तसं वाटलं. आणि त्यांनी थेट आपल्या लाडक्या ईडीलाच मध्ये ओढले. मतदारांनी अशा रीतीनं पैसे घेतले तर मतदारांची ईडीकडून चौकशी होऊ शकते, असं जाहीरपणे त्यांनी सांगून टाकलं. सुरुवातीला वाटलं, ते विनोदानं बोलले असावेत. पण खरंच त्यांनी गंभीरपणे मतदारांना इशारा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील भाषणात ईडीचा घरगडी असा उल्लेख केला होता, त्यानुसार खरोखरच ईडी हा भारतीय जनता पक्षाचा घरगडी असल्यासारखेच दादांचे हे वक्तव्य होते. त्यावर महाराष्ट्राचं खूप मनोरंजन झालं आणि कोल्हापूरच्या मतदारांनीही दादांच्या या इशार्याला मतपेटीतून उत्तर देण्याचा निर्धार केला.
पक्षाच्या आदेशानुसार दादांनी २०१९मध्ये कोथरूडमधून विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्यावर कोल्हापुरातून पळून गेले म्हणून टीका झालेली. त्यानंतर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितलेलं की, कोल्हापुरातील कुणीही राजीनामा द्यावा, तिथून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन. दुर्दैवानं कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक लागली. तिथे दादा उभे राहिले नाहीत, पण दादांनी उमेदवार उभा करून निवडणूक प्रतिष्ठेची केली. आधी कोल्हापुरात शिवसेनेचा आमदार होता, पण २०१९मध्ये ती जागा काँग्रेसनं जिंकली. पोटनिवडणुकीत आघाडीच्या धोरणानुसार जागा काँग्रेसला गेल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नाराज झाले. ते स्वाभाविकही होते. शेवटी शिवसैनिक निष्ठावान असतो आणि तो आदेश पाळतो. परंतु दादांना वाटत होते, की शिवसैनिक काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर मतदान करणार नाहीत, ते भाजपच्या कमळावर शिक्का मारणे पसंत करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ऑनलाइन सभा घेऊन शिवसैनिकांना काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याच्या बंधनात बांधलं. त्यामुळे दादांच्या त्या अपेक्षेवरही पाणी पडलं आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर लगोलग दादा हिमालयात निघाल्याची व्यंगचित्रं, मीम्स, विनोद यांचा पूर आला. सोशल मीडियावर फक्त दादांच्या हिमालयगमनाची चर्चा होती.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी व भाजपच्या माजी नगरसेवक जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते. मात्र उत्तर प्रदेशासह चार राज्यांत मिळालेला विजय, केंद्रीय तपास यंत्रणांनी आघाडीच्या नेत्यांवर केलेल्या कारवायांचा उन्माद यांच्या बळावर कोल्हापूरची जागा सहज जिंकू असा आत्मविश्वास आला होता. त्यामुळे २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नातेवाईक असलेल्या सत्यजित कदम यांना भाजपने उमेदवारी दिली. कोल्हापूर मतदारसंघावर दीर्घकाळ शिवसेनेचे वर्चस्व राहिल्याने गेल्या निवडणुकीत दुसर्या स्थानावर राहिलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची आशा होती. त्यासाठी त्यांनी शक्तिप्रदर्शन आणि प्रयत्नही चालवले होते. मात्र आघाडीच्या धोरणानुसार जागा काँग्रेसला गेली. नाराज क्षीरसागर यांची मातोश्रीवर बोलावून समजूत काढण्यात आली.
पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीमार्फत उभ्या राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव १९ हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या. त्यांना ९७ हजार ३३२ तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७८ हजार २५ मते मिळाली. गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांनी नेटाने लढवलेली निवडणूक आणि त्याला निष्ठावंत शिवसैनिकांनी दिलेली साथ यामुळे महाविकास आघाडी जागा टिकवू शकली. नाहीतर भाजपच्या आक्रमणापुढे ही जागा टिकवणे कठीण झाले असते. थोडी कच खाल्ली असती तरी कोल्हापूरचे पंढरपूर कधी झाले, याचा पत्ता लागला नसता.
राज्यात गेल्या अडीच वर्षे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यातील सत्तासंघर्ष अधिकाधिक तीव्र होत असतानाच पोटनिवडणुकीत आघाडीने मिळवलेला विजय महत्त्वपूर्ण आहे. कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची नगरी आहे, इथे जातीयवादी कार्ड चालत नाही. पारंपारिक शेतकरी कामगार पक्षाचा हा बालेकिल्ला असल्यामुळे मतदार वैचारिकदृष्ट्याही प्रगल्भ आहेत. अशा या शहरात भाजपने प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात मुख्य मुद्दा बनवला आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न केले. निवडणुकीचे वारे वाहू लागले तेव्हा ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची हवा होती आणि हिंदुत्वाला पोषक वातावरण होते. ‘पावनखिंड’ चित्रपटानेही काहीएक वातावरणनिर्मिती केली होती. आघाडीच्या सुदैवाने या सिनेमांची हवा लवकर विरून गेली आणि पुढे निवडणूक रुळावर आली. राजर्षी शाहू महाराजांची ही नगरी धार्मिक विद्वेषाला थारा देत नाही, हे या निमित्तानेही पुन्हा एकदा सिद्ध झाले.
कोल्हापूरच्या राजकारणावर महाडिक परिवाराचे वर्चस्व होते. २०१९पूर्वीची परिस्थिती पाहिली, तर एकावेळी धनंजय महाडिक खासदार, महादेवराव महाडिक विधानपरिषदेचे आमदार आणि अमल महादेवराव महाडिक कोल्हापूर दक्षिणमधून आमदार अशी सत्तास्थाने त्यांच्याकडे होती. सगळ्या सहकारी संस्थांवरही त्यांचे वर्चस्व होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत आधीचे वैर विसरून सतेज पाटील यांनी पक्षादेश मानून धनंजय महाडिक यांना पाठिंबा दिला. परंतु लगेचच होणार्या विधानसभा निवडणुकीत महाडिक परिवाराने सतेज पाटील यांच्याविरोधात अमल महाडिक यांना उभे केले. त्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा पराभव झाला. परंतु महाडिक परिवाराच्या र्हासाची बीजेही त्याच निवडणुकीत रोवली. आणि पाचसहा वर्षांतच संसदीय राजकारणातील महाडिक परिवाराचे नामोनिशाण सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी मिटवून टाकले. गोकुळच्या सत्तेतून महाडिक यांना बाहेरचा रस्ता दाखवला. महाडिक परिवाराबरोबरच त्यांच्या पाठिशी असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनाही त्यांनी प्रत्येक निवडणुकीत नामोहरम केले. विधानसभा निवडणुकीतही दोन्ही काँग्रेससह शिवसेना नेत्यांची मोट यशस्वीपणे बांधून त्यांनी भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला पंचगंगेच्या पलीकडे रोखण्यात यश मिळवले.
महाविकास आघाडीचे नेते एकदिलाने कामाला लागले असताना अख्ख्या राज्यातला भाजप कोल्हापुरात प्रचारासाठी उतरवला गेला होता. नुसता प्रचार केला असता तरी हरकत नव्हती. परंतु त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला. त्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला. गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दा काढला, तेव्हा कोल्हापूरचा प्रचार शिगेला पोहोचला होता. भाजपने त्याचीच री ओढत निवडणूक प्रचार विकासकामाऐवजी धार्मिक वळणावर नेला. चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, सुनील देवधर अशा भाजपच्या नेत्यांची फौज शाहूनगरीत हिंदुत्वाचा भोंगा वाजवीत फिरू लागली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन सभा घेऊन भाजपाचे हिंदुत्व किती बेगडी आणि दुटप्पी आहे हे सोदाहरण पटवून दिले. देवेंद्र फडणवीस यांची विराट सभा कोल्हापुरात घेण्यात आली, परंतु त्या सभेला जमलेली गर्दी मात्र बहुतांश कोल्हापूर शहराच्या बाहेरची होती. म्हणजे सभेला गर्दी होती, परंतु ते मतदार नव्हते. या सभेत त्यांनी नेहमीच्या आक्रस्ताळ्या शैलीत जोरदार भाषण केले आणि भाषण संपवताना उमापती महादेव की जय, सनातन हिंदू धर्म की जय… अशा घोषणा देऊन धार्मिक ज्वर वाढवण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांचा हाच प्रयत्न भाजपच्या अंगाशी आला. निवडणुकीच्या राजकारणात हे लोक इतक्या टोकाची धार्मिकता आणणार असतील तर यांचे काही खरे नाही आणि यांच्या उमेदवाराला निवडून दिले तर आपलेही काही खरे नाही, असा विचार कोल्हापूरच्या काठावरच्या मतदारांनी केला. आणि फडणवीस यांच्या या सभेचा फटका भाजप उमेदवाराला बसला.
चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरुवातीपासून खूप बढाया मारल्या. मतदारांवर ईडीची कारवाई असो, तीन लाख कार्यकर्ते आणून प्रत्येक मतदारामागे एक कार्यकर्ता ठेवण्याचे विधान असो, मतदारांना ते पटले नाही. खरेतर काँग्रेसच्या बाजूने राज्याची सत्ता होती आणि सत्तेचे म्हणून जे काही दुर्गुण असतात ते आपसूक येतातच. अशा परिस्थितीत भाजपने प्रचारात संयम बाळगला असता, नेत्यांनी आक्रस्ताळेपणा केला नसता, उमेदवाराने शिवराळपणा केला नसता तर कदाचित निवडणुकीचे वेगळे चित्र दिसू शकले असते. अर्थात काहीही झाले, तरी राजर्षी शाहूंच्या नगरीत कमळ फुलणे कठीणच होते. झालेही तसेच. या विजयाने महाविकास आघाडीला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना कोल्हापुरातून मिळालेला हा आत्मविश्वास निश्चितच उपयोगी ठरणार आहे.