अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, रवि-मंगळ-बुध सिंहेत, शुक्र कन्येत, केतू वृश्चिकेत, चंद्र धनुमध्ये, त्यानंतर मकर, कुंभ मेषेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरू-नेपच्यून कुंभेत. २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, २५ ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थी.
—–
मेष – अनेक शुभ गोष्टी घडण्याचे योग आहेत. पंचमेश रवीचे स्वराशीत भ्रमण होत असल्याने संधी चालून आली आहे. उच्च शिक्षणाबाबतचे निर्णय सफल होतील. शेअर बाजारात व त्वरित पैसे कमावण्याचे जे मार्ग असतील, त्यात चांगले लाभ होतील. लाभातल्या वक्री गुरू-नेपच्यून बरोबरचे रवी, मंगळ, बुधाचे समसप्तक योग लाभदायी ठरतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल्यामुळे आनंद द्विगुणित होईल. राजकीय क्षेत्राशी संबंधित मंडळींना अनपेक्षित लाभ होतील.
वृषभ – सुखस्थानातले रवीचे आगमन कौटुंबिक आनंदात भर घालणार आहे. लग्नात असणारा राहू आणि चतुर्थात असणारा मंगळ यामुळे खासकरून महिला वर्गाने घरात, कामाच्या ठिकाणी डोके शांत ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा वादविवादाचे प्रसंग ओढवतील. सरकारी, निमसरकारी क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीसाठी हा आठवडा फायद्याचा. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक सुधारेल. विद्यार्थीवर्गास सुवार्ता कानावर पडेल.
मिथुन – येत्या आठवड्यात उत्साह वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात थोडी मेहनत घेतली तर मोठे यश प्राप्त होणार आहे. नवीन क्षेत्रात भरारी घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. तृतीयेतल्या मंगळाची षष्ठ स्थानावरची दृष्टी असल्याने काहीजणांना कानाचे दुखणे, उष्णतेमुळे जखमा, त्वचेवर रॅश अशा आरोग्याच्या समस्या राहतील. नोकरीनिमित्त भरपूर प्रवास होईल. नोकरदार मंडळींचा कामात कास लागणार असून त्यात यश मिळेल. महिलावर्गाची सुखदायक काळ.
कर्क – या आठवड्यात कमी श्रमात जास्त लाभ मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगले लाभ होतील. द्वितीय स्थानातल्या रवी मंगळाच्या भ्रमणामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तिखट शब्दामुळे एखाद्याचे मन दुखावणार नाही, याची काळजी घ्या. २२ आणि २३ ऑगस्ट रोजी मन अशांत राहील. एखादी चिंता जाणवेल. सप्तमातल्या वक्री शनी-प्लुटोमुळे व्यावसायिक कामात तणाव जाणवतील.
सिंह – राशीस्वामी रवीचे लग्नातील भ्रमण फायद्याचे ठरणारे असेल तरी आधीचे मंगळाचे सिंह राशीतले भ्रमण सुरू असल्याने डोक्यावर पेटती चूल ठेवल्याचा अनुभव येईल. पुढले १५ दिवस डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम चालवावे लागणार आहे. या तत्त्वाचे काटेकोर पालन करा. अन्यथा कौटुंबिक वाद आणि व्यावसायिक हेवेदावे निर्माण होतील. सप्तमातले गुरू महाराज कार्य तडीस नेतील. विद्यार्थीवर्गासाठी शुभकाळ.
कन्या – या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. व्ययातले रवी, मंगळ आणि बुधाचे भ्रमण यामुळे खिशाला चाट बसणार आहे. देशात, परदेशात प्रवासाचे योग. परदेशस्थित व्यवसायात वृद्धी होईल. जनसंपर्क क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींना चांगले दिवस. कौटुंबिक आनंद साजरा होईल. पराक्रम स्थानातला केतू उत्साह वाढवेल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल.
तूळ – येत्या आठवड्यात चैनीसाठी पैसे खर्च होतील. पंचमातले वक्री गुरू आणि लाभातले रवी, मंगळ, बुध अनपेक्षित लाभ देतील. राजकीय व्यक्तींना विशेष लाभाचे योग आहेत. व्यवसायातून चांगले पैसे मिळतील. डिजिटल मार्केटिंग, जाहिरात क्षेत्राबरोबरच टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात काम करणारी मंडळी फायद्यात राहतील. विद्यार्थीवर्गास शैक्षणिकदृष्ट्या हा आठवडा आनंदाचा.
वृश्चिक – व्यवसाय करणार्यांना हा आठवडा चांगला जाणार आहे. व्यवसायात एखादे नवीन कॉन्ट्रॅक्ट होईल, नवी ऑर्डर मिळेल. सरकारी क्षेत्रातले एखादे काम पदरात पडेल. समाजात पत, प्रतिष्ठा वाढेल. राजकारणी मंडळींना मानसन्मानाचा काळ. मोठ्या अधिकारांचा हक्क मिळेल. तृतीय स्थानातल्या वक्री शनीमुळे कामात दिरंगाई होईल, पण अपेक्षित फायदा मिळेल.
धनू – यश मिळण्यासाठी अगदी शुभ काळ आहे. परदेशस्थित मित्र-मैत्रिणीचा सहवास लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल सन्मान मिळेल. नावलौकिक वाढेल. जमीनजुमल्याचा प्रश्न सुरू असेल तर नक्की लाभ होईल. विद्यार्थीवर्गास परदेशात शिक्षणाच्या संधी मिळतील.
मकर – आठवड्याच्या सुरुवातीचा काळ मानसिक तणावात जाणार आहे. अष्टमातल्या रवी-मंगळाच्या भ्रमणामुळे शारीरिक व्याधी निर्माण होतील. विशेष म्हणजे पोटाच्या खालच्या भागात त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. प्रेमप्रकरणात सावध राहा, फसवणूक होईल. चुकीच्या आणि फसवणूक करणार्या फोन कॉलपासून सावध राहा. शेती व्यवसाय, विद्युत उपकरणाच्या क्षेत्रात काम करत असाल तर लाभ होतील.
कुंभ – सप्तमातले रवी-मंगळाचे भ्रमण व्यावसायिक यशप्राप्तीसाठी शुभ राहील. नवीन कामे हातात पडतील. कुंडलीतील रवी-मंगळ-बुध आणि राहू-केतू-केतू यांच्या केंद्रयोगामुळे अनेक अडचणी निर्माण होतील. कौटुंबिक वादाला तोंड फुटेल. वक्री शनीचे व्ययातले भ्रमण खर्च वाढवेल. गर्भधारणा झालेल्या महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
मीन – शारीरिक स्वास्थाबाबत विशेष काळजी घ्यावी. इलेक्ट्रिक साहित्यापासून लांब राहा. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. खाण्याची पथ्ये पाळा, खास करून जंक फूडपासून लांब राहा. प्रतिस्पर्धी विरोधकांवर यश मिळवाल. प्रशासकीय सेवेत काम करणार्या मंडळींना वर्चस्व सिद्ध करायला लावणारा काळ. राजकीय व्यक्तींना यश मिळवण्यासाठी अनुकूल काळ.