• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

देशाचे आणि लसीचे प्रेरणास्थान

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
August 18, 2021
in टोचन
0

लसीच्या प्रमाणपत्रावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापल्यावरून माझ्यात आणि माझा मानलेला परममित्र पोक्या याच्यात जबरदस्त वाद झाला. माझं म्हणणं असं होतं की त्यांचं सरकार आहे, ते काय वाटेल ते करतील. तिथे आपल्यासारख्यांना कोण कुत्रं विचारतो! ते मोदींचं छायाचित्र छापतील, नाहीतर अमित शहांचं छापतील. निर्मला सीतारामन यांचं छापतील, नाहीतर स्मृती इराणी यांचं छापतील. तो त्यांचा प्रश्न आहे. भाजपच्या सगळ्या मंत्र्यांचं छायाचित्र छापलं तरी माझी काही हरकत नाही पण पोक्याला ते पटेना. तो सारखं आपलं हे प्रामाणिकपणाला धरून नाही, हेच टुमणं लावत होता. राज्यसभेतही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी चोख उत्तर दिलं, लसीचा संदेश प्रभावीपणे पोचविण्याची सरकारची नैतिक आणि धोरणात्मक जबाबदारी आहे, हे ओळखून पंतप्रधान मोदींचे छायाचित्र प्रमाणपत्रावर छापण्यात आलं. तरीही पोक्याच्या रागाचा पारा चढलेलाच होता.
तो तावातावाने म्हणाला, एक तर पुरेशी लस पुरवत नाहीत आणि काही केंद्रांवर तर आदल्या दिवशी रात्रभर लाइन लावून दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत लस मिळेलच याची शाश्वती नाही. काहीजणांची तर एक डोस मिळताना मारामार होतेय, दोन डोस सोडूनच द्या. एवढं करून मिळणार काय तर मोदींचा फोटो असलेलं प्रमाणपत्र. त्याऐवजी ‘लसीसाठी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असं जिवाच्या आकांताने झगडून अखेर लस मिळवणार्‍या त्या त्या लसवंताचं छायाचित्र त्या प्रमाणपत्रावर छापलं असतं तर त्याने लसीसाठी भोगलेल्या त्रासाचा श्रमपरिहार झाला असता, असं पोक्या म्हणाला, तेव्हा मलाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. लसीचा डोस असो वा व्हिस्कीचा डोस असो तिथे भलत्याच माणसाने लुडबूड करू नये, असं मला उगाचच वाटून गेलं.
मागे आम्ही एकदा आमच्या एरियात एका उत्सवात दारू पिण्याची आंतरविभागीय स्पर्धा ठेवली होती. विभागातील नामवंत पिणार्‍यांनी त्यात भाग घेतला होता. पोक्याच परीक्षक होता. विजेत्यांना आम्ही त्यांच्या पिण्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे पहिली, दुसरी, तिसरी बक्षीसे इम्पोर्टेड आकर्षक खंबास्वरूपात दिली. तेव्हाही सोबत त्यांना देण्यात येणार्‍या प्रशस्तीपत्रकावर महाराष्ट्राचा आद्य पियक्कड पुरुष तळीराम याचा फोटो छापावा, अशी मागणी विभागातील आमच्या अड्ड्यावर येणार्‍या शेकडो लोकांनी केली होती. त्याचा फोटो कुठे मिळेल यावर समारंभाच्या आधी आठ दिवस पिऊन खूप चर्चा झाली. राम गणेश गडकरींनी ते पात्र नाटकात इतक्या जिवंतपणे रंगवलं म्हणजे ती व्यक्ती कुठेतरी अस्तित्वात असलीच पाहिजे, असा निष्कर्ष एकाने काढला. असं काही नसतं, असं सांगून मी त्या वादावर अखेर पडदा टाकला आणि शेवटी त्यावर खंब्यांचं छायाचित्र टाकण्यात आलं.
आज त्या लस प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोवरून त्या प्रसंगाची आठवण झाली. मी पोक्याला समजावणीच्या स्वरात म्हटलं, तो फोटो किती आकर्षक आहे पहा. मला तर तो पाहिल्यावर ऋषीतुल्य रवींद्रनाथ टागोर यांची आठवण येते आणि मान खाली झुकते. तो फोटो काढण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असेल ते लक्षात घे. आज ते म्हणजेच देश आहे आणि देश म्हणजेच ते आहेत. त्यामुळे मी तर म्हणतो लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रत्येकाला केंद्र सरकारने बक्षीस म्हणून गोविंदा पथके पथकातील सवंगड्यांना देतात तशा मोदींचे फोटो छापलेल्या बॉड्या द्याव्यात आणि महिलांना साड्या द्याव्यात. हा काही टिंगल टवाळी करण्याचा प्रश्न नाही. जे आहे ते आहे.
आज आपल्या देशात लसीचे दुर्भिक्ष्य असताना मोदी सरकारने कोट्यवधी रुपयांची लस विदेशातील नागरिकांसाठी मायेच्या ममतेने पाठवून दिली, यालाच मानवतावाद म्हणतात. सगळेच माझे माझे म्हणून कसं चालेल! दुसर्‍यांच्या दुःखाचाही विचार करायला हवा. त्यासाठी आपण एक रात्र जागरण करून लसकेंद्रावरील रांगेत टोकन मिळवण्यासाठी साधा नंबर लावू शकत नाही? आज आपला देश आंतरराष्ट्रीय नकाशावर किती उच्च स्थानावर गेला आहे, हे पाहायला टेबलावर उभा राहून भिंतीवर टांगलेला आंतरराष्ट्रीय नकाशा पाहा. धडपडू नकोस. देशाचे पाय मजबूत असतील तर दंडावरील लस घेण्यास कष्ट पडले तर ते भोगायला हवे. आणि प्रमाणपत्रावर फोटो कुणाचा आहे, याचा अजिबात विचार करू नकोस. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर बसलेला त्यांच्या रेडियोचा आवाज आता खरखरत नाही. त्याला हळूहळू धार चढतेय. टोकिओ ऑलिम्पिकनंतर भाला जणू आपणच फेकला आणि सुवर्णपदक जिंकले ही भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण करण्याचे काम मोदींनीच केले हे कसे विसरता येईल? आज पदकांची सप्तपदी लाभली. महिला हॉकी टीम जिंकली असती तर अष्टपदीचे भाग्य मिळाले असते. त्या सर्वांची प्रेरणा मोदीच होते. त्यांच्या एका छायाचित्राने जर प्रेरणा मिळत असेल तर छायाचित्रे लस प्रमाणपत्रावरच नव्हे, तर सार्‍या देशाच्या कानाकोपर्‍यात लागली पाहिजेत. आपला ऑलिम्पिकचा संघ मायदेशी आल्यावर दिल्ली विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर तेथील अशोका हॉटेलमध्ये ज्या हॉलमध्ये त्या विजेत्या खेळाडूंचे भिंतीवरील फोटो सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होते, पण त्या सार्‍या खेळाडूंच्या फोटोंपेक्षा मोठा असलेला पंतप्रधान मोदींचा देदीप्यमान फाेटो तर पदकांचे खरे प्रेरणास्थान कोण आहे हे दर्शवीत होता. त्यामुळे लस प्रमाणपत्रावरील मोदीसाहेबांचे छायाचित्र हे देशाचे आणि लसीचे प्रेरणास्थान आहे, हे तू का लक्षात घेत नाहीस, असा प्रश्न विचारल्यावर पोक्या भडकला आणि म्हणाला, इतर कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाने लसीकरण प्रमाणपत्रावर आपला फोटो छापला नाही, मग यांनीच का छापला. एक वेळ ज्याने जगाला या आपत्तीत लोटण्याचे महापातक केले त्या कोरोना या सूक्ष्म जिवाणूचा फोटो चालला असता पण मोदींचा नको होता… बोलण्याच्या नादात पोक्याने नकळत मोदीजींची तुलना कशाशी केली, ते लक्षात येऊन मी कपाळाला हात लावला.

Previous Post

२१ ऑगस्ट भविष्यवाणी

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

टपल्या आणि टिचक्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.